सावध होण्याची गरज

05 Jun 2024 12:15:28
Ayodhya
मंदिरनिर्माण प्रक्रिया गतिमान करणार्‍या, त्याचबरोबर अयोध्येत वेगवान पायाभूत सुविधा उभारणार्‍या भारतीय जनता पार्टीला त्यानंतर चारच महिन्यांत प्रत्यक्ष अयोध्येतच पराभवाची चव चाखावी लागली, हा धक्का मोठा आहे!
श्रीरामललाचे अयोध्येत मंदिर जोवर होत नाही, तोवर पगडी न घालणारा क्षत्रिय समाज, पिढ्यान्पिढ्या अनवाणी चालण्याचं व्रत घेणारा श्रद्धावान समाज अयोध्येच्या अवतीभवती आणि एकूणच उत्तर प्रदेशात होता. पाचशे वर्षांनंतर त्यांच्या त्याग, तपस्या आणि संघर्षाला फळ मिळाले. पाचशे वर्षांनंतर त्यांनी शिरी पगडी आणि पायात पादत्राणं धारण केल्याचे आपण जानेवारीत अनुभवले.
अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराम मंदिरात जानेवारीत आपण प्राणप्रतिष्ठेचा अनुपम सोहळा अनुभवला. हा केवळ उपासनेचा व मंदिरात जाऊन पूजेचा विषय नव्हता. ते पुनरुत्थान होते- हिंदू पुनरुत्थान.
 
 
एकूण मंदिरनिर्माण प्रक्रिया गतिमान करणार्‍या, त्याचबरोबर अयोध्येत वेगवान पायाभूत सुविधा उभारणार्‍या भारतीय जनता पार्टीला त्यानंतर चारच महिन्यांत प्रत्यक्ष अयोध्येतच पराभवाची चव चाखावी लागली, हा धक्का मोठा आहे!
 
 
आज लोकसभा निवडणुकीत येथील भाजपाचे उमेदवार समाजवादी पार्टीच्या उमेदवाराकडून दणदणीत पराभूत झाले. अयोध्येत ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी दर्पोक्ती करत कारसेवकांवर बेछूट गोळ्या चालवणार्‍या मुलायमसिंगांच्या वारसांनी रामभक्त असलेल्या भाजपाच्या शिलेदाराचा पराभव केलाय. याचं विश्लेषण कसं करता येईल?
 
 
जानेवारीनंतर अयोध्यानगरी गजबजली आहे. श्रद्धावान यात्रेकरूंमुळे आर्थिक चक्र वेगानं फिरू लागलं आहे. योगीजींसारखा खंबीर मुख्यमंत्री असल्यानं शांतता व सुव्यवस्थाही उत्तम राहिलीय; पण मग भाजपा का नको वाटला तेथील लोकांना?
देशभरात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. एनडीएचे सरकारही येईल; पण सगळ्या छद्मपुरोगाम्यांना अयोध्येत भाजपा हरल्याचा प्रचंड आनंद झालाय!
 
 
समाजवादी पार्टी ज्या इंडी आघाडीचा भाग आहे त्यांच्या वैचारिक प्रवासाला पाहिलं तर यात नवल काही नाही. भाजपाचा विरोध- त्यांचा द्वेष करणं कदाचित त्यांची निवडणुकांसाठीची मजबुरी असेल, मात्र श्रीरामांचा, हिंदूंचा द्वेष ही त्यांची वैचारिक जडणघडणच आहे. त्यांच्या हाडीमासी भिनलेली ती गोष्ट आहे, कारण या पक्षांनी सेक्यॅुलरिझम, पुरोगामित्व आणि उदारमतवाद यांच्या नावाखाली हिंदुद्वेषाचा मार्ग स्वीकारला आहे.
 
 
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील मुस्लीम बाहुबली नेत्यांना पक्षात दिलेले मानाचे स्थान, गुंडगिरीला व अराजकाला त्यांच्या राज्यात दिलेले अभय हे याचेच द्योतक.
 
याच विचारांना मोदी-योगींच्या राज्यात अटकाव बसलेला होता. म्हणून खेळले गेलेले जातीयतेचे विखारी खेळ आज काही प्रमाणात यशस्वी झालेले दिसत आहेत.
 
 
मायावती यांच्या बसपाने उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेशात सामाजिक उतरंडीतील मागास वर्गांची मोट बांधून राजकारणात काही काळ चांगले यश मिळवले होते.
 
 
मात्र गेल्या काही वर्षांत त्यास उतरती कळा लागली. या निवडणुकीत या पक्षाच्या केडरपुढे नेतृत्वाचा अभाव दिसल्याने त्यांची मते स्वतःकडे खेचण्यात समाजवादी पार्टी व काँग्रेस यशस्वी ठरले आहेत असे दिसते. याचबरोबर ‘एमवाय’ समीकरण मांडून समाजवादी पक्षाने मुस्लीम मतेही गोळा केली. या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे उत्तर प्रदेशात त्यांना मिळालेले यश. भाजपाने राज्य पूर्णपणे गमावलेले नाही; पण त्यांना अपेक्षेपेक्षा निम्मेच यश मिळाले. त्यातही अयोध्येतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे!
भाजपा जातीय समीकरणं बांधण्यात कमी पडले का? इंडी आघाडीतील काही पक्ष जॉर्ज सोरोसप्रणीत ज्या भारतखंडन विचारांवर चालतात, त्याला ओळखण्यात भाजपा कमी पडले का? अनेक प्रश्न आहेत.
 
 
यथावकाश उत्तरे शोधली जातील; पण यानिमित्ताने सावध होण्याची गरज आहे. विकासाबरोबर सामाजिक अभिसरण व जातींच्या विळख्यातून राजकारण बाहेर काढण्याएवढा समरस हिंदू समाज निर्माण करण्याच्या दीर्घकालीन योजनेवरही काम करावे लागेल. रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी प्राणप्रतिष्ठेच्या केलेल्या मार्गदर्शनात याचे सूतोवाच केले होते. मंदिर बांधून झाले, आता रामराज्य आणण्याची जबाबदारीही आपलीच आहे. सामाजिक समीकरणांना सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य ते स्थान देत, रामराज्याची संकल्पना प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचवणे, हा लांबचा मार्ग भाजपाला घ्यायचा आहे. मोदी, योगी व काही मूठभर नेत्यांनी दिवसरात्र कष्ट करायचे व बाकीच्यांनी हा लांबचा मार्ग समजून न घेता केवळ अधिकार उपभोगायचे, हे चालणार नाही.
 
 
समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशात एका अर्थाने पुनरुज्जीवन झाले आहे. त्याचे दूरगामी परिणाम होतील, कारण मुस्लीम तुष्टीकरणासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. हा धोका ओळखणे व पराभवाने खचून न जाता, राम मंदिर ते राष्ट्रमंदिर हा प्रवास चालू ठेवणे असे दुहेरी काम भाजपाला करावे लागेल.
 
डॉ. प्रसन्न पाटील
समरसता साहित्य परिषद
Powered By Sangraha 9.0