खात्रीशीर रोपांसाठी वारद नर्सरी

विवेक मराठी    20-Jul-2024
Total Views |
@सुशांत डोके
उद्योजक होण्यासाठी उद्योजकाच्याच घरात जन्मावे लागते असे नाही, तर स्वतःची जिद्द व मेहनत करण्याची तयारी असेल, तर एक सर्वसामान्य घरातील मुलगादेखील उद्योग क्षेत्रात स्वतःचे नाव कोरून ठेवू शकतो, हे लातूर येथील अनिल वारद यांनी नर्सरी उद्योगातून सिद्ध केले आहे.

krushivivek
 
अनिल यांचे वडील उमरगा (जि. धाराशिव) येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. या ठिकाणीच अनिल यांनी बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले. घरात कोणताही उद्योगाचा वारसा नव्हता. सोबत फक्त विज्ञान शाखेची पदवी होती. आयुष्यात काही तरी अफाट, नावीन्यपूर्ण काम करून दाखविण्याची जिद्द व महत्त्वाकांक्षा होती. त्याच जोरावर अनिल यांनी लातूर येथील गांधी चौकात वारद मेडिकल सुरू केले; परंतु शॉर्टसर्किटमुळे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. न डगमगता परत व्यवसाय उभा केला. दरम्यानच्या काळात व्यावसायिक संस्था, शासकीय आस्थापना, वैयक्तिक घरमालक, उद्याने, हॉटेल्सना दर्जेदार व खात्रीशीर रोपे वाजवी दरात पुरविण्यासाठी बार्शी-लातूर रोडवरील दीप ज्योती नगर येथे अद्ययावत स्वरूपाची ’वारद बायोटेक प्रा. लि.’ची (2019) उभारणी केली.
सुसज्ज नर्सरी
 
ही नर्सरी दहा एकरांत आहे. उत्कृष्ट रोपांची निर्मिती व्हावी, यासाठी सुसज्ज ग्रीन हाऊस आणि पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली आहे. नर्सरीत उद्यानतज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल व अनुभवी कामगारांकडून (150 कामगार) सर्व रोपांची नियमित जोपासना केली जाते. कोकोपीटमध्ये ’ट्रायकोडर्मा’, ’सुडोमोनोस’ आणि ’पॉसिलोमायासि’ यांचे मिश्रण करून त्यामध्ये रोपांची निर्मिती केली जाते. पॉलिहाऊसमध्ये रोपांची निर्मिती झाल्यानंतर ही रोपे नंतर शेडनेटमध्ये ठेवली जातात.
 
 
krushivivek
 
संपर्क:
अनिल वारद, व्यवस्थापकीय संचालक
वारद बायोटेक प्रा. लि. लातूर
भ्रमणध्वनी : 9421374498
 
दर्जेदार रोपे उपलब्ध
 
या नर्सरीमध्ये 200हून अधिक प्रकारच्या रोपांची निर्मिती केली जाते. सेमी इनडोअर प्लांट्स, मोकळ्या जागी लावण्याची झाडे, घरातील वनस्पती आणि टिश्यू कल्चर अशी तीन प्रमुख उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सेमी इनडोअरसाठी ’अरेका पाम प्लांट’, ’ग्रीन ड्रासेना रिफ्लेक्सा प्लांट’, ’पॉइंटसिटिया फ्लॉवरिंग’ ही शोभिवंत रोपे उपलब्ध आहेत, तर ‘एडेनियम’, ’फ्रेश ऑफिस टाईम फ्लॉवर प्लांट’, ’बोन्साय’, ’हिरवे कलकत्ता पान’, ’बांबू’, ’पेपरोमिया’, ’मिनी तगर प्लांट’ ही रोपे आणि टिश्यू कल्चरमध्ये ’अलोकिशया’, ’पेपरोमिया’, ’सिंगोनियम रबर’, ’फिलोंडेड्रोन’ इ. रोपे उपलब्ध आहेत. घरातील कुंडीपासून तेकॉर्पोरेट कार्यालये, शाळा, रुग्णालय अशा सर्व आस्थापनांपर्यंत शोभिवंत रोपांची मागणी वाढत आहे. अनेक इमारती, कार्यालये तसेच घरांना शोभिवंत रोपांमुळे शोभा आली आहे. याखेरीज जांभूळ, मोसंबी, नारळ, आंबा, केळी आणि चिकू या फळांची रोपे तयार केली जातात.
वारद बायोटेकचा सहा शाखांमध्ये विस्तार
कल्पकता, कष्ट आणि नियोजनातून अनिल यांनी आपल्या नर्सरी उद्योगाचा विस्तार केला आहे. लातूर येथील गांधी चौक व बार्शी रोड या ठिकाणी, तर बर्दापूर (ता. अंबाजोगाई), उरळी कांचन (पुणे-सोलापूर मार्ग), डाळींब गाव (उरळी कांचन) आणि किनगाव (ता. अहमदपूर) अशा सहा शाखा आहेत. यामुळे वारद बायोटकेची दर्जेदार रोपेे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली आहे. गुणवत्तापूर्ण व खात्रीशीर रोपे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. या माध्यमातून वर्षाकाठी सहा कोटी रुपयांची उलाढाल होत असते.
पत्नी संगीताची समर्थ साथ
नर्सरी व्यवस्थापन, रोपांच्या नोंदी, मार्केटिंग, विक्री, कामगारांचे व्यवस्थापन अशा सर्व कामांत पत्नी संगीता वारद या समर्थ साथ देतात. व्यवसायातील प्रत्येक निर्णयात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. संगीता यांच्या प्रत्येक सूचना व्यवसायाला दिशा देणार्‍या असतात.
भविष्यातील नियोजन
 
येत्या काळात विविध प्रकारची दुर्मीळ देशी फळझाडे, वृक्षांची रोपे तयार करण्याचे नियोजन आहे. याखेरीज ग्रामीण तरुणांना स्थानिक पातळीवर वर्षभर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावा यासाठी ‘वारद बायोटेक नर्सरी फ्रँचायसी’ ही योजना तयार केली जाणार आहे.
वारद बायोटेेक हा केवळ खात्रीशीर उत्पन्नाचा व्यवसाय नाही, तर पर्यावरण बचाव अभियानाचाही एक भाग आहे. हरित-सुंदर लातूर शहरनिर्मितीत अनिल यांचा सहभाग असतो. यासाठी त्यांचे समाजातील विविध पर्यावरण संस्थांसोबत काम सुरू आहे. याअंतर्गत पर्यावरण उपक्रम राबविले जातात. अशा रीतीने ’वारद बायोटेक’ लातूरच्या कृषी उद्योगात मोलाची भर टाकत आहे.