अर्थार्जनाला आधार शिक्षणाचा

20 Jul 2024 12:45:49
sugarcane workers
जन शिक्षण संस्थान किंवा कृषी विज्ञान केंद्र यांचे ऊसतोड कामगारांसाठी, गरीब ग्रामीण जनतेसाठी सुरू असलेले काम हे अधिक व्यापक होऊ लागले आहे आणि हळूहळू त्याचे सकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. ऊसतोड कामगारांमधील हा बदल त्यांच्या स्थलांतराला मोठ्या प्रमाणावर खीळ बसवेल अशी आशा वाटते.
स्थिर व सुखी आयुष्य जगणार्‍या आपल्यासारख्या माणसांना कल्पनाही नसते की, आपल्याच राज्यातील एखाद्या जिल्ह्याला स्थलांतराचा तब्बल चार ते पाच दशकांचा इतिहासही असू शकतो. दरवर्षी बीड जिल्हा व आसपासच्या भागांतील ऊसतोड करणारे लाखो मजूर वर्षातील ठरावीक काळ आपले गाव-राहते घर-कुटुंबीय यांना सोडून रोजगारासाठी स्थलांतरित होतात. मागच्या लेखात आपण स्थलांतराच्या प्रश्नामुळे या भागात उद्भवणार्‍या समस्यांचा आढावा घेतला. रोजगार, स्त्रीआरोग्य, बालशिक्षण, बालआरोग्य, समाजाचे असंघटित असणे, कर्जसमस्या, वाढती व्यसनाधीनता, त्या परिसराचे एकूणच बिघडलेले अर्थकारण अशा अनेक समस्यांना मागील प्रचंड मोठा काळ बीड जिल्हा तोंड देत आला आहे. यातील प्रमुख समस्या आहे ती जोडप्याच्या, प्रामुख्याने ऊसतोड मजूर स्त्रियांच्या स्थलांतराची आणि त्यामुळे समाज व कुटुंबांच्या असंघटिततेची.
 
 
ऊसतोड मजूर स्त्रियांच्या स्थलांतरामुळे समाजाला वेगवेगळ्या स्वरूपाच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. या स्थलांतरामुळे त्यांच्या एकूण कुटुंबाच्याच आरोग्याचा स्तर खालावतो असे लक्षात आले आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील स्थलांतराचा प्रश्न सोडवण्याच्या हेतूने व एकूणच समाजाचा स्तर उंचावण्यासाठी गेली अनेक वर्षे काम सुरू आहे. त्यातील दोन प्रमुख संस्था म्हणजे दीनदयाल शोध संस्थानच्या संचालित जन शिक्षण संस्थान आणि कृषी विज्ञान केंद्र. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कौशल्य विकासांतर्गत विविध प्रशिक्षण, कृषी उत्पादन व कृषीसंबंधित अन्य उत्पादनांद्वारे स्थलांतरे थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे व त्यास यशही येऊ लागले आहे.
 
नानाजींच्या माध्यमातून दीनदयाल शोध संस्थान संस्थेद्वारे ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी गुरुकुल सुरू करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे गुरुकुल चालवण्यात येत होते. हा छोटासा टप्पा असला तरी इथे खरी सुरुवात झाली ती ऊसतोड कामगारांच्या समस्यांवर प्राधान्यक्रमाने तोडगा काढण्याची. 
 
जन शिक्षण संस्थानच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याविषयी संचालक गंगाधर देशमुख यांनी विस्तृत माहिती दिली. 1987च्या मे महिन्यात बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे धन्यता अभियान योजण्यात आले होते. ऋषितुल्य नानाजी देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली धन्यता अभियानांतर्गत एका मोठ्या जलाशयामधील साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू झाले. सुमारे सतराशे स्वयंसेवक या कार्यात श्रमदान करीत होते. हे काम सुरू असताना ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर काम करण्याची आवश्यकता आणि प्राथमिकता नानाजींच्या लक्षात आली. ऊसतोड मजुरांच्या मुलांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबवण्याच्या हेतूने नानाजींच्या माध्यमातून दीनदयाल शोध संस्थान संस्थेद्वारे ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी गुरुकुल सुरू करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे गुरुकुल चालवण्यात येत होते. हा छोटासा टप्पा असला तरी इथे खरी सुरुवात झाली ती ऊसतोड कामगारांच्या समस्यांवर प्राधान्यक्रमाने तोडगा काढण्याची.
 
जन शिक्षण संस्थानचा ‘कौशल्य विकास प्रशिक्षण’ उपक्रम
 
बीड जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या जास्त व उत्पादन कमी. तशातच एकूणच उद्योजकतेचा किंवा एमआयडीसीसारख्या सेक्टर्सचा अभाव यामुळे अर्थार्जनास मोठ्या प्रमाणावर फटका बसत होता व ऊसतोडणीकरिता बाहेर जावे लागत होते. याचा परिणाम संपूर्ण समाजाच्या जीवनमानावर होत होता. स्थानिकांना रोजगारासाठी, ऊसतोडणीसाठी बाहेर जावे लागू नये. उलट, त्यांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता होती.
 
 
दीनदयाल शोध संस्थानांतर्गत 2004 साली ‘जन शिक्षण संस्थान, बीड’ची स्थापना करण्यात आली व या माध्यमातून गरजूंना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले. सर्वसामान्य अल्पसाक्षर, निरक्षर महिला व पुरुष यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येते. केवळ प्रशिक्षणावर न थांबता, पुढे स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे, त्यासाठी बँकांच्या आवश्यक त्या योजनांची माहिती देणे हेदेखील केले जाते. आजवर संस्थेच्या वतीने हजारो नागरिकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात 90 टक्के महिला आहेत, तर 10 टक्के पुरुष आहेत. यात ऊसतोड कामगार महिला व पुरुष आहेतच. त्याचबरोबरीने सेवावस्त्यांमध्ये राहणारे नागरिक, ट्रान्सजेंडर्स, कैदी यांनाही प्रशिक्षण दिले जाते.
 

sugarcane workers
 
बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये जन शिक्षण संस्थान या संस्थेचे काम सुरू असून एकूण वेगवेगळे 12 प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते व स्वयंरोजगाराकरिता प्रेरित केले जाते. याकरिता परिसराचे सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसारकोर्सेस तयार केले. ब्युटिपार्लर, बॅगा शिवणे, इमिटेशन ज्वेलरी तयार करणे, रांगोळी आणि मेंदी काढणे, शिवणकाम, शोभिवंत वस्तू तयार करणे, एसी-रेफ्रिजरेटर दुरुस्ती, मोबाइल दुरुस्ती, मोटर सायकल दुरुस्ती, गॅरेज, प्लंबिंग अशा वेगवेगळ्या प्रशिक्षणांचा लाभ महिला व पुरुष घेतात. संस्थेने पाच उपजीविका केंद्रे सुरू केली आहेत. केवळ प्रशिक्षणापर्यंत न थांबता संस्थेच्या नानाजी देशमुख उपजीविका केंद्राच्या माध्यमातून माजी प्रशिक्षणार्थींचे मेळावे घेतले जातात. यानिमित्ताने जिल्हा उद्योग केंद्राचे, खादी ग्रामोद्योग केंद्राचे अधिकारी, वेगवेगळ्या बँकांचे अधिकारी यांची प्रशिक्षणार्थींशी भेट होते. सरकारच्या उद्योगविषयक वित्तीय योजनांची माहिती, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया यांची माहिती या मेळाव्यात दिली जाते. या काळात इन्फोसिसचे पंडित आणि नरेंद्र वैशंपायन यांच्याशी चर्चा चालू होत्या. एका सत्रात इन्फोसिसच्या संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यादेखील ऊस तोड कामगार महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी झाल्या होत्या. उपजीविका केंद्राच्या माध्यमातून त्यांना परवाने काढून देण्यासही मदत केली जाते. काहींचे बँक खातेही नसते, अशांना खाते काढण्यास मदत केली जाते. गेल्या वर्षी सात महिलांना बँकेत खाते काढल्यानंतर लगेचच व्यवसायाकरिता मुद्रा योजनेअंतर्गत कर्जही मिळाले. अनेक स्त्रियांनी स्वतःची ब्युटीपार्लर्स सुरू केली आहेत किंवा बॅगा शिवण्याचे काम सुरू केले आहे.
 
 अनेक महिला ऊसतोड कामगार असून त्यांच्यापैकी काही जणींनी ऊसतोडीस जाणेही बंद केले आहे. अधिकाधिक तरुण स्त्री-पुरुषांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला व उद्योजकतेची कास धरली, तर बीड जिल्ह्यातील कोणासही रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही.
जन शिक्षण संस्थानच्या स्थापनेपासून आजपर्यंत 43 हजार लोकांना प्रशिक्षण देण्यात आले असून सुमारे नऊ हजार प्रशिक्षणार्थींनी उद्योगांच्या माध्यमातून अर्थार्जन करण्यास सुरुवातही केली आहे. यापैकी अनेक महिला ऊसतोड कामगार असून त्यांच्यापैकी काही जणींनी ऊसतोडीस जाणेही बंद केले आहे. अधिकाधिक तरुण स्त्री-पुरुषांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला व उद्योजकतेची कास धरली, तर बीड जिल्ह्यातील कोणासही रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही.
 

sugarcane workers 
 
कृषी विज्ञान केंद्राचे स्त्रियांसाठी अभिनव उपक्रम
 
जन शिक्षण संस्थानच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाप्रमाणेच दीनदयाल शोध संस्थानच्या कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातूनही गेली अनेक वर्षे स्थानिक शेतकर्‍यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. 1993-94 कृषी विज्ञान केंद्राची स्थापना झाल्यानंतर गेली तीस वर्षे आधुनिक पद्धतीने शेती, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, कमी जागेत अधिक उत्पादन कसे मिळवावे याविषयी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. याच केंद्राच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पावले उचलली जाऊ लागली आहेत.
 
 
बीड जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख वसंतराव देशमुख आणि कृषी विद्या शास्त्रज्ञ कृष्णा करडीले व नरेंद्र जोशी यांच्या पुढाकाराने 2022 साली 300 ऊसतोड कामगार महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला. आमची ऊसतोडणीस जाण्याची इच्छा नसते, अन्य काही रोजगार नाही म्हणून जावे लागते, पर्यायी रोजगार इथेच उपलब्ध झाला तर आम्हाला जावे लागणार नाही, असा सूर ऊसतोड कामगार महिलांच्या या मेळ्यात उमटला. यानंतर संस्थेचे प्रकल्प प्रमुख व केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्या माध्यमातून अंबाजोगाई, परळी, केज, बीड इत्यादी तालुक्यांतील विविध गावांत व लमाणी तांड्यांवरील ऊसतोड कामगारांच्या गटचर्चा व बैठका घेण्यात आल्या. उपस्थित महिलांना कृषी सहउत्पादनांच्या माध्यमातून कशा प्रकारे उद्योग सुरू करता येऊ शकतो याची माहिती देण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून बारा-तेरा महिला या प्रयोगासाठी तयार झाल्या. या महिला कोणत्या प्रकारची उत्पादने करू शकतात, त्याकरिता कोणत्या स्वरूपाचा कच्चा माल येथे उपलब्ध होऊ शकतो, कमीत कमी यंत्रसामग्री वापरून, भांडवलाशिवाय आणि पौष्टिकतेचा विचार करून कशाचे उत्पादन करता येईल यासाठी सर्वेक्षण व चर्चा करण्यात आल्या.
 


sugarcane workers 
 
बाजरी खारोडी आणि बरेच काही...
 
उपरोक्त सर्व मुद्द्यांचा विचार करून बाजरी खारोडी हे उत्पादन निश्चित करण्यात आले. बाजरी, ज्वारी, कापूस, सोयाबीन, शेवगा ही या भागातील प्रमुख पिके. 2023 हे वर्ष त्याच काळात भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलेे. तत्पूर्वीच 2022 मध्ये संस्थेने ज्वारी, बाजरी पासून अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला. याच वर्षात महिलांच्या दोन पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. मराठी-हिंदीमध्ये ‘श्री अन्न पुस्तिका’ प्रकाशित करण्यात आली. घरोघरी केली जाणारी बाजरी खारोडी विक्रीयोग्य असावी म्हणून कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी गृह विज्ञान विभागांतर्गत त्याची स्टँडर्ड पाककृती तयार करण्यात आली. याविषयी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ रोहिणी जोशी-भरड यांनी माहिती दिली. उत्पादन अधिकाधिक पौष्टिक असेल याचा विचार पाककृती तयार होताना करण्यात आला. दहा-पंधरा प्रयोगांनंतर व त्यावरील प्रतिक्रियांनंतर एक पाककृती फायनल झाली. या रेसिपीचे सर्व महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी आवश्यक ती सामग्री पुरवण्यात आली. या महिलांनी 2022 पासून नियमित खारोड्यांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. खारोड्यांसाठी आवश्यक असणारे तीळ, लसूण इत्यादी पीकही या स्त्रिया आपल्या शेतातच घेतात. आवश्यक तेवढे खारोडीसाठी वापरतात, उरलेले विकून पैसे मिळवतात. त्यामुळे खारोडीसाठी अत्यंत अल्प खरेदी बाजारातून करावी लागते. 2023 हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे या उत्पादनांना अधिक चांगला प्रतिसाद मिळू लागला. पुण्यातील प्रसिद्ध इन्फोसिस कंपनीने खारोड्या वाळवण्याच्या यंत्राकरिता अर्थसाहाय्य केले. खारोडीसह शेवगा अर्थात मोरिंगा पावडर, आवळा कँडी, कारळा चटणी इत्यादी तयार करण्यासही सुरुवात केली. यापुढील आव्हान होते ते या उत्पादनांच्या विक्रीचे. ऊसतोड कामगारांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठीच इन्फोसिसच्या हेमंत सेलनोहकर यांनी खूप मदत केली. त्यांनी पुणे येथे मार्केट उपलब्ध करून दिले. बाजरी खारोड्या, ज्वारी शेव, मिलेट मिक्स, गोमय दिवे, शेवगा पावडर अशा उत्पादनांचे ‘दिवाळी भेटवस्तू किट’ तयार करण्यात आले. याचे पॅकिंग, लेबलिंग करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. वेगवेगळ्या बँका किंवा पतसंस्था दरवर्षी आपल्या सभासदांना, हितचिंतकांना दिवाळीत भेटवस्तू देतात. कोणत्याही शोभेच्या वस्तू वा तयार खाद्यपदार्थांऐवजी हे किट्स द्यावेत, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या संध्या कुलकर्णी तसेच दीनदयाल शोध संस्थानचे प्रकल्प प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी या बँका तसेच पतसंस्थांना केले व यास भरभरून प्रतिसाद मिळाला. सलग दोन वर्षे या उपक्रमाद्वारे माध्यमातून कोणाला 25 हजार, तर कोणाला 35, तर कोणाला 45 हजार रुपये या उत्पादनांच्या विक्रीतून मिळाले. 300 महिलांच्या प्रशिक्षणानंतर जवळपास 100 महिलांनी हे उपक्रम सुरू केले. पहिल्या वर्षी पावणेदोन लाख व दुसर्‍या वर्षी अडीच लाख रुपये इतकी आर्थिक उलाढाल या उपक्रमाद्वारे झाली. संशोधन, प्रयोगशाळा परीक्षण व स्टँडर्ड रेसिपीज तयार करून टिकाऊ स्वरूपातील एकूण 25 प्रकारची उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण या उपक्रमांतर्गत देण्यात आले आहे. यामुळे ऊसतोड महिला अर्थार्जन तर करू लागल्या आहेतच त्याचबरोबरीने अनेक स्थानिक ग्रामीण महिलांनाही अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे अशा शेतीसंलग्न उत्पादन व त्यांच्या विक्रीद्वारे पैसा कमावता येतो हे लक्षात आल्याने घरातील अन्य माणसेही आपल्या वैयक्तिक व्यवधानांतून वेळ काढून या उद्योजिकांना मदत करत असल्याचे संस्थेच्या लक्षात आले. थोडक्यात, हे खाद्योत्पादन उपक्रम हे केवळ महिलांनाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबालाच प्रगतीच्या मार्गावर नेत आहेत. या उपक्रमाद्वारे अर्थार्जन होत असल्याने काही महिलांनी ऊसतोडणीस जाणे बंद केल्याचेही संस्थेच्या माध्यमातून समजते. ज्या स्त्रिया अद्याप ऊसतोडणीस जात आहेत, त्या परत आल्यावर सहा महिने या उपक्रमात सहभागी होतात.
 
 
हे उपक्रम बीडमधील साधारण सहा तालुक्यांमध्ये सुरू आहेत. येत्या काळात हे सर्व तालुक्यांमध्ये राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने अंबाजोगाईत ग्रामीण ऊसतोड स्त्रियांचे टेलरिंग क्लस्टर तयार झाले आहे. अनेक महिलांनी आलेल्या उत्पन्नातून शिलाई मशीन घेतली, तर काहींकडे मशीन होती. अशा स्त्रिया बॅग्ज, पर्सेस शिवतात. किटसाठी लागणार्‍या ज्युट बॅग्जही त्यांनी स्वतःच शिवल्या आहेत. एका महिला प्रशिक्षकांनी येऊन बॅग्ज शिवण्याचे प्रशिक्षण दिले. अनेक स्त्रिया या कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यात तरबेज असतात. केसाचे चाप, साडी पिना, दाराची तोरणे, देवांची वस्त्रे अशा 10 ते 50 रुपयांपर्यंतच्या 25 प्रकारच्या वस्तू या ग्रामीण महिलांनी तयार केल्या. या वस्तू संक्रांतीच्या वाणासाठी खरेदी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. छ. संभाजीनगरमधील महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्याचाही चांगला परतावा या महिलांना मिळाला.
 

sugarcane workers 
 
महिलांच्या आरोग्यासाठी परसबाग उपक्रम
 
कौतुकास्पद अपवाद वगळता समाजात, विशेषतः अशिक्षित/अल्पशिक्षित समाजात स्त्रीच्या आरोग्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे केवळ उद्योजकतेच्या अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ऊसतोड महिला व ग्रामीण स्त्रियांच्या एकूण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ही संस्था परसबागेसारखे अत्यंत अभिनव उपक्रम राबवते.स्वतःच्या व कुटुंबीयांच्या आरोग्याचा विचार करत, स्त्रियांनीच पुढाकार घेऊन परसबागेत (किचन गार्डन) आवश्यक पोषणमूल्य असणार्‍या भाज्या पिकवाव्यात, औषधी वनस्पती लावाव्यात यासाठी संस्थेच्या वतीने त्यांना परसबाग किटचे वितरण करण्यात येते. तसेच ही बाग कशी लावावी, कशी जोपासावी याचेही प्रशिक्षण देण्यात येते. या किटमध्ये अडुळसा, पाती चहा, आवळा, शेवगा, कढीपत्ता, आले, पारंपरिक फळे तसेच फळभाज्या-पालेभाज्या या सार्‍यांचा समावेश असतो. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, परसबाग किट वितरणापूर्वी गावात आरोग्य शिबीर घेतले जाते व त्यात रक्त तपासण्या केल्या जातात. ज्या महिला गर्भपात केल्यामुळे, गर्भपिशवी काढण्यामुळे किंवा पुरेसे अन्न मिळत नसल्याने कुपोषणामुळे अ‍ॅनिमिक झाल्या असतील वा त्यांच्यामध्ये जीवनसत्त्वांची कमतरता असेल अशांना हे परसबाग किट प्रामुख्याने दिले जाते. तसेच लागवड कशी करावी याचे प्रशिक्षणही दिले जाते. परसबाग लागवडीनंतर त्या स्त्रियांच्या आहारात भाज्यांचा आवश्यक प्रमाणात समावेश झाल्याचे लक्षात आले आहे. परसबागेतील भाज्या ठरावीक काळ सेवन केल्यानंतर परत एकदा रक्त तपासण्या केल्या तेव्हा ज्या स्त्रिया अ‍ॅनिमिक होत्या त्यांच्या शरीरातील लोह तसेच जीवनसत्त्व वाढल्याचे दिसून आले. तसेच त्यांची ताकदही वाढली आहे. स्थलांतरित ऊसतोड कामगार महिला या जेव्हा काम संपवून परत येतात तेव्हा त्यांची तब्येत अत्यंत नाजूक झालेली असते. अशा वेळेस शारीरिक झीज भरून काढण्यासाठी ‘परसबाग’ ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरते आहे.
जन शिक्षण संस्थान किंवा कृषी विज्ञान केंद्र यांचे ऊसतोड कामगारांसाठी, गरीब ग्रामीण जनतेसाठी सुरू असलेले काम हे अधिक व्यापक होत गेले व हळूहळू त्याचे सकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले, की ऊसतोड कामगारांचा या कामांकडे ओढा वाढत जाईल व स्थलांतराला मोठ्या प्रमाणावर खीळ बसेल अशी आशा वाटते. जन शिक्षण संस्थान व कृषी विज्ञान केंद्रास त्यांच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा.
Powered By Sangraha 9.0