कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात!

विवेक मराठी    15-Jul-2024   
Total Views |

bjp
राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नावाच्या संस्थेशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आज महाराष्ट्रात उभे राहिले आहेत ज्यांची उत्तरे शोधणे भविष्यातील आव्हानांचा विचार करता हिंदुत्व चळवळीसाठी नितांत आवश्यक बनले आहे. या प्रश्नांपैकी सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा ‘कार्यकर्ता आज कुठे आहे?’ आणि विशेष म्हणजे हा प्रश्न खुद्द कार्यकर्त्यांनीच विचारलेला वा उपस्थित केलेला आहे की, वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये, प्रक्रियेमध्ये आम्ही कुठे आहोत? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘साप्ताहिक विवेक’च्या निमेश वहाळकर यांनी राज्याच्या काही भागांत दौरा केला. समाजाच्या विविध स्तरांतल्या व्यक्तींशी या संदर्भात संवाद साधला. त्या संवादातून जे समोर आले ते मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. राज्यात एकीकडे आषाढीच्या वारीची लगबग चालू असताना, ‘विवेक’ने काढलेली ही राजकीय जागरणाची वारी नवी दृष्टी देणारी, चिंतनाची गरज अधोरेखित करणारी आहे.
हिंदुत्व विचार आणि त्यावर आधारित हिंदुत्व चळवळ या देशात यशस्वी का ठरली? सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रापासून ते राजकारण, शिक्षण-आरोग्य व अन्य विविध सेवाकार्ये, ग्रामविकास, पर्यावरण आणि अशा असंख्य क्षेत्रांत आपला ठसा का उमटवू शकली? वास्तविक, हा हिंदुत्व विचार ज्या वेळी संघटित स्वरूपात प्रकट झाला आणि विस्तारू लागला तो काळ आणि त्यापुढेही अनेक दशकांचा काळ हा या विचारासाठीचा अत्यंत प्रतिकूल काळ होता. हिंदू, हिंदुत्व, राष्ट्र, राष्ट्रीयत्व आदी शब्द उच्चारणारे लोक म्हणजे अगदी अदखलपात्र, तुच्छ आणि राजकीय-वैचारिकदृष्ट्या अस्पृश्य समजले जाण्याचा काळही या चळवळीने पाहिला आहे. राजकीय सत्तेचे, शासकीय यंत्रणेचे, देशविदेशातील काळ्या व पांढर्‍या पैशाचे आणि असे कुठलेही स्रोत पाठीशी नसणारी ही चळवळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत क्षीण होत जाण्याऐवजी वाढतच का गेली? अशी कोणती शक्ती या चळवळीला लाभली?
 
 
 
उत्तर अतिशय सोपे आहे. ती शक्ती म्हणजे दुसरेतिसरे काही नसून या चळवळीसाठी आपले सत्त्व आणि स्वत्व दोन्ही पणाला लावून कार्यरत असलेला कार्यकर्ता होय. तोच या चळवळीचा आत्मा आहे. या आत्मशक्तीच्या बळावरच आज ही चळवळ देशाच्या प्रत्येक क्षेत्रात केंद्रस्थानी आली आहे. देशाच्या राजकारणात, राज्यव्यवस्थेत आज हिंदुत्व विचाराचा अभूतपूर्व प्रभाव निर्माण झाला आहे तोही खरे तर याच आत्मशक्तीची अभिव्यक्ती. राजकारण हा हिंदुत्व चळवळीतील अनेक घटकांपैकी एक घटक असला तरी या राजकीय सत्तेच्या माध्यमातून देशाला, समाजाला कुठे नेता येऊ शकते हे आपण प्रत्येक जण मागील दहा वर्षे अनुभवतो आहोत. राजकारणातील या यशाचे कारणही कार्यकर्ताच आहे. हिंदुत्व चळवळीचा राजकीय चेहरा असलेल्या भाजपाचा वा पूर्वाश्रमीच्या जनसंघाचा आजवरचा इतिहास बघितला तर आपल्याला हेच लक्षात येते. येथील कोणताही यशस्वी नेता, मग स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येक जण एक कार्यकर्ता आहे. कोणीही जन्माला येताना वारशाने नेतेपण घेऊन आलेले नव्हते, ते नेतेपण त्यांनी त्यांच्या निष्ठा सिद्ध करून मिळवले. महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे झाले तर, स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते नितीन गडकरी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रत्येक जण हा कार्यकर्त्यातून घडलेला नेता आहे. या गोष्टीची स्पष्ट जाणीव या प्रत्येक नेत्याला होती वा आहे म्हणूनच ही मंडळी यशस्वी झाली, समाजासाठी मोठे योगदान देऊ शकली. हिंदुत्व चळवळीचा कार्यकर्ता हा केवळ एखादी व्यक्ती वा अनेक व्यक्तींचा समूह नाही. झुंड तर नाहीच नाही. ती एक संस्था आहे, जी एकीकडे प्रसंगी लवचीक होते; परंतु दुसरीकडे कमालीची अविचल, स्थितप्रज्ञही असते. म्हणूनच आपल्या कार्यकर्त्याचा स्वभाव व्यक्तिस्तोमाला अनुकूल नसूनही प्रचलित राजकारणाची गरज म्हणून तो तेही करू शकतो. दुसरीकडे एखादे भलेमोठे, उत्कृष्ट दर्जाचे रुग्णालय वा शिक्षणसंस्था वा सेवाकार्य उभारणारा, त्यासाठी जीवनाची अनेक वर्षे झिजलेला, अतिशय कर्तृत्वसंपन्न - यशस्वी असलेला माणूसही स्वतःला केवळ कार्यकर्ताच म्हणवून घेताना पाहायला मिळतो. देशाच्या पंतप्रधानापासून ते लहानशा वाडी-वस्तीतील कार्यकर्त्यापर्यंत असलेली ही कार्यकर्ता नावाची संस्था ’डी-कोड’ करणे म्हणूनच आजतागायत भल्याभल्यांना जमलेले नाही. हा कार्यकर्ता नेमका आताच येथे आठवण्याचे कारण म्हणजे याच कार्यकर्ता नावाच्या संस्थेशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आज उभे राहिले आहेत ज्यांची उत्तरे शोधणे भविष्यातील आव्हानांचा विचार करता हिंदुत्व चळवळीसाठी नितांत आवश्यक बनले आहे. या प्रश्नांपैकी सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा ’कार्यकर्ता आज कुठे आहे?’ आणि विशेष म्हणजे हा प्रश्न खुद्द कार्यकर्त्यांनीच विचारलेला वा उपस्थित केलेला आहे की, वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये, प्रक्रियेमध्ये आम्ही कुठे आहोत? याच प्रश्नाच्या अनुषंगाने आपण या लेखात पुढे चर्चा करणार आहोत.
 
 लेखाचा मुख्य हेतू मागील दहा वर्षांत काय घडले आणि नजीकच्या वा लांबच्या भविष्यकाळात काय होऊ घातले आहे याच्या व्यापक चर्चेला प्रारंभ करण्याचा आहे आणि त्याच दृष्टीने उपस्थित होणारा मूलभूत प्रश्न म्हणजे वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये ’आपला’ कार्यकर्ता कुठे आहे?
4 जून रोजीचे लोकसभा निवडणुकीचे निकाल आपण सर्वांनीच पाहिले. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक संघ स्वयंसेवक, प्रखर राष्ट्रभक्त, कर्मठ आणि तपस्वी व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले याचा आनंद देशातील प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला झाला. मात्र या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जागांमध्ये झालेली मोठी घसरण आणि त्यातही विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना अपेक्षेपेक्षा अक्षरशः निम्म्याहूनही कमी मिळालेल्या जागा, हा मोठ्या चिंतेचा विषय ठरला. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक आदींनी भरपूर, उलटसुलट पद्धतीचे विश्लेषण करून झाले आहे. त्यामुळे तेच ते मुद्दे पुन्हा उगाळत राहण्यात काही अर्थ नाही. या लेखाचा तो हेतू अजिबात नाही. या लेखाचा मुख्य हेतू मागील दहा वर्षांत काय घडले आणि नजीकच्या वा लांबच्या भविष्यकाळात काय होऊ घातले आहे याच्या व्यापक चर्चेला प्रारंभ करण्याचा आहे आणि त्याच दृष्टीने उपस्थित होणारा मूलभूत प्रश्न म्हणजे वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये ’आपला’ कार्यकर्ता कुठे आहे?
अटलजी जीवन पैलू
भाजपच्या आजच्या पिढीतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका नक्की वाचली पाहिजे. राजकीय जीवनात, सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, काय बोलावे, काय बोलू नये याचा वस्तुपाठ अटलजींचे जीवन देते.
अटलजी जाणून घेण्यासाठी आजच आपली प्रत नोंदवा.
₹50.00
https://www.vivekprakashan.in/books/atalji-life-aspects/
 
 
 आजवरच्या प्रत्येक संघर्षाच्या काळात कार्यकर्ता हाच आपला कोअर राहिला. मग ती आणीबाणी असो, रामजन्मभूमी संघर्ष असो, 2014 च्या वेळचा सत्तांतराचा काळ असो वा अगदी प्रत्येक आपत्तीच्या काळातील सेवाकार्ये असोत, या गोष्टीचा केंद्रबिंदू कार्यकर्ता होता. या कार्यकर्त्यांतूनच नेते घडत होते, ते या गोष्टी पुढे नेत होते. कार्यकर्त्यातून नेता घडवण्याची, त्याचे नेतृत्व उभे राहण्याची-घडण्याची प्रक्रिया पक्षात घडू शकत होती. किंबहुना या प्रक्रियेस वाव देणारा, तशी नैसर्गिक रचना असलेला भारतीय जनता पार्टी हा मागील 30-40 वर्षांतील बहुधा एकमेव पक्ष असावा, कारण बाकी सर्व पक्ष एकामागोमाग एक केवळ विशिष्ट घराण्यांच्या भोवतालीच केंद्रित होत जात होते ज्यातून नवनेतृत्वाच्या निर्मितीची त्यांची क्षमता संपत चालली होती. भाजपाच्या या नैसर्गिक क्षमतेमुळे भाजपाने असंख्य कर्तृत्वसंपन्न नेतृत्वाची मांदियाळीच घडवली; मग ते राष्ट्रीय स्तरावर असो वा प्रादेशिक स्तरावर. भाजपामधील ही प्रक्रिया आजही चालू आहे, ती काही थांबली आहे अशातला मुळीच भाग नाही. एखाद्या निवडणुकीत जिंकण्या-हरण्यामुळे खचून जाईल इतकी हिंदुत्व चळवळ कमकुवत असती, तर ती 70-80 च्या दशकातच विझली असती. निवडणुकीतील हार-जीत आणि असे अनेक लहानमोठे धक्के पचवतच हा पक्ष वाढला आहे. मग आजच अशी परिस्थिती, विशेषतः महाराष्ट्रात का उद्भवली आहे? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा वा एकूणच हिंदुत्ववादी कार्यकर्ता लोकसभेतील निकालांमुळे खचला आहे, घाबरला आहे, शस्त्रे टाकून पळ काढण्याच्या मार्गावर आहे, अशा अनेक कुजबुज मोहिमा समाजात चालवल्या जाताना आपल्याला दिसू शकतील. संघ-भाजपाविरोधात हयात घालवलेल्यांचे अशा मोहिमा चालवणे हेच काम असते; परंतु ते वास्तव नाही. हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही, तर हरवलेला आहे, संभ्रमात आहे. आपल्यापुढे, आपल्यासारख्या राष्ट्रवाद, हिंदुत्व मानणार्‍या असंख्य मंडळींपुढे अनेक प्रश्न उभे आहेत. या हरवलेल्या कार्यकर्त्याला आपण आपल्या पक्षाच्या वाटचालीत, राजकीय प्रक्रियेत कुठे आहोत, आपले स्थान काय आहे याची उत्तरे मिळतील तेव्हाच भोवतालची परिस्थिती बदलणार आहे.
  हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही, तर हरवलेला आहे, संभ्रमात आहे.
 
 
याच विषयावर आपल्या विचारपरिवारातील कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ‘साप्ताहिक विवेक’ने नुकताच केला. याच अंतर्गत आम्ही मुंबई-ठाण्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, रत्नागिरी, चिपळूण अशा काही ठिकाणी प्रवास केला. हा प्रवास महाराष्ट्राच्या इतरही भागांत आम्ही करणार आहोत, हे या लेखाच्या माध्यमातून नमूद करू इच्छितो. या दौर्‍यात आम्ही येथील थेट भाजपाचे विविध लहानमोठ्या जबाबदार्‍या सांभाळणारे वा यापूर्वी सांभाळलेले कार्यकर्ते, समाजातील आपल्या विचारांना अनुकूल असलेली सुशिक्षित, प्रतिष्ठित मंडळी, रा. स्व. संघ परिवारातील विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी अशा किमान 150 हून अधिक व्यक्तींशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. यामध्ये मुंबई-ठाणे इत्यादी समाविष्ट केल्यास ही संख्या 200 हूनही अधिक होते. या मंडळींमध्ये अनेक उद्योजक, डॉक्टर्स, वकील, सीए, इंजिनीअर्स, प्राध्यापक-शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक, व्यापारी आदींचाही समावेश होता. ही सर्व मंडळी आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वी असलेली आणि त्या-त्या भागाचे उत्तम सामाजिक-राजकीय आकलन असलेली, उत्तम जनसंपर्क असलेली मंडळी होती. या मंडळींशी व्यक्तिगत स्तरावर भेटी घेत त्या-त्या भागांतील राजकीय स्थिती, लोकसभेला काय घडले आणि विधानसभेला काय घडू शकते अशा विषयांवर तपशीलवार, परंतु मोकळी चर्चा केली. या चर्चेतूनच वर उल्लेखलेल्या वस्तुस्थितीला बळकटी मिळाली ज्यामुळे हिंदुत्व चळवळीतील सक्रिय प्रसारमाध्यम म्हणून येणार्‍या जबाबदारीतून आम्ही या विषयात हात घातला आहे.
 

bjp 
 
लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच. शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसर्‍या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे. अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे. लेखात आधी उल्लेखिल्याप्रमाणे भाजपामधील कार्यकर्त्यांतून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया, जे भाजपाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे ती प्रक्रियाच पुढील काळात दुर्मीळ होत जाईल की काय, अशी एक प्रकारची भीती वा शंका कार्यकर्त्यांच्या मनात घर करू लागली आहे. याला काही प्रमाणात हिंदुत्वविरोधकांनी सोशल मीडियावरून यशस्वीपणे चालवलेला नॅरेटिव्ह हेही एक कारण आहे. जसे की भाजपा हा आयातांचा पक्ष बनत चालला आहे, भाजपा ’वॉशिंग मशीन’ आहे, भाजपाचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यापुरताच आहे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांनी केला; परंतु दुसरीकडे सोशल मीडियावरून हिंदुत्वाची बाजू मांडणार्‍या ज्येष्ठ मंडळींबाबतीत जो प्रकार काही व्यक्तींनी अगदी अलीकडे केला त्यामुळे चुटकीसरशी या अस्वस्थतेला बळ मिळाले आणि गावागावांत चुकीचा संदेश गेला हेही खरेच.
 
भाजपा हा आयातांचा पक्ष बनत चालला आहे, भाजपा ’वॉशिंग मशीन’ आहे, भाजपाचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यापुरताच आहे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांनी केला; परंतु दुसरीकडे सोशल मीडियावरून हिंदुत्वाची बाजू मांडणार्‍या ज्येष्ठ मंडळींबाबतीत जो प्रकार काही व्यक्तींनी अगदी अलीकडे केला त्यामुळे चुटकीसरशी या अस्वस्थतेला बळ मिळाले आणि गावागावांत चुकीचा संदेश गेला हेही खरेच. 
पक्ष संघटनवाढीसाठी अगदी नगरसेवक, सरपंच, पंचायत समिती-जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते आमदार, खासदार, मंत्री-राज्यमंत्री, महामंडळांची अध्यक्षपदे, पक्ष संघटनेतील विविध जबाबदार्‍या अशा विविध स्तरांवर कार्यकर्त्याला संधी दिली जात असते. त्यात आज पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय, याचा साकल्याने विचार होण्याची गरज आहे. याचा अर्थ बाहेरून आलेला प्रत्येक जण चुकीचा आहे असा निश्चितच नाही. कित्येक जण आज संघटनेसाठी, विचारधारेसाठी प्रभावीपणे काम करत आहेत. पक्षफोडीचा भाजपावर आरोप करणार्‍यांनी स्वतः महाराष्ट्रात अख्खे पक्ष फोडाफोडी करून उभारलेले आपण पाहिलेले आहेत. मात्र जर ’भाजपामध्ये बाहेरून आलेले...’ अशा प्रकारचा ’नॅरेटिव्ह’ जर तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत विरोधक यशस्वीपणे पोहोचवत असतील तर तो का पोहोचतो आहे, याचा विचार करण्यावाचून गत्यंतर नाही. शिवाय, ’कार्यकर्त्याचे स्थान काय’ हा प्रश्न केवळ राजकीय कार्यकर्त्याला एखादे पद मिळण्यापुरता सीमित नाही. कित्येक कार्यकर्ते असे आहेत, की जे आपापल्या नोकरी-व्यवसाय-उद्योगात प्रचंड यशस्वी आहेत, त्यांना कोणत्याही राजकीय लाभाची गरज नाही तरी एक विचारधारा म्हणून आपापल्या परीने ते हिंदुत्वाशी संबंधित काही ना काही काम करत आहेत. त्यांचे म्हणून आपापल्या भागांत एक प्रभावक्षेत्र आहे, ’नेटवर्क’ आहे. या मंडळींना ’आमचे स्थान काय’ असे म्हणताना आमच्या मताला, म्हणण्याला स्थान काय, असा अर्थ अभिप्रेत होता. त्या त्या भागांतील स्थानिक हिंदुत्वाशी संबंधित, गव्हर्नन्सशी संबंधित, उद्योग-व्यवसाय-अर्थकारण, शिक्षण-रोजगार आणि एकूणच नागरी जीवनाशी संबंधित कोणते मुद्दे आपण मार्गी लावले, ते लोकांपर्यंत किती प्रमाणात व कशा प्रकारे पोहोचवले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सार्‍यात या मंडळींना प्रत्यक्षात किती स्थान होते... या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे या मंडळींना मिळालेली नाहीत, हे वास्तव आहे. सुशिक्षित मध्यमवर्ग हा आज सार्‍या जातींमध्ये निर्माण झाला आहे, 40-50 वर्षांपूर्वी कदाचित असणारी स्थिती आज राहिलेली नाही. या आजच्या मध्यमवर्गातून प्रचंड मोठा पाठिंबा 2014 व 2019 मध्ये भाजपाला मिळाला. आज हा वर्गच अस्वस्थ असेल तर ही खूप मोठी काळजीची बाब ठरते.
 
 
 
समाजात काही ना काही विचार करणार्‍या सुशिक्षित वर्गापुढे जाताना आपण या मंडळींपुढे काय नॅरेटिव्ह मांडतो आहोत, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ आणीबाणीच्या काळातील संघर्ष वा रामजन्मभूमीसाठी कार्यकर्त्यांनी केलेला त्याग, सांडलेले रक्त याबाबत त्याला आदर जरूर आहे. राम मंदिर निर्माण झाल्याचा त्याला निस्सीम आनंदही जरूर आहे; परंतु हे मुद्दे मतदान करताना वय वर्षे 40-45 च्या आतील सुशिक्षित मतदात्यांसाठी किती प्रभावी ठरतील? भले तो मतदार अगदी हिंदुत्ववादी असला तरी तरुण कार्यकर्ता म्हणून काम करताना 30-40 वर्षांपूर्वीचे संदर्भ त्याला भावणारे नाहीत. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या गावात-तालुक्यातदेखील हिंदुत्वाचे अनेक प्रश्न आहेत. मग ते विशिष्ट समाजाच्या अतिक्रमणाचे असोत, लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांचे असोत वा अन्य काही, त्याला या विषयावर काही ना काही घडलेले हवे आहे आणि हे विषय जसे हिंदुत्वाशी संबंधित आहेत तसेच ते गव्हर्नन्सशीदेखील थेट संबंधित आहेत आणि ज्या प्रक्रियेत कार्यकर्त्याला महत्त्वाचे स्थानदेखील आहे. मध्य प्रदेशसारख्या राज्यात विधानसभा, लोकसभा असे सलग घवघवीत यश मिळाले, कारण तेथे शासन, अन्य हिंदुत्ववादी संस्था-कार्यकर्ते आणि विविध निर्णय-योजनांचे प्रत्यक्ष लाभार्थी हे एकत्र आले, त्यांच्यात उत्तम समन्वय राहिला. मात्र आपल्या येथे शासन, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, अन्य समविचारी संस्था-संघटनांचे कार्यकर्ते आणि समाजातील सुशिक्षित-विचारी मंडळी हे सर्व घटक भिन्न आहेत ज्यांचा परस्परांत संवाद-समन्वय नाही, असे चित्र दिसते जे पुढील वाटचालीसाठी अत्यंत घातक आहे. हा परस्परसंवाद प्रस्थापित होऊन कार्यकर्ता या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी येणार नाही, त्याला स्वतःचे सन्मानाचे स्थान मिळणार नाही तोपर्यंत आज राज्यात असलेली अस्वस्थतेची परिस्थिती बदलणार नाही.
 
 
’विवेक’द्वारा आम्ही केलेल्या प्रवासातून जाणवलेली आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या अस्वस्थतेच्या परिस्थितीतही आपल्या कार्यकर्त्याला हे ठाऊक आहे की, आपण खचून चालणार नाही! कारण जर आपण खचलो तर देश, त्यातही आधी आपले राज्य अराजकाच्या मार्गावर जाईल. 10 वर्षांत उभे केलेले सारे या अराजकतावाद्यांकडून उद्ध्वस्त होईल. राज्यात लोकसभेला ज्या प्रकारे मतदान झाले आणि त्याकरिता विशिष्ट समाजांसमोर विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे शरणागती पत्करली ते पाहता महाराष्ट्रात भविष्यात येऊ घातलेले धोकेही त्याला दिसत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी शक्तींनी पुन्हा नव्याने एकत्र येण्याची गरजही त्याला जाणवते आहे. देशातील असो वा राज्यातील, पक्षातील असो वा शासनातील, आपले नेतृत्व हे काही व्हिजन असलेले आहे, विचारधारेशी स्पष्ट आणि स्वच्छ बांधिलकी असलेले आहे आणि त्यांच्या हाती सत्ता आल्यास महाराष्ट्र सुरक्षित राहील, याचीही त्यांना खात्री आहे. केवळ गरज आहे ती आज आपल्या कार्यकर्त्यांपुढे निर्माण झालेली ही अभूतपूर्व राजकीय-वैचारिक कोंडी फोडण्याची, याकरिता सर्व पातळ्यांवर व्यापक प्रयत्न करण्याची. ही गरज स्वतः पक्षालाही जेव्हा जाणवू लागेल तो पक्षाच्या आणि राज्यातील हिंदुत्वाच्याही वाटचालीतील सुदिन ठरेल.

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये कार्यकारी संपादक (डिजिटल) म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.