वनौषधी, टोमॅटोचे गाव वडवळ नागनाथ

विवेक मराठी    20-Jul-2024   
Total Views |
krushivivek
लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ (ता. अहमदपूर) येथील छोटासा डोंगर संजीवनी बेट (औषधी वनस्पती) म्हणून ओळखला जातो. या बेटावर सुमारे 177 दुर्मीळ औषधी वनस्पती आढळतात. याखेरीज हे ठिकाण ‘टोमॅटोचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. टोमॅटो खरेदीसाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील व्यापारी या ठिकाणी ठाण मांडून असतात.
भारतात औषधी वनस्पतींचा प्रचंड खजिना आहे, असे म्हटले जाते. भारतामध्ये 16 प्रकारचे कृषिनुकूल वातावरणाचे प्रदेश आहेत. यात वनस्पतीच्या विविध प्रकारच्या 45000 प्रजाती आहेत, त्यापैकी 15 हजार प्रजाती औषधी उपयोगाच्या आहेत. सिद्ध व युनानी औषधी चिकित्साशास्त्रामध्ये जवळपास 1500 औषधी वनस्पतींचा उल्लेख आढळतो. यापैकी 500 वनस्पती नित्याच्या औषधी निर्माणासाठी वापरात आहेत. वडवळ नागनाथ (ता. अहमदपूर) येथे संजीवनी बेट (एक छोटासा डोंगर) आहे. या डोंगराच्या माथ्यावर विस्तीर्ण असे पठार पसरलेले आहे. डोंगराच्या सर्व बाजूंनी व डोंगरमाथ्यावर दुर्मीळ वनस्पती आढळतात. या गावाला धार्मिक वारसा लाभला आहे. नवनाथातील एक नाथ नागनाथ गावचे ग्रामदैवत आहे. बेटावरील दगड (लालसर), माती (लाल रंग), वनस्पती आणि वातावरणामुळे इथे उगवणारी प्रत्येक औषधी वनस्पती गुणकारी समजली जाते. क्षय, दमा, पित्त, मधुमेह आदी असाध्य रोगांनी पीडित रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती गावकरी सांगतात.
 
krushivivek 
 
दुर्मीळ औषधी वनस्पतींचा खजिना
 
वैद्य व रुग्णांसाठी पंढरी असलेल्या या बेटावर अडुळसा, दुधी, शेवरा, वड, भुईलिंब, लाजाळू, फणशी, कंकुटी, बनपात, खिरणी, वेली सोयाबीन, दमवेल, शालपर्णी, भूत्याकेशी, रानद्राक्षे, गुलाबी कोरांटी, खैर, बारतोंडी, जिवती, लहान जास्वंद, टेंभुर्णी, सालई, उतरण, हेंकळ, कोटे कोरांटी, अतिबला, छत्री बाभूळ, कापूर माधुरी, तुळस, आपटा, भूतमांजर, महारूख, जखमजोडी, कडवी नाय कंद, पित्त पापडा, शिवलिंगी, खडक शेपू, विष्णुक्रांता, पुनर्नवा, पिवळी तिळवण, बहावा, लाल गुंज, रानतुळस, काबा, पाथर, रानतूर, भुईआवळा, मुरमाटी बाभूळ, रुई, कृष्णसारीवा, तूपकडी, कडूनाय, अधोपुष्पी, हिवर, आसाना, कुरडू, गुळवेल, काकजंधा, कराळ, पिलूकी, थायटी, रोशा गवत, हरणदोडी, दहीपळस, बेहडा, वायवर्ण, बेल, निर्मली, चिंचवा, रानजाई, धामण, काळी टाकळी, गुलाबी बाभूळ, कडुलिंब, चिंच, झरवड, पळस, आजणवृक्ष, पाषणभेदी, माकडशिंगी, जिवती, गुलपंखी, सोमलता, बृहत्पुष्पी, गोकर्णी, गुलपंखी, किलवर लाल शेवरा, मरण मातंग, फड्या निवडुंग, पळस, पाचूंदा अशी 177 दुर्मीळ औषधी वनस्पती आढळतात.
 
उत्तरा नक्षत्रातील विशेष
 
दरवर्षी सप्टेंबर महिन्यात येणार्‍या उत्तरा नक्षत्रामध्ये संजीवनी बेटाचा परिसर हिरव्यागार वनस्पतींनी सजलेला असतो. या काळात औषधी वनस्पतींची कंदमुळे-फुले व पाने भरभरून येताना दिसतात. ग्रामदैवत नागनाथाची यात्राही याच नक्षत्रात असते. येथील वनस्पतींचे सेवन केल्याने कोणताही रोग बरा होतो, असाही गावकर्‍यांचा समज आहे. त्यामुळे उत्तरा नक्षत्राची पर्वणी साधून देशभरातील हजारो लोकांचे पाय संजीवनी बेटाला लागतात. याशिवाय परप्रांतांतील वैद्य, हकीम व वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णांचा लोंढा येत असतो. येथे येणारे रुग्ण या बेटावर आठ ते दहा दिवस राहून वनौषधींचे सेवन करतात.
krushivivek 
 
संजीवनी बेटास राजाश्रयाची गरज
 
भारतीय वनौषधींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे, हे लक्षात घेता वनौषधींचा खजिना असलेल्या संजीवनी बेटास केंद्र व राज्य शासनाकडून राजाश्रय मिळाल्यास या क्षेत्रात मोठा विकास घडून येईल. ‘व्होकल टू लोकल‘द्वारे स्थानिक वनौषधी जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी मोठा वाव मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, येथील दुर्मीळ वनस्पतींच्या प्रजातींचे संरक्षण होईल. शिवाय या ठिकाणी निसर्गोपचार, वनौषधी रसशाळा, योग उपचार केंद्राची उभारणी केल्यास सर्वसामान्य रुग्णास याचा मोठा लाभ होणार आहे.
 
krushivivek
 संजीवनी बेटावरील औषधी वनस्पती
 
 
 
टोमॅटोचे गाव म्हणून प्रसिद्ध
 
वनौषधीचे भांडार असलेले वडवळ नागनाथ हे ‘टोमॅटोचे गाव‘ म्हणून लातूरमध्ये प्रसिद्ध आहे. पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या चाळीस वर्षांपासून टोमॅटोची शेती केली जाते. गावचे जमीन धारण क्षेत्र 1160 हेक्टर आहे. पूर्वी हे गाव विड्याच्या पानांसाठी प्रसिद्ध होते. सध्या ड्रॅगन फ्रुट, सीताफळ, केशर आंबा, जिरॅनियम आदी शेती पाहायला मिळते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर टोमॅटोची शेती करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. साधारणतः चारशे हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोच्या शेतीचे क्षेत्र व्यापले आहे. गावात टोमॅटोच्या चार रोपवाटिका आहेत. यामुळे टोमॅटोचे लागवड क्षेत्र वाढण्यास मदत मिळाली आहे. शेतकरी टोमॅटोची विक्री जागेवरच करतात. या गावातून थेट हैदराबाद, बेंगलोर, उत्तर प्रदेश, दिल्लीपासून पाकिस्तानपर्यंत टोमॅटो पाठविले जातात. यासाठी विविध राज्यांतील व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी ठाण मांडून असतात. या माध्यमातून वार्षिक शंभर कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होत असते. टोमॅटो शेतीमुळे वडवळ नागनाथ परिसरातील चार ते पाच गावांतील लोकांना रोजगार मिळाला आहे. या गावात टोमॅटोआधारित प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होण्यास अधिक वाव आहे. एकूणच नैसर्गिक वनौषधी संपदा आणि कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या गावाची कहाणी अनेक गावांना प्रेरणा देणारी आहे.
 
 
“वडवळ नागनाथ गाव आरोग्य व कृषी पर्यटन म्हणून विकसित व्हावे” - अण्णासाहेब पाटील
 
वडवळ नागनाथ येथील ‘संजीवनी वनस्पती बेट‘ हा एक निसर्गदत्त ठेवा आहे. या बेटाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. येथील वनस्पतींचे जतन करण्यासाठी राजा विक्रमादित्य चालुक्यांनी बेटावर तलाव बांधला, असे म्हटले जाते. या ठिकाणी 175हून अधिक दुर्मीळ वनस्पती आहेत. आपल्याकडे वैदिक काळापासून वनौषधींचा वापर होत आला आहे. कोरोनाकाळापासून वनौषधींना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जगातील अनेक देश वनौषधींकडे वळले आहेत. वनौषधींची बाजारपेठ लक्षात घेता संजीवनी वनस्पती बेटाचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संजीवनी बेट विकसित करावे. या माध्यमातून शेतकरी वनौषधी शेतीकडे वळतील. वडवळ नागनाथची ‘टोमॅटोचे गाव‘ म्हणून ख्याती आहे. या ठिकाणी टोमॅटोचा प्रक्रिया कारखाना उभा करावा. त्यामुळे पर्यटन विकास व आरोग्य यांची सांगड घातली तर वडवळ नागनाथ हे गाव आरोग्य व कृषी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येईल.
 
- अध्यक्ष, बापूसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, वडवळ नागनाथ
मो.नं.ः 9422469226

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.