बायडन रिटायर्ड होत आहेत

विवेक मराठी    26-Jul-2024   
Total Views |
america 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक 5 नोव्हेंबर 2024 ला होऊ घातली आहे. त्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायडन यांना पक्षाकडून सुरुवातीस राष्ट्राध्यक्ष पदासाठी बिनविरोध पाठिंबा मिळाला होता; पण आता प्रकृती आणि अन्य कारणांमुळे बायडन यांनी निवडणूक उमेदवारीतून माघार घेऊन राजकीय सहचरी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता बायडन हे रिटायर्ड होत आहेत का? पुढील राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी होईपर्यंत तरी राष्ट्राध्यक्ष म्हणून राहणार का? यावर अमेरिकेतील राजकीय खेळी, डावपेच रंगत राहणार आहे. याचेच विश्लेषण करणारा हा लेख.
2024 साल हे जगभरातील अनेक प्रमुख राष्ट्रांच्या मध्यवर्ती निवडणुकांसाठी लक्षात राहणारे ठरणार आहे. जवळपास 97 देशांमध्ये अथवा युरोपियन युनियनसारख्या राष्ट्रसमूहामध्ये या वर्षी निवडणुका झाल्या. लक्षात राहणार्‍या निवडणुकांत अर्थातच भारताच्या लोकसभेच्या निवडणुका जशा आहेत, तशाच ब्रिटन, फ्रान्स, रशियाच्याही आहेत. त्याव्यतिरिक्त भारतीय उपखंडात पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही निवडणुका झाल्या; पण अजून एक लक्षात राहील अशी निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजे 5 नोव्हेंबर 2024 ला होऊ घातली आहे; पण त्याचे ताशेनगारे या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जोरात वाजू लागले आहेत, ती म्हणजे अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक, जी दर चार वर्षांनी होते.
 
 
अमेरिकन घटनेनुसार कोणतीही अमेरिकेत जन्माला आलेली आणि निवडणुकीच्या वेळेस नागरिक असलेली व्यक्ती ही सलग अथवा मध्ये अंतर असले तरी, केवळ दोनदाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकते. ह्या पदासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या पक्षीय निवडणुकांना सामोरे जावे लागते. पन्नास राज्यांत अशा निवडणुका होतात आणि त्यातून त्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार ठरतो. ट्रम्प हे 2020 मध्ये जरी बायडन यांच्याविरोधात लढून हरले असले तरी ह्या वेळेस ते परत उभे राहिले आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत.
 
 
जरी लिखित नियम नसला तरी अलिखित नियमाप्रमाणे, ज्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष हा त्याची पहिली मुदत पूर्ण करत असतो, त्याला परत एकदा उमेदवार होता येते आणि तेव्हा त्याला पक्षातून अंतर्गत आव्हान उभे राहत नाही, तर सर्व जण एकत्र येऊन त्याला पाठिंबा देतात. या अघोषित न्यायाने, बायडन ह्यांच्या दुसर्‍या वेळेस राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या लढतीसाठी डेमोक्रॅटिक पक्ष त्यांच्या मागे उभा होता. अपवाद फक्त रॉबर्ट केनेडी ज्युनियर ह्या केनेडी कुटुंबातील राजकारणी व्यक्तीचा होता. हे रॉबर्ट महाशय, ह्यांनी डेमोक्रॅटिक पक्षातून बायडन यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यांच्या लक्षात आले की, पक्ष आपल्या राष्ट्राध्यक्षाला वार्‍यावर सोडणार नाही. म्हणून हे महाशय पक्षातून बाहेर पडले आणि आता स्वतंत्र उमेदवार म्हणून राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा असफल प्रयत्न करत आहेत.
 
 
बायडन यांना जरी पक्षाकडून सुरुवातीस बिनविरोध पाठिंबा मिळाला असला तरी तो पूर्णपणे चिंताविरहित पाठिंबा होता असे नाही. त्याची कारणेदेखील तशीच होती. वयाची 81 वर्षे पूर्ण झालेले बायडन ह्यांना वयपरत्वे प्रकृतीची आव्हाने तयार होऊ लागली आहेत का, अशी शंका येऊ लागली होती. बोलताना अडखळणे, विसरणे, चुकीचे बोलणे हे चालू झाले होते. उदाहरणार्थ एकदा त्यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनाच राष्ट्राध्यक्ष म्हणून संबोधिले; पण त्याहीपेक्षा अधिक म्हणजे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची बायडन यांनी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्राध्यक्ष पुतिन नावाने ओळख करून दिली. आंतरराष्ट्रीय सभांमध्ये डुलक्या घेणे, जी-20 सारख्या राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत दुसरीकडेच पाहणे, तसेच दुसर्‍या महायुद्धाचा विजय दिवस फ्रान्समध्ये साजरा करताना सैनिकांकडे दुर्लक्ष करत निघून जाणे असे अनेक प्रकार होऊ लागले होते.
 

america 
अर्थात तरीदेखील या आणि अशा वागण्याकडे डेमोक्रॅटिक पक्ष अगदी सहजपणे दुर्लक्ष करत बायडन यांच्या प्रकृती आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवत तरी होता किंवा त्याहीपेक्षा वास्तवात विश्वास आहे असे दाखवत तरी होता; पण कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही, तशीच काहीशी अवस्था या संदर्भात झाली. जून 27 ला, राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये म्हणजे बायडन आणि ट्रम्प यांच्यामध्ये पहिली अधिकृत आणि प्रत्यक्ष (live) वादविवाद (debate) चर्चा झाली. या चर्चेदरम्यान हे सार्‍या देशाला स्पष्ट झाले की, कारणं काही असू देत, पण बायडन यांची प्रकृती ही राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या लढतीसाठी आणि अजून पुढे चार वर्षे राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी साथ देणारी असण्याची शक्यता शून्यवत आहे. या वेळेस पक्षीय राजकारणी आणि त्यांना पाठिंबा असणारे डावे अथवा डाव्या बाजूस झुकलेले विचारवंत, कलाकारांपासून ते अगदी सामान्य डेमोक्रॅटिक मतदारांबद्दल सर्वाना काळजी वाटू लागली. काळजी फक्त बायडन हरण्याची नव्हती, तर ट्रम्प सरळ सरळ निवडणुकीच्या आधीच जिंकणार याची होती. राजकीय आणि सामाजिक विचाराने दुभंगलेल्या या देशाच्या अर्ध्या जनतेला ट्रम्प येणे म्हणजे जगबुडीपेक्षाही भयावह आहे असे वाटते.
 
डेमोक्रॅटिकची सामायिक भीती हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागली आणि बायडन यांनी निवडणुकीतून पायउतार व्हावे, अशी मागणी करू लागली. वरकरणी बायडन हे मान्य करत नव्हते. माध्यमांत, बायडन पत्नी जील आणि कुटुंबीय हे त्यांना सत्तेच्या भुकेमुळे माघार घेऊ देत नाहीत, असे येत होते. दुसरी अशी पण चर्चा चालू होती की, डेमोक्रॅट्समध्ये अंतर्गत सत्तास्पर्धा चालू होती, की बायडन नाही तर कोण? कारणे काही असली तरी ही कहाणी पुढे जात नव्हती. पुढे जात होती ती फक्त ट्रम्प यांची लोकप्रियता. निवडणुकीचे अंदाज ट्रम्प हे बायडनविरोधात सहज जिंकणार हे स्पष्ट होऊ लागले होते. निवडणुका ह्या पैशाशिवाय लढता येत नाहीत आणि त्यासाठी अमेरिकन राजकारण्यांना कोट्यवधी डॉलर्स गोळा करावे लागतात. ट्रम्प जिंकण्याच्या शक्यतेमुळे रिपब्लिकन समर्थक जोमात मदत करू लागले, तर बायडन समर्थक मात्र कमी होऊ लागल्याने डेमोक्रॅटिक पैसे गोळा करण्यात कमी पडू लागले. मग हळूहळू पक्षातले वरिष्ठ नेतेही बायडन यांना पुनर्विचार करायचा आग्रह करू लागले. एका क्षणी बायडन म्हणाले की, जर आजारी पडलो तरच मी पायउतार करण्याचा विचार करेन. त्यानंतर खरे का खोटे कळणे शक्य नाही; पण त्यांना अचानक कोव्हिड झाला आणि ते जनतेपासून दूर झाले. त्यांच्यावर उपचार करणे चालू झाले.
 


america 
इथल्या पद्धतीनुसार दोन्ही पक्ष आपापली राष्ट्रीय अधिवेशने जुलै-ऑगस्टमध्ये घडवून आणतात. रिपब्लिकन पक्षाचे चारदिवसीय अधिवेशन हे 15 ते 18 जुलैला विस्कॉन्सिन या राज्यात होणार होते. तसे ते पार पडले. त्याआधी ट्रम्प यांनी जे.डी. व्हान्स यांना उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडले. व्हान्स हे माजी सैनिक, येल विद्यापीठातून वकिली शिक्षण घेतलेले, ज्यांनी त्यांच्या अतिसामान्य बालपणावरून लिहिलेल्या Hillbilly Elegy - Memoir of a Family and Culture in Crisis पुस्तकामुळे नावाजलेले असल्याने, ट्रम्प यांच्या बाजूने उत्साह अजूनच द्विगुणित झाला. त्यात भर म्हणून ट्रम्प यांचे अधिवेशनातील भाषण हे अमेरिकेला एक करण्याचे आव्हान करत होते आणि लोकांना त्यांनी गोळी लागलेली असतानादेखील दाखवलेले धैर्य पाहिले होते. थोडक्यात, दिवसेंदिवस बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या पायाखालील वाळू सरकतच होती. अशा पार्श्वभूमीवर शेवटी बायडन यांनी 21 जुलैला त्यांचा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय त्यांनी केवळ स्वतःचे नाव असलेल्या लेटरहेडवर (जे व्हाइट हाऊसचे अथवा निवडणूक प्रचाराचे लेटरहेड नव्हते) जाहीर केले. त्या वेळेस ते टीव्ही, यूट्यूब, समाजमाध्यमे अथवा रेडिओवर आले नाहीत. त्यांचा निर्णय त्यांनी कथित माहितीनुसार त्यांच्या कॅबिनेटमधीलदेखील कुणा मंत्र्याला सांगितले नव्हते. बायडन यांच्या चीफ ऑफ स्टाफकडून ही बातमी त्यांना कळली. अशा प्रकारच्या गोपनीयतेमुळे काही काळ बायडन यांच्या हयात असण्यावरूनच समाजमाध्यमे आणि विशेष करून राजकीय उजव्या बाजूचे शंका घेऊ लागले होते. मात्र 24 तारखेला त्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि या सर्व कपोलकल्पित कथांवर पडदा पडला. बायडन यांनी आधी पत्रातून ते निवडणुकीतून लांब गेले इतकेच सांगितले. जे काही वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत त्यात अनेक राजकीय व्यक्तींची अपेक्षा होती की, बायडन नुसते निवडणुकीतून दूर होतील आणि त्यांना त्यांच्या मनासारखा उमेदवार ठरवता येईल; पण बायडन यांनी अचानक खेळी खेळली आणि नंतर काही वेळेतच त्यांनी त्यांच्या जागी त्यांच्या राजकीय सहचरी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर केला. परिणामी इतर बहुतांशी नेत्यांनी कमला हॅरिसना पाठिंबा जाहीर केला त्यात क्लिटंन दाम्पत्यही आहे. त्याला पर्याय नव्हता. तरीदेखील ओबामा दाम्पत्य अजूनही गप्प आहे. हे राजकारण ऑगस्टमध्ये डेमोक्रॅटिक अधिवेशन होईपर्यंत कमीअधिक फरकाने चालू राहील. मात्र कमला हॅरिस यांनी उमेदवारी जाहीर होताक्षणी 80 मिलियन्स डॉलर्स गोळा केले आणि अनेकांचा पाठिंबा मिळवला, त्यामुळे गोष्टी बदलल्या. कमला हॅरिस ह्या जरी राष्ट्राध्यक्ष झाल्या, तरी त्यांच्यावरील अतिडाव्या प्रभावामुळे अमेरिका-भारत संबंध कसे असतील हे पाहण्यासारखे असेल. त्यावर तूर्त भाष्य करणे टाळूयात.
 
 
बायडन यांनी निवडणूक उमेदवारीतून माघार घेतली असली तरी ते अजूनही राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांची तब्येत अजून ढासळली तर ते पायउतार होतील म्हणून अथवा अमेरिकन 25 व्या घटनादुरुस्तीने कॅबिनेट ठराव करून त्यांना राष्ट्राध्यक्ष पदापासून दूर करतील आणि सध्याच्या उपाध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. बायडन हे रिटायर्ड होत आहेत का? पुढील राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी होईपर्यंत म्हणजे 20 जानेवारी 2025, दुपारी 12 पर्यंत राष्ट्राध्यक्ष म्हणून राहत आहेत. यावर अमेरिकेतील राजकीय खेळी, डावपेच आणि स्पर्धा रंगत राहणार आहे.