महासत्तेची कानउघाडणी

विवेक मराठी    18-Jul-2024   
Total Views |


trump
शंभर वर्षांच्या काळात अमेरिकेत चार राष्ट्राध्यक्षांच्या हत्या पाहिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर हल्ले झाले. हे सर्व हल्ले अंतर्गत होते. प्रत्येक हल्ल्याचे कारण कधी पूर्णपणे प्रकाशात आले नाही अथवा येऊ दिले नाही. तरीदेखील असे म्हणायला जागा आहे की, द्विपक्षीय राजकीय पद्धतीत एका बाजूस दुसर्‍या बाजूचे पटले नाही म्हणून जी काही टोकाची हवा तयार केली जाते त्यात किमान दोन जीव जातात - एक म्हणजे अशा द्वेषाला बळी पडून स्वतःच टोकाचा द्वेष करतो तो मारेकरी आणि दुसरा अर्थातच ज्याच्यावर प्राणघातक हल्ला होतो तो. हे हल्ले केवळ एकाच पक्षीय विचारसरणीतून झालेले दिसत नाहीत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि नोव्हेंबर 2024 मध्ये होत असलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 14 जुलैला पेनसिल्व्हेनिया राज्यात चालू असलेल्या प्रचारसभेच्या वेळेस सुदैवाने अयशस्वी, पण प्राणघातक हल्ला झाला हे आत्तापर्यंत जगभरच्या प्रसारमाध्यमांकडून सांगून आणि दाखवून झाले आहे. आता निर्णायक वाटू शकणार्‍या क्षणाला ट्रम्प यांनी समोर ठेवलेली माहिती वाचण्यासाठी मान किंचित वळवली आणि त्याच क्षणाला एका मारेकर्‍याने नेम धरून मारलेली गोळी ही ट्रम्प यांच्या कपाळाचा छेद करून जाण्याऐवजी, उजव्या कानाला स्पर्श करून गेली. कानाला लागले; पण ट्रम्प मात्र वाचले.
 
 
थॉमस मॅथ्यू कुक या फिलाडेल्फियामधील 20 वर्षीय युवकाने केलेला हा हल्ला, किमान अजून तरी झालेल्या चौकशीप्रमाणे वरकरणी एकट्याने केला होता. गेल्या दोन दिवसांत सुरक्षा यंत्रणेकडून आलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रचारसभेत उभ्या असलेल्या पोलिसांना एका उतरत्या छपरावर कोणी तरी दुर्बीण लावून जरा जास्तच टेहळणी करत आहे, अशी शंका आली. त्यांनी सुरक्षा यंत्रणेस तात्काळ सांगितले, सुरक्षा यंत्रणेनेही या युवकास संशयित ठरवले आणि काही रक्षक तात्काळ त्याच्या जवळ जात होते, त्याच वेळेस हा हल्ला झाला. जरी हल्ला कोणी थांबवू शकले नसले तरी नंतर लगेचच सुरक्षारक्षकांनी त्याला गोळ्या मारून ठार केले. दुर्दैवाने या सर्व हल्ल्यात दोन सामान्य नागरिकांचेही गोळीबाराच्या मध्येे आल्याने प्राण गेले. नंतर केलेल्या गुन्हा अन्वेषणातून बाहेर आलेल्या माहितीनुसार या मारेकर्‍याच्या गाडीत स्फोटकेही होती. अर्थात त्याचा डाव हा केवळ ट्रम्पवर हल्ला करण्यापुरता मर्यादित नव्हता; पण एकूणच मोठा हल्ला करण्याचा त्याचा मानस होता, असे म्हणायला जागा आहे. एकीकडे असला भीषण हल्ला करणारा हा युवक दुसरीकडे शिक्षणात हुशारी दाखवून प्रसिद्ध होता. असे वाटते की, अशी मुले रेडिओ, टीव्ही, इंटरनेटवरील चर्चा, भडक राजकीय वक्तव्ये वगैरे ऐकून भरकटतात. ऐकायला बरेच असते; पण स्वतःची मानसिकता सांगायला फक्त एकाकीपण असते. मग परिणाम अपरिहार्य असतात. याची कारणे शोधणे हा एक वेगळाच विषय आहे.
 
 
इथे मतदार नोंदणी करताना रिपब्लिकन, डेमोक्रॅट अथवा स्वतंत्र म्हणून करावी लागते. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत प्रायमरी पक्षीय स्तरावर निवडणुका असतात, त्यात त्यानुसार आणि राज्याच्या नियमानुसार मतदान करता येते. अर्थात ही पक्षीय संलग्नता कधीही बदलता येते. तसेच ज्या पक्षाशी संलग्नता आहे त्याच पक्षाच्या बाजूने मतदान करावे असे काही नसते. थॉमस मॅथ्यू कुक हा त्या अर्थाने रिपब्लिकन पक्षाशी संलग्न होता; पण आधी म्हटल्याप्रमाणे त्याचा काही संबंध त्याच्या ह्या हिंसक कृत्याशी असेल असे नाही.
 
trump 
अमेरिकेचा राजकीय इतिहास हा जसा पूर्ण रक्तरंजित नाही तसाच तो पूर्णपणे अहिंसकपण नाही आहे. 1835 साली तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, पण ते वाचले. मात्र नंतरच्या शंभर वर्षांच्या काळात अमेरिकेने जेम्स गारफिल्ड, अब्राहम लिंकन, विल्यम मॅकिन्ली आणि जॉन केनेडी अशा चार राष्ट्राध्यक्षांच्या हत्या पाहिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर हल्ले झाले, त्यात रॉबर्ट केनेडी ह्यांची हत्या झाली. इतर अनेक त्यांच्या काळात झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमधून वाचले. हे सर्व हल्ले अंतर्गत होते. प्रत्येक हल्ल्याचे कारण कधी पूर्णपणे प्रकाशात आले नाही अथवा येऊ दिले नाही. तरीदेखील असे म्हणायला जागा आहे की, द्विपक्षीय राजकीय पद्धतीत एका बाजूस दुसर्‍या बाजूचे पटले नाही म्हणून जी काही टोकाची हवा तयार केली जाते त्यात किमान दोन जीव जातात - एक म्हणजे अशा द्वेषाला बळी पडून स्वतःच टोकाचा द्वेष करतो तो मारेकरी आणि दुसरा अर्थातच ज्याच्यावर प्राणघातक हल्ला होतो तो. हे हल्ले केवळ एकाच पक्षीय विचारसरणीतून झालेले दिसत नाहीत.
 
 
21व्या शतकातील अमेरिकेच्या कुठल्याही पक्षाची अथवा राष्ट्राध्यक्षाची बाजू न घेता अथवा विरोध न करता, विचार करायचा झाला तर काही गोष्टी नजरेत भरतात. रेगनपर्यंत दोन्ही पक्ष निवडणुका झाल्यावर जरी राजकारण खेळत असले तरी एकत्र येऊन कामदेखील करत राहायचे. मात्र क्लिटंनच्या काळात डेमोक्रॅट्स आलेले पाहून रिपब्लिकन्स हे जास्त राजकीय आवाज करू लागले. तेच पुढे बुशच्या काळात डेमोक्रॅट्स करू लागले; पण तितकेसे यश आले नाही. ओबामाच्या काळात डेमोक्रॅट्स त्यांची टोकाची भूमिका घेऊ लागले, तर रिपब्लिकन पक्षांतर्गत टी पार्टी नावाचा गट तयार होऊन तो खूप अंतर्गत आणि बाह्य विरोधकांसाठी आक्रमक झाला. त्याच काळात आधी कधी डेमोक्रॅट असलेला ट्रम्प हा रिपब्लिकन होऊन राष्ट्राध्यक्षपद मिळवता येईल का ह्याची चाचणी घेऊ लागला. ट्रम्पचे बोलणे, चालणे आणि वागणे हे कुठल्याही अर्थाने अमेरिकन पारंपरिक नसल्याने ते अनेकांना पचणे अवघड जाऊ लागले. तरीदेखील सामान्य गोरा अमेरिकन, जो कारणे अनेक असू शकतील; पण परिणाम म्हणून हळूहळू आवाज गमावून बसला होता, तो हा समाज ट्रम्पच्या Make America Great Again या मंत्राने आशावादी झाला. ट्रम्पचे बोलणे त्याच्या हृदयाला भिडू लागले आणि त्याने मतदानातून ट्रम्पला राष्ट्राध्यक्ष केले.
 
 
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डेमोक्रॅट्स असलेल्या, पण पक्षीय नसलेल्या अनेक प्रतिक्रियात्मक चळवळी चालू झाल्या - त्यात कृष्णवर्णीयांसाठी Black Lives Matter, स्त्रियांसाठी Me Too, लैंगिकतेवर आधारित नवीन समुदाय आणि त्यांच्या चळवळी, पैसा वाटण्याच्या समाजवादी कल्पना आणि अर्थातच पर्यावरण चळवळी असे अनेक आले. केवळ अशा चळवळी करून हे थांबले नव्हते, तर त्या प्रत्येक चळवळीत कुठला तरी समुदाय जो पीडित आहे असे दाखवता येईल आणि त्या समाजालाही त्यातून आपण पीडित आहोत, असे म्हणत असमाधानी राहण्याची सवय होईल हे ठरवून पाहिले गेले अथवा अशा चळवळीचे असेच फळ असते ते मिळाले; पण त्यातून तयार झालेला असंतोषाचा भडका तयार झाला. ट्रम्पना हरवून बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले खरे; पण तरीदेखील गेली चार वर्षे ट्रम्पविरोधात सतत आग भडकवत ठेवण्यात आली. त्यात भर म्हणून की काय, पण ट्रम्पच्या विरोधात वादविवादात हरल्यावर बायडेनना अनेक जण राजीनामा द्यायला सांगू लागले. त्यास उत्तर देताना एका माध्यमाच्या मुलाखतीत ट्रम्पबरोबरचा वादविवाद सोडून ट्रम्पच्या चुकांकडे लक्ष केंद्रित करा, असे सुचवताना बायडेन म्हणाले, It's time to put Trump in a bull's eye. शब्दश: याचा अर्थ होतो की, ट्रम्पवर (शस्त्र हातात घेऊन) नजर रोखून बघा; पण वास्तवात त्याचा अर्थ फक्त ट्रम्प यांच्या राजकीय चुका बघा, असा होतो. अर्थात नंतर झालेल्या हल्ल्यामुळे बायडेन यांना तसे म्हणणे चुकीचे होते, असे जाहीरपणे मान्य करावे लागले आहे. तरीदेखील आधी म्हटल्याप्रमाणे द्वेषाची आग भडकलेली होती. कदाचित त्यात चमचाभर का होईना अधिक तेल पडले आणि त्या भडकलेल्या आगीची अर्धपूर्ती ह्या हल्ल्यातून झाली. अर्धपूर्ती अशासाठी, कारण द्वेषातून हल्ला केला खरा; पण तो सुदैवाने सफल झाला नाही, जरी दुर्दैवाने त्यात दोन प्राण गेले.
 
 
कटकारस्थानच्या कथा रंगवणार्‍या ट्रम्प समर्थकांना बायडेन अथवा डेमोक्रॅटिक पार्टीने कट रचलेला दिसतो. तसे असायची शक्यता खूपच कमी वाटते, तर दुसर्‍या बाजूस बायडेन समर्थकांना ट्रम्पने स्वतःच केले आहे, असे म्हणायचा मोह होत आहे. असे म्हणताना ते हा विचार करत नाहीत की, काही वाट्टेल ते म्हणालात तरी ट्रम्प ‘देव तारी त्याला कोण मारी’ ह्या उक्तीप्रमाणे समोर आलेल्या गोळीतून वाचले आहेत जरी कानाला बर्‍यापैकी इजा झाली आहे; पण वर म्हटल्याप्रमाणे द्वेषाने भडकावयाला लागले की अशा गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात हे वास्तव आहे, जे यानिमित्ताने जगाला परत दिसले.
 
 
ह्या घटनेचे चलतचित्र तटस्थ नजरेने पाहताना दोन गोष्टी दिसतात ज्या विचार करायला भाग पाडतात - एक म्हणजे ट्रम्प यांनी कुठेही ना बिचकता केलेले जनतेला आवाहन आणि दुसरी म्हणजे तितकेच स्थिर राहून जनतेने दाखवलेले धैर्य.
 
 
trump
 
गोळी लागलेल्या क्षणाला ट्रम्प यांचा कान रक्तबंबाळ झाला. सुरक्षारक्षकांनी सभोवताली कडे केले आणि ट्रम्पना घेऊन सुरक्षितपणे घेऊन जाण्यास सुरुवात केली; पण त्या क्षणालादेखील, ट्रम्प - एक वादग्रस्त, अति राजसिक व्यक्तिमत्त्व, अजिबात बिचकलेले दिसले नाही, तर त्यांनी त्या सुरक्षारक्षकांना तसेच थांबवून त्या कड्यातून, समर्थकांकडे मूठ वळवून बघत, समर्थकांना, ‘लढा! लढा! लढा!’ - Fight! Fight! Fight! असा संदेश दिला आणि मग सभास्थानातून हॉस्पिटलकडे रवाना झाले. ट्रम्प यांचा मुठी आवळून दिलेला संदेश उपस्थित ट्रम्प समर्थकांनीदेखील तितक्याच उत्साहात घेतला. वास्तविक हा हल्ला झाला तेव्हा मारेकर्‍याला मारलंय, पकडलंय, का अजून मोकळा आहे ते माहीत नव्हते. शिवाय तो एकटा आहे की त्याचे साथीदार सर्व गर्दीत मिसळून आहेत, हेदेखील माहिती असणे शक्य नव्हते, तरीदेखील कोणी घाबरून पळाले नाही. कुठेही चेंगराचेंगरी झाली नाही. नंतरदेखील कुठेही रिपब्लिकन समर्थकांनी दंगल केल्याचे प्रत्यक्षात अथवा माध्यमात दिसले नाही. 2016 च्या निवडणुकीत, ट्रम्पना पाठिंबा देणार्‍या सामान्य समर्थकांना हिलरी क्लिटंन उपहासाने Basket of Deplorable (एकगठ्ठा शोचनीय/निंदनीय) म्हणाली होती; पण अशाच सामान्य ट्रम्प समर्थकांचे हे वर्णन प्रशंसनीय होते/आहे. बायडेनविरोधात हरल्यावर जो काही ट्रम्प यांच्या आवाजी वक्तव्याला भुलून ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन काँग्रेसवरच हल्ला करून कब्जा केला त्याच्याबरोबर 180 अंशाच्या विरुद्ध असे हे वर्तन आहे, जे स्पृहणीय आहेच; पण ते आता तसेच राहील, अशी आपण फक्त आशा करू शकतो.
 
 
दुसर्‍या महायुद्धानंतर जागतिक महासत्ता झालेल्या अमेरिकेची राष्ट्रीय मानसिकता ही बर्‍याच अर्थाने ‘महर्षी झालो, पण ब्रह्मर्षी का होऊ शकत नाही’, हे न समजणार्‍या विश्वामित्रासारखी झालेली आहे. जगाला सतत शहाणपण शिकवायला जाणार्‍या ह्या महासत्तेची ह्या प्रसंगाने कानउघाडणी झाली आहे. जगभरच्या नेत्यांकडून काळजी व्यक्त करणारे संदेश आले, tweets आले. जणू काही सतत जगभर लोकशाही आणण्यासाठी तथाकथित अथक प्रयत्न करणार्‍या ह्या देशाला जगाने आरसा दाखवला.
 
 
या प्रसंगानंतर वृत्तमाध्यमे आणि स्वतःस विचारवंत समजणारे फार शिकलेत असे वाटत नाही. तशी अपेक्षा करणेही चुकीचेच आहे; पण बायडेन यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. एकूण शनिवारआधीची ट्रम्पविरोधी भडक वक्तव्ये बंद झाली. 48 तासांनंतर रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यासाठीचे चार दिवसीय अधिवेशन चालू झाले. त्यात ट्रम्प यांची देहबोली पहिली तर ती खूपच बदललेली दिसली. आधी असलेली निव्वळ आक्रमकतेसाठीची आक्रमकता दिसली नाही. आत्मविश्वास नक्कीच दिसत होता; पण तो पाय जमिनीवर ठेवून चालत असलेल्या व्यक्तीचा. असे म्हटले जात आहे की, ट्रम्प यांचे रिपब्लिकन कॉन्फरन्समधील भाषण हे आता केवळ राजकीय बायडेनविरोधी नसून, देशाला एकत्र आणायचा संदेश देणारे असणार आहे. ट्रम्प यांनी हे करून दाखवले तर भरपूर बदनामी झालेली असूनदेखील त्यांना स्वतःचे नाव आणि देशाला वाचवण्याच्या एक दैवी संधीचा त्यांनी सुयोग्य फायदा केला, असे म्हणावे लागेल.
 
 
एकूणच डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स तसेच त्यांचे आणि म्हणून जनतेचे नेते असलेल्या बायडेन आणि ट्रम्प यांनी राजकीय आणि राष्ट्रकर्तव्याची खरीखुरी समज झालेली स्वकृतीतून दाखवली तरच ही कानउघाडणी देशाच्या आणि जनतेच्या पथ्यावर पडली असे समजता येईल.