कारगिल युद्ध शौर्याची चिरंतन गाथा

विवेक मराठी    26-Jul-2024
Total Views |
 
@मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (निवृत्त)
 9137338463


Kargil Vijay Diwas 2024
कारगिलचं युद्ध सदैव विजयाचं प्रतीक म्हणून येणार्‍या अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहील. असंख्य भारतीय सैनिकांनी आपल्या शौर्यानं जिथे आकाशाला गवसणी घातली आणि सर्वोच्च बलिदान दिलं त्या टोलोलिंगच्या पायथ्याशी कारगिल युद्धस्मारक बांधण्यात आलं आहे. या विजयाच्या स्मरणार्थ 26 जुलै हा ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून आपण साजरा करतो. कारगिल विजयाचं हे रजतमहोत्सवी वर्ष! कारगिलच्या युद्धस्मारकात रोवलेल्या त्या स्मरणशिलांमागची एकेक कथा शौर्याची चिरंतन गाथा सांगणारी आहे.
कारगिल विजयाचं हे रजतमहोत्सवी वर्ष! 15 ते 18 हजार फूट उंचीवरच्या संकीर्ण हिमशिखरांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मे-जुलै 1999 या काळात लढलं गेलेलं कारगिलचं युद्ध भारताच्या इतिहासात प्रेरणेचा अखंड स्रोत होऊन सदैव तेजाळत राहील. भारतीय सैन्यदल आणि वायुदलाच्या संयुक्त कारवाईनं साधलेला अभूतपूर्व परिणाम, तोफखान्याची उत्कृष्ट कामगिरी, संपूर्ण भारतात उसळलेली राष्ट्रभक्तीची अभूतपूर्व लाट आणि मुख्य म्हणजे प्रसारमाध्यमांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रभावीपणे पोहोचलेलं पहिलं भारतीय युद्ध म्हणून या युद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची प्रतिमा उंचावली. या युद्धानं सैन्याच्या आधुनिकीकरणासह एकूण संरक्षण व्यवस्थेत अनेक फेरबदल करण्यासाठी उद्युक्तही केलं. अशा अनेक पैलूंनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेलं हे युद्ध तरुणांच्या हृदयावर कोरलं गेलं ते मनांत दुर्दम्य इच्छाशक्ती घेऊन पराक्रमाची पराकाष्ठा करत मातृभूमीसाठी सर्वस्व समर्पित करणार्‍या तरुण सैनिक आणि अधिकार्‍यांमुळे! त्यांच्या साहस आणि बलिदानातून समाजाला खर्‍या नायकांची जाणीव झाली. त्यांनी तरुणाईची व्याख्याच बदलून टाकली. या युद्धात पायदळाच्या युवा अधिकार्‍यांचं धाडसी नेतृत्व ही सुवर्णाक्षरांत नोंदवण्यासारखी गोष्ट आहे. कारगिलच्या युद्धस्मारकात रोवलेल्या त्या स्मरणशिलांमागची एकेक कथा अंतर्मनाचा ठाव घेणारी आहे.
 
1965 आणि 1971 सालीही काश्मीर गिळंकृत करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने हाणून पाडला. इथून पुढे विभाजन रेषा ही ताबारेषा (Line of Control) म्हणून ओळखली जाऊ लागली. 1971 च्या युद्धानंतर पुढची दोन-अडीच दशकं काश्मीर दहशतवादाने पेटलेला होता. हजारो हिंदूंची कत्तल, संरक्षणदलांच्या अधिकार्‍यांचं अपहरण सत्र सुरूच होतं. ISI, JKLF, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या अनेक संघटनांमधून इस्लामी आतंकवाद फोफावला होता.
 
 
‘भारत पाकिस्तान पडोसी साथ साथ रहना है’ असं म्हणत 1999 साली तत्कालीन पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयींनी सुरू केलेली लाहोर बसयात्रा काश्मीरसाठी अनेक आशा घेऊन आली होती. त्यांचा आत्मविश्वास आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये शांती प्रस्थापित करण्याची आंतरिक तळमळ कदाचित नवा इतिहास घडवून गेली असती! पण अमेरिकेकडून मिळणारी शस्त्रास्त्रं आणि चीनशी जवळीक या जोरावर पाकिस्तानने लढण्याची जय्यत तयारी केली आणि ताबारेषेपासून दीडशे ते दोनशे किलोमीटर्स पुढे येत एप्रिलअखेरीपर्यंत उंच डोंगरमाथ्यांवर स्वतःच्या छावण्या उभारल्या.
 
 


Kargil Vijay Diwas 2024
भारतीय सैन्यापुढील आव्हानं ः कारगिल म्हणजे श्रीनगर आणि लेह यांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरचं सर्वात उंच ठिकाण! द्रास ते कारगिल या भागात ताबारेषा ((LoC)) या महामार्गाच्या खूपच जवळ आहे. प्रतिकूल निसर्ग, कडाक्याच्या थंडीत अंगावर कपड्यांची अस्तरं, शस्त्रास्त्रांसह जीवनावश्यक वस्तूंचं पाठीवर वजन, अशा अवस्थेत कमीत कमी 5-6 हजार फूट चढण, त्यात सरळसोट असे डोंगरकडे, दुर्गम आणि छोट्या पायवाटा आणि समोरचा शत्रू वर जय्यत तयारीनिशी असल्याने खालून चढताना समोरून आक्रमण होण्याची शक्यता! सामरिक दृष्टीने ही अतिशय प्रतिकूल अशी युद्धभूमी आहे. ऑक्सिजन खूपच विरळ होत जातो. कोणत्याही सैनिकाला लगेच लढायला न पाठवता या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी 'acclimatization'ची प्रक्रिया अत्यावश्यक आहे; पण ती पूर्ण करायला त्या वेळी भारतीय सैन्याकडे पुरेसा वेळ नव्हता. त्या वेळची शस्त्रं, उपकरणं आणि इतर साधनं ही तुलनेने जुन्या तंत्रज्ञानाची, अवजड अशी होती. अशा अनेक आव्हानांवर भारतीय सैन्याने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली आणि इतिहास घडवला!
 
 
शत्रूचा अंदाज ः घुसखोरांचा शोध घेण्यासाठी अगदी पहिली पाच जणांची पेट्रोलिंग टीम कॅप्टन सौरभ कालिया यांच्या नेतृत्वाखाली निघाली होती. मात्र 14 मे रोजी बटालिक भागातून ती दिसेनाशी झाली. त्यांच्या शोधार्थ जाण्याची कामगिरी कॅप्टन अमित भारद्वाज यांना देण्यात आली. गोळीबार सुरू झाला तेव्हा बरोबर असलेल्या 30 सैनिकांचं नेतृत्व करत त्यांना सुरक्षित बेस कॅम्पला पाठवण्यासाठी हा वीर शत्रूसमोर छातीचा कोट करून खंबीरपणे उभा राहिला. 17 मे रोजी समोरच्या 10 घुसखोरांना मारून मगच जखमी कॅप्टन अमित कोसळले. कॅप्टन सौरभ आणि त्याच्या टीमला पाकिस्ताननं युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतलं होतं. युद्धकैद्यांना सन्मानानं वागणूक देण्याबाबतचे सगळे नियम, संकेत, करार मोडून त्यांचे अतोनात हाल केले गेले. छिन्नविच्छिन्न केलेला कॅप्टन सौरभचा देह भारतीय सैन्याकडे 9 जून रोजी सोपवण्यात आला. कधीही न भरून येणारी ही जखम आहे. कॅप्टन अमित भारद्वाज यांचा देह बर्‍याच कालावधीनंतर म्हणजे 13 जुलै रोजी बर्फात मिळाला. त्यानं शस्त्र हातात घट्ट पकडलेलं होतं... शेवटच्या श्वासापर्यंत कॅप्टन अमित लढत होते.
 
 
ऑपरेशन विजय ः स्थलसेनाप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन विजयला सुरुवात झाली. टोलोलिंग इथली महत्त्वपूर्ण लढाई सुरू झाली. 15,000 फूट उंचावर असलेली ही जागा शत्रूनं ताब्यात घेतली होती, कारण तिथून राष्ट्रीय महामार्गाचं निरीक्षण करणं सोपं होतं. आपल्या सैन्यावर वरून पाकिस्तानी सैन्य गोळ्या आणि मोठ्या दगडांचा वर्षाव करत होतं. पॉइंट 4590 काबीज करताना 18 ग्रेनेडिअर्सचे नेतृत्व करताना मेजर अधिकारी यांना गोळ्या लागल्या. तशाही अवस्थेत ते लढत राहिले, जवानांना दिशा देत राहिले. त्यांनी शत्रूचा एक तळ उद्ध्वस्त केला. तोपर्यंत शत्रूच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीराची चाळणी केली होती. अद्वितीय शौर्य गाजवून 30 मे रोजी हा सिंह धारातीर्थी पडला. शत्रूच्या बंकरसमोर पडलेला त्यांचा देह परत मिळवणंसुद्धा खूप आव्हानात्मक होतं. लेफ्टनंट कर्नल विश्वनाथन (वीरचक्र), मेजर विवेक गुप्ता (महावीरचक्र) असे अनेक वीर टोलोलिंगच्या लढाईत धारातीर्थी पडले. मेजर विवेक यांना गणवेशात शेवटची मानवंदना देणारी त्यांची पत्नी कॅप्टन राजश्री यांचा फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं आजही भरून येतो!
 

Kargil Vijay Diwas 2024 
टोलोलिंगबरोबरच त्याच्या उत्तरेकडचा पॉइंट 5140 घेणंही अत्यंत गरजेचं होतं. या दरम्यान एक नाव भारतातल्या घरोघरी पोहोचलं ते म्हणजे अत्यंत निर्भयपणे मोहिमा गाजवणारे कॅप्टन विक्रम बत्रा (परमवीरचक्र). रेडियो सेटवर संवाद साधण्यासाठी त्यांचं टोपणनाव होतं ‘शेरशहा’! कामगिरीदरम्यान 16,000 एवढ्या उंचीवर पोहोचल्यावर शत्रूची धमकी रेडियो सेटवर गरजली, ‘शेरशहा, उपर आ गये हो, अब वापस नाही जा सकोगे.’ त्यांनी वर चढतानाच उत्तर दिलं - ‘एक घंटेमें देखते है, कौन उपर रहेगा.’ दृढ संकल्पशक्ती आणि अत्यंत कुशल नेतृत्व करत 20 जून रोजी पॉइंट 5140 त्यांनी घेतलाच. आपल्या कमांडिंग ऑफिसरला ही बातमी देताना कॅप्टन विक्रम म्हणाले, ‘सर, ये दिल मांगे मोअर.’ संपूर्ण देशात त्यांचं हे वाक्य खूप गाजलं. तारुण्याची व्याख्याच जणू या कॅप्टननं बदलून टाकली! काही दिवसांतच पॉइंट 4875 घेण्यासाठी कॅप्टन विक्रम सज्ज झाले. तिथे 15,900 फुटांवर निकराची लढाई सुरू झाली. चार अतिरेकी मारून हा वीर पुढे सरसावत होता. बरोबर 13 जॅक रीफचे साथीदार होते. फार मोठी जोखीम कॅप्टन विक्रम यांनी पत्करली आणि शत्रूला लोळवत, शेवटच्या श्वासापर्यंत ते तुफान लढत राहिले! 7 जुलै रोजी हा शेरशहा शांत झाला. अद्वितीय शौर्यासाठी मरणोपरांत त्यांना ‘परमवीर’चक्र प्रदान करण्यात आलं. आज पॉइंट 4875 ला आपण बत्रा टॉप म्हणून ओळखतो.
 
 
17 जाटचे मेजर रितेश शर्मा यांच्याबरोबर होते ज्युनियर अधिकारी कॅप्टन अनुज नय्यर (महावीरचक्र). ‘सर, एक दिवस मी तुमच्या वरची बढती मिळवेन बरं का,’ असं ते मेजर रितेश यांना नेहमी म्हणत. 7 जुलैचा दिवस. चार वेगवेगळ्या postsमधून शत्रूनं जबरदस्त हल्ला चढवला होता. लढाई सुरू होती. भारतीय सैन्याचा दारूगोळा संपत आला. तेवढ्यात अनुज यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागून ते जबर जखमी झाले. तरी तमा न बाळगता ते लढत राहिले. चारही posts सर झाले आणि मगच कॅप्टन अनुज यांनी डोळे मिटले. वरिष्ठ मेजर रितेश सद्गदित झाले. त्यांचा प्रिय अनुज त्यांच्या पुढे निघून गेला होता. आजूबाजूला आपल्याच साथीदारांची पडलेली शरीरं, सांडलेलं रक्त, जखमांमुळे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करणारे सैनिक यामुळे खचून न जाता लढाई सुरू ठेवणं खूप अवघड होतं.
 
 
पुढचं लक्ष्य होतं Three pimples! सुरुवातीला त्याभोवतीचं नॉल (knoll) हे ठिकाण घ्यायचं होतं. पुन्हा एकदा 2 राजपूत रायफल्सला कामगिरी सोपवण्यात आली. मेजर पद्मपाणी आचार्य (महावीरचक्र) आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख करतात, प्रिय बाबा, इथे निवडण्यात आलेल्या अगदी मोजक्या लोकांमधला मी एक भाग्यवान आहे. तुमच्या आदर्शाला साजेसं काम माझ्या हातून घडेल. काहीही झालं तरी आपल्या कुटुंबाचा सन्मान कमी होईल असं मी कधीही वागणार नाही. आईला सांगा हा जन्मभरासाठीचा सन्मान आहे. बाबा, चारूला महाभारतातली रोज एक गोष्ट सांगत जा म्हणजे पोटातल्या तुमच्या नातवंडावर खूप छान संस्कार होतील.
 
 
28 जून रोजी तीन उंचवटे असलेलं हे ठिकाण काबीज करण्याच्या दृढनिश्चयानं मेजर मोहित सक्सेना आणि मेजर पद्मपाणी आचार्य यांनी आपापल्या कंपन्यांसह कूच केलं. तुलनेनं शत्रूच्या बाजूचं बळकट असा हा मोर्चा आणि चढाईसाठी अत्यंत कठीण असा हा ‘नॉल’ (Knoll) डोंगरकडा होता. हळूहळू एकेक पाऊल टाकत पुढे जाणं अपरिहार्य असल्यानं शत्रूला वेध घेणं सोपं होतं. मेजर पद्मपाणी यांना गोळ्या लागल्या. गंभीर जखमी अशा या अवस्थेतही ते रांगत पुढे गेले आणि शत्रूच्या तळावर त्यांनी अचूकपणे ग्रेनेड फेकला. विजयाचा शंखध्वनी ऐकूनच मेजर पद्मपाणी यांनी डोळे मिटले. मेजर गेल्यानंतर काही महिन्यांनी त्यांची मुलगी या जगात आली. तिचं नाव ठेवलं अपराजिता! मेजर पद्मपाणी आपल्या मुलीला त्यांचा सहवास नाही देऊ शकले, मात्र शौर्याचा, स्वाभिमानाचा खूप मोठा वारसा त्यांनी तिला बहाल केला!
 

Kargil Vijay Diwas 2024 
याच मोहिमेत होते कॅप्टन विजयंत थापर (वीरचक्र). लहानपणापासून रायफल्स, रणगाडे, सैन्य याच वातावरणात वाढलेल्या या बालकाचं नाव ‘विजयंत’ हेही एका मुख्य battle tank चं नावच! शत्रूकडून होणारा मशीनगनचा संततमारा थांबवणं अत्यंत गरजेचं होतं. तिथूनच पुढे जेमतेम दोन-तीन माणसे जाऊ शकतील एवढी अरुंद अशी बोळ होती. नायक तिलक सिंह याला घेऊन कॅप्टन विजयंत त्या वाटेनं पुढे सरसावले. मात्र या ठिकाणी डोक्याला गोळी लागून ते धारातीर्थी पडले. रॉबिन या टोपणनावानं प्रसिद्ध असलेल्या कॅप्टन थापर यांनी लिहिलेलं शेवटचं पत्र अचंबित करणारं होतं. मृत्यूचं दाट सावट मनोमन ओळखून हा नायक खात्रीनं लिहितो, तुम्हाला हे पत्र मिळेपर्यंत मी स्वर्गात अप्सरांचा पाहुणचार घेत घेत तुम्हाला वरून बघत असेल. मला कशाचाही पश्चात्ताप नाही. मला पुन्हा मनुष्य जन्म मिळालाच तर मी पुन्हा सैन्यदलात जाऊन आपल्या राष्ट्रासाठी लढेन. तुमच्या भविष्यासाठी आज भारतीय सैन्यदल कुठे लढलं ते शक्य असेल तेव्हा अवश्य येऊन पाहा. अनेक गोष्टी दिलदारपणे व्यक्त करून हा सेनानायक मिशनवर निघाला होता... स्वच्छंद मनानं!
 
यांच्याबरोबर आणखी एक रणधुरंधर होते नागा अधिकारी कॅप्टन निकेझाकुओ केंगुरुसे (महावीरचक्र). 28 जून रोजी द्रास विभागातल्या 'black rock' इथे भीषण लढाई सुरू झाली. तशात निकेझाकुओ यांच्या पोटात गोळी लागली. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत ते पुढे जात राहिले. अत्यंत कठीण अशा त्या डोंगरकड्यावरून त्यांचे पाय घसरू लागले तेव्हा त्यांनी आपले बूट काढले. डोंगरकड्यावर भक्कम असा दोर बांधला आणि रॉकेट लाँचर घेऊन ते शत्रूच्या तळावर धावून गेले. चौघांना लोळवून मगच हा परमप्रतापी वीर धारातीर्थी पडला.
 
 
अवघ्या एकोणिसाव्या वर्षी परमवीरचक्र मिळवणारे ग्रेनेडिअर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव आणि इतर योद्ध्यांनी केलेली शौर्याची पराकाष्ठा टायगर हिलची लढाई अमर करून गेली! यात कॅप्टन सचिन निंबाळकर यांनी अद्भुत असा पराक्रम गाजवला. या लढाईदरम्यान तोफखान्याचे मेजर चंद्रभूषण द्विवेदी (सेना मेडल) यांना वीरमरण आलं.
 
 
कारगिल युद्धाची वैशिष्ट्ये ः भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या विभागांचा एकमेकांबरोबर अतिशय सुंदर असा मेळ या युद्धात पाहायला मिळाला. रसद पुरवणं, खंदक, रस्ते तसंच शेल्टर्स बांधणं, गाड्या आणि उपकरणांची दुरुस्ती, अगदी पुढे जाऊन वैद्यकीय सेवा पुरवणं अशी आपापली कामं या विभागांनी उत्कृष्टरीत्या केली. मुख्यालयापासून ते अगदी आघाडीच्या मोर्च्यांपर्यंत उभारलेली संदेश यंत्रणा अतिशय प्रभावी होती. 'Artillery wins battles' ही उक्ती खरी करत आपल्या तोफखान्याने नवनवीन आविष्कार केले. पॉइंट 4875 घेताना तोफांनी पराक्रमाची एवढी शर्थ केली की, त्या पॉइंटला 'gun point' असं नाव देण्यात आलं. बोफोर्स तोफा, M198 तोफा, तसंच एका वेळी 40 रॉकेट्स मारणारं multi barrel rocket launcher असे किती तरी रामबाण उपाय शत्रूवर लागू पडले. वायुसेनेचं ऑपरेशन सफेद सागर महत्त्वपूर्ण ठरलं. याअंतर्गत शत्रूची टेहळणी करण्यापासून ते डोंगरांच्या कडेकपार्‍यांमध्ये लपलेल्या शत्रूवर भेदक मारा (strike mission) करण्यापर्यंत मोठंच यश वायुसेनेला मिळालं. भारतीय युद्धाच्या इतिहासात प्रथमच आघाडीच्या इतक्या जवळ स्वतःच्याच प्रदेशात घुसखोरांवर बॉम्बफेक करण्यासाठी लढाऊ विमानांचा उपयोग करण्यात आला. कारगिल युद्धादरम्यान भारतीय समाजाचं ऐक्य ठळकपणे दिसून आलं. रोजची एकेक बातमी माध्यमांद्वारे देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचत होती. त्यामुळे अभूतपूर्व पद्धतीने अवघा देश भारतीय सैन्यामागे उभा होता. राष्ट्रभक्तीची प्रचंड मोठी लाट उसळली होती. सैन्याचं मनोबल वेळोवेळी उंचावत होतं.
 
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर यश ः या युद्धानंतर भारताची प्रतिमा जगाच्या पटलावर अधिक उजळून निघाली. भारताच्या राजकीय नेतृत्वाचा खंबीर पाठिंबा युद्धात सगळ्यात महत्त्वाचा होता. घुसखोरी मागे घेईपर्यंत कोणतीही चर्चा वा वाटाघाटी करणार नाही, असं पंतप्रधान मा. अटलजींनी ठणकावून सांगितलं. त्यांची दूरदृष्टी आणि निग्रही भूमिका जगभरात नावाजली गेली. अगदी चीननेदेखील पाकिस्तानची बाजू न घेता ‘दोन्ही राष्ट्रांनी ताबारेषेचा आदर ठेवावा’ असंच तटस्थ मत नोंदवलं.
 
शोध आणि बोध ः कारगिल युद्धामुळे भारताला संरक्षण व्यवस्थेतल्या अनेक त्रुटी समजल्या. हेर यंत्रणेची पुनर्रचना, सैन्यदलांचं आधुनिकीकरण, सैन्याच्या उपकरणांमध्ये आमूलाग्र बदल, बजेटमध्ये वाढ यासह भारताचं अण्वस्त्र धोरणही अधिक स्पष्ट करण्यात आलं. कारगिल भागात कायमस्वरूपी सुरक्षा कडक करण्यात आली. 14 Corps हे नवीन मुख्यालय स्थापन करण्यात आलं.
 
 
14 जुलै 1999 रोजी ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचं तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अधिकृतपणे जाहीर केलं आणि वीरांना मानवंदना दिली. घुसखोरी केलेले पाकिस्तानी सैनिक नव्हतेच, तर काश्मीर स्वतंत्र करू बघणारे आतंकवादी होते असं सिद्ध करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत स्वतःच्या सैनिकांचे मृतदेहसुद्धा पाकिस्ताननं नाकारले. त्यांच्यावर अंतिम संस्कार करून भारतीय सैन्यानं उदात्त मानवी मूल्यांचं दर्शन समस्त विश्वाला घडवलं. पाकिस्तानची धर्मांध वृत्ती भारतानं ठेचून काढली.
 
 
अटलजी जीवन पैलूभाजपच्या आजच्या पिढीतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका नक्की वाचली पाहिजे. राजकीय जीवनात, सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, काय बोलावे, काय बोलू नये याचा वस्तुपाठ अटलजींचे जीवन देते.
अटलजी जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा.
₹50.00
https://www.vivekprakashan.in/books/atalji-life-aspects/
 
 
वेदनेची किनार असली तरी कारगिलचं हे युद्ध सदैव विजयाचं प्रतीक म्हणून येणार्‍या अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहील. असंख्य भारतीय सैनिकांनी आपल्या शौर्यानं जिथे आकाशाला गवसणी घातली आणि सर्वोच्च बलिदान दिलं त्या टोलोलिंगच्या पायथ्याशी कारगिल युद्धस्मारक बांधण्यात आलं आहे. या तीर्थक्षेत्राला आवर्जून भेट द्यावी. या विजयाच्या स्मरणार्थ 26 जुलै हा ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून आपण साजरा करतो. भारताचे नागरिक म्हणून आपल्यावर खूप मोठं दायित्व आहे. या परमवीरांनी मातृभूमीसाठी जे बलिदान दिलं त्याचा सन्मान सदैव राखला जाईल असंच वर्तन आपल्याकडून निरंतर घडो, असा संकल्प करू या. या रणधुरंधरांना कडक मानवंदना!
 
जय हिंद!