समानशीलव्यसनेषु सख्यम्

18 Jul 2024 17:15:36

swami avimukteshwaranand
संन्याशाच्या वेशात अविमुक्तेश्वरानंद पाखंड करत आहेत. दुसरीकडे प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष, अशी थाप मारत उद्धव ठाकरे राजकीय पाखंड करत आहेत. त्यांना उद्धव ठाकरे जवळचे वाटले असल्यास नवल नाही. त्यांना आपल्या मित्रपक्षांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारे व्यक्ती निर्दोष वाटणारच. एकावर साक्षात आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या धर्मपीठाची फसवणूक करण्याचा आरोप आहे, दुसर्‍याने वडिलांच्या विचारसरणीशी प्रतारणा केली आहे. एकाने भगवी वस्त्रे घालून श्रद्धेचा खेळ मांडला आहे, दुसर्‍याने भगव्याची झूल पांघरून मतांची बेगमी केली आहे. त्यामुळे ‘समानशीलव्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने त्यांचे जवळ येणे हेच सयुक्तिक आहे.
ख्रिश्चन धर्मात, विशेषतः कॅथोलिक पंथात एक परंपरा आहे. येशू ख्रिस्ताच्या मूळ शिकवणीनुसार, प्रत्येक माणसाला मृत्यूनंतर थडग्यात पडून राहावे लागते. जगाच्या अंताच्या दिवशी (जजमेंट डे) प्रभू सर्वांच्या पाप-पुण्याचा हिशोब करेल आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरकात जागा देईल. त्यामुळे चर्चच्या परंपरेनुसार, ख्रिश्चन व्यक्तीला चर्चमध्ये जाऊन आपल्या पापाची कबुली पाद्रीसमोर द्यावी लागते. ही कबुली दिल्यानंतर व्यक्ती त्या पापामधून मुक्त होते, अशी ही कल्पना आहे; परंतु कॅथोलिक चर्चच्या मान्यतेनुसार, अशी कबुली दिल्यानंतरसुद्धा काही पाप त्या व्यक्तीला चिकटून राहते. त्यावर उतारा म्हणून पाद्री किंवा धर्मोपदेशकाकडून त्या व्यक्तीला पापमुक्तीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्याला इंडल्जन्स असे म्हणतात. युरोपच्या मध्ययुगीन काळात, ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांच्यापासून अगदी खालच्या धर्मोपदेशकांपर्यंत सर्व पाद्य्रांनी अशी प्रमाणपत्रे विकायला काढली. त्यामुळे धनाढ्य लोकांनी सरळ-सरळ पैसे देऊन अशी प्रमाणपत्रे विकत घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मार्टिन ल्युथर याने केलेल्या बंडानंतर इंडल्जन्स प्रमाणपत्रांच्या विक्रीचा हा धंदा काहीसा कमी झाला; परंतु तो लगेच बंद झालेला नाही.
 
 आज या सर्व प्रकाराची आठवण येण्याचे कारण म्हणजे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नावाच्या ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांनी शिल्लक शिवसेनेचे ’मालक’ उद्धव ठाकरे यांना दिलेले प्रमाणपत्र. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी ’मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. आपल्या धर्मात विश्वासघात हे सर्वात मोठे पाप आहे, हा सर्वात मोठा घात आहे, ‘शिवसेना पक्षप्रमुख’ उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे याचे दुःख आहे. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय हे दुःख हलके होणार नाही. जो विश्वासघात करतो, तो हिंदू असूच शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा रंगत आली. लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे थोडी तरतरी आली होती; परंतु मतांचा हा तजेला मराठी मतांमुळे नव्हे, तर हिरव्या मतांच्या जोरावर आल्याचे लवकरच कळून चुकले. त्यामुळे उद्धव ठाकरे जिंकल्यानंतरही वरमले होते. एका भगवी वस्त्रे नेसलेल्या धर्माचार्यांनी त्यांच्या बाजूने आपले वजन टाकल्यामुळे त्यांना नव्याने हुरूप आला.
 
  

swami avimukteshwaranand

’अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नावाच्या ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांनी’ असा उल्लेख वर केला आहे तो यासाठीच. हे अविमुक्तेश्वरानंद मुळात शंकराचार्य आहेत की नाही इथपासून प्रश्न आहेत. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या पदग्रहणाला सर्वोच्च न्यायालयानेच स्थगिती दिलेली आहे.
 शंकराचार्यांनी केलेली ही पाठराखण उद्धव ठाकरे यांच्यासाठी पापमुक्तीचे प्रमाणपत्रच होय. फक्त एकच गफलत आहे. अविमुक्तेश्वरानंद हे काही पोप नाहीत आणि हिंदू जनसमुदाय हा काही ख्रिश्चनांमधील कॅथोलिक पंथ नाही. ख्रिश्चन पंथामध्ये जसे पोप हा पंथाचा सर्वाधिकारी असतो आणि त्या पंथाचे सर्व सदस्य त्याचे अनुयायी असतात, तसे हिंदूंचे नाही. येथे प्रत्येक हिंदू हा ईश्वराचा अंश असतो आणि आपल्या हृदयातील ईश्वराला तो जबाबदार असतो. म्हणून अमुक प्रकारे वागलात म्हणून तुम्ही हिंदू नाहीत, असे येथे कोणीही सांगू शकत नाही. अगदी हिंदू धर्ममार्तंडांच्या उतरंडीतसर्वोच्च स्थानी असलेल्या शंकराचार्यांनाही तो अधिकार नाही.
 
मुळात आद्य शंकराचार्यांनी देशाच्या चार कोपर्‍यांत चार पीठे स्थापन करून सनातन धर्माच्या सिद्धांतांचे जतन करण्याचे दायित्व त्यांच्यावर सोपविले होते. हिंदू धर्माला एककल्ली होण्यापासून रोखण्याचे ते पहिले पाऊल होते. स्वतः त्या शंकराचार्यांना काशीच्या घाटावर जाब विचारण्याचे काम एका चांडाळाने केले होते, मग त्या आचार्यांच्या कित्येक पिढ्यांनंतर आलेल्या शंकराचार्यांच्या शब्दांना कितपत प्रमाण मानायचे?
 
हे झाले अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्याला किती किंमत द्यायची याबाबत. आता अविमुक्तेश्वरानंद काय म्हणाले हे पाहू. राजकारणाशी आमचा काही संबंध नाही. मात्र राजकारण्यांनीही धर्माचे पालन केले पाहिजे. राजकारण्यांनी धर्मात ढवळाढवळ करणे थांबवावे, आम्ही राजकारणावर बोलणे बंद करू. आम्ही संन्यासी आहोत. आपण राजकीय वक्तव्य करू नये, हे पूर्णपणे बरोबर आहे. पंतप्रधान मोदींनी मंदिरात येऊन धर्माची स्थापना केली, तर तुम्ही लोक ते थेट दाखवता. शंकराचार्यांनी राजकारणाबद्दल काही सांगितले तर ते चुकीचे मानले जाते. जे राजकारणी आहेत त्यांनी धर्म पाळू नये का? विश्वासघाताच्या पापाबद्दल आम्ही जनतेला सावध करू नये का? जर तुम्ही धार्मिक असाल तर कोणाचाही विश्वासघात करू नका. आम्ही राजकारणाबाबत काहीही बोललो नाही. आपण धर्माबद्दल बोललो आहोत. केवळ ‘हिंदू आहोत’ असे ओरडून चालणार नाही. जेव्हा आपणाला धर्माचा अर्थ कळेल आणि त्याचा अवलंब करू तेव्हाच आपण हिंदू होऊ. लोकांच्या जीवनात धार्मिकता खर्‍या स्वरूपात रुजली पाहिजे, हे वेळोवेळी समजावून सांगितले पाहिजे. धर्माचार्याने असे केले नाही, तर तो त्याचे काम करत नाही असे समजावे. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे धर्म समजावून सांगतो, असे ते म्हणाले.
 
ही सगळी वाक्ये पाहिली तरी या अविमुक्तेश्वरानंदांनी सर्व संकल्पना आणि युक्तिवादांचा गुंता केलेला आहे, हे सहज दिसून येते. राजकारण्यांनी धर्मात ढवळाढवळ करू नये किंवा धर्माचार्यांनी राजकारणात लुडबुड करू नये, असे भारतात कधीही कोणी म्हटले नव्हते. ही संकल्पना पाश्चात्त्यांचीच आणि तिलासुद्धा चर्च आणि तेथील राजवटी यांच्यातील संघर्षाची किनार आहे. तो आपला सध्या विषय नाही. आपल्याकडे धर्मसत्ता आणि राजसत्ता नेहमीच एकत्र नांदलेल्या आहेत. राजसत्तेने धर्मसत्तेला संरक्षण द्यायचे आणि धर्मसत्तेने राजसत्तेचा विवेक सांभाळायचा, ही येथील परंपरा आहे.
 
आर्य चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला केलेले मार्गदर्शन, सम्राट अशोकाने भगवान बुद्धांकडून घेतलेली प्रेरणा, विद्यारण्यस्वामींनी हरिहर आणि बुक यांना विजयनगरचे साम्राज्य उभे करण्यासाठी दिलेले आत्मबळ, छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांचे मिळालेले मार्गदर्शन, शीख पंथातील सर्व 10 गुरू आणि विशेषतः गुरुगोविंद सिंग यांचा खालसा पंथ ही सर्व धर्म आणि राजकारणाची आपल्याकडची उदाहरणे आहेत. अगदी अलीकडील काळात ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक पिढ्या दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद यांना दैवत मानणार्‍या होत्या. श्री अरविंद हे त्यांच्या पूर्वायुष्यात अरविंद घोष या नावाने ओळखले जात असताना स्वतः क्रांतिकारक होते. आझाद हिंद फौज उभे करणारे नेताजी सुभाष चंद्र बोससुद्धा अध्यात्माने प्रेरित होते. हैदराबाद संस्थानात निझामाविरोधात स्वातंत्र्यलढा उभे करणारे स्वामी रामतीर्थसुद्धा संन्यासीच! सध्याच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यामुळे संन्यासी आणि राजकारण यांचा काहीच संबंध नाही हे बोलणे सत्य नाही.
 
अविमुक्तेश्वरानंद यांच्या या बडबडीला लोकांचा आक्षेप आहे तो त्यांनी केलेल्या लपवाछपवीला. एकीकडे आपण राजकारणाशी संबंधित नाहीत, आपला मार्ग संन्यासाचा आहे, असे सांगायचे आणि दुसरीकडे बेछूटपणे राजकीय वादंग उभे करायचे, ही अविमुक्तेश्वरानंद यांची कार्यशैली बनली आहे. या बनवेगिरीचा निषेध अन्य कोणी नाही स्वतः आदि शंकराचार्यांनीच केलेला आहे. जटिलो मुण्डी लुंचितकेशः काषायांबरबहुकृतवेषः। पश्यन्नपि च न पश्यति मूढः उदरनिमित्तं बहुकृतवेषः॥ (केस लांब वाढवायचे किंवा संपूर्ण टक्कल करायचे, भगवी वस्त्रे घालून अनेक प्रकारची वेशभूषा करायची, पोटासाठी अनेक सोंगे घ्यायची असे हे मूर्ख लोक दिसत असूनही बघत नाहीत.) अशी या बनवेगिरी करणार्‍यांची शैली असते, असे आचार्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी कोणी दगाबाजी केली किंवा त्यांना कोणी दगा दिला, हे लोकांना आता नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यावर एवढे चर्वितचर्वण झालेले आहे, की त्याची आता पुन्हा उजळणी करायला नको अन् तरीही अविमुक्तेश्वरानंदांना त्या शिळ्या कढीला ऊत आणायचा आहे याला कारण त्यांची स्वतःची पार्श्वभूमी.
 
’अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नावाच्या ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांनी’ असा उल्लेख वर केला आहे तो यासाठीच. हे अविमुक्तेश्वरानंद मुळात शंकराचार्य आहेत की नाही इथपासून प्रश्न आहेत. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या पदग्रहणाला सर्वोच्च न्यायालयानेच स्थगिती दिलेली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दिवंगत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी खोटा दावा केल्याचा आरोप करत एक याचिका त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती. त्या सुनावणीदरम्यान ज्योतिषपीठाचे नवे शंकराचार्य म्हणून अविमुक्तेश्वरानंद यांच्या नियुक्तीला आपण मान्यता दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र पुरी येथील गोवर्धन मठाच्या शंकराचार्यांनी दाखल केले होते.
 

swami avimukteshwaranand 
 
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना याच अविमुक्तेश्वरानंदांना केवळ गंगेत प्रतिमा विसर्जन केले म्हणून पोलिसांकरवी अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्या वेळी समस्त हिंदूंनी त्यांना सहानुभूती दाखवून अखिलेश यांच्या नावाने बोटे मोडली होती. मात्र तेव्हाही असाच अवसानघात करून केवळ दोनच दिवसांमध्ये त्यांनी अखिलेश यांना भेटून त्यांना आशीर्वाद दिला होता.
 
अविमुक्तेश्वरानंद यांचे गुरू स्वरूपानंद सरस्वती हेसुद्धा वादग्रस्त होते. के. ए. पॉल या अत्यंत कडव्या मिशनरी धर्मप्रचारकांकडून त्यांनी आशीर्वाद घेतले होते. या पॉल महाशयाच्या विरोधात फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. हेच अविमुक्तेश्वरानंद स्वतःला सेक्युलर म्हणून मिरवत असतात. त्यांच्या मठाच्या कार्यक्षेत्रापासून जवळच असलेल्या बंगालमधील मुस्लिमांच्या अत्याचार वगैरेंबद्दल ते कधीही बोलत नाहीत; परंतु इस्लामी देशांवर इस्रायल, अमेरिका आणि इंग्लंड अत्याचार करत असल्याची ओरड ठोकत होणार्‍या निदर्शनांना मात्र ते हजर असतात. उत्तर प्रदेशात राज्यकारभाराची नवी पहाट घेऊन येणार्‍या योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ते सातत्याने कडवी वक्तव्ये करतात, मात्र अखिलेश यादव आणि आझम खान यांच्याशी त्यांची जवळीक आहे. योगी आदित्यनाथ यांच्याविषयी ते म्हणतात, की संन्याशांनी राजकारणात भाग घेऊ नये; परंतु देशभरात इकडेतिकडे फिरताना राजकीय वक्तव्य करायला मात्र त्यांनास्वतःला कुठलाही दंडक आड येत नाही. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना याच अविमुक्तेश्वरानंदांना केवळ गंगेत प्रतिमा विसर्जन केले म्हणून पोलिसांकरवी अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्या वेळी समस्त हिंदूंनी त्यांना सहानुभूती दाखवून अखिलेश यांच्या नावाने बोटे मोडली होती. मात्र तेव्हाही असाच अवसानघात करून केवळ दोनच दिवसांमध्ये त्यांनी अखिलेश यांना भेटून त्यांना आशीर्वाद दिला होता.
 
 
थोडक्यात म्हणजे संन्याशाच्या वेशात अविमुक्तेश्वरानंद पाखंड करत आहेत. दुसरीकडे प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष, अशी थाप मारत उद्धव ठाकरे राजकीय पाखंड करत आहेत. त्यांना उद्धव ठाकरे जवळचे वाटले असल्यास नवल नाही. नुसते जवळचे नाही, तर ते त्यांना निर्दोषही वाटत आहेत, हेही बरोबरच आहे. त्यांना आपल्या मित्रपक्षांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारे व्यक्ती निर्दोष वाटणारच. एकावर साक्षात आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या धर्मपीठाची फसवणूक करण्याचा आरोप आहे, दुसर्‍याने वडिलांच्या विचारसरणीशी प्रतारणा केली आहे. एकाने भगवी वस्त्रे घालून श्रद्धेचा खेळ मांडला आहे, दुसर्‍याने भगव्याची झूल पांघरून मतांची बेगमी केली आहे. त्यामुळे ‘समानशीलव्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने त्यांचे जवळ येणे हेच सयुक्तिक आहे.
Powered By Sangraha 9.0