कुंभार समाज इतिहास आणि लोकस्मृती

विवेक मराठी    16-Jul-2024
Total Views |
@अरुणचंद्र पाठक  9309859826

kumbhar
महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याकडे प्रागैतिहासिक कालखंडात सावळदा संस्कृती, जोर्वे संस्कृती, मावळा संस्कृती अशा भिन्नभिन्न नावांनी प्रसिद्ध झालेल्या संस्कृती आढळतात. त्यांचा कालखंड ठरवताना त्या त्या काळात निर्माण झालेली मातीची भांडी, त्यांची आकारवैशिष्ट्ये, पोत इत्यादींच्या आधारे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी ही नावे दिलेली आहेत. त्या त्या स्थानांवर सापडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या शैलींच्या भांड्यांवरून व कुंभारांच्या कलाकृतींवरून संस्कृतींना मिळालेली ही नावे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.
कुंभार म्हटलं की आठवतो, एका चाकाला फिरवत, काठीने गती देत आणि हाताने मातीच्या गोळ्याला आकार देत असलेला माणूस. आमच्या शेजारीच कुंभाराचं घर होतं. तो तासन्तास मातीच्या गोळ्याला आकार देत, वेगवेगळ्या आकारांची भांडी बनवत असताना आम्ही लहानपणी अत्यंत कुतूहलाने त्याच्या समोर किती तरी वेळ बसून राहात असू.
 
मानवी जीवनाची जी प्रगती झाली, त्यात तो अगदी प्रारंभिक अश्मयुगापासून विकसित होत गेला. त्याच्या आयुष्यामध्ये त्याला लागलेले दगडी हत्यारांचा उपयोग करणं, धनुष्याला बाण लावून तो सोडणं आणि अग्नीचा शोध लागणं हे त्या त्या टप्प्यावरचे क्रांतिकारक शोध होते. त्याच प्रकारचा एक शोध होता कुंभाराच्या चाकाचा. पुराश्मयुगीन मानवाचा काळ साधारणपणे इ.स.पूर्व पाच लाख वर्षांपूर्वीचा मानला जातो. याचे दोन भाग होतात. प्रारंभिक पुराश्मयुगीन माणूस आणि नंतरचा नवाश्मयुगीन माणूस. या नवाश्मयुगीन माणसाला कुंभाराच्या चाकाचा शोध लागला.
 
कुंभाराच्या चाकाचा शोध लागला तशी मानवाच्या जीवनाला गती मिळाली. गाडीसाठी चाक तयार करता आले आणि सामान वाहून नेण्यासाठी बैलगाडी विकसित झाली. पुराश्मयुगाच्या प्रारंभी शिकार करून, जनावरे मारून खाणारा माणूस आता पशुपालन करू लागला. याचा उपयोग शेतीसाठी व आपल्या अन्य व्यक्तिगत उपयोगासाठी आहे, हे त्याच्या लक्षात येऊ लागले. त्याच्या मनात धर्मविषयक संकल्पना निर्माण झाल्या. त्यामुळे मृतदेहावर काही संस्कार करून त्यानंतर काही विधी करू लागला.
आता माणूस सुबक भांडी बनवू लागला. या भांड्यांवर काळ्या-पिवळ्या रंगांचे नक्षीकाम करू लागला. विशेषत: हडप्पा संस्कृतीत पशुपक्ष्यांची, मोराची चित्रे आढळतात. पुढे नागर संस्कृतीचा विकास झाला. रथाचं चाक गतीने धावू लागलं तशी पौराणिक कथानकांमध्ये श्रीकृष्णाची कथा आली आणि त्याच्या हातात सुदर्शन चक्र आलं. आपल्याकडील वेदांचा जर्मन अभ्यासक मॅक्स मुल्लर याला अत्यंत कठीण प्रश्न पडला होता. त्याला असं वाटलं की, गतीने फिरणारं चाक ही आपल्या विचारविश्वाच्या पलीकडची गोष्ट होती. म्हणून ऋग्वेदाचा काळ ठरवताना त्याला मोठी अडचण येत होती. तो काळ त्याने फारसा मागे नेला नाही.
 
 
kumbhar
जसा मातीकामासाठी कुंभाराच्या चाकाचा शोध लागला होता, त्याचप्रमाणे गाडीच्या चाकाचा, रथाच्या चाकाचा त्याला शोध लागला होता आणि या शोधाचाच एक भाग म्हणून त्याने नदीकाठी वस्ती करण्याचे थांबवून नदीपासून थोडेफार दूर, आतल्या बाजूस वस्ती करण्यास सुरुवात केली आणि विहिरी खणण्यास सुरुवात केली. खोदलेली विहीर ही भारताने आशिया खंडाला, किंबहुना जगाला दिलेली एक मोठी देणगी होती. विहिरीतले पाणी उपसून काढण्यासाठी त्याने रहाटगाडग्याचा शोध लावला. या रहाटगाडग्याचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदिक साहित्यात आढळतो.
 
सातवाहन म्हणजे शालिवाहन राजाच्या काळातली कुंभाराविषयीची एक मजेदार कथा आपल्याला ऐकायला मिळते. सुप्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण, हे महाराष्ट्रातील पहिला सातवाहन राजाच्या राजधानीचे नगर होते. त्या राजवंशाच्या उत्पत्तीची कथा पुढीलप्रमाणे सांगतात. या कथेचा कर्ता गुणाढ्य. त्याने पैशाची नावाच्या भाषेत ‘बृहत्कथा’ नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याचे रूपांतर ‘कथासरित्सागर’मध्ये आले आहे. ‘कथासरित्सागर’मध्ये आढळणारी कथा अशी - सुप्रतिष्ठान नगरात सोमशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला वत्स आणि गुल्म अशा नावांचे दोन पुत्र होते आणि श्रुतार्थ नावाची कन्या होती. ही कन्या गोदावरीच्या काठी स्नानासाठी गेलेली असताना नागराज कीर्तिसेन नामक राजाशी तिचा संबंध आला व तिला त्यापासून गर्भ राहिला. तिला झालेला हा पुत्र पुढे गुणाढ्य अशा नावाने विख्यात झाला अशी कथा सांगितली जाते. हा कीर्तिसेन राजा नागराज वासुकीचा पुतण्या होता. आणखीही अशीच एक कथा सांगितली जाते. उद्यतन सुरी याच्या कथा कुवलय मालेमध्येदेखील आली आहे. ही कथा अशी - या ब्राह्मण कन्येला नागराजापासून दिवस गेल्यानंतर तिच्या कुटुंबाने तिला घराबाहेर काढले. तिचा प्रतिपाळ एका कुंभार कुटुंबाने केला. त्या कुंभार कुटुंबात राहात असताना ती मातीपासून विविध खेळणी तयार करत असे. घोडे, शिपाई असे एक सैन्यच तिने तयार केले होते आणि जेव्हा त्या नगरावर क्षत्रपांनी आक्रमण केले, तेव्हा तिने इंद्राची प्रार्थना केली आणि त्याला प्रसन्न करून घेतले. तिथे शालिवाहनाची म्हणून जी विहीर होती, त्या विहिरीतून पाणी काढून तिने त्या मातीच्या खेळण्यांवर शिंपडले. त्या अमृतवर्षावामुळे त्या मातीच्या खेळण्यांचे रूपांतर खर्‍याखुर्‍या सैन्यात झाले. हे सैन्य त्या लढाईत जिंकले आणि सातवाहनांनी आपल्या राज्याची स्थापना केली, अशी एक रंजक कथा वाचावयास मिळते. कुंभारांनी मातीच्या वस्तू तयार करण्याच्या कलेचे एक विकसित रूप या कथेद्वारा आपल्याला पाहण्यास मिळते.
 
 
नवाश्मयुगातच मानवाला चाकाचा शोध लागला होता. त्याचा विकास हडप्पा संस्कृतीत किंवा सरस्वती संस्कृतीच्या काळात झाला, असे आपल्याला म्हणता येते. सरस्वती संस्कृतीत चिन्नोदारो, लोथर, ढोलाविरा यांसारख्या अनेक नगरांमध्ये आपण उत्खनन केले आहे. पाच हजार वर्षांपूर्वी इथे एक प्रशस्त अशी संस्कृती विकसित झाली होती. या संस्कृतीचा संपर्क पश्चिम आशिया, दक्षिण युरोप, इजिप्त या देशांशी होता. तसेच काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या देशांशी व्यापारी संबंध या संस्कृतीने प्रस्थापित केले होते. यामध्ये अत्यंत विकसित झालेली मातीची खेळणी तयार करण्याची कला होती. अनेक प्रकारची भांडीही तेथे चाकाचा वापर करून तयार केली जात असत. त्यावर विविध रंगांत नक्षीकाम केले जात असे. भांडी भाजण्याची कलाही त्यांनी अवगत केली होती. त्यामुळे ती भांडी मजबूत होत असत. दोन चाकांच्या बैलगाड्या, पक्षी, विविध आकारांच्या शिट्ट्या, खुळखुळे अशी खेळणी उत्खननात मोठ्या प्रमाणावर मिळाली आहेत.
 

kumbhar 
महत्त्वाचा मुद्दा असा की, प्रतिष्ठान हे दक्षिणेतले, भारतभर पसरलेल्या साम्राज्याचे मुख्य सातवाहन काळामध्ये होते. त्या साम्राज्याची निर्मिती ब्राह्मणकन्या आणि नागवंशातील राजा या दोन भिन्न वंशांतील संकरातून झाली. त्या वेळेस कुंभाराने त्याचा प्रतिपाळ केला होता हे विशेष. याच काळात असलेले तगर नावाचे एक नगर आपल्याला पाहण्यास मिळते. आताचे तेर (जिल्हा उस्मानाबाद) हे ते नगर होय. या वेळी युरोपातील रोमबरोबर असलेल्या संपर्काचा फायदा झाला. रोममधील कुंभार येथे मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिले होते. रोमन पॉटरी नावाच्या एका विशेष पॉटरीचा प्रकार पाहण्यास मिळतो. ही पॉटरी अत्यंत पातळ असून तिला एक प्रकारचा मेटॅलिक साऊंड म्हणजे धातूसारखा नाद असतो व ती साधारणपणे लालसर रंगात तयार होते. या भाजलेल्या मातीचे वैशिष्ट्य आणि तिच्यापासून तयार केलेली वेगवेगळी खेळणी तेर येथील वस्तुसंग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतात. कुंभार कलेतून निर्माण झालेल्या सुमारे दहा हजारांहून अधिक वस्तू आजमितीला तेर येथील वस्तुसंग्रहालयात उपलब्ध आहेत. त्यातील प्रसिद्ध शिल्प म्हणजे घोड्यावर बसलेले दांपत्य, हत्तीवर बसलेले दांपत्य, लहान मुलाला दूध पाजण्यासाठी असलेले गोखुर व वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपल्याला येथे पाहायला मिळतात. उत्खननात एम. एन. देशपांडे यांना तिथे रोमन पॉटर्सची म्हणजे कुंभारांची वसाहत सापडली. हे रोमन कुंभार अर्थातच वर्णाने गोरे होते. म्हणून ‘गोरा कुंभार’ अशा नावाने ही जमात पुढे प्रसिद्ध झाली आणि संत गोरोबा कुंभार यांनाही लोक ‘गोरा कुंभार’ याच नावाने ओळखतात. हे ज्ञानदेवांचे समकालीन म्हणजे इ.स.च्या 12 व्या-13 व्या शतकातला असला तरी लोकस्मृती या ठिकाणी येऊन राहिलेल्या परदेशी कुंभारांची आठवण विसरली नव्हती म्हणून या कुंभारांना ‘गोरा कुंभार’ असे नाव पडले.
 
या सगळ्या ऐकीव कथा किंवा लोकस्मृती आहेत. यांना दंतकथा असेही म्हणता येईल. त्यांना पौराणिक संदर्भही उपलब्ध आहेत, हे विशेष.
 
असा हा कुंभार, आमच्याकडे सबंध देशभर पसरलेला, वेगवेगळ्या राज्यांत स्थिरावलेला, परदेशातही गेलेला असा आहे आणि त्यांनी विकसित केलेली कला ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे आद्य क्रांतिकारक किंवा मानवी जीवनाच्या प्रगतीचा पाया घालणारी अशी ही जमात आहे.
 
महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याकडे प्रागैतिहासिक कालखंडात सावळदा संस्कृती, जोर्वे संस्कृती, मावळा संस्कृती अशा भिन्नभिन्न नावांनी प्रसिद्ध झालेल्या संस्कृती आढळतात. त्यांचा कालखंड ठरवताना त्या त्या काळात निर्माण झालेली मातीची भांडी, त्यांची आकारवैशिष्ट्ये, पोत इत्यादींच्या आधारे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी ही नावे दिलेली आहेत. त्या त्या स्थानांवर सापडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या शैलींच्या भांड्यांवरून व कुंभारांच्या कलाकृतींवरून संस्कृतींना मिळालेली ही नावे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.