हाती सत्ता असताना संविधानाची मोडतोड करणारा काँग्रेस पक्षच आज संविधान रक्षणाच्या नावाने गळे काढतो आहे.संसदेच्या कामात अडथळे आणणे हेच त्याला आणि त्याच्या साथीदारांना इतिकर्तव्य वाटते आहे, तर ओवेसीसारखा मुस्लीम नेता आपल्या कृतीतून धोकादायक अजेंडा अधोरेखित करतो आहे.
संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी ‘संविधान बचाओ’चे जोरदार नारे देत जो गोंधळ घातला तो उभ्या देशानेच नव्हे तर जगानेही पाहिला. निवडणूक प्रचारादरम्यान ज्या मुद्द्यावरून या देशातील नागरिकांची दिशाभूल केली तोच मुद्दा यापुढील काळातही रेटणार असल्याचेच त्यांनी यातून सूचित केले. तो गोंधळ पाहून या लोकप्रतिनिधींना आपण नेमके कशासाठी संसदेत पाठविले आहे, असा प्रश्न त्यांना मतदान करणार्या नागरिकांच्या मनात उभा राहिला असेल.
बहुमत प्राप्त करत सत्तासूत्रे हाती घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारकीची शपथ घेण्यासाठी उभे राहिले तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी गोंधळ घालून राज्यघटनेच्या प्रती त्यांना उंचावून दाखविल्या. ‘भाजपा संविधान बदलणार’ या आवईने एकगठ्ठा मते मिळवण्यात आणि त्या बळावर लोकसभेतील जागा दुप्पट करण्यात यशस्वी झाल्याने तोच खेळ सदनात पुढे चालू ठेवायचा विरोधी पक्षांचा आणि त्यांच्या नेत्याचा मानस दिसतो आहे. जे संविधान भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे, ते संविधान निव्वळ राजकीय फायद्यासाठी बदलले कोणी, या इतिहासाचा या नारेबाजांना खरोखर विसर पडला आहे की ते सोयीस्कर त्याकडे दुर्लक्ष करत आहेत?
देशावर लादलेल्या आणीबाणीचे अर्धशतकी वर्ष येत्या 25 जूनला चालू झाले. या आणीबाणीच्या आडून संविधानात सोयीचे बदल करण्याचे कुकर्म तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले, हा इतिहास आहे आणि विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केले तरी तो बदलणार नाही. आणीबाणीच्या काळात संविधानाची जी मोडतोड करण्यात आली त्याविषयी ‘विवेक’च्या मागील अंकात सविस्तर लेख प्रकाशित झाला आहेच. लोकशाही व संविधानाचे स्वयंघोषित तारणहार असणारे राहुल गांधी, संविधानाचे पावित्र्य भंग करण्याचे सर्व प्रयत्न करणार्या आपल्या आजीच्या थोरवीचे गोडवे गातात, हा करुण विनोद आहे. त्यातला विरोधाभास सुज्ञ जनतेच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. देशावर हुकूमशाहीचा वरवंटा फिरवत इंदिरा गांधींनी संविधानालाच स्थगिती दिली होती. त्या बिकट काळात ज्या भारतीय जनसंघाने संविधान आणि लोकशाही टिकविण्यासाठी प्राणपणाने लढा दिला त्याच जनसंघाचे वैचारिक वारसदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांना या संविधानाच्या प्रती फडकावून दाखविताना, ‘तुमच्यामुळेच हे संविधान फडकविण्यासाठी आमच्या हाती शिल्लक राहिलेले आहे’, हे विरोधकांच्या लक्षात तरी आले का? जर त्या वेळी इंदिरा गांधीच्या हुकूमशाहीला विरोध झाला नसता, तर या देशात लोकशाही व संविधान उंच फडकविण्यासाठी सोडाच, पाहायला तरी शिल्लक राहिले असते का? आपल्या पिताश्रींनी म्हणजे राजीव गांधी यांनी स्पष्ट शब्दांत इंदिराजींच्या आणीबाणी लादण्याच्या कृत्याचे समर्थन केले होते व वेळ पडल्यास अशी आणीबाणी पुन्हा लादली जाऊ शकते, असे म्हटले होते, हे राहुल गांधी विसरले असतील; पण देश विसरलेला नाही. इंडी आघाडीने म्हणजे पर्यायाने काँग्रेसने अंतर्मुख होऊन याचा विचार करणे आवश्यक आहे; पण विचारांशी आणि वैचारिकतेशी फारकत घेतलेल्या काँग्रेसला आणि काँग्रेसी नेतृत्वाला हे जमणे अवघडच.
लोकशाहीचे आणि संविधानाचे आपणच रक्षक आहोत, या भ्रामक नॅरेटिव्हमुळे एकगठ्ठा मतांचे ध्रुवीकरण होत काँग्रेसच्या जागा दुप्पट झाल्या. त्याचे यथायोग्य आकलन करून न घेता हाच नॅरेटिव्ह कसा ताकदवान करता येईल व जनतेला अधिकाधिक भ्रमात कसे टाकता येईल, या हेतूने ही अतिशय स्वस्त ड्रामेबाजी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे. मात्र यामुळे पुढच्या काळात काँग्रेसपुढे संकट उभे राहिल्यावाचून राहणार नाही. ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक आणि देशाची फसवणूक आहे.
‘देश चालविण्यासाठी सर्वांच्या सहमतीची आवश्यकता असल्याने सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ’ अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. मात्र या भूमिकेमागचे गांभीर्य व देशासाठी त्याचे असलेले महत्त्व लक्षात न घेता, गतवेळेपेक्षा दुप्पट जागा मिळाल्याच्या कैफात असलेला काँग्रेस पक्ष व त्याचे नेतृत्व आपल्या वैचारिक दिवाळखोरीचेच दर्शन घडवत आहे. विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडून जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यात काँग्रेसला अपयश आले तर या पक्षाचे भविष्य कठीण आहे याचे भान त्यांनी बाळगायला हवे. काँग्रेस आणि इंडी आघाडीने घातलेला गोंधळ जसा सर्वांनी पाहिला तसा हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेला कट्टर मुस्लीम नेता असदुद्दीन ओवेसी याने शपथविधीच्या वेळी केलेला खोडसाळपणाही जगभरात पाहिला गेला. खरे तर त्याने जे काही केले ते केवळ खोडसाळपणाचे नव्हते, तर ज्या देशात मी सुखेनैव राहतो, त्या देशापेक्षाही मला माझा धर्म श्रेष्ठ वाटतो हे सांगण्याचा तो उद्दाम मार्ग होता. अल्लाला साक्ष ठेवत शपथ घेणार्या ओवेसीने नंतर ‘जय भीम’ म्हटले, ‘जय तेलंगणा’ म्हटले आणि शेवटी ‘जय फिलिस्तिन’ म्हटले. यातल्या प्रत्येक जयजयकारामागे एक उघड संदेश आहे. एकसंध भारताच्या विघटनाचा त्यामागे असलेला विचार लपून राहत नाही आणि ‘जय फिलिस्तिन’ असे भारताच्या सवोर्र्च्च सभागृहात बेधडकपणे म्हणताना कट्टरपंथाचे उघडपणे समर्थन करण्याचे औद्धत्यही आहे.
थोडक्यात, हाती सत्ता असताना संविधानाची मोडतोड करणारा काँग्रेस पक्षच आज संविधान रक्षणाच्या नावाने गळे काढतो आहे.संसदेच्या कामात अडथळे आणणे हेच त्याला आणि त्याच्या साथीदारांना इतिकर्तव्य वाटते आहे, तर ओवेसीसारखा मुस्लीम नेता आपल्या कृतीतून धोकादायक अजेंडा अधोरेखित करतो आहे.
पहिल्याच अधिवेशनात विरोधकांच्या दबावतंत्राची झलक दिसली असली तरी या दबावतंत्राला सत्ताधार्यांनी भीक घातली नाही. लोकसभाध्यक्ष पदासाठी काँग्रेसने निवडणूक लादल्यावर भूमिकेवर ठाम राहत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे निवडणूक जिंकल्यानंतर, नव्याने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना ओम बिर्ला यांनी आणीबाणीचा निषेध करणारा प्रस्ताव मांडून, त्याविरोधातील लढ्यात बळी पडलेल्यांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्याचे आवाहन सदस्यांना केले. लोकसभाध्यक्षांची ही कृती म्हणजे सत्ताधार्यांनी विरोधकांना टाकलेला गुगली असा खोडसाळ प्रचार होत आहे. मात्र ती कृती म्हणजे लोकशाहीला काळिमा फासणार्या आणीबाणीविषयीच्या भावनांचे ते निदर्शक होते. असे करणे संविधानाविषयीची आस्था, आदरही अधोरेखित करून गेले हे गोंधळी विरोधकांच्या लक्षात आले का?