सोयाबीन, हरभरा, कोथिंबीर शेतीतून साधली प्रगती

20 Jul 2024 15:39:32

krushivivek
 
चाकूर तालुक्यातील तीवटघाळ या छोट्या गावात शिवाजी पाटील यांची 40 एकर शेती आहे. शिवाजी यांनी लहानपणापासून शेतीची आवड जोपासली आहे. शैक्षणिक अर्हता जरी कमी असली तरी प्रत्यक्ष शेतीत काम केल्यामुळे शिवाजी यांना शेतीचे ज्ञान अवगत झाले. पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसे. त्यामुळे ते आधुनिक शेतीकडे वळले. ही शेती करण्यासाठी त्यांच्याकडे सर्व अवजारे, मशीन व ट्रॅक्टर आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी अडीच एकरांमध्ये केशर आंब्याची (सहाशे झाडे) लागवड केली. 2023-24 हंगामात सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सोयाबीन, हरभरा आणि कोथिंबीर हे त्यांचे मुख्य पीक. 2023-24 हंगामात सोयाबीनचे 300 क्विंटल उत्पन्न घेतले, तर हरभरा पिकाचे 135 क्विंटल उत्पन्न मिळाले. दहा एकरांमध्ये कोथिंबरची लागवड केली होती. यातून एकरी दहा क्विंटल धणे मिळाले. दोनशे रुपये किलो दराने ते शेतकर्‍यांना धणे विकतात.
यंदा 40 एकरांत सोयाबीनची (जात 992 फुले) लागवड केली. एकरी 16 ते 18 क्विंटल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. रब्बी हंगामात हरभरा, कोथिंबीर, ज्वारी, गहू आदी पिकांची लागवड करतात. पाणी व्यवस्थापनासाठी चार विहिरी व चार बोअर आहेत. शिवाजी पाटील यांनी अतिशय कष्टातून शेती यशस्वी केली आहे. सध्या ते तीवटघाळमध्ये विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन म्हणून दायित्व सांभाळत आहेत. नवनवीन शेती प्रयोगांविषयी माहिती घेऊन ते शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे तरुण शेतकर्‍यांचे ते प्रेरणास्थान आहेत.
संपर्क
शिवाजी पुंडलिकराव पाटील
तीवटघाळ, ता. चाकूर, जि. लातूर
भ्रमणध्वनी : 7030530400
Powered By Sangraha 9.0