राजकारणात अनेकदा जीवनमूल्यांशी तडजोड केली जाते. राजकारणाचा हा भागच आहे, म्हणून त्याचे समर्थन केले जाते. जे अशा प्रकारचे समर्थन करीत नाहीत, त्यांचे नाव ‘हरीभाऊ ऊर्फ नाना बागडे’होय. उपजत नेतृत्वगुण, कर्तृत्व, संघटन कौशल्य, संघसंस्कार आणि जिभेवर साखर यामुळेच ते अल्पावधीत सर्वांचे लाडके ‘नाना’ झाले. या व्यापात त्यांनी कधी ‘विवेक’चा ऋणानुबंध क्षणभरदेखील कमी होऊ दिला नाही. सा. विवेक परिवारातर्फे हरीभाऊ यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल अनंत शुभेच्छा!
हरीभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त ऐकून ‘सा. विवेक’ला खूप आनंद झाला. या आनंदाचे कारण असे की, 1964-65 साली हरीभाऊ ‘सा. विवेक’चे पूर्णकालीन काम करीत होते. मराठवाड्यातील गावोगावी ‘विवेक’ नेण्याचे काम त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक केले. त्यानंतर त्यांच्याकडे जनसंघाचे काम आले आणि पुढे भाजपा झाल्यानंतर भाजपाचे काम आले. उपजत नेतृत्वगुण, कर्तृत्व, संघटन कौशल्य आणि जिभेवर साखर असल्यामुळे काही वर्षांतच हरीभाऊ हे नाव मागे पडले आणि ते सर्वांचे ‘नाना’ झाले. ‘विवेक’चा ऋणानुबंध त्यांनी क्षणभरदेखील कमी होऊ दिला नाही. त्यांचे राजकीय जीवन पायरी-पायरीने प्रगत होत गेले. राजकारणाच्या गराड्यात ‘विवेक’चा प्रतिनिधी त्यांना भेटायला गेला तर सर्व कामे बाजूला ठेवून ते त्याची भेट घेत आणि सर्व प्रकारचे सहकार्य करीत.
हरीभाऊ ऊर्फ नाना हे मूलतः संघ स्वयंसेवक आहेत. स्वयंसेवक ही मिरविण्याची गोष्ट नसून ती जगण्याची गोष्ट आहे. स्वयंसेवक म्हणजे शंभर टक्के विचारनिष्ठ, शंभर टक्के मूल्यनिष्ठ आणि शंभर टक्के आचारनिष्ठ. राजकारणाविषयी असे म्हटले जाते की, माणसाचे झपाट्याने पतन घडवून आणणारे हे क्षेत्र आहे. सत्ता, संपत्ती, अधिकार लालसा आणि सुखासीन जीवनात राहणारी सवय राजकारणी माणसांना जडत जाते. अशा वेळी अनेक जीवनमूल्यांशी तडजोड केली जाते. राजकारणात असेच चालते, असे म्हणून अशा सर्वांचे समर्थन केले जाते. जे अशा प्रकारचे समर्थन करीत नाहीत, त्यांचे नाव असते ‘हरीभाऊ ऊर्फ नाना बागडे’.
त्यांनी आपली आत्मकथा लिहावी, हा विषय घेऊन मी त्यांना एकदा भेटलो. पहिल्या भेटीतच ते मला म्हणाले, “रमेशजी, आत्मकथा म्हणजे स्वतःविषयी काही लिहिणे, ते मला कसे जमणार? मी संघ स्वयंसेवक आहे. संघ स्वयंसेवक मी, माझे, माझ्यामुळे झाले, अशा प्रकारची भाषा वापरीत नाही.” त्यांचे म्हणणे शंभर टक्के बरोबर होते. मी त्यांना म्हणालो, “दामुअण्णा दाते (ज्येष्ठ दिवंगत संघ प्रचारक) यांना जेव्हा मी सुचविले होते की, त्यांनी आपले अनुभव शब्दबद्ध करावेत, तेव्हा त्यांनीदेखील हेच उत्तर दिले होते. वरिष्ठ अधिकार्यांची अनुमती मी मिळविली आणि दामुअण्णांच्या जीवनानुभवाचे ‘स्मरणशिल्प’ प्रकाशित झाले.
हरीभाऊंना हा किस्सा मी सांगितला आणि म्हटले की, एका ज्येष्ठ प्रचारकाने वाट दाखविली आहे, तेव्हा तुम्हाला लिहायला काही हरकत नाही. ते आत्मस्तुतीचे चरित्र होणार नाही, हे आपण बघू. हरीभाऊंच्या जीवनप्रवासाचे ‘माझा प्रवास - संघ, जनसंघ, भाजपा‘ पुस्तक प्रकाशित झाले. राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना अर्थात त्यांनी वाचले तर खूप प्रेरणा आणि दिशा देणारे हे पुस्तक आहे. भाजपा हा विचारनिष्ठ, आचारनिष्ठ आणि मूल्यनिष्ठांचा पक्ष कायम ठेवण्यात हरीभाऊंचे योगदान अतिप्रचंड आहे.
राजस्थानचे राज्यपाल पद ते आता भूषविणार आहेत. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, असा सर्व उदंड अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. राज्यपाल पद हे सांविधानिक पद आहे. संविधानाप्रमाणे राज्यपाल राज्याचा प्रमुख असतो. सामान्य स्थितीत राज्यपालांकडे कार्यकारी अधिकार नसतात, ते मुख्यमंत्र्यांकडे असतात; परंतु राज्यात केव्हा केव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की, संविधानाच्या मार्गदर्शक कायद्याप्रमाणे शासन चालविणे शक्य होत नाही. अशा वेळी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली जाते. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी राज्यपाल असतात. राज्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते. सामान्य स्थितीत राज्यपाल राज्यातील वडीलधारी व्यक्ती असते. तिच्या वडीलकीचा आणि सांविधानिक पदाचा आदर आणि सन्मान केला जातो. काही वेळेला वाचाळ राजकारणी राज्यपालांविरुद्ध श्वानसूर काढीत असतात. ते पूर्णतः अयोग्य आहे.
मृदुभाषी, मनुष्यस्वभावाची उत्तम पारख असलेले हरीभाऊ ऊर्फ नाना आपल्या कामात शंभर टक्के यशस्वीच होतील. आपला देश खेड्यांचा देश आहे. खेड्यातील माणूस शहरातील माणसासारखा एक वेळ सतराशे साठ विषयांची माहिती ठेवणारा नसतो; पण त्याच्याकडे उपजत शहाणपण असते. त्याला ग्रामीण शहाणपण म्हणतात. हरीभाऊंचा जन्म, शिक्षण चित्तेपिंपळगाव या छोट्याशा गावातच झाले आहे. राजकीय अनुभवाच्या शहाणपणाबरोबर ग्रामीण शहाणपणाची जोड त्यांना लाभलेली आहे. हे ग्रामीण शहाणपण सर्व भारतभर एकसारखं आहे. खेडूत हा महाराष्ट्रातील असो की राजस्थानातील असो, अनेक बाबतीत तो एकसारखाच विचार करतो. यामुळे हरीभाऊ अल्पावधीत राजस्थानी जनतेच्या मनात स्थान मिळवतीलच.
असाही राजस्थान आणि महाराष्ट्र यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे राजस्थानातील सिसोदिया वंशातील होते, असे संशोधक सांगतात. राजस्थान हा महाराष्ट्राप्रमाणे भारतमातेचा खड्गहस्त आहे. राजस्थानला पराक्रमाची आणि शौर्याची तसेच भक्तीचीही महाराष्ट्राप्रमाणे थोर परंपरा आहे. हरीभाऊ महाराष्ट्र आणि राजस्थान यांचे हे भावनिक नाते त्यांच्या कार्यकाळात अधिक दृढ करतील.
देशाचा विचार करता सध्या आपण एका संक्रमण कालखंडातून जात आहोत. एका बाजूला राष्ट्रविरोधी शक्तींचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. विविध प्रकारे आणि विविध माध्यमांतून तो व्यक्त होत आहे. महाराष्ट्राचाच विचार करायचा तर जातवादाचे भूत महाराष्ट्रात जागृत झालेले आहे. तेही अशा महाराष्ट्रात जिथून जातिनिर्मूलन चळवळीचा जन्म झालेला आहे. या क्षणी आपल्या देशाला एकात्मतेची आणि सार्वत्रिक बंधुभावनेची सार्वत्रिक गरज आहे. हरीभाऊ संघ स्वयंसेवक असल्यामुळे ही गरज ते फार उत्तम प्रकारे जाणतात. राजस्थानात राष्ट्रवादी शक्तींचाच प्रभाव वाढेल, याकडे ते लक्ष देतील, यात काही शंका नाही.
एक व्यक्ती म्हणून हरीभाऊंचा विचार करता संघउद्यानातील ते सुवर्णकमळ आहेत, असे म्हणायला पाहिजे. कमळाचे वैशिष्ट्य असे असते की, ते पाण्यात आणि चिखलात उगवते; परंतु कमळाकडे बघितले असता कमळावर चिखलाचा डागही नसतो आणि पाण्याचा एक थेंबही नसतो. पाण्यात आणि चिखलात राहूनही त्यापासून अलिप्त राहणे हे कमळाचे वैशिष्ट्य आहे. अलिप्त राहून आपल्या मोहक आकाराने सर्वांना आकर्षित करून घेणे आणि मंद सुगंधाची दरवळ सगळीकडे पसरविणे हे कमळाचे वैशिष्ट्य आहे. हरीभाऊंचे व्यक्तित्व असे आहे. म्हणून त्यांना सुवर्णकमळ म्हणायचे.