भाषायोगिनी यास्मिनताई

27 Jun 2024 16:58:25
@डॉ. नीलिमा गुंडी
ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी आयुष्य वाहून घेतले आहे. शेख यांच्या भाषाविषयक निरपेक्ष सेवाकार्याचा अनेक पुरस्कार व सन्मान देऊन गौरव करण्यात आलेला आहे. यास्मिनताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यायला त्यांचे आत्मपर लेखन उपयोगी पडते. ‘आपल्या मातृभाषेवर प्रेम करा.’ हा त्यांचा केवळ संदेश नाही, तर ती त्यांची जीवननिष्ठा आहे. यास्मिनताई यांना त्यांच्या अखंड जीवनसाधनेमुळे ‘भाषायोगिनी’ असेच म्हणावेसे वाटते. नुकतेच त्यांनी वयाच्या शंभरीत पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात परिचय.
 
Yasmin sekh
 
प्रा. यास्मिन शेख यांची नि माझी पहिली भेट झाली ती मुक्त विद्यापीठाच्या एका अभ्यासक्रमानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यशाळेत! खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही! त्या वेळी झालेल्या चर्चांमध्ये त्यांचा जो सहभाग होता, तो माझ्या लक्षात राहिला. त्यातून त्यांचा मराठी भाषा आणि साहित्य यांचा अभ्यास जसा मला जाणवला होता, तशीच आत्मीयताही जाणवली होती. मुंबईहून पुण्याला आम्ही बरोबर आलो होतो. त्यामुळे त्यांच्याशी थोडी ओळख झाली, ती पुढे वाढत गेली.
 
1995 नंतर मी मराठी अभ्यास परिषदेमध्ये कार्यरत होते. आमच्या काही कार्यक्रमाला त्या हजर असत.
 
विशेष म्हणजे मराठी अभ्यास परिषदेतर्फे दिला जाणारा भाषाविषयक लेखन पुरस्कार शेखबाईंच्या ‘मराठी शब्दलेखनकोश’ या ग्रंथाला मिळाला होता. तेव्हा संस्थेची कार्यवाह या नात्याने माझा त्यांच्याशी संपर्क येत गेला. वक्तृत्वोत्तेजक सभागृहात डॉ. प्रमोद तलगेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला तो पुरस्कार समारंभ आजही लक्षात राहिला आहे. त्या कार्यक्रमाला भाषाप्रेमी, तसेच काही भाषातज्ज्ञ मंडळी आवर्जून उपस्थित होती. डॉ. सरोजिनी भाटे या परीक्षकाच्या भूमिकेतून बोलल्या होत्या. एकंदरीत यास्मिनताईंच्या कोशाचे चांगले स्वागत झाले होते.
 
 
यास्मिनताईंची ओळख भानू काळे यांच्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या ’व्याकरण सल्लागार’ म्हणून झाली होतीच! त्यांच्या या भाषाविषयक कोशामुळे त्यांची ती प्रतिमा सर्वदूर पसरली. त्यांनी हा कोश मराठी साहित्य महामंडळाच्या लेखनविषयक नियमांनुसार तयार केला होता. त्या नियमांना शासनमान्यता आहे. या कोशाची रचना व त्यातील परिशिष्टे यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला, की या कोशाचे अंतरंग सहज उलगडते. हा कोश मुख्यतः सर्वसाधारण वाचकांना उपयुक्त ठरेल असा आहे. कोशाच्या दुसर्‍या आवृत्तीत 6/11/2009 रोजी संमत झालेला ’देवनागरी लिपी व वर्णमाला’ याविषयीचा शासननिर्णयसुद्धा समाविष्ट आहे. त्यामुळे मराठी वर्णमाला, जोडाक्षरलेखन, अंकलेखन याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी या कोशाची मदत होते. भाषेचे हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणकीय व्यवहार या सर्वच पातळ्यांवर हा कोश मार्गदर्शक ठरतो.
 
 
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे प्रकाशित झालेली यास्मिनताईंची ’मराठी लेखन मार्गदर्शिका’ (1997) देखील खूप महत्त्वाची आहे. मराठी लेखन करणारे सामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, लेखक, अमराठी मंडळी, पाट्या रंगवणारे रंगारी अशा विविध स्तरांवर लेखन करणार्‍या मंडळींनी सतत सोबत ठेवावा, असा हा संदर्भग्रंथ आहे. मातृभाषा बोलणारे, लिहिणारे जेव्हा ’मला व्याकरण येत नाही,’ असे म्हणतात; तेव्हा खरे तर आपण नियम आत्मसात केले आहेत, हेच त्यांच्या ध्यानात आलेले नसते! असेच शेखबाई माझ्याशी गप्पा मारताना सहज म्हणाल्या होत्या. त्यांचे हे भाष्य मार्मिक आहे. लोकांच्या मनातील व्याकरणाचा बागुलबोवा - पोकळ भीती - दूर करणारे असे हे भाष्य आहे.
 
 
यास्मिनताईंनी तरुणपणी भाषाविज्ञानाचा अभ्यास एका समर स्कूलमध्ये केला होता. त्यातून त्यांना भाषा आणि व्याकरण यांच्याकडे पाहण्याची मर्मदृष्टी मिळाली आहे. भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. भाषेची आवाहकता स्थलकालाच्या पलीकडे टिकून राहावी यासाठी तिला नियमांची स्थिर अशी बैठक हवी. प्रमाणभाषेचे लेखन योग्य रीतीने व्हावे, ही त्यांची भूमिका आहे. या भूमिकेतूनच त्यांनी ‘लोकसत्ता’ दैनिकामधून ’भाषासूत्र’ या सदरामध्ये वयाच्या 98 व्या वर्षीही सातत्याने लेखन केले. त्यामुळे अनेक जणांना लेखनासाठी मार्गदर्शन मिळाले. इतकेच नव्हे, तर त्याला मोठा प्रतिसाद मिळत असताना त्यांनी देशविदेशातील कित्येक जणांच्या शंकांचे शांतपणे निरसनही केले! यास्मिनताईंची मी नुकतीच भेट घेतली तेव्हा शंभरीच्या उंबरठ्यावरही त्यांच्या बुद्धीची तल्लखता आणि कार्यनिष्ठा सतेज असल्याचे मला जाणवले. वृत्तीची प्रसन्नताही अम्लान असल्याचे अनुभवता आले. लेखन बिनचूक असावे म्हणून मुद्रितांमधील दुरुस्त्या या वयातही स्वतः काटेकोरपणे ताडून पाहण्याची त्यांची सवय मला खरोखरच प्रभावित करून गेली!
 
 
यास्मिनताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यायला त्यांचे आत्मपर लेखन उपयोगी पडते. मुळात विद्यार्थिदशेपासूनच त्या चौकस बुद्धीच्या - ’ज्ञानार्थी’ - होत्या. महाविद्यालयात अभ्यासासाठी मो.रा. दामले यांचा व्याकरणग्रंथ जवळ बाळगणार्‍या त्या वर्गातील एकमेव विद्यार्थिनी होत्या. पुणे येथील स.प. महाविद्यालयात त्या शिकल्या. तेथील शैक्षणिक वातावरणाविषयी त्या लिहितात -
 
 
पुण्याच्या सर परशुराम महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हाच ’मराठी कॉम्पोझिशन’ हा ऐच्छिक विषय घ्यायचा मी निश्चय केला. मला मराठी भाषेविषयी वाटणारे अपरंपार प्रेम हे तर एक कारण होतेच; पण ’उपेक्षितांचे अंतरंग’ लिहिणारे श्री.म. माटे आपल्याला मराठी विषय शिकवणार, हेही एक महत्त्वाचे कारण होते. उच्च शिक्षणाविषयीची त्यांची मते त्यांनी अनेकदा ठामपणे मांडली.
 
 
उच्च शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांचे विवेचन नव्हे. ते जीवनविषयक दृष्टिकोन तयार करते, श्रेष्ठ संस्कृती तयार करते आणि विचाराला चालना देते, ते खरे उच्च शिक्षण, अशी त्यांची धारणा होती आणि त्यांच्या शिकवण्यातून त्यांनी हे उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. (’अंतर्नाद’ मार्च 2008) यास्मिनताईंमध्ये वर अभिप्रेत असलेला जीवनविषयक दृष्टिकोन बाणलेला होता, हे खरे आहे.
 
 
ताईंच्या 91व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अनौपचारिक समारंभाला मी गेले होते, तेव्हा त्यांनी आपला कोश उपस्थितांना भेट दिला होता. त्यावर त्यांनी लिहिले होते: ’आपल्या मातृभाषेवर प्रेम करा.’ हा त्यांचा केवळ संदेश नाही, तर ती त्यांची जीवननिष्ठा आहे. 21 जून हा दिवस हल्ली ‘योग दिन’ म्हणून साजरा होतो. त्या दिवशी जन्मलेल्या यास्मिनताई त्यांच्या अखंड जीवनसाधनेमुळे मला जणू ’ भाषायोगिनी ’ वाटतात.
 
 
(‘मूर्तिमंत मराठीप्रेम’ या भानू काळे व दिलीप फलटणकर यांच्या पुस्तकातून साभार)
Powered By Sangraha 9.0