भारतीय मजदूर संघाची - 70 वर्षे कामगार सेवेची

विवेक मराठी    24-Jul-2024
Total Views |
 @अॅड. अनिल ढुमणे
BMM
भारतीय मजदूर संघ केवळ विशुद्ध कामगार संघटना नसून ती जबाबदार सामाजिक संघटनादेखील आहे. त्यामुळे सत्तराव्या वर्षात विविध उपक्रम भारतीय मजदूर संघाने हाती घेतले आहेत. येणार्या काळात संपर्क अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुमारे दहा लाख कामगारांशी संपर्क करून मजदूर संघ पोहोचवण्यात येणार आहे. तसेच भारतीय मजदूर संघाचे काम तळागाळात सर्वदूर पोहोचावे यासाठी महाराष्ट्रात सुमारे शंभरपेक्षा जास्त विस्तारक निघणार असून ते विविध क्षेत्रांत काम वाढवण्यास आणि नवीन संघटना निर्माण करण्यासाठी काम करणार आहेत.
भारतीय मजदूर संघ (बीएमएस) ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली केंद्रीय कामगार संघटना 23 जुलै 2024 पासून 70 व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. राष्ट्रहित, उद्योगहित, कामगारहित ही विचारांची त्रिसूत्री. ‘देश के हित मे करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम!’ ‘राष्ट्रभक्त मजदूरो, एक हो, एक हो!’ ‘देशभक्त मजदूरो, एक हो! एक हो!’ अशा घोषणांच्या आधारावर ‘भारतमाता की जय!’ म्हणत विशुद्ध कामगार संघटना म्हणून भारतीय मजदूर संघाने आपले कामकाज सुरू केले. राजकारण आणि राजकीय पक्षापासून अलिप्त राहण्याचे धोरण भारतीय मजदूर संघाने स्थापनेपासून स्वीकारले आणि ते तंतोतंत पाळले. त्यामुळे राजकीय वरदस्त आणि मान्यतेचा प्रश्नच नव्हता. औद्योगिक प्रगतीचे चक्र, कृषी विकासाचे प्रतीक म्हणून गव्हाच्या लोंब्या आणि मानवी कर्तृत्वाचा शिल्पकार असलेला अंगठा व मूठ ही निशाणी असलेला भगवा ध्वज, भारतीय श्रमिकांचे दैवत भगवान विश्वकर्मा यांना आदर्श ठेवून, सामूहिक नेतृत्व, सामूहिक निर्णय, भारतीय परंपरा आणि संस्कृतीच्या आधारे संघटन, ही अनोखी कार्यपद्धती भारतीय मजदूर संघाने कामगार क्षेत्रात स्वीकारली. हा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीत प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचाच होता. त्यामुळे सर्व स्तरांत प्रचंड विरोध सहन करत अत्यंत खडतर परिस्थितीत भारतीय मजदूर संघाने आपले काम सुरू केले.
 
शून्य से सृष्टी तक
 
23 जुलै 1955 रोजी भोपाळ येथे स्थापनेच्या वेळी 35 कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी भारतीय मजदूर संघ नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. स्थापनेच्या वेळी शून्य सभासद आणि शून्य संघटना असणार्या भारतीय मजदूर संघाचे 1967 साली बारा वर्षांनी दिल्ली येथे पहिले अधिवेशन संपन्न झाले. या काळात कार्यकर्त्यांनी देशभर काम करून दोन लाखांपेक्षा जास्त सभासद आणि 200 पेक्षा जास्त संलग्न संघटना उभ्या केल्या. भारत-चीन युद्धाच्या वेळी कमुनिस्ट आणि अन्य संघटनानी ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत चीनच्या समर्थनाची भूमिका घेतली असताना भारतीय मजदूर संघाने कामगारांमध्ये प्रखर राष्ट्रभक्तीची भूमिका घेतली. युद्धकाळात आपल्या मागण्या बाजूला ठेवून देशासाठी काम करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आलेल्या आणीबाणीत लोकशाही वाचवण्यासाठीच्या झालेल्या संघर्षात भारतीय मजदूर संघाने सक्रिय सहभाग घेतला, आपले हजारो कार्यकर्ते जेलमध्ये गेले. 1974 च्या रेल्वे कामगारांचा 24 दिवसांच्या संपातील लक्षणीय सहभाग, सर्वांना बोनस या मागणीसाठी घेतलेली भूमिका व देशभर आंदोलन, महागाई भत्ता निर्देशांकातील चोरीविरोधी मुंबई बंद आंदोलन केले. त्यासाठी संयुक्त मोर्चा तयार केला. व्यापक कामगारहितासाठी अपमान सहन केला. बोनस, महागाई भत्ता या विषयांत भारतीय मजदूर संघाला यश मिळाले. सरकारने बोनसचा कायदा केला, महागाई भत्तानिर्देशांक काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला. रेल्वेचा संप यशस्वी होऊन त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. या सर्वांमुळे भारतीय मजदूर संघाचे कामगार चळवळीतील महत्त्व वाढले आणि भारतीय मजदूर संघ आत्मविश्वासाने पुढे सरसावला. 1983 साली झालेल्या केंद्रीय कामगार संघटनाच्या सदस्यता चाचणीत 23 लाख सभासदांसह भारतीय मजदूर संघाने देशात द्वितीय स्थान पटकावले. त्या वेळी पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता येथे झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय अधिवेशनात 35,000 प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर 1994 साली झालेल्या सदस्यता चाचणीत भारतीय मजदूर संघ अन्य सर्व कामगार संघटनांना मागे टाकून 39 लाख सभासद संख्येसह पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. 2001 साली 67 लाख, तर 2011 साली 1.77 कोटी सभासद, तर सन 2022 मध्ये 6500 पेक्षा जास्त संलग्न संघटना आणि 2.50 कोटींपेक्षा जास्त सभासद संख्येसह भारतीय कामगारांचे नेतृत्व करीत आहे. अत्यंत कमी कालावधीत प्रचंड आत्मविश्वासाने पुढे आलेली कामगार संघटना म्हणून भारतीय मजदूर संघाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 70 वर्षांच्या काळात कुठलेही विभाजन नाही की फूट नाही, वैचारिक मतभेद नाही, व्यक्तिगत आकांक्षा यासाठी संघर्ष नाही. शोषित, पीडित, वंचित कामगार वर्गाला न्याय मिळवून देत भारत देशाला पुनर्वैभव प्राप्त करण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निश्चित दिशेने कार्य आणि मार्गक्रमण करीत आहे.
 
 कोणताही नेता मजदूर संघातून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र संघटना निर्माण केलेली नाही. 70 वर्षे सातत्याने आपला विचार घेऊन, या विचाराशी प्रामाणिक राहून, ठरलेल्या कार्यपद्धतीत कार्य करणारी आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारी कामगार क्षेत्रातील एकमेवादित्य अशी संघटना म्हणजे भारतीय मजदूर संघ
 
या पार्श्वभूमीवर भारतीय मजदूर संघाने 70 वर्षांत अखंड आणि सातत्यपूर्ण प्रवास सुरू ठेवून आज 26 राज्ये, सर्व केंद्रशासित प्रदेश, सुमारे साडेपाचशे जिल्ह्यांत भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा व तालुक्यांत कमिट्या आहेत. सत्तर वर्षांत भारतीय मजदूर संघात कधीही फूट पडलेली नाही, कधीही विभाजन झालेले नाही, कोणताही नेता मजदूर संघातून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र संघटना निर्माण केलेली नाही. 70 वर्षे सातत्याने आपला विचार घेऊन, या विचाराशी प्रामाणिक राहून, ठरलेल्या कार्यपद्धतीत कार्य करणारी आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारी कामगार क्षेत्रातील एकमेवादित्य अशी संघटना म्हणजे भारतीय मजदूर संघ देशात आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO मध्ये भारतीय कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहे. सरकारबरोबर प्रतियोगी सहकारिता Responsive Co-operation ही भूमिका घेतली. सरकारने चांगले काम केल्यास त्याचे कौतुक केले, तर कामगारविरोधी धोरणाचा कडाडून विरोधदेखील केला. हे करत असताना सरकारमध्ये कोण बसलेले यावर कधीही आपले धोरण ठरवले नाही. त्यामुळे भारतीय मजदूर संघ एक विश्वासाची संघटना म्हणून देशात नावारूपाला आलेली आहे.
 
BMM 
 
भारतीय मजदूर संघाचा विस्तार
 
आज भारतीय मजदूर संघाच्या 6500 पेक्षा जास्त संलग्न कामगार संघटना, 40 अखिल भारतीय महासंघ, 200 पेक्षा जास्त राज्यस्तरीय महासंघ, 750 जिल्हे आणि संपूर्ण देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत भारतीय मजदूर संघ कार्यरत आहे. संघटित क्षेत्रातील सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक बँका अधिकारी, कर्मचारी, सहकारी बँक, विमा उद्योगातील अधिकारी, कर्मचारी, एजंट, राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, खासगी शाळा व महाविद्यालय इंजिनीअरिंग, केमिकल, प्लास्टिक, फार्मास्युटिकल उद्योगासह विविध प्रकारचे खासगी उद्योग, नेव्हल डॉक, मर्चंट नेव्ही, संरक्षण उद्योगातील कारखाने, रेल्वेचे 17 झोन, मेट्रो, करन्सी आणि नोट प्रेस, टांकसाळ, स्टील, इस्पात, सिमेंट, पेट्रोलियम, ओएनजीसी, पोस्टल विभाग, RMS, ग्रामीण डाक सेवक, BSNL, MTNL, खादी ग्रामोद्योग, टेक्सटाइल, एअर इंडिया, एअरपोर्ट ऑथोरिटी, राज्य परिवहन, RCF, कामगार राज्य विमा निगम, भविष्य निर्वाह निधी, रुग्णालय, हॉस्पिटल, पोर्ट अँड डॉक, न्यूक्लिअर पॉवर, थर्मल पावर, पाणीपुरवठा, फिल्म उद्योग, सर्व प्रकारच्या वीज कंपन्या, कंत्राटी- कायम कामगारांसह असंघटित क्षेत्रात घरेलू कामगार, अंगणवाडी, बालवाडी, आशाताई, मिड डे मिल, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फेरीवाले, आठवडे बाजार, फोटोग्राफर, प्लांटेशन, बिडी कामगार, नॅशनल हेल्थ मिशन, सुरक्षारक्षक, वन कामगार, MIDC, वनरक्षक, आरोग्यरक्षक, मलेरिया फवारणी कामगार, मच्छीमार कामगार, शेतमजदूर, वीटभट्टी कामगार, हॉटेल कामगार, गुमास्ता, हमाल, माथाडी, पेट्रोल पंप, पेन्शनर, ज्येष्ठ नागरिक आदी सर्वच क्षेत्रांत भारतीय मजदूर संघ व संघाच्या संघटना काम करीत आहेत.
 
 
भारतीय मजदूर संघाची विविधांगी भूमिका
 
कामगार संघटनांच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवत असताना 1966 साली प्रथम श्रम आयोग, 2000 साली आलेला द्वितीय श्रम आयोग यात भारतीय मजदूर संघाने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. तसेच जागतिकीकरणात स्वदेशीचे महत्त्व जाणून स्वदेशी जागरण मंचाची स्थापना केली. जागतिक व्यापार संघटना WTO मध्ये भारतातील कामगार आणि शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन त्याविरोधात देशभर लढा उभा केला. भारताने WTO मधून बाहेर पडावे किंवा आपल्याला अनुकूल धोरणे WTO मध्ये राबवली जातील यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले. देशाची प्रगती होत असताना पर्यावरणाचा समतोल राखणेही महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन, कामगारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पर्यावरण मंचाची स्थापना केली. परंपरागत कामगार कायदे बदलले पाहिजेत आणि युगानुकूल सर्वसमावेशक संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि न्याय मिळवून देणारे नवीन कामगार कायदे केले पाहिजेत यासाठी संघर्ष केला. सामाजिक सुरक्षा कोड 2020 आणि वेतन कोड 2019 निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका भारतीय मजदूर संघाने पार पाडली. अन्य औद्योगिक संबंध कोड 2020 आणि औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती कोड 2020 मध्ये कामगारविरोधी असलेल्या तरतुदी वगळल्याशिवाय हे कोड लागू करू नये, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारपुढे मांडली. नुकत्याच झालेल्या जी-20 राष्ट्रांच्या परिषदेत स्थापन केलेल्या लेबर ट्वेंटी एल-20 गटाचे नेतृत्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी-20 देशांच्या कामगार संघटनांमध्ये एकमत तयार केले, त्यास उद्योजकांच्या बी-20 आणि या अहवालाला जी-20 देशांची मान्यता मिळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यानंतर जगातील विविध देशांमध्ये भारतीय मजदूर संघाबद्दल आकर्षण निर्माण झाले असून अनेक देशांमध्ये भारतीय मजदूर संघाला बोलावले जात आहे. नवीन पेन्शन आणि जुनी पेन्शन यातील तफावत सरकारला नजरेस आणून त्यात सुधारणा करण्यास भाग पाडले आणि आता जुनी पेन्शन लागू करण्यासदेखील सरकारला भाग पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना लागू करण्यातही महत्त्वाची भूमिका भारतीय मजदूर संघाने पार पाडली आहे. त्यामुळे सर्व कामगार संघटनांची पीछेहाट होत असताना भारतीय मजदूर संघ वाढत आहे आणि वाढतच आहे आणि म्हणूनच भारतीय मजदूर संघाने 70 वर्षांच्या कार्यकाळात प्राप्त केलेले यश अनन्यसाधारण असे आहे.
 
BMM 
 
जबाबदार सामाजिक संघटना
 
भारतीय मजदूर संघ केवळ विशुद्ध कामगार संघटना नसून ती जबाबदार सामाजिक संघटनादेखील आहे. त्यामुळे सत्तराव्या वर्षात विविध उपक्रम भारतीय मजदूर संघाने हाती घेतले आहेत. या वर्षात ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या काळात पाच विषयांवर कामगारांमध्ये जनजागरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतीय राज्यघटनेत सांगितलेली नागरिक कर्तव्य, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी, सामाजिक समरसता आणि पर्यावरण या पाच विषयांवर कामगारांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या पंधरवड्यात संपर्क अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुमारे दहा लाख कामगारांशी संपर्क करून मजदूर संघ पोहोचवण्यात येणार आहे. तसेच भारतीय मजदूर संघाचे काम तळागाळात सर्वदूर पोहोचावे यासाठी महाराष्ट्रात सुमारे शंभरपेक्षा जास्त विस्तारक निघणार असून ते विविध क्षेत्रांत काम वाढवण्यास आणि नवीन संघटना निर्माण करण्यासाठी काम करणार आहेत.
 
 
कामगार क्षेत्रामध्ये महिला आणि युवा नेतृत्व मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच कामगार क्षेत्रातील जटिल प्रश्न सोडवण्यासाठी प्रशिक्षित अशा प्रकारची टीम तयार करण्यासाठी विविध अभ्यासवर्गांचे आयोजन जिल्हा, उद्योग, प्रदेश स्तरावर करणार आहे.
 
कामगार चळवळीसमोरील बदलती आव्हाने
 
देशातील कामगार चळवळीला 140 वर्षे पूर्ण झाली आहेत. कामाचे तास, शुद्ध पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह, साप्ताहिक सुट्टी, वेळेवर वेतन, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा यासाठी सुरू झालेला संघर्ष विविध कायदे अस्तित्वात असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबलेला आहे. आज अनेक ठिकाणी कामगारांना बारा तास काम करावे लागते. किमान वेतनासाठी संघर्ष, कंत्राटीकरण, वर्षानुवर्षे काम करूनही ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी मिळत नाही. मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत आहे. कामगार कायद्यांची पायमल्ली, सरकारचे कामगारविषयक धोरणाकडे असणारे दुर्लक्ष, मोठ्या प्रमाणावर असलेला असंघटित क्षेत्रातील कामगार आणि त्यांच्यासाठी न्यायसुविधांचा अभाव असे जटिल प्रश्न कामगार क्षेत्रात उभे आहेत. कायम कामगारांची कमी होत चाललेली संख्या, त्या जागी कंत्राटी, आऊटसोर्सिंग कामगार, फिक्स टर्म कामगार अशा विविध नावांनी निर्माण होत असलेला अस्थायी कामगार वर्ग, उच्चशिक्षित कामगारांचेदेखील होणारे शोषण, कामगार संघटना स्थापन करण्यात निर्माण केलेले अडथळे, दिवसेंदिवस वाढत चाललेली आर्थिक विषमता हे प्रश्न आणखी गंभीर होत चालले आहेत. त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) ने रोजगारकपातीचे मोठे आव्हान उभे केले आहे. या सर्व प्रश्नांसाठी चळवळ उभारून कामगार वर्गाला त्यांचा सन्मान आणि आर्थिक न्याय मिळवून देणे, ही कामगार चळवळीसमोरील आव्हाने असून हे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय मजदूर संघ आणखी सक्षम करणे, हे लक्ष्य या वर्षात ठेवले आहे.
 
 
हे काम पूर्ण करण्याची शक्ती संचय करत असताना या सत्तराव्या वर्षाच्या प्रवेशाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी, स्व. रमणभाई शहा, स्व. मनहरभाई मेहता, स्व. बाळासाहेब साठे, स्व. भाऊसाहेब चांद्रायनजी, स्व. श्रीकांत धारप यांच्यासह देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे विनम्र स्मरण करत असताना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी बीएमएसचे काम उभे करण्यासाठी- वाढवण्यासाठी योगदान दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत धन्यवाद देत आहे. आगामी आव्हानांसाठी या कार्यकर्त्यांकडून प्रेरणा आणि भगवान विश्वकर्मा आम्हाला शक्ती देईल, हा विश्वास आहे.
 
अॅड. अनिल ढुमणे
अध्यक्ष
भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश