नुकताच साहित्य अकादमीचा युवा साहित्यकार पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या ‘उसवण’ या कादंबरीस जाहीर झाला. 2022 साली ही कादंबरी देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. यांनी प्रकाशित केली. एकशे सोळा पानांच्या या छोट्या कादंबरीत लेखक देवीदास सौदागर यांनी मागच्या तीस-पस्तीस वर्षांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समाजजीवनाची घट्ट वीण उसवू लागली. त्याचे परिणाम दृश्य स्वरूपात समोर येण्याच्या काळात साहित्य रूपात ते वाचकांसमोर येत आहेत.
जागतिकीकरणाचे परिणाम छोट्या छोट्या गावांत जाणवू लागले. त्यामुळे गावगाडा विसविशीत झाला. गाव आणि गावगाडा खिळखिळा झाला आणि छोटे कौशल्याधारित उद्योग मोडकळीस आले. तरीही निष्ठेने काम करत राहणार्या माणसाची ही गोष्ट आहे.
विठू टेलर नावाच्या शिंपीकाम करणार्या माणसांची परवड कशी होते आणि त्यांच्या जीवनात आलेल्या हताशपणाचे सावट दूर करण्यासाठी त्याचे निकराने प्रयत्न कशा प्रकारचे असतात. याचे चित्रमय वर्णन या कादंबरीत अनुभवता येते. ही विठू नावाच्या नायकाची गोष्ट असली तरी ती केवळ त्याच्यापुरती मर्यादित न राहता तो, त्याचे घर, त्याचे गाव, त्या गावातील सामाजिक- राजकीय वातावरण, जागतिकीकरणाच्या लोंढ्यात वाहत जाणारी ग्रामीण व्यवस्था व माणुसकीचा आटत चाललेला प्रवाह या गोष्टी प्रकर्षाने समोर येतात.
पन्नास वर्षांपूर्वी रा. रं. बोराडे यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीचा नायक शिंपीकाम करणारा आहे. मात्र दोन्ही कादंबर्यांतील जीवनसंघर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवरचा आहे. ‘पाचोळा’तील नायक हा गर्विष्ठ आहे. आपल्या कौशल्य आणि कामाला पर्याय नाही. त्यामुळे तो अडेलतट्टू भूमिका घेताना दिसतो, तर ‘उसवण’मधील विठू टेलर हा परिस्थितीने गांजला आहे. रेडीमेड कपड्यांची सहज उपलब्धता ही त्याची समस्या असून त्याच्या छोट्या गावातही रेडिमेड कपडे उपलब्ध होऊ लागल्याने त्याच्या शिवणकामास उतरती कळा लागली आहे. बेतून कपडे शिवणारे कमी झाले आणि उसवण, ठिगळ अशी फुटकळ कामे त्याला करावी लागतात आणि त्यातून मिळणार्या तुटपुंज्या उत्पन्नातून संसाराचा गाडा पुढे न्यावा लागतो. त्याला त्याच्या पत्नीची खंबीर साथ लाभते आहे. परिस्थितीचा अचूक वेध घेऊन पुढे जाणारी, सकारात्मक दृष्टिकोन असलेली विठू टेलरची पत्नी गंगा ही आजच्या काळात आदर्श वाटावी अशी आहे. धंदा चालत नाही म्हणून खंतावलेल्या विठूचे मनोधैर्य वाढवत ती त्याला साथ देते, तर विठूची दोन लेकरे- एक मुलगा सुभाष आणि मुलगी नंदा यांचे भावविश्व आणि समकालीन वास्तव यांचा सुरेख आलेख या कादंबरीत वाचता येतो.
उद्ध्वस्त झालेल्या गावगाड्याला जडलेल्या विविध व्याधीही लेखक मोठ्या खुबीने मांडतो. गावात वेगवेगळ्या रंगांचे झेंडे दिसू लागतात. वेगवेगळ्या झेंड्यांखाली समाज विभागला जातो. सामाजिक ताणतणाव वाढतो आणि उसवलेल्या झेंड्याला शिवण घालण्याचे काम विठू टेलर करतो. ही सामाजिक उसवण त्याला अस्वस्थ करत राहतो. सामाजिक विभागणी राजकीय दबावगटाला जन्म देतात आणि एकाच गावात गुण्यागोविंदाने राहणारे लोक एकमेकांशी वैरभावाने वागू लागतात. मारामारी होते, पोलीस केस होतात.म्हातारी माणसं या परिस्थितीने हतबल होतात, तर तरुण अधिक आक्रमक होतात. एकूणच गावगाड्याची झालेली ही उसवण कशी शिवून घ्यायची, हा काळाने उभा केलेला प्रश्न गंभीर भविष्यकाळ अधोरेखित करतो. छोट्या गावात झालेली ही सामाजिक विभागणी आपल्या एकूणच सामाजिक जीवनाची लिटमस टेस्ट आहे, असे लेखक सहजतेने अधोरेखित करतो. गावातील तरुण जत्रा, जयंती, उत्सवाच्या नावाखाली वर्गणी जमा करतात. श्रद्धेपेक्षा दादागिरी आणि सामाजिक दहशतीचा अनुभव यानिमित्ताने येत राहतो.
समाज जातीत विभागला जातो आणि त्याचे परिणाम उद्याच्या पिढीवरही होतात. विठू टेलर आपल्या मुलीला बाजारात घेऊन जातो तेव्हा ती फोटोवाल्याकडून संत नामदेव आणि संत कबीर यांचे फोटो निवडते. विठू विचारतो, हेच फोटो का? तेव्हा मुलगी सांगते, हे आपले पूर्वज आहेत. या एका प्रसंगातून लेखक सामाजिक उसवण किती खोलवर झाली आहे, हे सांगतो. संत महापुरुष जातीपुरते मर्यादित करण्याची मानसिकता किती खोलवर रुजलेली आहे. खरं तर शिंपीकाम हा कधी तरी जातीचा व्यवसाय असेल; पण आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाल्यावर हा व्यवसाय जातीचा न राहता कौशल्याचा झाला; पण आपला व्यवसाय म्हणजे आपली जात आहे, अशी सामाजिक ओळख निर्माण झालेल्या काळात विठू टेलरची मुलगी जे करते ते जनरीतीनुसारच आहे असे वाटत राहते.
‘उसवण’ या कादंबरीत जुनी पिढी आणि नवी पिढी यांचे यथार्थ चित्रण दिसते. विठू टेलरचे समवयस्क मित्र, त्यांच्यामधील नातेसंबंध आणि अकृत्रिम आपलेपणा जागोजागी दिसून येतो. विठूचा उतरणीला लागलेला शिलाईचा व्यवसाय हा त्याच्या मित्रांचा चिंतेचा विषय होतो. प्रसंगी विठूची उधारी वसूल करण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे त्याला आर्थिक उभारी मिळावी म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करतात. जुन्या गावगाड्याची प्रचीती या मंडळींच्या व्यवहारातून दिसून येते.
लेखक देवीदास सौदागर यांच्या ‘उसवण’ या कादंबरीत शिलाई व्यवसाय करणार्या एका माणसाच्या जीवनातील चढउतार मांडले आहेत. खरं तर हे चित्रण प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे, कारण शिंपीसारख्याच अनेक जणांना जागतिकीकरणाचा फटका बसला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचे हे गडद चित्रण ‘उसवण’मधून मांडले आहे. कौशल्य असतानाही रोजगार उपलब्ध होत नाही यांचे दु:ख लेखक ‘उसवण’मधून मांडतो.
देवीदास सौदागर यांच्या ‘उसवण’ कादंबरीस पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लेखकाने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते, वेदनेला पुरस्कार मिळाले म्हणून वेदना संपत नाही. लेखकाने एक शाश्वत सत्य मांडले. या सत्याला सामोरे जाताना वेदनेचे भांडवल न करता जीवनसंघर्षात सकारात्मक राहण्याचा दृष्टिकोन लेखक मांडतो आणि तोच संदेशही आपल्या कादंबरीत लेखक देतो.