अष्टपैलू नेतृत्व

विवेक मराठी    12-Jul-2024   
Total Views |
देवगिरी नागरी सहकारी बँक लि. संभाजीनगरचे विद्यमान अध्यक्ष मा. किशोर शितोळे यांना नुकताच ‘बेस्ट चेअरमन’ पुरस्कार प्राप्त झाला, तर इंडिया बँकिंग समिट 2024 या समारंभात ‘इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर’ हा पुरस्कार बँकेस प्राप्त झाला. या पार्श्वभूमीवर संघशाखेचे मुख्य शिक्षक ते सहकारी बँकेचे चेअरमन असा सामाजिक, उद्योजकीय प्रवास करणार्‍या किशोर शितोळे यांची वाटचाल प्रेरणादायी आहे. किशोर शितोळे यांनी देवगिरी नागरी बँकेचा व्यवसाय विविध आयामांतून वृद्धिंगत केला त्याचप्रमाणे त्यांनी कायम सामाजिक दायित्व व संघभावही जपला आहे.
Bank

सहकार क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्ते मंडळींना सदैव सावध राहून संस्थेचे हित जपावे लागते. आपण ज्या संस्थेचे नेतृत्व करत आहोत त्या संस्थेचे आपण मालक नसून विश्वस्त आहोत, हा भाव कायम मनात ठेवून काम करावे लागते. असा भाव जपत काम करणार्‍यांपैकी आहेत, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे.
 
किशोर शितोळे यांचे जन्मगाव फुलंब्री. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि संघसंस्कारही तेथेच झाले. शाखेचे मुख्य शिक्षक म्हणून काम करताना किशोर शितोळे यांचे टाइम मॅनेजमेंटचे प्रशिक्षण होत गेले. लातूर येथील भूकंपानंतरच्या मदतकार्यात किशोर शितोळे सहभागी झाले. विवेकानंद सार्द शतीच्या काळात देवगिरी प्रांत युवा आयाम संयोजक म्हणून काम केले आहे, तर देवगिरी महासंगमचे ते सहप्रमुख होते. संघ आणि संघविचारांच्या संस्था, संघटना यांमध्ये ते सदैव कार्यरत असतात.



kishor
 
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी स्थापत्य अभियंता ही पदवी मिळवली व पुण्यात शरदभाऊ साठे यांच्यासोबत काम करून या क्षेत्रातील अनुभव मिळवला. संभाजीनगरचे प्रथितयश उद्योजक आबासाहेब देशपांडे यांच्या हॉटेल वेदांतची सर्व उभारणीपर्यंतची सर्व कामे किशोर शितोळे यांना करण्याचा अनुभव मिळाला. पुढे या पंचतारांकित हॉटेलचे जनसंपर्क अधिकारी व जनरल मॅनेजर अशा पदांवरही त्यांनी काम केले. नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
 
किशोर शितोळे सन 2012 पासून देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करू लागले. तीन वर्षे उपाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांनी सांभाळली असून मागील चार वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून ते नेतृत्व करत आहेत.

प्राणायाम एक अमृतानुभव

लेखक – योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन

https://www.vivekprakashan.in/books/pranayama/

 
 
सन 2012 च्या काळात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात बँकेच्या जठवाडा येथील आर्य चाणक्य शाळेच्या परिसरात मा. आमदार हरिभाऊ बागडे यांच्यासोबत जलसंधारण व जलसंवर्धन प्रकल्पात बंधारा बांधला.
 
Bank 
 
बँकेच्या माध्यमातून हे काम केले. या अनुभवातून लोकसहभागातून जिल्हाभरात किशोर शितोळे यांनी असे प्रकल्प करायला सुरुवात केली. या काळात संभाजीनगर परिसरात बारा बंधारे बांधले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बांधलेले बंधारे पाहण्यासाठी लोक येतात. इतके उत्तम काम किशोर शितोळे यांनी लोकांना सोबत घेऊन केले. लोकसहभागातून सुरू झालेल्या या कामाला चळवळीचे स्वरूप आले आणि त्यातून ‘जलदूत’ ही संस्था स्थापन केली गेली. मराठवाड्यातील जलसंधारण, जलसंवर्धन करण्यासाठी ही संस्था काम करत आहे.
देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून मागील चार वर्षे किशोर शितोळे यांनी खूप वेगवेगळ्या उपक्रमांतून बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याबाबत माहिती देताना ते म्हणतात, ’मागील काही वर्षे सहकारी बँकांसमोर खूप मोठी आव्हाने आहेत. खासगी बँकांशी आम्हाला स्पर्धा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकाभिमुख कर्मचारी निर्माण करण्यासाठी आम्हाला काही प्रयोग करावे लागले. कर्मचारी वर्गाचे मनोधैर्य आणि कार्यप्रणवता विकसित करताना सर्वात आधी त्या कर्मचार्‍यांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी अनेक छोटे छोटे प्रयोग केले. पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग कशा आयोजित कराव्यात इथपासून मोठ्या उद्योजकांसोबत वन टू वन बिझनेस मीटिंग करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे शेवटच्या पायरीवर उभा असणारा ग्राहकही कायम जोडलेला राहिला, त्याला समाधानकारक सेवा उपलब्ध होईल, असे प्रयत्न केले. कर्मचारी ग्राहकाभिमुख झाले, त्यामुळे अनेक उपक्रम राबवणे सोपे झाले.’
 
Bank 
 
समाज आणि बँक यातील अंतर कमी करून समृद्धी प्राप्त करण्यासाठीही वेगवेगळ्या योजना व उपक्रम किशोर शितोळे यांनी बँकेच्या माध्यमातून राबवले आहेत. सोशल मीडिया आणि मानवी जीवनात दैनंदिन व्यवहार यांना लक्षात घेऊन प्रयत्न केले गेले, त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
 
किशोर शितोळे सांगतात, सध्या सोशल मीडियाचा समाजावर खूप मोठा प्रभाव आहे. हे लक्षात घेऊन आम्ही देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या विविध प्रकारच्या योजना सोशल मीडियावर प्रकाशित केल्या. त्याचप्रमाणे दुकानाच्या नावाचे बोर्ड बनवून दिले, त्यावर दुकानदाराचे नाव व बँकेचेही नाव टाकले. एखाद्या दुकानदाराने आमच्याशी संपर्क केला, तर फलकाच्या पंचाहत्तर टक्के भाग त्या दुकानदाराची जाहिरात व पंचवीस टक्के बँकेची जाहिरात अशी योजना केली.
 
त्याचप्रमाणे कर्मचारी व ग्राहक यांचे फिटनेस क्लब सुरू केले आहेत. यामुळे कर्मचारी व ग्राहक यांच्यामध्ये खूप चांगले संबंध निर्माण झाले. लॉकडाऊनच्या काळात ‘आरोग्यम् धनसंपदा’सारखा उपक्रम केला त्याचाही खूप मोठा फायदा झाला आहे.
 
 
कर्मचारी वर्गाचे नेतृत्वगुण विकसित करणे आणि ग्राहकांना कायम बँकेशी जोडून ठेवणे हे सातत्याने करण्याचे काम आहे. ते किशोर शितोळे यांनी मनापासून केले. ग्राहकांसाठी बँकेच्या विविध योजना मांडताना सामाजिक जाणीव जागृती करण्यासाठीही प्रयत्न केले गेले. बँकेच्या ग्राहकासाठी उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी मातीची भांडी देण्यात आली. या गोष्टीचा सकारात्मक परिणाम झाला आहे.
 
 
Bank
 
सध्याच्या काळात तंत्रज्ञान हे एक शक्तिकेंद्र म्हणून विकसित झाले आहे. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, तो यशस्वी ठरतो. हे लक्षात घेऊन देवगिरी नागरी सहकारी बँकेने स्वतःचे कॉल सेंटर सुरू केले. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर निर्माण केले. अशा प्रकारचे कॉल सेंटर सुरू करणारी देवगिरी नागरी सहकारी बँक ही महाराष्ट्रातील पहिली बँक आहे. या उपक्रमाबद्दल किशोर शितोळे सांगतात, देवगिरी नागरी सहकारी बँकेने स्वतःचे कॉल सेंटर सुरू केले. स्वतःचे सॉफ्टवेअर तयार केले. यामुळे आमच्या व्यवसायात वाढ झाली. हे सेंटर सुरू केल्यावर करार पद्धतीने तरुणांना नोकरी दिली. त्यासाठी ब्रँच रिलेशन ऑफिसर हे पद तयार केले. या कॉल सेंटरमुळे तरुणांना नोकरीची संधी मिळाली.
बुडीत कर्जवसुली मोठ्या प्रमाणात वाढली. जे कर्ज वसूल होणार नाही असे वाटत होते, तेही वसूल होऊ लागले. आपण जेवढी वसुली करू त्या प्रमाणात आपल्याला बँकेकडून पगार मिळणार आहे, हे लक्षात घेऊन सर्व जण मेहनत करू लागले. आमची देवगिरी नागरी सहकारी बँक ही 39 वर्षे जुनी आहे. एकूण 33 शाखा कार्यरत असून शहरी व ग्रामीण भागांत आम्ही सेवा देतो. 2500 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या आमच्या बँकेचा या वर्षी निव्वळ नफा 46 कोटी इतका आहे. आधुनिक तंत्रज्ञान मदतीला घेऊन आम्ही हे यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रात मार्गदर्शन करणार्‍या 250 सी.ए.ची मीटिंग आयोजित करून आम्ही आमच्या योजना त्यांच्या समोर मांडल्या. त्यातूनही व्यवसायवृद्धी झाली आहे.
 
Bank 
देवगिरी नागरी सहकारी बँक ही केवळ सहकारी बँक म्हणून कार्यरत नाही, तर सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेणारी चळवळ आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय बंद होते अशा कठीण काळात अनेक लघु उद्योजकांना बँकेने मदत केली. या काळात जवळपास शंभर कोटी रुपये कर्जरूपाने वितरित करून लघु उद्योजकांना दिलासा दिला होता. लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कर्जाची वसुलीही झाली आहे, ही विशेष कौतुकाची बाब आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या माध्यमातून 1100 मराठा तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा केला गेला. केवळ कर्जपुरवठा आणि वसुली यापलीकडे जाऊन आपण आणखी काही गोष्टी करू शकतो, हे किशोर शितोळे यांच्या लक्षात आले. या बाबतीत ते सांगतात, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या माध्यमातून आम्ही कर्जवाटप केले. त्याचप्रमाणे कर्जदार योग्य प्रकारे उद्योग करतो आहे का याकडे लक्ष दिले. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन दिले. जे यशस्वी ठरत आहेत, उद्योगात स्थिर होत आहेत, त्यांना एकत्रित करून त्यांना अजून विकसित होण्यासाठी काय करावे, मोठ्या उद्योजकांनी आपले उद्योग कसे विकसित केले यासंबंधी माहिती दिली. विविध उद्योगांना भेटी देण्यास प्रोत्साहन दिले. या सर्वांचा परिणाम खूप चांगला झाला. शेतकर्‍यांची मुले आज उद्योजक झाली आहेत.
देवगिरी नागरी सहकारी बँक सातत्याने विविध उपक्रम राबवते. त्याचप्रमाणे सामाजिक, राष्ट्रीय भानही जपते. बँकेच्या सर्व शाखांमध्ये सहकार दिवस तसेच 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिन साजरा केला जातो. आपल्या राष्ट्रीय अस्मितांचे स्मरण करून समाज एकसंध ठेवण्यासाठी असा उपक्रम सर्व समाजाला सोबत घेऊन बँक करत असते आणि असा कार्यक्रम कर्मचारीबंधूंनी पुढाकार घेऊन करावा, असा बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांचा आग्रह असतो. नुकताच किशोर शितोळे यांना ‘बेस्ट चेअरमन’ पुरस्कार मिळाला, तर बँकेला ‘इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर’ पुरस्कार मिळाला. या दोन्ही पुरस्कारांबद्दल ते म्हणतात, हा पुरस्कार जरी ‘बेस्ट चेअरमन’ असा असला आणि बँकेचा अध्यक्ष म्हणून मी तो स्वीकारला असला तरी तो आमच्या टीमवर्कला मिळालेला हा पुरस्कार आहे. बँकेच्या अध्यक्षापासून ते शिपाईबंधूपर्यंत सर्व जण त्याचे मानकरी आहेत. आम्ही समूहभाव जपला आहे, जो मी संघशाखेत शिकलो. तोच समूहभाव आम्हाला असे यश देतो आहे.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001