अमेरिकेतील विठ्ठल-रखुमाई मंदिर - समाज मंदिर

विवेक मराठी    12-Jul-2024
Total Views |
@उज्ज्वला करंबेळकर
 
america 
अमेरिकेमध्ये स्वामिनारायण मंदिर, श्री बालाजी मंदिर आहेत; पण विठोबा-रखुमाई मंदिर नव्हते. 2023 साली अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मराठमोळे भालचंद्र ऊर्फ भाऊ कुलकर्णी यांनी आपल्या विठ्ठलभक्तीच्या ओढीने विठ्ठल मंदिर अमेरिकेमध्ये  लिंडहर्स्ट , न्यू जर्सी  येथे उभारले. या वर्षी 21 मे रोजी मंदिराचा वर्धापन दिन साजरा झाला. यानिमित्ताने उज्ज्वला करंबेळकर यांनी भालचंद्र ऊर्फ भाऊ कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी वृंदा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. यातून मंदिरनिर्मितीचे भावविश्व उलगडले. हेच काम सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठीच हा लेखनप्रपंच...
मागील वर्षी म्हणजे मे 2023 मध्ये अमेरिकेत लेकीकडे होते तेव्हा, लिंडहर्स्ट , न्यू जर्सी येथे विठ्ठल मंदिराची स्थापना होतेय, उद्घाटन होतंय आणि पंढरपूरहून आलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, हे ऐकून आश्चर्यचकित झाले होते. मनात संमिश्र विचारांची गर्दी झाली होती. आत्तापर्यंत अमेरिकेतील स्वामिनारायण मंदिरं, श्री बालाजी मंदिरांबद्दल ऐकलं होतं; पण विठोबा-रखुमाई मंदिर असेल/व्हावं किंवा का नाही? असा विचारही मनात आला नव्हता; पण मंदिर झालं आणि त्याच वर्षीच्या आषाढी एकादशीनिमित्त विठोबावारी आणि रिंगणही मोठ्या उत्साहात पार पडलं आणि ह्या वर्षी 21 मे 2024 रोजी मंदिराचा पहिला वर्धापन दिनही उत्साहात साजरा झाला.
 
मार्च 2024 मध्ये या मंदिरात जाण्याचा योग जुळून आला.
 
या मंदिराचे कर्ते आहेत, मराठमोळे श्रीमान भालचंद्र ऊर्फ भाऊ कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती वृंदा कुलकर्णी. या भेटीत भाऊ व वृंदाताईंशी झालेल्या संवादातून, मंदिराविषयी मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि त्यांचे हे काम सर्वांपर्यंत पोहोचवावे असे प्रकर्षाने वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.
 
 
मंदिर स्थापण्यामागचा विचार सांगताना भाऊ म्हणाले, “भारतात सिटीबँक, मुंबई येथील नोकरी सोडून मी 2001 साली अमेरिकेत आलो. 2001 ते 2012 बारा वर्षे जेनेसिस कंपनीत नोकरी व 2012 पासून ’गव्हर्नन्स आणि रिस्क मॅनेजमेंट’ ह्यांतील ‘कन्सल्टन्सी’ अशा एकूण 22 वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात खूप फिरलो. सगळीकडे स्वामिनारायण, श्री बालाजी मंदिरांमध्ये जायचो. या देवळांच्या संस्थापकांनी, विश्वस्तांनी आणि स्वयंसेवकांनी गेली पन्नास वर्षे परिश्रमपूर्वक या संस्था/मंदिरं उभी केली आहेत.
 
america
 
थोडा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं, ही मंदिरं केवळ धार्मिक परंपरा जपणारी केंद्रं नाहीत, तर ती त्या समाजाची/समूहाची बहुद्देशीय केंद्रं आहेत. देवाधर्माबरोबरच तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, नोकरी/व्यवसायाकरिता मदत/मार्गदर्शन, आबालवृद्धांकरिता विविध शिबिरे/कार्यशाळा अशा सर्वसमावेशक उपक्रमांची आखणी केलेली असते. यामुळे कुटुंब आणि समाज परस्परांशी चांगला जोडला जातो. इथे आवर्जून येण्याची ओढ निर्माण होते. अगदी वीकेंडला सहजपणे फिरायला म्हणूनही लोकं इथे सहकुटुंब येतात. हे सर्व पाहिल्यावर, मराठी माणसांना एकत्र आणता येईल अशा मंदिराची स्थापना करण्याचा विचार मनात सुरू झाला. त्यातून हे मंदिर उभं राहिलं.”
 
 
त्याचबरोबर इथे फक्त जप, पूजाअर्चा, आरती एवढंच न होता, ते समाजाच्या एकत्र येण्याचं केंद्र कसं होईल ह्या दृष्टीने कुलकर्णी दांपत्याने विचार केला. घरातल्या सर्व वयोगटांतल्या सदस्यांना देवळात यावंसं वाटायला हवं. त्यासाठी परिवारातील सर्व सदस्यांकरिता काही ना काही उपक्रम हवेत, असा विचार करून त्यांनी या मंदिरामार्फत होऊ शकतील अशा उपक्रमांची एक चौकट तयार केली.
 
विठ्ठलनामाचा रे टाहो…
लेखिका : विनीता तेलंग
पुस्तकाचे वैशिष्ट्य : यातील प्रत्येक ओवी, अभंग आपल्याला ऐकता येणार आहे.
हे पुस्तक नक्कीच वाचकांना भावसमृद्ध करेल, याची खात्री आहे.
मूळ किंमत : 120/- ₹
https://www.vivekprakashan.in/books/vitthalnama-cha/
 
  
या माध्यमातून मराठी समाजाला एकत्र जोडून (networking) एकमेकांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात मदत करावी.
 
अडीअडचणीत आपण एकटे नाही, तर सर्व समाज माझ्या पाठीशी आहे, असा विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
परिवारातील सर्व सदस्यांना यावेसे वाटेल असे वय, आवड व गरज लक्षात घेऊन नवनवीन उपक्रम राबवावेत, ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवत वाटचाल सुरू झाली.
 
america 
मंदिर निर्माण प्रकल्पासाठी
मदतनिधी संकलन
namaste@vitthalmandirus.org
 
 
देवांमध्येही विठ्ठल-रखुमाईचीच निवड करण्यामागचा विचार आणि या मंदिराचं वेगळेपण भाऊंनी सांगितलं. ते म्हणाले,
“खरं तर राम, कृष्ण, दत्तात्रय, अंबाबाई, तुळजाभवानी हे सगळे देव-देवता आपलेच; पण जातीपातींच्या वर सर्व समाजाला एकत्र आणणारा, सर्वसमावेशक देव म्हणजे पांडुरंग अर्थात श्री विठ्ठल. महाराष्ट्राला एक थोर संत परंपरा आहे. संतांची शिकवण, त्यांनी केलेले समाजप्रबोधन ह्यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप महत्त्वाचे योगदान आहे. पुढच्या पिढीपर्यंत हे संचित पोचविण्यात आपण कमी पडतोय. नवीन पिढीला ह्या संतांची नावेही माहिती नाहीत. या संत परंपरेचे एक दैवत म्हणजे विठ्ठल. म्हणूनच विठोबा-रखुमाई या दैवतांची निवड आम्ही केली.”
 
 
भाऊंची ही कल्पना सर्व मित्रमंडळी, हितचिंतकांनी उचलून धरली. या सर्वांच्या वेळोवेळी होणार्‍या भेटी, विचारांची देवाणघेवाण, चर्चा ह्यातून विठ्ठल मंदिर उभारायचे ठरले. त्यानंतर त्याकरिता जागेची शोधाशोध सुरू केली. आपल्या आगमशास्त्रानुसार वास्तुरचना, त्याबरोबरच शिक्षण, संत वाङ्मय, श्रीमद्भगवद्गीता पठण, सभागृह, अन्यान्य उपक्रमांकरिता निश्चित जागा आणि मराठमोळे महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी उपाहारगृह (कॅफेटेरिया) असा या प्रकल्पाचा आराखडा ठरला.
 
 
मात्र जागा, नोंदणी ह्या औपचारिकतेत जाणारा वेळ लक्षात घेऊन कुलकर्णी पती-पत्नींनी आपल्या घराच्या मागे असलेल्या अंगणात (बॅकयार्ड) 600 चौ. फुटांचे देऊळ बांधले. मराठी जनांचा प्रारंभापासूनच प्रचंड प्रतिसाद मिळाला. 21 मे 2023 या दिवशी सुलभाताई खरे यांनी पंढरपूरहून आणलेल्या विठ्ठल-रखुमाईची प्राणप्रतिष्ठा झाली. पांडुरंगकृपेने शाळीग्रामातून घडवलेल्या मूर्ती मिळाल्या. त्याविषयी सांगताना भाऊ म्हणाले, “तो एक मोठा योगायोगच! विठ्ठल-रखुमाईच्या सोनं-चांदीत घडवलेल्या मूर्ती पुण्यात गाडगीळ, मराठे यांच्याकडे पाहणे सुरू होते. तेव्हाच आमचे पुण्यातील स्नेही श्रीकांत देव यांनी पंढरपुरातल्या एका मूर्तिकाराचे नाव- संजय पालकर यांचे नाव सुचवले. त्याबरोबर आम्ही उभयतांनी पंढरपूरला जाऊन त्यांना भेटून अमेरिकेतील मंदिरनिर्मितीविषयी माहिती दिली आणि पंढरपूर मंदिरातील मूर्ती ज्या दगडातून घडवल्या आहेत, त्या गंडकी नदीतील शाळीग्रामाच्या दगडातून त्यांंनी आमच्या देवळासाठी सुरेख मूर्ती घडवून दिल्या. असे अनेकांचे हात या कामी लागले.”
 
america 
 
मेमध्ये मंदिराची स्थापना झाल्यानंतर, जून 2023 मध्ये असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त विठोबा वारी करायची ठरली आणि सर्व जण उत्साहाने तयारीला लागले.
 
 
विठोबा वारीच्या नियोजनात, मंदिराच्या स्वयंसेविका चित्रा भावे आणि राजश्री कुलकर्णी, ज्यांनी आळंदी ते पंढरपूर वारी केली होती, त्या पुढाकार घेऊन उत्साहाने कामाला लागल्या. वारीची सर्व आखणी त्यांनी केली. नोंदणीसाठी गुगल फॉर्म भरण्याचं आवाहन केलं आणि 300च्या वर नोंदणी झाली. आळंदी ते पंढरपूर हे अंतर 261 कि.मी. आहे. अमेरिकेत अंतर मैलात मोजतात. त्यानुसार 161 मैल चालायचे ठरले. अमेरिकेत प्रत्यक्ष रस्त्यावर एकत्रितपणे चालणे व्यवहार्य नव्हते. तेव्हा ह्या नोंदणीकृत भक्तांच्या 8-8 च्या 22 दिंड्या/उपदिंड्या केल्या. प्रत्येक दिंडीने म्हणजे आठ जणांनी मिळून 18 दिवसांत 161 मैल चालायचे निश्चित केले. आपापल्या सोयीने रोज चालायचे, रोजचे चालणे एका एक्सेल शीटमध्ये भरायचे. चालताना हरिपाठ म्हणत म्हणत दिंडी झाली. खूप जणांनी 161 मैलांचे अंतर एकट्याने पूर्ण केले.
 
 
एकादशी आधीच्या वीकेंडला एका मैदानात ग्यानबा- तुकारामाच्या गजरात, वाखरीला होतो तसा गोल रिंगण सोहळादेखील पार पडला. एकादशी दिवशी पादुकांच्या पालखी मिरवणुकीत लेझीम, फुगड्या, अभंगांनी ठेका धरला.
 
सहभागी सर्वच ’जय हरी विठ्ठल’च्या गजरात दंग होते.
 
 
त्यानंतर गेलं वर्षभर दर महिन्याला किमान दोन प्रवचनं किंवा भाषणं (संत परंपरा, शास्त्र, आयुर्वेद इ. विषयांवर), धार्मिक सण (श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, चैत्री पाडवा, रामनवमी इ.), बाल संस्कार वर्ग (ज्यात 5 ते 12 वयोगटातील 35 मुलं-मुली आठवड्यातून दोन दिवस सहभागी होतात), करीअर कनेक्ट असे कार्यक्रम, उपक्रम सुरू आहेत. नवनवीन वक्ते, स्वयंसेवक जोडले जात आहेत. गेल्या वर्षभरात 1000 च्या वर मराठी माणसं देवळात येऊन गेली.
 
america 
 कुलकर्णी दांपत्यासमवेत लेखिका उज्ज्वला करंबेळकर सहकुटुंब
 
’एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ संत तुकारामांचे हे वचन, या मंदिराचे ब्रीदवाक्य आहे. भाऊ कुलकर्णी कन्सल्टन्सीव्यतिरिक्तचा उरलेला सर्व वेळ मंदिर व उपक्रमांकरिता देतात. वृंदा कुलकर्णी सी.ए. आहेत. त्या मूळच्या अहमदाबाद, गुजरातच्या. इंडियन ऑइलमधली नोकरी सोडून 2001 मध्ये अमेरिकेत आल्यावर सी.पी.ए. करून 2022 पर्यंत अकाऊंटिंग आणि फायनान्स क्षेत्रांत त्यांनी काम केलं. आता पूर्णवेळ देवळाच्या कामाला त्यांनी वाहून घेतलंय.
 
 
भाऊ कुलकर्णी व वृंदा कुलकर्णी यांच्या खांद्याला खांदा लावून प्रवीण पाटील, वैशाली पाटील अशी त्यांची टीम आहे. प्रवीण आणि वैशाली हे पती-पत्नी जनसंपर्क, कार्यक्रमांची योजना, निधी संकलन आणि मनुष्यबळ (स्वयंसेवक) उभे करणे अशा महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडताहेत.
 
 
पराग भालेराव, डॉ. आश्लेषा राऊत, डॉ. वनश्री जोशी हे आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ विविध उपक्रम राबवत आहेत.
 
अमेरिकेतील नियमांप्रमाणे ह्या संस्थेची नोंदणी, सेक्रेड फाऊंडेशन (Sacred Foundation) ह्या नावे 'Not For Profit'’ (आपल्याकडे आपण NGO, Non Governmental Org. म्हणतो.) अंतर्गत केली आहे. संस्थेला अमेरिकन टॅक्स डिपार्टमेंटकडून करमुक्त स्टेटससुद्धा मिळालाय.
 
एका वर्षातच विठ्ठल मंदिराला आळंदीचे परमपूज्य श्री गोविंदगिरी महाराज, गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त साखरे महाराज अशा थोर विभूतींचे आशीर्वाद लाभले.
 
 
भव्य मंदिर व्हावे, हे कुलकर्णी दांपत्याचे पहिल्यापासूनच स्वप्न होते. घरामागील बॅकयार्डात बांधलेले मंदिर ही तात्पुरती तडजोड होती. त्यामुळे आता मंदिराची भव्य वास्तू उभारण्याकरिता मध्य जर्सी विभागात जमीन बघण्याचे काम सुरू आहे. हाती घेतलेला मंदिर निर्माण प्रकल्प 2025 ते 2028 या कालावधीत पूर्णत्वाला न्यायचा आहे. त्यासाठी निधी संकलन सुरू आहे. 2024 मध्ये जे दाते आर्थिक मदत करतील, त्यांना मंदिराचे ’संस्थापक सदस्यत्व’ मिळेल अशी योजना आहे.
 
 
आयुष्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ यशस्वीपणे व त्यात संतुलन साधत, एकमेकांना सहकार्य करत आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग ह्या मंदिराच्या माध्यमातून न्यू जर्सीतील सर्व मराठी जनांना मिळेल, असा विश्वास कुलकर्णी पतीपत्नींनी व्यक्त केला. त्याच दिशेने त्यांचं काम चालू आहे.