अखंड ऊर्जेची आस असणारं नाटक ‘इवलेसे रोप’

18 Jul 2024 18:04:32
@उत्तरा मोने 

vivek
आयुष्याच्या रेट्यात आपण इतके गुंततो की, आपल्या जगण्यातला तटस्थपणा आपण विसरून जातो. मात्र त्या घटनांचे परिणाम आपल्या मनावर खोल उमटत जातात. आयुष्याच्या संध्याकाळी नात्याची खरी किंमत कळते आणि एका दृष्टीने नात्यांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. जगण्याच्या याच परिमाणांचं नाटक म्हणजे सई परांजपे लिखित आणि दिग्दर्शित ‘इवलेसे रोप’. आपण आयुष्यात आर्थिक नियोजन नेहमीच करतो; पण भावनिक नियोजन करणं विसरून जातो. हे नाटक याच गोष्टीची प्रकर्षाने जाणीव करुन देते.
आयुष्यात घडणार्‍या बर्‍यावाईट प्रसंगांचं ओझं घेऊन बर्‍याचदा आपण जगत असतो. आपलं जगणं हे या घटनांभोवती अनेकदा फिरत असतं. आपल्या जगण्यातला तटस्थपणा प्रत्यक्ष जीवन जगताना मात्र आपण विसरून जातो, कारण आयुष्यात घडणार्‍या घटनांमध्येे आपण गुंतून जातो. त्या घटनांचे परिणाम आपल्या मनावर खोल उमटत जातात. आयुष्याच्या संध्याकाळी नात्याची खरी किंमत कळते आणि एका दृष्टीने नात्यांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. जगण्याच्या याच परिमाणांचं नाटक, सई परांजपे लिखित आणि दिग्दर्शित ‘इवलेसे रोप’.
 
 
माई (भानू) आणि बापू (माधव) यांची ही गोष्ट. म्हटली तर त्यांची, म्हटली तर आपल्यापैकी प्रत्येकाची. दोन पिढ्यांची मूल्यं, त्यांची संस्कृती, जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या सगळ्यात दोन पिढ्यांनी एकमेकांना समजून घेणं, नव्या पिढीने जुन्या पिढीच्या आयुष्यात डोकावून बघणं आणि त्यातून नात्यांचा उलगडा होणं, या सगळ्या गोष्टी या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येतात.
 
 
आजच्या पिढीचे वैशाली आणि जगन्नाथ हे आधीच्या पिढीतल्या माई आणि बापूंच्या संसारात डोकावून पाहतात, तेव्हा माई आणि बापू आजारांनी त्रस्त आहेत, वृद्ध झालेले आहेत; पण तरीही ते एकमेकांना छान समजून घेतायत. खरं तर काळ जणू त्यांच्यासाठी थांबलेला आहे; पण तरीही ते आनंदाने जगण्याला सामोरे जातायत. जगन्नाथ आणि वैशाली बाहेरगावी जाताना माई-बापूंकडे एक रोप सांभाळायला देतात. त्या रोपाचं संगोपन करता करता ती दोघंही त्यात पुरती गुंतून जातात. जगन्नाथ आणि वैशाली परत आल्यावरही ते रोप त्यांना परत द्यावंसं वाटत नाही. त्यांना मूल नसतं, त्यामुळे त्या रोपालाच ते मुलाची माया लावतात. खरं तर आता त्यांच्या आयुष्यात नवीन काही घडणार नाही याची त्यांना कल्पना आहे; पण आलेला दिवस ते आनंदाने पुढे नेतात, हे महत्त्वाचं. छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांच्यातलं नातं कसं फुलत गेलंय, हे सईताईंनी अतिशय सुंदर रीतीने दाखवलंय आणि तितक्याच सुंदर पद्धतीने ते नातं साकार केलंय लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी. अतिशय संवेदनशील आणि उत्तम कलाकार असणार्‍या लीना आणि मंगेशला या नाटकात खूपच आव्हान होतं. मंगेशने पूर्वी सईताईंबरोबर काम केलं होतं त्यांच्या ‘सख्खे शेजारी’ या नाटकात. एकदा सईताई मंगेश आणि लीनाच्या ‘आमने सामने’ या नाटकाला आल्या होत्या. नाटक बघून झाल्यावर सईताई मंगेशला म्हणाल्या की, तुम्ही पुण्याला या माझ्या घरी. तुम्हाला एक भेट द्यायची आहे. ती दोघंही एकदा पुण्याला गेली. सईताई म्हणाल्या की, घरी जेवायलाच या आणि त्यांनी या नाटकाचं वाचन ठेवलं, दोघांना म्हणाल्या, ही तुमची भेट, हे नाटक तुम्ही करा. मी दिलंय, तुम्ही ठरवा. लीना म्हणाली, नाटक तर आम्हाला आवडलंच होतं. एक तर सई मावशीने लिहिलेलं, तिची भाषा, तिचा नाटकातला आशय, विषय सगळंच विचार करायला लावणारं होतं. नाटकाचा आशय गंभीर होता; पण त्यात हसत हसत भाष्यं केलेली होती. आमच्या दृष्टीने ते नक्कीच आव्हानात्मक होतं. आमची याआधीची नाटकं पाहता ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकांच्या पार्श्वभूमीवर याचं आव्हान वेगळं होतं.
 
 
खरं तर 70/75 वर्षांचं जोडपं आणि त्यांचं तरुणपण दाखवणारं 20/22 वर्षांचं तरुण जोडपं वेगवेगळं असावं, असं मूळ नाटक लिहिताना सईताईंनी लिहिलं होतं; पण या दोघांनीच ते दोन्ही रोल करावेत, असं मंगेश आणि लीना यांनी ठरवलं आणि स्वतःसाठीच आव्हान आणखी कठीण करून घेतलं. अर्थात त्या दृष्टीने लेखनात बदल केले गेले. सादरीकरणाच्या दृष्टीने जर तरुण आणि वृद्ध दोन्ही भूमिका या दोघांनी करायच्या तर मग कपडे बदलणं, मेकअप यासाठी थोडा वेळ मिळणं याचाही विचार करून पुन्हा लिखाणात बदल केले गेले. लीना म्हणते, प्रत्येक प्रवेशात वयाचे बदल होते. म्हणजे मोठ्या वयातून तरुण वयात येताना पटकन मेकअप, कपडे बदलून संगीताची ती धून संपायच्या आत पुन्हा येऊन हजर व्हायचं होतं. त्यामुळे या बदलाबदलीत भूमिकेसाठी चित्त स्थिर ठेवून काम करणं महत्त्वाचं असतं. अर्थात यात माझी टेक्निकल टीम, मेकअप-कपडेपट सांभाळणारे मीनल, सूरज, आकाश या सगळ्यांचं श्रेय आहे. अगदी संगीत ऑपरेट करणार्‍यापासून इतर सहकलाकारापर्यंत सगळ्यांचं. मला असं वाटतं की, लीना म्हणूनही मला या भूमिकेने खूप शिकवलं. सईताईंनी खूप शिकवलं. म्हणजे आपल्या आयुष्याला ना इतका वेग आहे की, सतत आपल्याला काहीना काही करावंसं वाटत राहतं. थोडा ठहराव हवा आपल्या आयुष्यात. नेहमी वाहती नदीच छान दिसते असं नाही. तळंही छान असतं. या सगळ्याची जाणीव मला झाली. सई मावशीची भाषा. तो काळ थोडा वेगळा होता. 1970 च्या आसपासचं ते तरुण जोडपं. त्यामुळे त्या वेळची भाषाही त्यांनी थोडी वेगळी वापरली आहे. म्हणजे उदा. द्यायचं झालं तर आपण सहजच म्हणतो की, ‘त्यापेक्षा आपण गाण्यांच्या भेंड्या खेळू’, तर इथे ‘त्यापेक्षा’च्या जागी सई मावशीने ‘त्यापरिस’ हा शब्द वापरलाय किंवा ‘किती मऊ मखमल जणू’, ‘झुडूप’ असे शब्द वापरलेत. मला वाटतं ही भाषा लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि त्या प्रत्येक शब्दाला लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतो. मुख्य म्हणजे मी केवळ या नाटकात अभिनय करत नाही, तर मी या नाटकाची निर्मातीदेखील आहे. त्यामुळे महिला दिनाच्या दिवशी या नाटकाचा शुभारंभ झाला, तेव्हा सई मावशीने आवर्जून याचा उल्लेख केला की, नाटकाची लेखिका + दिग्दर्शिका आणि अभिनेत्री आणि निर्माती महिला आहे. या नाटकाची संपूर्ण प्रोसेसच छान अनुभव देणारी होती. सई मावशीचं दिग्दर्शन अनुभवणं हाही एक वेगळा विषय होता. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. या नाटकाच्या तालमी आम्ही प्रतीक भिडेच्या रिसॉर्टवर केल्या. सात दिवस आम्ही सगळे एकत्र राहिलो. त्या दिवसांत फक्त या नाटकाचा विचार, त्यावर चर्चा आणि तालमी. त्यामुळे अगदी पाच दिवसांतच आमचं नाटक बसलं. आमच्या सगळ्यांसाठीच एक सुखद अनुभवाचा काळ होता तो.
 

vivek 
लीनाच्या या मताला दुजोरा देत मंगेश म्हणाला, रिहर्सल ते पहिला प्रयोग हा अनुभव आमच्यासाठी रोलर कोस्टर राइडसारखा होता. सई मावशीच्या दिग्दर्शनाचा पुन्हा एकदा वेगळा अनुभव मिळाला मला. व्यक्तिरेखांकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. खरं तर गोष्टी त्याच असतात; पण दृष्टिकोन त्यांच्या अनुभवातून आलेला असतो. बरं, सई परांजपे हे आज केवढं मोठं नाव; पण ही सगळी मोठेपणाची झूल त्या बाहेर ठेवून रिहर्सलला येतात. नाटकाच्या वाचनापासून त्यांचं कधी दडपण आलं नाही. उलट मावशीकडे आपण कसे सहज व्यक्त होतो तसं आमचं झालं. त्यामुळे नाटक बसवताना अगदी काही बाळबोध शंका आली तरी विचारायला संकोच वाटला नाही कधी किंवा आम्ही सुचवलेले काही बदलही त्यांनी आपणहून स्वीकारले. तसंच तरुण आणि ज्येष्ठ अशा दोन्ही भूमिका करताना केवळ मेकअप आणि कपडे बदलून व्यक्तिरेखा बदलणार नाही, तर आतून त्या माणसात कसा बदल होईल याचा सुंदर विचार त्यांनी आम्हाला दिला. मुळात वयातल्या वेगवेगळ्या टप्प्यांत माणूस कसा बदलत जातो किंवा म्हातारपणी आपल्याबरोबर जरी कुणी नसलं तरी आनंदाने आपण कसे राहू शकतो. प्रसंगी एकमेकांचे मित्र होतो. क्वचित तर ती हळूहळू माझी आई होत जाते. नातं अधिक परिपक्वहोत जातं. शिवाय निर्माता म्हणून विचार करताना हाही विचार केला की, या नवराबायकोच्या आयुष्यात सगळं थांबलंय. मग आजच्या जगण्याच्या वेगाशी ते मॅच होईल का? पण यात असं आहे ना, की त्यांच्या आयुष्याचा वेग थांबलाय. ज्या काही घटना घडल्या आहेत, स्थित्यंतरं घडली आहेत, ती वेगवान आहेत आणि त्या वेगवान घटनाच तुम्हाला गती देतात. त्यामुळे बघणारे भारावून जातात. तरुण मुलांना पुढचा काळ बघितल्यासारखं वाटतं, तर ज्येष्ठांना सिंहावलोकन केल्यासारखं. उलट तरुणांनी हे नाटक आवर्जून बघावं असं मला वाटतं, कारण आपण आर्थिक नियोजन नेहमीच करतो; पण भावनिक नियोजन करणं, ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी हे नाटक पाहिलं पाहिजे असं मला वाटतं.
 
 
लीना म्हणाली, याचा प्रत्यय आम्हाला नेहमी येतोय, कारण नाटक संपल्यावर प्रेक्षक भरल्या डोळ्यांनी आम्हाला भेटायला येतात. आयुष्य कसं असावं हे कळलं म्हणतात. या 70/75 वयाच्या जोडप्याच्या आयुष्यात इवलंसं रोप येतं आणि त्यांचं आयुष्यच बदलून जातं. कोणता क्षण सुखावून जातो ते कळत नाही. हा वेगळेपणा आयुष्यात नकळत डोकावून जातो.
 
 
यावर सईताई तर म्हणतात, हे तुमचंआमचं सगळ्यांचंच नाटक आहे. आजूबाजूला वावरणारी वडिलमंडळी, त्यांची साथसोबत, त्यांच्या आयुष्यातले खाचखळगे, रुसवे-फुगवे या सगळ्यांचं बारकाईने मी निरीक्षण करत आले. त्यातूनच हा विषय मागोवा घेत इथपर्यंत आला. खरं तर याचं बीज खूप वर्षांपूर्वी मी जेव्हा दूरदर्शनला काम करत होते, तेव्हाच पडलं होतं. ‘सात बज चुके है’ या मालिकेतून हा विषय मी मांडला होता. ती दोघं, त्यांचा सहप्रवास, एकमेकांशिवाय कंटाळणं, एकमेकांवरचं प्रेम हे सगळं त्यात होतं; पण माझ्या मनात मात्र हा विषय कुठे तरी रेंगाळत होता. तेव्हा त्या विषयाला पुरता न्याय दिला गेला नाही असं वाटत राहिलं. आत्ता या नाटकात तो विषय पुन्हा आला. रेखा देशपांडेने त्याचं हिंदी नाटकही केलं. मंगेश आणि लीनाला जेव्हा ‘आमने सामने’ नाटकात पाहिलं तेव्हा ती दोघं या नाटकासाठी योग्य आहेत असं मला वाटलं. त्यांच्याशी बोलणं झालं. खूप मेहनत करून छान नाटक ते सादर करतायत आणि लोकांना ते खूप आवडतंय हे महत्त्वाचं.
 
 
खरं तर नाटकातल्या माई-बापूंचं वय आणि सईताईंचं वय यात साधर्म्य आहे. याही वयात हा उत्साह सईताईंनी टिकवून ठेवलाय, तो उत्साहच कदाचित आपल्यालाही नवी ऊर्जा देतो. या लेखाच्या निमित्ताने सईताईंशी बोलण्यासाठी फोन केला, तर त्या या नाटकाच्या पुस्तकाची प्रूफं तपासत बसल्या होत्या आणि नेमकं त्याच वेळी मी नाटकाच्या निमित्ताने बोलायला फोन केला याचं केवढं अप्रूप वाटलं त्यांना. हा असा आनंद सगळ्यांना टिकवता आला पाहिजे. माई-बापूंच्या आयुष्यात एक इवलंसं रोप येतं आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं तसंच सईताईंच्या आयुष्यात आलेलं नाटकाचं हे इवलंसं रोप त्यांना सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे क्षण देऊन जाणारं ठरो, हीच यानिमित्ताने सदिच्छा.
Powered By Sangraha 9.0