शुभ दक्षिणायन!

30 Jul 2024 16:42:12
 @वैद्य ज्योत्स्ना पेठकर
आपल्या संस्कृतीत प्रथा अत्यंत जाणीवपूर्वक पेरलेल्या आहेत, ज्यात फक्त आपलाच नाही तर संपूर्ण सृष्टीचा विचार केलेला आहे. आषाढ अमावस्येची गटारी करून मूळ संकल्पनेच्या ज्ञानाच्या उद्देशाला फार मोठा तडा बसलाय आणि म्हणूनच की काय, तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी ‘स्वास्थ्याची’ वानवा जाणवते, कारण या समृद्ध चालीरीतीमागील मूळ ज्ञान जाणून घेतले जात नाही, त्यामुळे काही वेळा फक्त चालीरीती पाळल्या जातात, तर काही ठिकाणी ते मागासलेपण म्हणून डावलले जाते. यात तोटा आपलाच आहे, कारण डावलले जातेय ते ज्ञान.
Ashadhi Amavasya 2024
 
आपल्या अस्तित्वाशी निगडित अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘काळ’!
 
चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या गतीसापेक्ष काळ बदलतो आणि त्याचे परिणाम निसर्गावर तसेच आपल्यावरदेखील होत असतात. या बदलांप्रमाणे स्वत:त बदल करणे किती गरजेचे आहे हे माणसाच्या लक्षात येऊ लागले तसे या बदलांना बिंबवण्यासाठी त्या त्या विशिष्ट वेळी विविध सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली असावी. खगोलीय ज्ञान, ऋतू आणि त्यातून होणारे बदल यांचे ज्ञान देणारे हे सण, या प्रथा अथवा चालीरीती आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनत गेल्या. सगळ्यांचा उद्देश एकच - ‘काळ लक्षात ठेवून त्याप्रमाणे बदल करणे’!
 
 
पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे आपण दक्षिणायन-उत्तरायण अनुभवतो. ज्याच्या तेजाशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही त्या सूर्याचे ‘उत्तरायण’ आपण सगळेच आनंदाने साजरे करतो. त्याचे उत्तरायण ग्वाही असते जीवन पुन्हा बहरण्याची!
 
उत्तरायणाप्रमाणेच महत्त्वाचे असते ‘दक्षिणायन’.
 
ऋततो दक्षिणायनम्
 
वर्षादयो विसर्गश्च यद्बलं विसृत्यम् - वाग्भट सूत्र स्थान 3/4
 
वर्षा, शरद आणि हेमंत दक्षिणायनाचे हे तिन्ही ऋतू समस्त प्राणिमात्रास बळ देणारे असतात. म्हणूनच याला आयुर्वेदात ‘विसर्ग काल’ म्हणतात.
 
हिवाळा तब्येत उत्तम करण्याचा ऋतू असतो हे आपल्याला माहीत असते; पण त्या विशिष्ट ऋतूतील गुणधर्म वापरून घ्यायचे असतील तर त्याआधीचे दोन्ही ऋतूदेखील तितकेच महत्त्वाचे असतात आणि त्या ऋतूतील ऋतुचर्यापालनदेखील.
 
काळाप्रमाणे वागण्याचे ज्ञान, त्याचे महत्त्व पूर्वसुरींनी वेगवेगळ्या अर्थपूर्ण पद्धतींनी बिंबवण्याचा प्रयत्न केला, त्यापैकीच एक समृद्ध परंपरा ‘दिव्याची अवस’!
 
वर्षभरात एकूण 12 अमावस्या येतात. (दर तीन वर्षांनी अधिकाची एक अधिक अमावस्या असते.) प्रत्येकच अमावस्या अंधाराची असते, मग आषाढातल्या याच अमावस्येला फक्त का दिव्यांची पूजा करायची? ही अमावस्या खास आहे, कारण ती असते दक्षिणायनाच्या प्रारंभी! परिवर्तनाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
 
Ashadhi Amavasya 2024 
 
इथून पुढे जे विशिष्ट बदल होत जाणार आहेत त्यांना लक्षात ठेवण्यासाठी ही अमावस्या दिव्याचे प्रतीक वापरून साजरी करायची.
वर्षादी ऋतूंपैकी शरदाचे काही दिवस सोडले तर हळूहळू दिवस कमी होत जाऊन रात्र म्हणजे अंधार वाढीस लागणार हे सूतोवाच दक्षिणायन करत असते. वीज नसलेल्या काळात हळूहळू वाढत जाणार्‍या अंधारात आधार असणार्‍या प्रकाशाच्या स्रोताला - दिव्याला अर्थातच महत्त्व असणार आणि त्याबद्दल कृतज्ञतादेखील!
 
 
‘कृतज्ञता’ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. वटपौर्णिमा असो, बैल पोळा असो, नागपंचमी असो, गुरुपौर्णिमा असो किंवा दिव्याची अमावस्या असो, सजीव-निर्जीव सगळ्याच घटकांचे आपल्या जीवनातील महत्त्व जाणून त्यांच्या प्रति त्या त्या विशिष्ट काळात काही पद्धतींद्वारे कृतज्ञता व्यक्त केली गेली. संस्कृतीतून जपला जाणारा हा कृतज्ञतेचा भाव निसर्गातील प्रत्येक घटकाशी ‘साहचर्य’ स्थापित करतो, परस्परावलंबित नात्याला अधोरेखित करतो. या सगळ्या गोष्टी त्याच ‘डोळस’पणे आपण साजरे करतो तेव्हा नकळतपणे आपण खगोलीय ज्ञान, भौगोलिक ज्ञान, आहार आणि पचनशास्त्र यांच्याशी जोडले जात असतो जे आपल्या स्वस्थ आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
 
 
दिव्याची प्रतीकात्मक पूजा ‘प्रकाशाच्या’ महत्त्वासाठी जशी आहे तशीच ‘अग्नीच्या’ महत्त्वासाठीदेखील. ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ या न्यायाने आकाशस्थ अग्नी जसा झाकोळला जातो तसाच पोटातलाही. त्यामुळे अन्न पचण्याचा वेग मंदावतो. परिवर्तनासाठी अत्यंत आवश्यक असतो अग्नी; निसर्गात आणि शरीरात दोन्हीकडे!
 
 
लक्षात ठेवायचे आहे की, दक्षिणायनच्या प्रारंभी, विशेषत: वर्षा ऋतूत दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशासारखा पोटातला अग्नीदेखील मिणमिणता आहे. त्याला झेपेल इतकेच काम द्यायचे आहे. म्हणजेच पचायला जड पदार्थ खायचे नाहीयेत. मांसाहार, कडधान्ये, पोहे, साबुदाणा, चुरमुरे, भेळ इत्यादी पचायला नियमित खाण्याचे पदार्थ या दिवसांत ठरवून वर्ज्य करावेत. तर इडली, डोसा, ढोकळा, ब्रेड, दही इत्यादी आम्लता वाढवणारे पदार्थदेखील वर्ज्य करावेत. अन्यथा ‘अपचन’ सुरू होते. अतिशय गृहीत धरले जाणारे अपचन अनेक रोगांचे मूळ कारण असते.
 
 
या मुळाला रुजू द्यायचे नाही. यासाठी योजना झाली चातुर्मासाची! आषाढापासून पुढे चार महिने जेव्हा अग्नी मंद असेल तेव्हा जास्तीत जास्त लंघन करावे. फळं, कंदमुळे खावीत, पित्ताची आम्लता वाढवणारा लसूण वर्ज्य करावा, शीत वीर्य असलेला कांदा वर्ज्य करावा, असे चातुर्मासाचे स्वरूप अपेक्षित असते. अर्थात साबुदाणा, वरईसारखे पचायला जड आणि आम्लता वाढवणारे पदार्थ खाऊन काही जण चातुर्मासाचा अपव्यय करत अनेक आजारांच्या मुळाला खतपाणी घालतात हा भाग वेगळा.
 
Ashadhi Amavasya 2024 
 
आषाढ अमावस्येनंतर येणार्‍या नागपंचमीला अन्न न चिरता, न तळता, न भाजता केवळ ‘वाफवून’ खाण्याची प्रथादेखील या ‘पाचकाग्नीला’ अनुसरून! अन्न शिजवण्याच्या या पद्धतीचे खूप फायदे आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अन्नातील अत्यंत पोषक अशी जीवनसत्त्वे राखली जातात. या सगळ्याचा उद्देश अगदी साधा आणि सरळ - आपण आजारी न पडता उत्तम स्वास्थ्य राखत छान जगावे.
 
नागपंचमी निमित्त आहे, ज्या प्रजातींमुळे शेती, धान्य राखले जाते त्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे. आषाढातील धो धो पावसात त्यांची बिळे पाण्याने तुडुंब भरली, की शीतरक्ताचे हे प्राणी उबेच्या शोधात माणसांच्या वसाहतीत शिरू शकतात. त्यांची भीती वाटून त्यांची हत्या होऊ शकते. ती होऊ नये म्हणून त्यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करण्याचा प्रघात पडला. यातूनही उद्देश एकच - अन्नसाखळी जपत निसर्गचक्राचा समतोल साधायचा.
 
 
आषाढ अमावस्येची गटारी करून मूळ संकल्पनेच्या ज्ञानाच्या उद्देशाला फार मोठा तडा बसलाय आणि म्हणूनच की काय, तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी ‘स्वास्थ्याची’ वानवा जाणवते, कारण या समृद्ध चालीरीतीमागील मूळ ज्ञान जाणून घेतले जात नाही, त्यामुळे काही वेळा फक्त चालीरीती पाळल्या जातात, तर काही ठिकाणी ते मागासलेपण म्हणून डावलले जाते. यात तोटा आपलाच आहे, कारण डावलले जातेय ते ज्ञान.
 
 
Ashadhi Amavasya 2024
 
आपल्या संस्कृतीत प्रथा अत्यंत जाणीवपूर्वक पेरलेल्या आहेत, ज्यात फक्त आपलाच नाही तर संपूर्ण सृष्टीचा विचार केलेला आहे.
पूर्वी नकळतपणे रुजल्या जाणार्‍या या गोष्टी आता मुद्दाम रुजवण्याची वेळ आली आहे. गेली अनेक वर्षे मुलांसोबत हे सगळे सण, त्यामागील खगोलीय, भौगोलिक आणि स्वास्थ्याशी निगडित ज्ञान जाणून घेत साजरे करतोय आणि त्याचे परिणामदेखील दिसत आहेत. मुलं संस्कृतीशी फक्त नव्हे तर ज्ञानाशी जोडली जात आहेत.
 
 
पितळ, चांदी, तांबे, पंचधातू, मेण आणि माती यांनी ‘नंदादीप, लामणदिवा, समई, निरांजन, पणती, ओळण दिवा, कंदील, चिमणी’ अशा अनेक रूपांत प्रकाशाच्या वाटा उजळतात. ती सगळी रूपे एकत्र मांडून, त्यांची मनोभावे पूजा करून मनावर आणि बुद्धीवर बिंबवले जाते की, इथून पुढे अग्नी मंद असणार आहे, त्याप्रमाणे आहार योजायचा आहे. बटणाच्या एक क्लिकवर आपण झगमगाट करू शकतो; पण पोटातला अग्नी मात्र त्या मिणमिणत्या दिव्याइतकाच असणार आहे हे लक्षात ठेवायला हवे. अग्नी आहे म्हणून आपले अस्तित्व आहे आणि म्हणूनच त्याबद्दल कृतज्ञ राहायचे आहे.
 
 
दक्षिणायनाचा विसर्गकाल आपल्याला भरपूर काही देणारा आहे, ते घेण्यासाठी सज्ज होऊ या ‘डोळसपणे’!
 
शुभ दक्षिणायन!
Powered By Sangraha 9.0