टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने केलेल्या सांघिक कामगिरीमुळे भारताला तब्बल 13 वर्षांनी आयसीसी स्पर्धा जिंकता आली. प्रत्येक खेळाडूने आपापला वाटा चोख उचलला तर अंतिम विजय साध्य होतो याचेच दर्शन टी-20 विश्वचषकात दिसून आले. भारतीय संघ या स्पर्धेत विजेत्याच्या थाटात खेळला आणि विजेत्यासारखाच जिंकला. भारतीय संघ आता फक्त क्रमवारीतील अव्वल संघ नाहीए, तर तो चॅम्पियन संघही झाला आहे.
सातासमुद्रांच्या अलीकडे एक आटपाट नगर आहे. या गावातील लोकांचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. गावचा राजा रोहित आहे मनमिळाऊ, दिलदार आणि प्रजेला सांभाळून घेणारा. क्रिकेटयुद्धाच्या मैदानात उतरला, की या राजातील योद्धा जागा होतो आणि तो चौकार, षटकारांच्या अशा काही फैरी झाडतो की, सैन्याला पहिल्या टप्प्यातच तो पुढे घेऊन जातो. त्याच्याकडे विराट, यशस्वी, सूर्यकुमार, रिषभ, शिवम आणि हार्दिक अशी क्षेपणास्त्रे आहेत आणि तो स्वत:ही काही कमी नाहीए. विराट नावाचं दीर्घ पल्ल्याचं क्षेपणास्त्र तर 2007 मध्ये सैन्यात दाखल झालं तेव्हापासून धडाडतंय आणि जगात दबदबा राखून आहे, तर सूर्यकुमार आखूड पल्ल्याचा मारा करत असला तरी या घडीला त्याच्यासारखा भेदक कुणी नाही.
बरं रोहित राजाचा तोफखानाही भरभक्कम आहे. बुमराह, अर्शदीप आणि सिराज आघाडीला राहून शत्रुसैन्याला खिंडार पाडतात आणि मग कुलदीप, अक्षर यांच्या तोफा धडाडतात. युद्ध पाच दिवसांचं असो, एक दिवसाचं, की साडेचार तासांचं, राजा व सेनापती विराट आणि त्याचे 15 शिलेदार जिवाचं रान करतात आणि देशाचं नाव रोशन करतात.
अशा या रोहितसेनेचा जगात दबदबा आहे. एके काळी ज्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेतील युद्धभूमीत आपलं सैन्य खेळताना कचरायचं, त्या युद्धभूमीही रोहितसेनेनं हळूहळू काबीज केल्या आहेत. अडीच वर्षांपूर्वी सैन्याला राहुल द्रविड या चाणाक्ष आणि कूटनीतीत माहीर असलेल्या माजी सैनिकाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर सैन्याने तीनही प्रकारच्या युद्धांत जगात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
पण, अशा या कर्तबगार सैन्याला आणि त्यांच्या राजा, मार्गदर्शकाला एकच दु:ख आहे. युद्धभूमी गाजवणार्या या आटपाट नगराला गेली 13 वर्षं राणीच नव्हती. आयसीसी ट्रॉफीच्या प्रेमात राजा आकंठ बुडाला होता, सैन्याचीही तीच इच्छा होती; पण रोहित राजा झाल्यापासून तीन स्वयंवरं झाली, तिथे अंतिम टप्प्यात रोहितच्या सैन्याने कच खाल्ली होती. हे शल्य खूप मोठं होतं, कारण विजयाच्या जवळ जाऊन तीनदा या राणीने दुसर्याच सैन्याच्या गळ्यात माळ घातली होती.
2024 साल उजाडलं तेव्हा मात्र राजा रोहितने एक पण केला. त्याला 36 वं वर्ष खुणावत होतं, तर हुकमाचा एक्का विराटही 35 वर्षांचा झाला होता; पण दोघांनी एक शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. लढण्याला राम राम न करता त्यांनी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एक शेवटचं छोटं युद्ध खेळण्याचं ठरवलं. सैन्य पुन्हा एकदा जमवलं आणि एका महिन्यात 19 देशांच्या सैन्यांना ते भिडले. ‘आजचा दिवस आपला आहे, उद्या कुणी पाहिला आहे’ या बाण्याने हे सैन्य लढलं.
मागच्या तीन वर्षांत सैन्य चांगलंच एकजीव झालं होतं. जिंकण्याची आस होती. आता बदल करायचा होता तो मानसिकतेत आणि रणनीतीत. समोर येणार्या आव्हानांचा नेमका अभ्यास करून ती कशी परतवायची याची सखोल रणनीती आखली गेली. मार्गदर्शक राहुल संगणकासमोर कमी आणि खेळाडूंबरोबर मैदानात जास्त वेळ घालवत होते. बारकाईने इतर सैन्यांच्याही नोंदी करत होते. वेळ कमी होता; पण संघात भारावलेपण आणण्यात ते यशस्वी ठरले आणि मग? या सैन्याने एक सवय स्वत:ला लावून घेतली. रोजच्या दिवसाचाच विचार करायचा. युद्धाशिवाय इतर काही बोलायचं नाही, वागायचं नाही, करायचं नाही. मन हलकं ठेवायचं आणि एक कमी पडला तर दुसर्याने ती जागा भरून काढायची. एकमेकांना सांभाळून घ्यायचं आणि फक्त आणि फक्त सैन्याच्या विजयाचा विचार करायचा.
नेहमीसारखीच आव्हानं आली. सुरुवातीला तर युद्धभूमीच युद्धासाठी तयार नव्हती. त्यामुळे सुविधांचा अभाव होता. विराट क्षेपणास्त्रावर सैन्याचा भरवसा, तर तेच निकामी ठरू लागलं. सगळे मिळून 120- 130 इतक्याच फैरी झाडू शकत होते. महत्त्वाचं म्हणजे क्षेपणास्त्रं शत्रूकडून नेस्तनाबूत होत होती; पण एक निकामी ठरला तर दुसरा उभा राहिला. रोहित या टप्प्यापासून मारा करतच होता. त्याला सूर्यकुमार, रिषभ आणि अक्षरची साथ मिळाली आणि अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड हे शत्रू नेस्तनाबूत झाले. बुमराहची तोफ अचूक मारा करत होती, तर युवा अर्शदीपची त्याला साथ मिळत होती. परिणामी, पहिल्या गटवार साखळी टप्प्यात रोहितचं सैन्य अपराजित राहिलं. कॅनडाविरुद्ध तर पाऊसच पडला.
भारतीय सैन्यासाठी सोपा असलेला पहिला टप्पा तिथलं क्रिकेटला पोषक नसलेलं वातावरण आणि गोलंदाजांना मिळणारी अनियमित उसळी यामुळे थोडा खडतर झाला. एक टप्पा तर पार झाला; पण वेस्ट इंडिजमधला दुसरा टप्पा आणखी आव्हानात्मक होता. एक तर शत्रू मोठे होते आणि इथं शत्रूबरोबर निसर्गाशीही दोन हात करायचे होते. प्रत्येक सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरलेला; पण रोहित सैन्याचं ब्रीदच होतं. बाकीचा विचार करायचा नाही. सामना जिंकण्यावर फक्त लक्ष केंद्रित करायचं.
रोहितची तलवार तळपली, सूर्यकुमार धडाडला आणि मग अक्षर आणि कुलदीपच्या तोफांनी इंग्लिश फळीला पार जमीनदोस्त केलं. आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 आणि आता इंग्लंड सैन्यावर 68 फैरींनी विजय मिळवल्यामुळे रोहित सेनेचं वर्चस्व सिद्ध झालं. आता एक धक्का आणखी द्यायचा होता दक्षिण आफ्रिकेला.
एकदा अशी सकारात्मक वृत्ती असेल तर मोठं आव्हान तुमच्यातील कौशल्य आणि ताकद अधिक जागं करतं. आगीत लोखंड चमकतं तसं भारतीय संघाचं झालं. अफगाणिस्तान आणि बांगलादेशला तर सैन्याने लोळवलंच. शिवाय ऑस्ट्रेलियाला 27 फैरींनी हरवत त्यांच्याबरोबरचा जुना हिशोब चुकता केला. आता मुकाबला इंग्लंडशी होता. या साहेबांच्या देशाने 2022 मध्ये तेव्हाच्या विराट सेनेचा मोठ्ठा पराभव केला होता; पण या वेळी तो हिशोबही चुकता झाला. इथंही रोहितची तलवार तळपली, सूर्यकुमार धडाडला आणि मग अक्षर आणि कुलदीपच्या तोफांनी इंग्लिश फळीला पार जमीनदोस्त केलं. आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 आणि आता इंग्लंड सैन्यावर 68 फैरींनी विजय मिळवल्यामुळे रोहित सेनेचं वर्चस्व सिद्ध झालं. आता एक धक्का आणखी द्यायचा होता दक्षिण आफ्रिकेला. दोन्ही सैन्य तोपर्यंत स्पर्धेत अपराजित होती आणि या आफ्रिकन देशाने तर ट्रॉफी ही राणीच कधी पाहिली नव्हती.
त्यामुळे आफ्रिकन संघाने निकराचा प्रयत्न केला. सतत रोहित सेनेसमोर आव्हानांच्या भिंती उभ्या केल्या. आधी रोहित, रिषभ आणि सूर्यकुमार या क्षेपणास्त्रांना स्वस्तात निकामी केलं. तेव्हा या अंतिम युद्धासाठी सगळं काही राखून ठेवलेला विराट मैदानात उभा राहिला. त्याने अक्षरला हाताशी धरलं आणि तो लढत राहिला. शेवटी भारतीय संघाने 176 फैरी झाडल्याच. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचीही हेन्रिक्स, मार्करम ही क्षेपणास्त्रं निकामी केल्यावर आशा निर्माण झाली; पण क्विंटन डी कॉक, क्लासेन आणि स्टब्ज अडथळे म्हणून उभे राहिले. बरं, हुकमी अस्त्र अक्षर आणि कुलदीपचा तोफखानाही चालेना.
पण, अशा वेळी बुमराहची जादू चालली आणि अर्शदीपने त्याला साथ दिली. तर धोकादायक क्लासेनचा काटा हार्दिकने काढला. अगदी पराभवाच्या दाढेतून तोफखान्याच्या गोलंदाजांनी रोहितसेनेला बाहेर काढलं आणि जेव्हा युद्धाची शेवटची तोफ धडाडली तेव्हा या रोहितसेनेचा प्रत्येक शिलेदार जमिनीवर आडवा होऊन धरणीमातेला चुंबत होता. प्रसंगच तसा होता. ज्यासाठी एक महिना लढा दिला ती जमीन, ती ट्रॉफी पादाक्रांत झाली होती. सैनिकांनी जल्लोष केला, काहींनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली, सोनेरी ट्रॉफी राणीला मिरवलं आणि मार्गदर्शक राहुल द्रविडला उचलून घेत त्यांचे आभार मानले.
आटपाटनगर खर्या अर्थाने सुखी झालं. त्यांना हवी असलेली हक्काची राणी मिळाली.
400-500 शब्दांत टी-20 विश्वचषकातील भारताच्या लढ्याविषयी लिहायचं झालं तर असं लिहिता येईल. मात्र ही परीराणीची गोष्ट नाही, तर एका लढवय्या राजाची गोष्ट आहे एवढं नक्की. 19 नोव्हेंबर 2023 ला घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या भारतीय संघातील वातावरण आठवा. सलग दहा सामने अपराजित राहिलेला संघ तेव्हा अनपेक्षितपणे हरला होता आणि दु:ख इतकं मोठं होतं की, मोहम्मद सिराज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होता.
रोहित शर्मा, विराट कोहली तेव्हाच निवृत्तीचा विचार करत होते. टी-20 क्रिकेट तर 2022 पासून दोघं फारसे खेळलेले नव्हते; पण एकदिवसीय विश्वचषकानंतर लगेचच सहा महिन्यांत टी-20 विश्वचषकाचं आव्हान होतं आणि मग बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांचीही समजूत काढली. पुढचे काही दिवस अगदी मीडियातही सामसूम होती. संघात इतकं नैराश्य होतं की, रोहित शर्मा, विराट कोहली तेव्हाच निवृत्तीचा विचार करत होते. टी-20 क्रिकेट तर 2022 पासून दोघं फारसे खेळलेले नव्हते; पण एकदिवसीय विश्वचषकानंतर लगेचच सहा महिन्यांत टी-20 विश्वचषकाचं आव्हान होतं आणि मग बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांचीही समजूत काढली. वेळ कमी असला तरी नवीन आव्हानाला तयार राहण्याची विनंती केली. बीसीसीआयचा संघातील दिग्गज खेळाडूंवर अजूनही विश्वास आहे आणि त्यांना कुणी हटवणार नाही, हे त्यांनी जाहीर केलं आणि महत्त्वाचं म्हणजे राहुल द्रविड यांना टी-20 विश्वचषकापर्यंत संघाबरोबर राहण्याची विनंती केली.
याचा परिणाम झाला. सगळ्यांना मिळून टी-20 विश्वचषकासाठी निकराचा प्रयत्न करण्याची आस निर्माण झाली. संघबांधणी नव्याने सुरू झाली. मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे मायदेशात झालेले दौरे असा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम होता आणि दीड महिने चालणारी आयपीएल होती. सगळ्याचा अभ्यास संघ प्रशासनाबरोबरच क्रिकेट अकॅडमीकडूनही सुरू होता आणि टी-20 विश्वचषकासाठी रणनीती आखणं सुरूच होतं.
आयपीएल संपल्या संपल्या टी-20 विश्वचषकाचं बिगूल वाजणार होतं. त्यामुळे संघात भारतीय खेळपट्ट्यांवर आयपीएल गाजवलेले खेळाडू घ्यायचे, की अमेरिका-वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन जुनेच खेळाडू ठेवायचे, हा मुद्दा होता; पण अजित आगरकर यांच्या निवड समितीने रोहित, विराट यांचा गतलौकिक लक्षात घेऊन त्यांच्याभोवतीच संघाची उभारणी केली. टी-20 मध्ये एक षटकही सामन्याचा रंग बदलू शकतं. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू खूप महत्त्वाचे. त्यामुळे गोलंदाजांचे पर्याय मिळतात आणि फलंदाजी खोलवर झिरपते, हे लक्षात घेऊन अजित आगरकरांच्या निवड समितीने खेळाडूंची निवड केली.
या रणनीतीमुळे एरवी कुठल्याही संघात स्थान मिळवेल अशा यशस्वी जयस्वालला अंतिम अकरा जणांच्या संघातून कायम बाहेर बसावं लागलं, तर अष्टपैलुत्वामुळेच यजुवेंद्र चहलऐवजी अक्षर पटेल कायम संघात राहिला. शिवम दुबे गरज पडल्यास एखादं षटक टाकू शकतो आणि फिरकीपटूंना जोरदार फटकेही मारू शकतो, म्हणून तो संघात आला. थोडक्यात, प्रत्येकाची संघात एक भूमिका ठरलेली होती आणि एक फेल गेला तर दुसर्याने जागा भरून काढायची लवचीकताही संघात होती. असा कागदावर तरी भक्कम संघ तयार झाला.
प्रत्यक्ष मैदानात काही वेळा गोष्टी मनासारख्या घडल्या, काही वेळा नाही; पण विजयाचं सूत्र आणि गणित खेळाडूंनी बदलू दिलं नाही. तेवढी जिगर प्रत्येकच खेळाडूने दाखवली. भारतीय संघाच्या या विजयावर कुणाकुणाचा प्रभाव होता एकदा बघू या.
रोहित शर्मा
कर्णधार म्हणून त्याने खेळाडूंना स्थैर्य दिलं. गरज असेल तेव्हा क्रिकेटच्या चर्चेपासूनही दूर ठेवलं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला आपला खेळ करू दिला. त्यांच्यावर दडपण आणलं नाही. विराट पहिले सात सामने चालला नाही तेव्हाही त्याने अगदी डंके की चोटपे त्याची पाठराखण केली. त्याचा फलंदाजीचा क्रमांक बदलला नाही. खेळाडू म्हणून तर तो सरस आहेच. या स्पर्धेत आव्हानात्मक परिस्थितीत तो खेळपट्टीवर उभा राहिला. लय सापडलेला रोहित शर्मा नितांतसुंदर फलंदाजी करतो आणि बरोबरीने झटपट धावाही वाढवतो. अमेरिकेविरुद्ध न्यूयॉर्कच्या तात्पुरत्या उभारलेल्या खेळपट्टीवर कसं खेळायचं हे कुणालाच कळत नव्हतं; पण रोहित उभा राहिला, प्रयत्न करत राहिला आणि स्पर्धा पुढे सरकली तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमधली एक अप्रतिम खेळी खेळला. तोपर्यंत स्पर्धेत 200 धावा एकदाच झाल्या होत्या. आताही रोहित खेळत असतानाच फक्त खेळपट्टी सोपी वाटत होती. 41 चेंडूंत 92 धावांची त्याची खेळी दीर्घकाळ लक्षात राहणारी ठरावी. दुसर्या बाजूला विराट खेळत नसतानाही त्याने ना धावांचा वेग कमी होऊ दिला, ना सुरुवात डगमगीत होऊ दिली. स्पर्धेत एकूण नऊ सामन्यांत त्याने 248 धावा केल्या.
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहवर या स्पर्धेनंतर स्वतंत्र प्रकरण किंवा पुस्तक लिहावं लागेल. अचूकता तर त्याचं अस्त्र आहेच. या घडीला तो जगातील सर्वोत्तम तेज गोलंदाज आहे, हेही मान्य; पण या स्पर्धेत बुमराहचं नेतृत्वही दिसलं आणि अक्कलहुशारी. त्याने मिळवलेला प्रत्येक बळी त्याने गोलंदाजाभोवती जाळं विणत पैदा केलेला होता. कधी वेगात बदल करत, तर कधी चेंडू अचूकपणे शिवणीवर टाकत स्विंग पैदा करत आणि या दोन्ही गोष्टी हुशारीने वापरत त्याने कायम फलंदाजांना विचार करायला लावला आणि शेवटी तो फलंदाजांवर भारी ठरला. क्षेत्ररक्षक कुठे असावेत यावरही त्याची स्वतंत्र मतं होती आणि रोहितला तो तिथेही मदत करत होता. याचं मूर्तिमंत उदाहरण क्विंटन डी कॉकच्या अंतिम सामन्यातील बळीमध्ये दिसलं. कुलदीपला तिथे उभं करण्याची विनंती बुमराहने रोहितला केली होती. पुढच्याच चेंडूवर झेल तिथेच उडाला. राहुल द्रविडच्या नियोजनाचं मुख्य केंद्र बुमराह होतं आणि बुमराहने बरोबरच्या युवा गोलंदाजांनाही छान हाताळलं. स्पर्धेत त्याची धावगती षटकामागे 4.50 इतकी होती आणि हा एक विक्रम आहे. टी-20 मध्ये षटकामागे 8 ही धावगती नियमित मानली जाते. 16 बळी पटकावत तो मालिकावीर ठरला.
रिषभ पंत
रिषभ पंतने रस्ते अपघातानंतर मैदानावर परतण्याचा प्रवास दीड वर्षात पूर्ण केला. तो करताना जी जिगर दाखवली, तीच मैदानातही दिसली. उजवी-डावी फलंदाजांची जोडी हवी म्हणून त्याला तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. ही जागा तशी जबाबदारीची. एरवी विराट हा कसलेला फलंदाज वर्षानुवर्षं या क्रमांकावर फलंदाजी करतोय; पण रिषभने भूमिका चोख बजावली. धावांचा वेगही राखला आणि अमेरिकेतील खडतर खेळपट्टीवर यष्टिरक्षणातही अजिबात कसूर केली नाही. उलट तो सरस ठरला. जिगरबाज खेळाडू म्हणून भारतीय विजयात तो चमकला.
भारताची मधली फळी
सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे, रवींद्र जाडेजा यांनी भारताची मधली फळी तयार होते. यातल्या कुणाची वेगळी ओळख निर्माण करून देण्याची गरज नाही; पण विश्वचषकात त्यांच्यावर वेगळी जबाबदारी होती. इथं खेळपट्ट्या वेगळ्या होत्या आणि डावाच्या मध्यावर अनेकदा जेमतेम 70 धावा झालेल्या असायच्या आणि महत्त्वाचं म्हणजे तेव्हाच हे फलंदाज खेळपट्टीवर असायचे; पण या तिघांतील किमान एक जण प्रत्येक सामन्यात आव्हानांना पुरून उरला. परिस्थितीनुरूप त्यांनी खेळ केला. खूप कमी वेळेत खेळपट्टीशी जुळवून घेतलं आणि भारताची धावसंख्या समाधानकारक असेल याची दक्षता घेतली. याचं पूर्ण श्रेय मधल्या फळीला जातं.
फिरकीपटूंची निश्चित भूमिका
वेस्ट इंडिजमध्ये फिरकीपटू निर्णायक भूमिका बजावतील, हे तर रोहत शर्माचं सुरुवातीपासून म्हणणं होतं. म्हणून त्याने संघात चार फिरकीपटूंची निवड केली; पण यातल्या यजुवेंद्र चहलला लायकी असूनही संधी मिळाली नाही. अक्षर आणि कुलदीपने मात्र संधीचं सोनं केलं. अक्षरने पॉवर प्लेमध्ये एखादा बळी मिळवायचा आणि सातव्या षटकापासून कुलदीपने मधल्या फळीला खिंडार पाडायचं हे विंडीजमध्ये अगदी ठरल्यासारखं होत होतं. या दोघांमुळे भारतीय संघाला सामन्यांवर वर्चस्व मिळवता आलं. अक्षरने तर बॅटनेही साथ दिली. अगदी अंतिम सामन्यातही तो विराटच्या साथीने उभा राहिला. 2024 मध्ये कुलदीप एक भेदक फिरकीपटू म्हणून समोर आला आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि वेगात करत असलेले बदल यामुळे फलंदाज चांगलेच बुचकळ्यात पडतात आणि एक तर त्रिफळाचीत होतात किंवा पायचीत. त्याचं है कौशल्य टी-20 विश्वचषकात उठून दिसलं.
राहुल द्रविडचं मार्गदर्शन
भारतीय संघात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि लक्ष्मण यांच्यासारखे घणाघाती फलंदाज होते, तेव्हा राहुल द्रविडने संघात फक्त स्थान टिकवलं नव्हतं, तर ते कामगिरीने कमावलं होतं. क्रिकेट खेळाचा त्याच्याइतका अभ्यास कुणी केला नसेल. तो मुळातच अकॅडमिक आहे आणि रणनीती आखण्यात माहीर आहे. खेळाडूंवर तो मेहनत घेतो. राजस्थान रॉयल्स संघात त्याने यशस्वी जयस्वालला हेरलं आणि आता भारतीय संघातही तीनही प्रकारांत तो त्याच्या बाजूने उभा राहिला. आताही त्याने भारतीय संघात अजोड शिस्त आणली आहे आणि फलंदाज, गोलंदाजांना त्यांची कामं समजावून सांगणं, त्यांच्या क्षेत्ररक्षणापासून सगळ्यावर मेहनत घेणं हे सगळं त्याने शिस्तीत केलं आहे. संघाच्या झेल पकडण्यात आलेल्या चपळाईचं जितकं श्रेय खेळाडूंना आहे तितकंच राहुल द्रविडला. या स्पर्धेत अक्षर पटेलने सीमारेषेवर एकहाती आणि उंच उडी मारून पकडलेला झेल आठवा किंवा सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा पकडलेला अंतिम सामन्यातील अद्भुत झेल. श्रेय खेळाडूंचं आहेच; पण तितकंच राहुल द्रविडने त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचंही आहे. एकदिवसीय विश्वचषकात अति चोख विचार केल्याची टीका त्याच्यावर झाली; पण टी-20 विश्वचषकात त्याच्या नियोजनाचं फळ त्याला मिळालं. अंतिम सामन्यात विराटने एक बाजू लावून धरावी आणि अक्षरने धावा वाढवाव्यात याची सतत दोघांना आठवण करून देण्यासाठी तो पाणी घेऊन मैदानातही आला होता. स्पर्धा जिंकल्यावर खेळाडूंनी त्याला हवेत उचललं आणि मानवंदना दिली ती उगीच नाही.
प्रत्येकच खेळाडूने आपला वाटा उचलला तर अंतिम विजय साध्य होतो. भारतीय संघ या स्पर्धेत विजेत्याच्या थाटात खेळला आणि विजेत्यासारखाच जिंकला. भारतीय संघ आता फक्त क्रमवारीतील अव्वल संघ नाहीए, तर तो चॅम्पियन संघही झाला आहे. अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाने टी-20 प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. हा निर्णय अपेक्षित आणि आधीपासून सगळ्यांनाच माहीत असलेला होता; पण त्यांची जागा घेऊ शकणारे अकरा नवीन खेळाडू संघाच्या वेशीवर आधीपासून उभे आहेत यापेक्षा चांगलं चिन्हं ते कुठलं?
हळूहळू भारतीय क्रिकेटमध्ये नवीन पर्व सुरू होईल आणि तेही भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाणारंच असेल. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेटचा समावेश झालाय. क्रिकेटचा विस्तार होतोय आणि भारतीय क्रिकेटची यात महत्त्वाची भूमिका असणारए यापेक्षा अभिमानाची गोष्ट ती कुठली?