योद्धा राजनेता!

विवेक मराठी    22-Jul-2024   
Total Views |
devendra fadnavis
राजकारणात 'रेलेव्हंट’ राहावे लागते, असे देवेंद्र फडणवीस अनेकदा म्हणाले आहेत. त्यांनी राज्याच्या राजकारणात 'रेलेव्हंट’ राहणे, ही केवळ त्यांची गरज नाही, तर त्यांच्या पक्षाची आणि महाराष्ट्र राज्याचीही गरज आहे. या नाजूक व अवघड राजकीय स्थितीत योद्धा-राजनेता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्तृत्व आणखी उजळून निघावे आणि यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक निश्चित दिशा मिळावी, हीच देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नियती आपली काही ना काही परीक्षा पाहत असते. सर्व काही सुरळीत, मनासारखे होते आहे असे वाटत असतानाच संकट समोर येऊन उभे ठाकते. या संकटाला संधी मानून त्यातून मार्ग काढण्यासाठी जो संघर्ष करतो तोच यशस्वी होतो. सृष्टीचा हा अलिखित नियम आहे. जितकी व्यक्ती मोठी तितकी तिच्यासमोर येणारी संकटे मोठी. या अशा मोठ्यातील मोठ्या संकटांना, नियतीच्या परीक्षांना यशाकडे जाण्याची केवळ एक संधी न मानता कर्तव्य मानून जी व्यक्ती संघर्ष करते, त्या व्यक्तीला इतिहास लक्षात ठेवतो. या नियमाच्या उदाहरणादाखल इतिहासात डोकावले तर इतिहासाच्या प्रत्येक पानावर अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांची मांदियाळी आपल्याला आढळेल. वर्तमानातही अशा व्यक्तिमत्त्वांची कमतरता नाही. यासाठी फार लांब जाण्याचीही गरज नाही. आपल्या महाराष्ट्रातही नियतीच्या परीक्षेत संघर्ष करणार्‍या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे आहेतच. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे यातील आघाडीचे नाव.
 
 
देवेंद्र फडणवीस हे नाव माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष, बालपणापासूनचे संघ स्वयंसेवक, एक उच्चविद्याविभूषित नेता, नगरसेवकपदापासून काम करून वर आलेले कार्यकर्ता, व्हिजन व अभ्यास असलेले प्रशासक आणि अशा अनेक विशेषणांनी, उपाध्यांनी सार्‍या महाराष्ट्राला परिचित आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हाची परिस्थितीही फार काही अनुकूल आणि सर्वोत्तम होती अशातला भाग नाही. केंद्रात अभूतपूर्व सत्तापरिवर्तन होऊन स्पष्ट बहुमतात मोदींचे सरकार आले असले तरी पुढे काही दिवसांतच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र हादरला होता. महाराष्ट्रातील भाजपाचे आणखी एक मोठे नेते अर्थात नितीन गडकरी हे आधी राष्ट्रीय अध्यक्ष आणि मग केंद्रीय मंत्री म्हणून राष्ट्रीय राजकारणात दाखल झाले होते. शिवाय महाराष्ट्रात भाजपा सर्वांत मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमत नव्हते, शिवसेनेसोबतची युतीही तेव्हा तुटलेली होती. अशा नाजूक परिस्थितीत महाराष्ट्र भाजपामधील राज्यव्यापी नेतृत्वाची पोकळी भरून काढणे व कुशलपणे पाच वर्षे सरकार चालवणे अशा दुहेरी आव्हानांची परीक्षा देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले. त्या वेळच्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक रथी-महारथी असताना तुलनेने तरुण व नवखे मानले गेलेले फडणवीस काय टिकाव धरणार, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर स्वतः फडणवीस यांनी आपल्या कामातून, कर्तृत्वातून दिले.
  
 
2014 मध्ये नवखे मानले गेलेले फडणवीस 2019 मध्ये राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले होते. पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होणार असे सर्वांनाच वाटत असताना नियतीने पुन्हा एकदा परीक्षा पाहण्याचे ठरवले. भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले असताना अचानक मोठा घात झाला आणि नवे राजकीय समीकरण जन्माला आले. हे समीकरण जन्माला येण्यामागेही फडणवीस यांचा आवरता न येणारा प्रभाव, वेग, वर्चस्व, त्यातून निर्माण झालेला मत्सर, असूया हेच कुठे तरी कारणीभूत होते, हे विशेष. जे व्हायचे ते झाले आणि सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपा विरोधी बाकांवर बसला. याही परिस्थितीत पक्षासाठी आणि राज्यासाठी फडणवीस पुढे जात राहिले. सत्ताधार्‍यांना केवळ भावनिक नाही, तर मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि तितक्याच आक्रमक मांडणीतून अक्षरशः रडकुंडीला आणणारा विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने फडणवीसांच्या रूपाने पाहिला. कोविडकाळात राज्य सरकारचे नेतृत्व ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणून घरी बसलेले असताना जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न बाळगता राज्याच्या कानाकोपर्‍यात पायाला भिंगरी लावून फिरलेला लोकनेताही महाराष्ट्राने फडणवीसांच्या रूपाने पाहिला. फडणवीसांनीच वर्तवलेल्या भविष्यवाणीप्रमाणे असंख्य अंतर्विरोधांनी बजबजलेले ते सरकार कोसळले आणि राज्यात ऐतिहासिक ’पॉलिटिकल करेक्शन’ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या रूपाने झाले.
 

devendra fadnavis 
या सत्तांतरानंतर सरकारमध्ये स्वतः पद न घेण्याचे ठरवलेले फडणवीस काही तासांतच पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले, हा आणखी एक अनपेक्षित धक्का होता; परंतु गेली दोन-अडीच वर्षे पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कुशल प्रशासक असलेले नेतृत्व सरकारमध्ये का आवश्यक होते ते कळून येते. पालकमंत्री म्हणून एका गडचिरोलीसारख्या जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी तेथे करून दाखवलेले कामदेखील इथे उदाहरण म्हणून घेण्यासारखे आहे. नक्षलवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, जोडीला विविध विकासात्मक कामे, प्रकल्प यामुळे आज गडचिरोलीचे चित्र झपाट्याने बदलत असल्याचे तेथील अनेक मंडळी सांगतात. शिवाय, फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पायाभरणी झालेले असंख्य प्रकल्प आज पूर्णत्वास जात आहेत, त्यांची लोकार्पणे होत आहेत आणि त्याची फळे महाराष्ट्रास मिळत आहेत. मग त्यात समृद्धी महामार्ग, अटल सेतू (ट्रान्सहार्बर लिंक), कोस्टल रोड, मुंबई-पुणे-नागपुरातील असंख्य मेट्रो प्रकल्प अशी किती तरी उदाहरणे घेता येतील. त्यामागे फडणवीसांचा सिंहाचा वाटा होता, काही व्यापक व्हिजन होते.
 

devendra fadnavis 
चांदा ते बांदा पसरलेल्या, मुंबई-पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन संस्कृतीपासून नंदुरबार-गडचिरोलीसारख्या कमालीच्या दुर्गम भागांपर्यंतची विविधता असलेल्या, स्वतःचे असे काही ठोस, वेगळे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक ’नेचर’ असलेल्या महाराष्ट्र राज्याचा सर्वंकष आवाका असलेला, विकासाबाबत ठोस व्हिजन असलेला आणि सार्‍या राज्याची मान्यता-लोकप्रियता असलेला म्हटल्यावर आज केवळ देवेंद्र फडणवीस हेच एकमेव नेते आहेत. लोकसभेचे महाराष्ट्रातील निकाल बरेचसे अनपेक्षित होते. यावरून विधानसभेत काय होणार याबाबतही वेगवेगळी राजकीय विश्लेषक मंडळी आपापले तर्क चालवत आहेत, अंदाज बांधत आहेत; परंतु या सार्‍यांतही देवेंद्र फडणवीस यांना वगळून पुढे जाता येत नाही, कारण तेच राजकारणाच्या केंद्रस्थानी, एका निर्णायक भूमिकेत आजही आहेत. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीतून अनेक नेते, आमदार भाजपामध्ये सामील झाले. यंदा महाराष्ट्रात भाजपाला फटका बसूनही भाजपामधून कुणी बाहेर पडू इच्छित नाही. आजही त्यांना भाजपा हाच सुरक्षित पर्याय वाटतो. यावरून देवेंद्र फडणवीस यांचे स्थान व व्यूहरचना किती भक्कम आहे हे लक्षात येते. भाजपा हाच आज महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्या पक्षाच्या राज्यातील केंद्रस्थानी फडणवीस आहेत. राजकारणात ’रेलेव्हंट’ राहावे लागते, असे देवेंद्र फडणवीस अनेकदा म्हणाले आहेत. त्यांनी राज्याच्या राजकारणात ’रेलेव्हंट’ राहणे ही केवळ त्यांची गरज नाही, तर त्यांच्या पक्षाची आणि महाराष्ट्र राज्याचीही गरज आहे. त्याकरिता आगामी विधानसभा निवडणूक सर्वार्थाने महत्त्वाची आहे. या नाजूक व अवघड राजकीय स्थितीत योद्धा-राजनेता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्तृत्व आणखी उजळून निघावे आणि यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक निश्चित दिशा मिळावी, हीच देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
 

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये कार्यकारी संपादक (डिजिटल) म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.