तळकोकणाचं वैभव

विवेक मराठी    19-Jul-2024   
Total Views |
‘तळकोकण’ म्हणजे साधारणतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दक्षिण भाग. या तळकोकणाला एक वेगळी ‘आपली’ अशी संस्कृती आहे. पर्यटनवाढीला कोकणात प्रचंड वाव आहे. काय बघायचं, या प्रश्नाची अनेक आकर्षक उत्तरं निर्माण करायला कोकणी माणसाने शिकायला हवं. परिसर भरपूर फिरून पर्यटनमूल्य असलेली ठिकाणं हुडकायला हवीत. परिसराचं वर्णन, त्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती ही आपण जेवढी जास्तीत जास्त मिळवू तेवढं कोकणातल्या सामान्य जागांनाही पर्यटनमूल्य येईल. परिसराचा जेवढ्या सूक्ष्म पातळीवर अभ्यास होईल तेवढी पर्यटनाची क्षितिजं विस्तारतील आणि त्यातून कोकणच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी येईल.
 
konkan tourism
रत्नागिरी जिल्ह्यात राहत असूनही त्याचं दाक्षिणात्य भावंड असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने लहानपणापासूनच मनावर भुरळ घातलेली आहे. आपण जिथे राहतो तिथपासून खूप दूरच्या ठिकाणी फिरायला जाण्याचं आकर्षण अनेकांना असतं; पण आपल्या जवळपासच इतकी माहीत नसलेली ठिकाणं असतात, जी बघण्यासारखी, पर्यटनानंद घेण्यासारखी आणि अभ्यासण्यासारखी असतात. एक जन्म पुरणार नाही इतका प्रचंड पर्यटनस्थळांचा खजिना कोकणाला मिळाला आहे. ’तळकोकण’ म्हणजे साधारणतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दक्षिण भाग. या तळकोकणाला एक वेगळी ’आपली’ अशी संस्कृती आहे. लहानपणापासून तळकोकणातल्या माझ्या मावशीच्या ’त्रिंबक’ या गावी जातोय. मध्ये सुमारे आठ वर्षांचं अंतर पडून अलीकडे नुकतंच पुन्हा या गावी जाणं झालं आणि मन एका वेगळ्याच विश्वात रमलं!
 
’त्रिंबक’ हे मालवण तालुक्यातलं एक सुंदर निसर्गसंपन्न गाव. तळकोकणात सरसकट आंबा-काजूची लागवड नसल्याने रस्त्याच्या आजूबाजूला जंगलभाग बर्‍यापैकी दिसतो. मुंबई-गोवा हायवेने कणकवलीपर्यंत गेलं, की ’आचरा’ या गावाकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याला आपली गाडी लागली, की जानवली नदी आणि गड नदी यांच्या मधून अनुक्रमे ’कलमठ’, ’वरवडे’,’किर्लोस’, ’रामगड’, ’श्रावण’, ’आडवली’, ’पळसंब’ अशी गावं करत करत रस्ता त्रिंबक गावापर्यंत पोहोचतो. पुढे हा रस्ता चिंदरमार्गे आचर्‍याला जातो व त्यापुढे मालवणला जातो. मुंबई-गोवा सागरी महामार्गही देवगडमार्गे आचर्‍याला येतो. एकंदरीत, ’आचरा’ हा इथला अनेक वेगवेगळ्या गावांना जोडणारा मुख्य तिठा!
 
 
त्रिंबक गाव आणि आजूबाजूचा परिसर इथली लहानपणापासून भावणारी गोष्ट म्हणजे इथे ’शेती जगणारी’ कुटुंबं आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत आंबा बागायतीचं प्रमाण या भागात कमी असल्याने शेती हा प्रधान व्यवसाय राहिला आहे. लाल तांदळासारख्या पिकांच्या पारंपरिक जातीही या भागात जपल्या गेल्या आहेत. कडधान्य शेती भरपूर प्रमाणात होते. मावशीकडे लहानपणापासून जाणं असल्याने इथली सहकाराधारित शेती जवळून बघता आली. कदाचित हे माझं वैयक्तिक निरीक्षण असेल; पण तळकोकणात आपापसातलं सहकार्य हे जास्त प्रमाणात आहे आणि स्पर्धा तुलनेने कमी आहे. अनेक गावांमधले लोक एकमेकांकडे शेतीची आणि अन्य कामं करायला अगदी आपलं घर असल्यासारखी जातात. त्यामुळे एक ’सहकाराधारित अर्थव्यवस्था’ आणि अन्नधान्याची स्वयंपूर्णता इथे बघायला मिळते.
 

konkan tourism 
 
त्रिंबक या गावी एक दिवस राहून तिथून मालवण, धामापूर,सर्जेकोट, कुणकेश्वर असा एकदिवसीय दौरा झाला. त्यात अध्येेमध्ये अनेक सुंदर मंदिरं नजरेस पडली. रामेश्वर हे त्रिंबक गावचं ग्रामदैवत. त्रिंबकहून आचर्‍याकडे जाताना वाटेत ’चिंदर’ या गावी ’आकारी ब्राह्मणदेवा’चं सुंदर मंदिर नजरेस पडलं. ’आकारी ब्राह्मणदेव’ या नावाने इथल्या अनेक गावांमध्ये मंदिरं आहेत. यांचं उगमस्थान नेमकं काय याबद्दल माहिती नाही. शांत-सुंदर परिसर, कौलारू छोटं मंदिर, मागे मोठा वटवृक्ष आणि मंदिराच्या बाजूला लांबपर्यंत विस्तार असलेला चिंदरचा भव्य तलाव. या तलावात ’कुमुदिनी’ची लहान आकाराची पुष्कळ फुलं नजरेस पडतात. हे मंदिर 1954 साली बांधलं गेलं आणि इथे कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या धामधुमीत होतो, अशी माहिती मिळाली. तिथून पुढे भेट दिली ती आचर्‍याच्या रामेश्वर मंदिराला. कुणकेश्वरसारखंच हे इथलं एक प्रसिद्ध आणि भव्य परिसर असलेलं देवस्थान. या देवळाला ’इनामदार श्री रामेश्वर’ असंही म्हणतात. साधारणपणे 1684 च्या सुमारास या देवळाची स्थापना झाली अशी माहिती कळते. या देवळात रामनवमीचा उत्सव भव्यदिव्य होतो; पण त्या दिवशीच्या सहलीत सर्वांत भावलेलं मंदिर म्हणजे बिळवस-मसुरे गावचं सातेरी जलमंदिर. जलमंदिर म्हणजे नेमकं काय असतं त्याबद्दल उत्सुकता होती. थोडक्यात, जलमंदिर म्हणजे चारही बाजूंनी पाण्याने वेढलेलं मंदिर. भारतात बिहारमधलं पावापुरी इथलं जलमंदिर प्रसिद्ध आहे. कोकणात संगमेश्वरमध्येही एक तळ्यातलं मंदिर आहे. बिळवसमधल्या सातेरी जलमंदिरामुळे जलमंदिर म्हणजे नेमकं काय असतं ते जवळून बघता आलं. मालवणहून आंगणेवाडी रस्त्याला लागल्यानंतर अतिशय तीव्र उतार उतरून आपण बिळवसमध्ये सातेरी जलमंदिरापाशी पोहोचतो. दगडी बांधकामाने युक्त अशा तळ्यात हे मंदिर वसलं आहे. मंदिराच्या एका बाजूला तळ्यातच एक चौकोनी आकाराचं जलकुंड आहे व तिथे बाराही महिने पाणी असतं. या जलकुंडाच्या तळाशी शंकराची पिंडी आहे. मंदिर परिसर अतिशय सुंदर, निसर्गरम्य आहे. सातेरी देवी म्हणजे नेमकं काय आहे ते पाहायची उत्सुकता होती; परंतु मंदिराच्या गाभार्‍यात एक मोठं वारूळ आहे व हीच इथली देवता आहे. सुमारे 700 वर्षांपूर्वी एका जैन भक्ताने हे देवस्थान वसवले अशी माहिती मिळते. आषाढ महिन्यात सातेरीची जत्रा भरते.
 

konkan tourism 
 
मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला सर्वांना परिचित आहे; परंतु सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी बांधलेले राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले या सहलीत प्रथमच पाहिले. राजकोट आणि सर्जेकोट ही दोनही खरं तर बंदरं आहेत; पण त्यांना छोटेखानी किल्ल्यांचं रूप दिलं गेलं आहे. राजकोट किल्ल्याचं नुकतंच नवीन चिरेबंदी बांधकाम झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा या किल्ल्यावर उभारलेला आहे. डिसेंबर 2023 मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं. राजकोट किल्ल्यावरून दिसणारा अथांग समुद्र आणि लांबच्या लांब पसरलेला, चारही बाजूंनी वेढलेला सिंधुदुर्ग किल्ला हे दृश्य अतिशय विलोभनीय होतं. सर्जेकोट किल्ला शिवाजी महाराजांनी 1668 मध्ये बांधला. सर्जेकोट किल्ल्याबद्दलची ऐतिहासिक माहिती तिथल्या ग्रामस्थ इंदिरा खांडाळेकर यांच्या एका लेखातून मिळाली.सर्जेकोट हे एके काळी एक बंदर म्हणूनच अस्तित्वात होतं. मालवणची व्यापारपेठ सर्जेकोटच होती. गलबतामधून येणारा माल सर्जेकोट बंदरात उतरूनच पुढे तो व्यापारी नेत असत. स्वातंत्र्यपूर्व काळातही सर्जेकोटची बाजारपेठ गजबजलेली असायची. दक्षिण भारत म्हणजे कारवार-मंगलोर, मुंबई, मद्रास अशा अनेक ठिकाणांहून माल बोटीने येत असे. सर्जेकोट हा भुईकोट किल्ला असून तो शिवकाळात बांधलेला आहे. हा सुमारे सात ते आठ एकर इतक्या क्षेत्रफळावर बांधलेला आहे. या किल्ल्यावर खांडाळेकर खानदानाचं वास्तव्य होतं. या खांडाळेकरांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या दरबारी सरदार म्हणून कामास होते. त्यांच्याबद्दलची शौर्यकथा म्हणजे त्या वेळी समुद्रमार्गे आक्रमणे होत होती. एका रात्री शत्रूने समुद्रमार्गातून या किल्ल्यावर आक्रमण करण्याचा व्यूह रचला होता. कोटात असलेलं सैन्य गाढ झोपेत होतं. हीच वेळ शत्रू साधणार होता, पण खांडाळेकर सरदार जागे झाले. त्यांना दूरवरच्या शत्रूचा सुगावा लागला. सर्जेकोट किल्ल्याला चार कोपर्‍यांत चार छोटे-मोठे बुरूज होते, त्यापैकी एका बुरुजावर तोफ ठेवली होती. मात्र शत्रूवर हल्ला करायचा तर ती तोफ दुसर्‍या बाजूच्या बुरुजावर हलवणं गरजेचं होतं. झोपलेल्या सगळ्या सैनिकांना उठवलं तर पलिते पेटवले गेले असते. शत्रूला तो प्रकाश दिसला असता तर शत्रू सावध झाला असता, म्हणून खांडाळेकर सरदारांनी सोबत मोजकेच सैनिक घेऊन ती तोफ ओढत दुसर्‍या बुरुजावर नेली आणि शत्रूचं जहाज नजरेच्या टप्प्यात येताच तोफ डागली. शत्रूचं खूप मोठं नुकसान झालं.सर्जेकोट किल्ला हल्ल्यातून वाचला. याच बहादुरीचं इनाम म्हणून हा किल्ला या कुटुंबाला शिवाजी महाराजांनी दिला. या दोघांसोबत पद्मगड हाही शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गच्या संरक्षणासाठी बांधला.
 
 
vivek
 
हे किल्ले पाहून, अभ्यासून आमची गाडी जगप्रसिद्ध धामापूर तलावाकडे वळली. मालवणपासून पूर्वेला कुडाळकडे जाताना 19 किमी अंतरावर कर्ली नदीच्या जवळ हा विस्तीर्ण तलाव आहे. कोकणात जांभा दगडात छोटी छोटी तळी भरपूर दिसतात; परंतु चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला इतका विस्तीर्ण तलाव हा कोकणात फक्त इथेच बघायला मिळेल. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा तलाव मानवनिर्मित आहे यावर विश्वासही बसणार नाही; परंतु अधिक माहिती मिळवल्यावर कळलं की, इ.स. 1530 मध्ये विजयनगर साम्राज्याचे मांडलिक नागेशराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी हा बांधला. डोंगरांवरून येणारे प्रवाह एकत्रितपणे एका ठिकाणी अडवून तलावांची निर्मिती करण्याचं एवढं मोठं आणि एवढं जुनं हे महाराष्ट्रातलं पहिलंच उदाहरण असावं. त्या काळात नुसत्या मातीचा वापर करून, पक्का बंधारा बांधून एवढ्या मोठ्या तलावाची निर्मिती कशी केली गेली असेल याचं आश्चर्य वाटतं. आजूबाजूच्या डोंगररांगांतले सुमारे 60 पेक्षा जास्त प्रवाह या तलावाला येऊन मिळतात. तलावाच्या काठाशी तीव्र उतारावर काही ठिकाणी घनदाट जंगल आहे. तलावाच्या काठी असणारं हेमाडपंथी भगवती मंदिर हा वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. या तलावाच्या पाण्याचा आजूबाजूच्या शेतीला प्रचंड उपयोग होतो.
 

konkan tourism 
 
या एकदिवसीय सहलीचा शेवट देवगडजवळच्या कुणकेश्वर मंदिर परिसराच्या भेटीने झाला. वेळेअभावी देवदर्शन घेता आलं नाही तरी कुणकेश्वरकडून देवगडकडे येताना उंच कड्यावर क्षणभर थांबावंसं वाटलं. उंचावरून खाली दिसणारा कुणकेश्वरचा अथांग समुद्र, त्याची ती गर्जना, आभाळभर साठलेले लठ्ठ लठ्ठ काळेकुट्ट मेघ, भन्नाट वारा, समुद्रकिनारी दिसणारं टुमदार कुणकेश्वर मंदिर हे सगळं दृश्य अक्षरशः वेड लावणारं होतं. समुद्र बघायला, त्यात डुंबायला सगळ्यांनाच आवडतं; पण उंच कड्यावरून समुद्र बघणं हे विलक्षण आनंददायी असतं. त्यात एक मनःशांती जाणवते. अथांगता अनुभवता येते. कुणकेश्वर मंदिर हे पर्यटनस्थळ आहेच; पण कड्यावरचं हे ठिकाण अजिबात चुकवू नये असं आहे.
 

konkan tourism 
 
अलीकडे पर्यटनाची व्याख्या बदलते आहे. कोकण म्हटलं की गणपतीपुळे, मुरुड, तारकर्ली अशी काही ठरावीक ठिकाणं मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या पसंतीची राहिली आहेत. यापलीकडे जाऊन, थोडी क्षितिजं विस्तारून पर्यटनाकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे. यातून पर्यटनवाढीला कोकणात प्रचंड वाव आहे. काय बघायचं, या प्रश्नाची अनेक आकर्षक उत्तरं निर्माण करायला आपण शिकायला हवं. त्यासाठी मुळात कोकणातल्याच माणसांनी भरपूर परिसर फिरून पर्यटनमूल्य असलेली ठिकाणं हुडकायला हवीत. परिसराचं वर्णन, त्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती ही आपण जेवढी जास्तीत जास्त मिळवू तेवढं कोकणातल्या सामान्य जागांनाही पर्यटनमूल्य येईल. आज कोकणातल्या माझ्यासारख्या अनेक वर्षं इथे राहणार्‍या माणसालाही जवळचंच एखादं ठिकाण बघितल्यावर ‘अरे, हे आपल्याला माहीतच नव्हतं’ असा आश्चर्ययुक्त आनंद होतो. परिसराचा जेवढ्या सूक्ष्म पातळीवर अभ्यास होईल तेवढी पर्यटनाची क्षितिजं विस्तारतील आणि त्यातून कोकणच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी येईल.

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड.