भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव कळंबेळकर यांचे 16 जून 2024 रोजी सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
मूळचे नागपूरचे असलेले अनंतराव पोस्ट टेलीग्राम उद्योगात अकाऊंट्स विभागामध्ये कामाला होते. अनंतराव श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडींजींचे बालमित्र होते. अनेक वर्षे त्यांनी ठेंगडीबरोबर काम केले. नागपूरमध्ये प्रवासात ते दत्तोपंत यांना सायकलवर घेऊन फिरायचे.
त्यानंतर मुंबईमध्ये ते नोकरीनिमित्ताने आले आणि भारतीय मजदूर संघ मुंबईचे काम सुरू केले. स्व. रमणभाई शहा, स्व. प्रभाकर केळुस्कर, डॉ. पां. रा. किनरे, मुकुंदराव गोरे, बाळासाहेब काशीकर यांच्याबरोबर त्यांनी काम केले. 1980 नंतर त्यांच्याकडे भारतीय मजदूर संघ मुंबईचे सचिव आणि नंतर अध्यक्ष अशी जबाबदारी आली. सुमारे 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी भारतीय मजदूर संघात विविध जबाबदार्या पार पाडल्या. अनेक वर्षे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तो काळ ट्रेड युनियनच्या भरभराटीचा काळ होता. जॉर्ज फर्नांडिस, डॉ. दत्ता सामंत, जी.आर. खानोलकर, ठ . ग. मेहता, शरद राव, दत्ताजी साळवी आदी कामगार नेते काम करत होते. त्यात भारतीय मजदूर संघाच्या विचारधारेवर मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात प्रामुख्याने त्यांनी बीएमएसचे काम उभे केले. अनेक औद्योगिक कारखान्यांमध्ये आपल्या संघटना उभ्या केल्या.
त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेला श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांचा प्रदीर्घ लढा यशस्वी झाला. मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यात अनेक केसेस कराव्या लागल्या. मात्र 25 ते 30 वर्षे चिकाटीने हा लढा त्यांनी चालू ठेवला आणि श्रीनिवास गिरणीमधील कामगारांना न्याय मिळवून देण्यात भारतीय मजदूर संघाला यश आले. त्यात त्यांना मोलाची साथ लाभली ती अॅड. श्रीकांत धारप, विश्वनाथ साटम आणि राजाराम वर्मा यांची.
तसेच दुसरा यशस्वी लढा म्हणजे एअर इंडियामधील रोजंदार कामगारांना नोकरीत कायम करण्यासाठी केलेला लढा. त्यासाठीदेखील औद्योगिक न्यायाधीकरण, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यामध्ये अत्यंत चिकाटीने हा लढा लढला. या लढ्यामध्ये अॅड. श्रीकांत धारप, जोगेंद्र प्रताप सिंग यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. एअर इंडियामधील रोजंदार कामगारांना कायम करण्यात भारतीय मजदूर संघाला यश आले.
अनंतराव यांच्या नेतृत्वातच चित्रपट उद्योगातील फेमस स्टुडिओ, रॅमनोर्ड इंडस्ट्रीज आणि अन्य स्टुडिओमध्येदेखील भारतीय मजदूर संघाच्या संघटना उभ्या राहिल्या. अनेक चांगले करारदेखील त्या उद्योगांमध्ये केले. मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर्स, फार्मासिस्ट, फायर फायटर्स यांच्या संघटनादेखील त्यांनी उभ्या केल्या होत्या. मुंबईतील घरेलू कामगारांची संघटना वाढवण्यातदेखील त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच मुंबईमध्ये औद्योगिक क्षेत्रात भारतीय मजदूर संघदेखील स्वतःचे स्थान निर्माण करू शकला. भारतीय मजदूर संघाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला. भारतीय मजदूर संघाची कामगार क्षेत्रातील शोधसंस्था भारतीय श्रमशोध मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. अनेक वर्षे त्यांनी श्रमशोध मंडळाचे सचिव म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कठोर, पण प्रेमळ स्वभावाचे अनंतराव शिस्तप्रिय होते. त्यांचे हस्ताक्षर अत्यंत सुरेख होते. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी व्यक्तिगतदेखील खूप मदत केलेली होती. मजदूर संघाच्या कामात समर्पित भावनेने तनमनधन देऊन काम करणारे निष्ठावंत, कर्मठ कार्यकर्ते अनंतराव यांचे कार्य मजदूर संघातील कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देईल.
वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत ते मजदूर संघात सक्रिय होते. त्यांच्या पत्नी बीएसएनएलमध्ये कार्यरत होत्या. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. अनंतरावांसारख्याच अनेक कार्यकर्त्यांमुळे भारतीय मजदूर संघ आज देशात पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचलेला आहे आणि कामगार क्षेत्रात आपली वेगळी ओळख आणि स्थान मजदूर संघाने निर्माण केले आहे. त्यांचे योगदान आमच्या कार्यकर्त्यांना, आपल्या विचाराच्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहसंवेदना आम्ही व्यक्त करीत आहोत. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.