केरळमधले केविलवाणे कम्युनिस्ट

विवेक मराठी    19-Jul-2024
Total Views |
@प्रा. अशोक मोडक
 
तीन दिवसीय बैठकीचे एकमेव उद्दिष्ट केरळमधल्या केविलवाण्या पराभवाचे विश्लेषण करण्याचे. अर्थात, या निर्णयाचे कारण सुस्पष्ट आहे. भारतातल्या अन्य भागांतून ‘आपण नेहमीच हरलो आहोत; पण त्रिवेंद्रमच्या विधानसभेतूनही आपण गायब होणार की काय?’ या भयाने हे सर्व चिंतातुर जंतू अक्षरश: कासावीस झाले आहेत.
vivek
 
या वर्षी संसदीय निवडणूक पार पडल्यानंतर 26, 27 व 28 जूनला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीची नवी दिल्ली येथे एक बैठक झाली. त्या बैठकीत, ‘केरळ राज्यात त्यांची जी केविलवाणी पीछेहाट झाली, तिचा कठोर पंचनामा करण्यात आला.’ म्हणजे भारतातल्या अन्य राज्यांतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जी दारुण घसरगुंडी झाली, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांतून कधीकाळी कम्युनिस्टांची चांगली चलती होती, तिथे तर मार्क्सवाद्यांचा धुव्वाच उडाला; परंतु या पक्षाच्या नेत्यांना आणि केंद्रीय समितीतल्या सदस्यांना या अपयशाची दखल घेणे काही आवश्यक वाटले नाही. तीन दिवसांच्या या बैठकीत या सगळ्यांचे एकमेव उद्दिष्ट होते, ते केरळमधल्या केविलवाण्या पराभवाचे विश्लेषण करण्याचे. अर्थात, या निर्णयाचे कारण सुस्पष्ट आहे. भारतातल्या अन्य भागांतून ‘आपण नेहमीच हरलो आहोत; पण त्रिवेंद्रमच्या विधानसभेतूनही आपण गायब होणार की काय?’ या भयाने हे सर्व चिंतातुर जंतू अक्षरश: कासावीस झाले आहेत.
 
 
सन 1952 मधल्या पहिल्या संसदीय निवडणुकीत हे लालभाई तुलनेने चांगल्या संख्येत आपले खासदार संसदेत निवडून आणण्यात सफल झाले होते. त्यानंतर पाच वर्षे उलटल्यावर तर केरळ विधानसभेत स्वत:चे सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आले. तेव्हा झालेल्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या आंदोलनातही ही मंडळी आघाडीवर होती व परिणामत: मुंबईच्या विधानसभेतही आपला आवाज बुलंद करणे त्यांना शक्य झाले होते. कालांतराने मार्क्सवादी साम्यवाद्यांनी आपली वेगळी चूल मांडली. आणीबाणीच्या विरोधात झालेल्या जनआक्रोशात लालभाईंची घोषणाबाजी वाजतगाजत राहिली. तथाकथित उजव्या कम्युनिस्टांनी आणीबाणीचे निर्लज्ज समर्थन केले आणि इंदिरा काँग्रेस पक्षाची शाखा म्हणूनच डांगे गटाला अस्तित्व टिकवून ठेवावे लागले. मग मार्क्सवादी कम्युनिस्टांनी रणदिव्यांच्या नेतृत्वाखाली डांगे गटाच्या कॉम्रेड्सची यथेच्छ टिंगलटवाळी केली.
  
कलकत्त्याच्या भिंतींवर ही टवाळी शेलक्या शब्दांत प्रकटली. ‘दिल्ली से आयी इन्दिरा गाय, सांथ मे बछडा सी.पी.आय.’ अशा ओळींतून ही टवाळी प्रकट झाली. तेव्हा रणदिवे, करात, येचुरी वगैरे महाभाग ‘बघा, आम्ही आमचे अस्तित्व कसे टिकवले आहे’ अशा फुशारकीत जगत होते. वर्तमानात या सगळ्या बढायांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. आता उरले आहेत उसासे आणि हुंदके! केविलवाणी शोकांतिका अशी की, असे अश्रुसिंचन करण्यासाठीही कुणी उरले नाही. म्हणूनच कम्युनिस्टांचा करुण विलाप समजून घेतला पाहिजे.
  
नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत मार्क्सवादी लाल बावटेधारकांनी केरळमध्ये वीस जागांवर आपले उमेदवार उभे केले होते; पण त्यापैकी अवघा एक जण विजयी होऊन खासदार बनला. विस्मयाची गोष्ट अशी की, ज्या हिंदुत्वनिष्ठांनी आतापर्यंत केरळमध्ये आपले खाते उघडले नव्हते, त्यांनीही या निवडणुकीत एका जागेवर आपला माणूस निवडून आणला. मग लोकच म्हणू लागले की, ‘सूर्यनारायण उगवतो, तेव्हा लाल रंगाचा असतो. तो अस्ताला जातो तेव्हाही त्याच्या रंगातून लालीच प्रकटते.’ केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट अस्ताला जात आहेत, तर तिथले हिंदुत्वनिष्ठ नुकताच उदय झाल्यामुळे सगळ्यांना प्रभावित करीत आहेत. दोन्ही विचारधारांचा एकेक उमेदवार विजयी होतो... पण एक विचार विसर्जनाच्या दिशेने जातोय, तर दुसरा विजय पूर्व क्षितिजाला चैतन्यमय करीत आहे.
 

vivek 
 
लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा असा की, मार्क्सवाद्यांच्या त्रिदिवसीय चिंतन बैठकीनेही हाच निष्कर्ष काढला आहे. ‘दि हिंदू’ दैनिकाच्या 5 जुलै 2024च्या अंकात या संदर्भात जे वृत्त प्रसिद्ध झाले आहे त्याचे शीर्षकच पाहा किती बोलके आहे! 'C.P.I. (M) failed to counter Hindutva Politics.'
 
सन 2024च्या संसदीय निवडणुकीत हिंदुत्वनिष्ठांना केरळमध्ये एका जागेवर यश मिळाले आहे. या वास्तवाची खोली किती गहिरी आहे ते आता समजून घेतले पाहिजे. भारतीय जनता पार्टीने जी आघाडी अन्यान्य पक्षांच्या साहाय्याने उभी केली आहे, त्या आघाडीस सन 2019च्या संसदीय निवडणुकीत 19.21% मते मिळाली होती. सन 2024च्या संसदीय निवडणुकीत भाजपा आघाडीने मिळवलेल्या मतांची टक्केवारी 22.78% असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या आघाडीने एका जागेवर पहिला खासदार केरळमधून निवडून आणला, तर आणखी तीन जागांपैकी एकेका जागेवर तीस टक्क्यांपेक्षा अधिक मते प्राप्त केली आहेत. सन 2021 नंतर पाच वर्षे उलटल्यावर म्हणजे सन 2026 मध्ये केरळ विधानसभेची निवडणूक होणार आहे. म्हणून लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत जे विधानसभा मतदारसंघ येतात, त्यांचा विचार केला तर भाजपाचे केरळमधले यश विशेषत्वाने अधोरेखित करता येईल. हा हिशोब आपणास सांगतो की, केरळमध्ये अकरा विधानसभा मतदारसंघांत भाजपा आघाडीला प्रथम क्रमांकाचे यश मिळाले आले आहे. मार्क्सवादी पार्टीच्या केंद्रीय समितीने चर्चेच्या अखेरीस निष्कर्ष काढला आहे की, ‘पूर्वी आपल्या पक्षाजवळ तरुण तुर्कांचे समूह होते आणि हे समूह वर्षातले बाराही महिने कधी वर्गसंघर्ष करून, तर कधी जाती-पोटजातींमध्ये अगडे विरुद्ध पिछडे अशा कसोटीवर रान पेटवून पक्षाची मशाल पेटती ठेवत असत. वेगवेगळ्या भाषिक गटांच्या अस्मितांना धग देऊनही केरळमध्ये मार्क्सवादाची मशाल धगधगती ठेवत असत; पण नजीकच्या भूतकाळात युवक-युवतींची पक्षावरची निष्ठा दुर्दैवाने अस्ताला गेली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र केरळात कार्यविस्तार करण्यात यशस्वी ठरला आहे.’ कुणा विचारवंताने केरळमधल्या हिंदुत्वनिष्ठांच्या प्रगतीविषयी मोठी मार्मिक मल्लिनाथी केली आहे. ही मल्लिनाथी समजून घेण्यासाठी प्रथम अंतोनिओ ग्रामची या इटालियन मार्क्सवाद्याने जगातल्या कम्युनिस्टांना वर्गसंघर्षाची आग पेटती ठेवण्यासाठी जे मौलिक मार्गदर्शन केले होते ते समजून घ्यायला हवे.
 
 
जवळपास ऐंशी वर्षांपूर्वी ग्रामची या विचारवंताने लाल बावटेवाल्यांना केलेली शिफारस जगभर दुमदुमत होती. अंतोनिओ ग्रामची यांनी लिहून ठेवले आहे की, ‘भांडवलदारांना आणि सत्ताधीश बनलेल्या त्यांच्या सग्यासोयर्‍यांना जेरीला आणायचे असेल, तर आपण कम्युनिस्ट कॉम्रेड्सनी कल्पकता दाखवून आपल्या लढ्यांचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. उदाहरणार्थ, भांडवलशाहीचे भाट ज्या गृहीतांवर, ज्या सभ्यतांवर-समजुतींवर भरवसा ठेवून कष्टकरी जनतेला भुरळ पाडतात व मार्क्सवादाच्या प्रभावापासून कष्टकर्‍यांना दूर ठेवण्यात यशस्वी होतात, त्याच गोष्टींवर आपण कुठाराघात केला पाहिजे. हे भांडवलदारी भाट संस्कृती, धर्म यांचे देव्हारे सगळीकडे बसवतात. मग आपण लाल बावटेवाल्यांनी नेमक्या याच अधिष्ठानांना सुरुंग लावले पाहिजेत. सन 2024च्या भारतातल्या संसदीय निवडणुकीत भाजपाला केंद्रीय सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अंतोनिओ ग्रामचीच व्यूहरचना व्यवहारात उतरविण्याची खटपट भाजपा-विरोधकांनी केली. ही खटपट अंशत: यशस्वीही झाली. कोण राम? कुठली अयोध्या? कुठले हिंदुत्व? अशा प्रश्नांच्या तोफा डागण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीला भले निर्भेळ बहुमत मिळवता आले नसेल; पण तरी संसदेत 240 खासदार स्वत:च्याच पक्षाचे निवडून आणण्यात हिंदुत्वनिष्ठ यशस्वी ठरले. काँग्रेसला शंभर जागी यश मिळविण्यासाठी जिवाचे रान करावे लागले. सर्व हिंदुत्वविरोधकांचा फौजफाटा काँग्रेसने एकत्र केला, तरीदेखील एकट्या भाजपाच्या खासदारांची 240 ही संख्याही राहुल व खरगे कंपनीला गाठता आली नाही, हे कठोर वास्तव आहे; पण आश्चर्य हे की, हिंदुत्वनिष्ठांनी ग्रामचीची महोदयाची व्यूहरचना केरळ राज्यात कौशल्याने राबविली! उदाहरणार्थ, लाल बावटेवाले जर प्रत्यक्ष घाम गाळणार्‍या कष्टकर्‍यांना संघटित करीत असतील, तर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेही अशा निर्धनांना, वंचितांना व शोषितांना भगव्या ध्वजाखाली एकत्र आणू शकतात, हे आपल्या मल्याळी बंधुभगिनींनी लक्षात घेतले व ‘प्रभू रामचंद्राने तर प्राचीन काळातच नेमक्या अशा व्यक्तींना एकत्र करून श्रीलंकेवर चढाई करण्यात यश प्राप्त केले होते. मग वर्तमानातही याच श्रीराममार्गाने आम्ही जाणार, मार्क्सच्या मार्गावर कशाला चालायचे?’ हे उत्तरगर्भ प्रश्न केरळात तरी बिनतोड ठरले. बिचार्‍या केरळीय कम्युनिस्टांनी हिंदुत्वनिष्ठांना हरविण्यासाठी कृष्णाष्टमी साजरी करण्याचे म्हणे मनसुबे रचले; पण केरळातल्या मतदारांना असली कृष्णाष्टमी व बेगडी कृष्णाष्टमी यातली तफावत कळली. कम्युनिस्टांची ड्रामेबाजी यशस्वी झाली नाही. म्हणजे अंतोनिओ ग्रामचीची व्यूहरचना केरळातल्या हिंदुत्वनिष्ठांनी अमलात आणली. वामपंथीय बूमरँग इतक्या शिताफीने रामभक्तांकडून उलटविण्यात आले की, मार्क्सवाद्यांच्या केंद्रीय समितीला उघड्या डोळ्यांनी श्रीरामरथाचा महिमा मान्य करणे अपरिहार्य ठरले.
 
 
सन 2026 मध्ये केरळ विधानसभा निवडणूक होणार आहे. ‘हिंदुत्वनिष्ठांनी समाजपुरुषाला जागे ठेवण्याचे, विविध कृती करण्याचे उपक्रम जर सुरू ठेवले, तर केरळ राज्यही आपल्या वर्चस्वाखालून जाईल. आपण अपयशाचे धनी ठरू,’ या चिंतेने केरळमधले कम्युनिस्ट संत्रस्त आहेत. ‘पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तमिळनाडू या राज्यांमध्येही आपली संघटनात्मक ताकद क्षीण झाली आहे. आपण संसदीय निवडणुकीत कितीक मतदारसंघांत मतदान केंद्रांवर आपल्या कार्यकर्त्यांच्या नेमणुका करू शकलो नाही. केरळ राज्यात आपल्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला काँग्रेसपुरस्कृत आघाडीने धूळ चारली हे खरे आहे; पण सर्व मतदारसंघांतून संघाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या संख्येपेक्षा अधिक पटींनी आपली फौज तैनात केली हे अधोरेखित केले पाहिजे.’ मार्क्सवाद्यांच्या मध्यवर्ती समितीकडून इतक्या स्वच्छ शब्दांतून शोक व्यक्त झाला आहे.
 
 
 
ही मध्यवर्ती समिती कम्युनिस्ट कॉमे्रेड्सच्या भ्रष्ट व गुन्हेगारी वर्तनामुळेही चिंतामग्न आहे. ‘आपण कन्नूर मतदारसंघात सोन्याची तस्करी आणि हवाला व्यवहार करणार्‍या लालभाईंच्या अभद्र व्यवहारांवर पांघरूण घातले. मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि तथाकथित उजवे कम्युनिस्ट व वामपंथीय पुरोगामी नागरिक यांनी एकत्र येऊन किल्ले लढवावेत या दिशेने आपल्या पुढार्‍यांनी प्रयत्नांची शिकस्त करणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात उजव्या कम्युनिस्टांनी व वामपंथीय पुरोगाम्यांनी मार्क्सवाद्यांवरच आगपाखड करणे चालू ठेवले, तेव्हा आपल्या मार्क्सवादी म्होरक्यांनी नि:संकोचपणे आपल्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना समर्थन दिले. आता संसदीय निवडणुकीत आपल्या एकोणीस उमेदवारांचा पराभव झाला व एकुलता एक उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत पोहोचला.’ तेव्हा वर उल्लेखिलेल्या उजव्या कम्युनिस्टांनी आणि पुरोगामी हितचिंतकांनी साक्षात पिनराई विजयन यांच्यावर म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांवरच आसूड ओढले आहेत. अपयश अनाथ असते हेच खरे!
 
 
केरळमधल्या केविलवाण्या कम्युनिस्टांचा पंचनामा करताना हिंदुत्वनिष्ठांनी म्हणजेच भाजपाच्या समर्थकांनी योग्य बोध घेतला पाहिजे, असे तीव्रतेने जाणवते. संघटनात्मक पकड, ध्येयनिष्ठेवर पूर्ण भरवसा, संधिसाधू माणसांना वेळीच दूर करण्याची सत्वरता आणि समाजातल्या तळागाळामधल्या अभागी, दुर्दैवी घटकांविषयी अस्सल करुणा कृतींमधून व्यक्त करण्याची निकड हे पैलू लाख मोलाचे आहेत आणि तीच भाजपाची ओळख आहे. ती जपली पाहिजे.