मानव, दानव आणि महाराष्ट्र

26 Jul 2024 17:12:09
shyam manav
 पुढील दोन-तीन महिन्यांत असे अनेक मानव आणि दानव भाजपाविरोधात पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यांच्या जाळ्यात न अडकता, हिंदुत्व विचार परिवारातील कार्यकर्त्यांचे भावविश्व जपणारी, त्यांना ऊर्जा व प्रेरणा देणारी हिंदुत्ववादी इकोसिस्टीम नव्या जोमाने कार्यान्वित होणे, ही आज महाराष्ट्राची मोठी गरज आहे. या गरजेची पूर्तता कशी होते, यावर महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.
  
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ येताच महाविकास आघाडीने आपला जुनाच खेळ पुन्हा एकदा सुरू केल्याचे दिसते. आपली समाजात कोणत्याच प्रकारची विश्वासार्हता उरलेली नसल्याने, आपल्या म्हणण्याला कोणताच नैतिक आधार उरलेला नसल्याने राजकारणातील चिखलफेक अ-राजकीय व्यक्तींकडून करवून घेणे हा या महाविकास आघाडीच्या पक्षांचा जुना फॉर्म्युला. कोणतीही निवडणूक जवळ आल्यानंतर या फॉर्म्युलाचे वेगवेगळ्या माध्यमांतून प्रकटीकरण होताना आपल्याला दिसते. स्वतःला डावे आणि पुरोगामी, सेक्युलर इत्यादी म्हणवून घेणारे लोक या फॉर्म्युल्याचे नैसर्गिक वाहक, कारण मुळात ही अ-राजकीय म्हणवणारी मंडळी वास्तवात ’अराजकीय’ प्रवृत्तीची असतात, हे अनेकदा दिसून आले आहे. श्याम मानव हे यातील ताजे उदाहरण.
 
पुस्तकात ३ खंडकाव्ये आणि १२ स्फुट काव्याचे रसग्रहण
क्रांती ऋचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण
https://www.vivekprakashan.in/books/poems-of-freedom-fighter-savarkar/
 
   
श्याम मानव हे महाराष्ट्रात ’विवेकवादी’ आणि ’सुधारणावादी’ म्हणवून घेणार्‍यांच्या यादीतील एक प्रमुख नाव. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी(?)चे नेतृत्व करणारा एक चेहरा म्हणून श्याम मानव महाराष्ट्राला परिचित आहेत; परंतु हाती घेतलेले हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सोडून श्याम मानव भलत्याच विषयात घुसले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आदी काही मंडळींना तुरुंगात टाकण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला होता, असे अजब आणि धक्कादायक विधान करून मानव मोकळे झाले. खरे तर हे विधान करणारे मानव कोण, त्यांचा या विषयातील अधिकार काय, या आरोपांचा पुरावा काय, आजच अचानक ते हे सगळे का बोलू लागले आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित व्हायला हवे होते; परंतु महाराष्ट्र हा ’पुरोगामी’ असल्याने येथील स्वयंघोषित पुरोगाम्यांनी कसेही काहीही बोलले तरी त्यावर प्रश्न न विचारण्याचा प्रघातच आहे. श्याम मानव कोणताही संबंध नसताना इतक्या खालच्या स्तरावर गरळ ओकून बसले तरी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांना कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. ’मी मानव यांना अनेक वर्षे ओळखतो, असे आरोप करण्याआधी त्यांनी किमान माझ्याशी बोलायला तरी हवे होते’ इतकेच म्हणून मानव यांचा विषय फडणवीसांनी संपवला. फडणवीस यांच्या सुसंस्कृत स्वभाव-प्रकृतीला हे साजेसेच. उद्या कदाचित मानव यांनी आणखी काही चिखलफेक केली तरी फडणवीस त्यांच्या वय-ज्येष्ठत्वाचा शक्य तितका सन्मान ठेवतील, ते स्वतः मानव यांच्या पातळीवर उतरणार नाहीत, हेही फडणवीसांना ओळखणार्‍या सर्वांना माहिती आहे. शिवाय, फडणवीसांवर कितीही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले तरी त्यांचा सामना करायला ते समर्थ आहेत, हेही आपण जाणतो. तरीदेखील येथे आधी उल्लेखलेला प्रश्न अनुत्तरितच राहतो की, मुळात हे असे बेछूट आरोप करणारे श्याम मानव कोण? त्यांचा यात संबंध काय आणि ते आताच हे सारे का बरळत आहेत?
 असे बेछूट आरोप करणारे श्याम मानव कोण? त्यांचा यात संबंध काय आणि ते आताच हे सारे का बरळत आहेत?
 
याचे उत्तरही सोपे आहे. ’इकोसिस्टीम’ कामाला लागलेली आहे. प्रत्येक लोकसभा वा विधानसभा निवडणुकीचा इतिहास काढून पाहिला तर आपल्याला हा पॅटर्न स्पष्टपणे दिसून येईल. कधी असहिष्णुतेचा मुद्दा उगवतो, कधी पुरस्कार-वापसीची भानगड सुरू होते, कधी ’संविधान खतरे में’ ही बांग सुरू होते, तर कधी आणखी काही. क्रमाक्रमाने समाजातील विविध मंडळी अचानकपणे यावर हिरिरीने बोलू लागतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही संविधानाच्या नावाखाली झालेला अपप्रचार आपण पाहिलाच. स्वतःला अ-राजकीय म्हणवत प्रत्यक्षात मोदी-भाजप-संघद्वेषाच्या राजकीय हेतूनेच प्रेरित असलेली आणि समाजात ’निर्भय बनो’चा बुरखा घेऊन वावरणारी अख्खी गँग महाराष्ट्रात कार्यरत होती. लोकसभा निवडणूक असल्याने तेव्हा स्वाभाविकच नरेंद्र मोदी त्या वेळी टार्गेट होते. आज टार्गेट आहेत ते देवेंद्र फडणवीस. म्हणूनच मनोज जरांगे यांचे सुरुवातीला मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भाषा करणारे आंदोलन कधी फडणवीसांच्या द्वेषाचे आंदोलन बनले ते अनेकांना कळलेच नाही; परंतु बारकाईने घटनाक्रम पाहिला तर हे सारे पूर्वनियोजित होते आणि या फडणवीस-द्वेषाचे बोलविते धनी कुणी वेगळेच होते, हे सहज लक्षात येते. आता यात श्याम मानव अवतरलेत.
 देवेंद्र फडणवीसांना खिंडीत गाठण्याचे झालेले अनेक प्रयत्न त्यांनी हाणून पाडलेच,  आजही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसच आहेत आणि विधानसभा निवडणुकीतही तेच केंद्रस्थानी राहणार आहेत. हा केंद्रबिंदू खच्ची केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, हे फडणवीस विरोधक चांगलेच जाणतात.
 
देवेंद्र फडणवीसांना रोखण्यासाठी शरद पवारांनी महाविकास आघाडीचा डाव टाकला. या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात या मंडळींनी महाराष्ट्राचा काय खेळखंडोबा करून ठेवला होता ते सार्‍यांनीच पाहिले. पुढे फडणवीसांना खिंडीत गाठण्याचे झालेले अनेक प्रयत्न त्यांनी हाणून पाडलेच, शिवाय महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांची चार शकलेही झाली. आजही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसच आहेत आणि विधानसभा निवडणुकीतही तेच केंद्रस्थानी राहणार आहेत. हा केंद्रबिंदू खच्ची केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, हे फडणवीस विरोधक चांगलेच जाणतात. म्हणून राजकारणाच्या पटलावर असे मानव अवतार घेऊ लागले आहेत. ही सुरुवात आहे. कदाचित पुढील दोन-तीन महिन्यांत असे अनेक मानव आणि दानव भाजपाविरोधात पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यांच्या जाळ्यात न अडकता, हिंदुत्व विचार परिवारातील कार्यकर्त्यांचे भावविश्व जपणारी, त्यांना ऊर्जा व प्रेरणा देणारी हिंदुत्ववादी इकोसिस्टीम नव्या जोमाने कार्यान्वित होणे, ही आज महाराष्ट्राची मोठी गरज आहे. या गरजेची पूर्तता कशी होते, यावर महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.
Powered By Sangraha 9.0