‘पवन’ नावाचे वादळ !

विवेक मराठी    24-Jun-2024   
Total Views |

pawan
सत्तारूढ वायएसआर काँग्रेसला पराभूत करायचे तर तेलुगू देशम-भाजप-जनसेना पक्ष यांनी एकत्र येण्यावाचून गत्यंतर नाही हे आघाडीतील पक्ष नेतृत्वाच्या गळी उतरविण्यात पवन कल्याण यांचा असणारा आग्रह आणि हट्ट हे त्यांचे मुख्य योगदान. सूर्य किरणांमध्ये एरव्हीही दाहकता असते; पण बहिर्वक्र भिंगातून ते किरण एकवटतात तेव्हा एखादी वस्तू जाळून टाकण्याची क्षमता त्यांत येते. सत्तारूढ पक्षाच्या विरोधात कमालीचा असंतोष असला तरी विरोधक जर विखुरलेले असतील तर त्या असंतोषाची पुरेशी धग मतदानातून प्रकट होत नाही. आघाडीचे ते ‘बहिर्वक्र’ भिंग किती महत्वाचे आहे हे ठसविण्याचे श्रेय निखालस पवन कल्याण यांच्याकडे जाते.
एखाद्या राजकीय पक्षाचा निवडणुकीत किती दारुण पराभव व्हावा याचे उदाहरण पाहायचे असेल तर आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव हे ज्वलंत उदाहरण ठरेल. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला 175 पैकी 151 जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या विधानसभेत त्या पक्षाला अवघ्या 11 जागा जिंकता आल्या. या पराभवाला घसरण शब्दही सौम्य होईल. याला पडझडच म्हटले पाहिजे.
रेड्डी सरकारच्या उणीवा
 
आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या होत्या आणि त्यांचे लक्षावधी लाभार्थी होते. थेट खात्यात जमा होणार्‍या (डीबीटी) योजनांमध्ये 53 लाख मातांना वर्षाकाठी पंधरा हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येत होते. 66 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार्‍या निवृत्तिवेतनात वृद्धी करण्यात आली होती. एक कोटी महिलांना आर्थिक साह्य मिळत होते. 2019 ते 2024 या पाच वर्षांत आंध्र प्रदेश सरकारने डीबीटीच्या माध्यमातून अडीच लाख कोटी रुपयांचे आर्थिक साह्य समाजातील विविध घटकांना दिले. याखेरीज शिष्यवृत्ती, कर्ज, रेशनवरील स्वस्त तांदूळ, अनुदान इत्यादींवर रेड्डी सरकारने पावणे दोन लाख कोटी खर्च केले. ते सर्व लाभार्थी कुठे गेले? असा प्रश्न आपल्याला पडला आहे असे निकालांचा धक्का बसलेले मावळते मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले. त्यांच्या त्या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे.
मतदारांना या सरकारी योजनांबरोबरच आणखी काही अपेक्षा होत्या आणि असतात. रेड्डी सरकार त्यात कमी पडले. राज्य सरकारच्या तिजोरीवर पडलेल्या अवाढव्य भारामुळे पायाभूत सुविधांचे काम रेंगाळले किंवा रखडले. परिणामतः औद्योगिक विकासाला खीळ बसली. त्याचे पर्यवसान बेरोजगारी वाढण्यात झाले. महागाई वाढलीच होती. कल्याणकारी योजनांवर निधी खर्च करण्यासाठी रेड्डी सरकारने घेतलेल्या कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. 2019 साली राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज होते; ते आता सात लाख कोटींवर गेले आहे. त्याखेरीज अमरावती या प्रस्तावित राजधानी शहराचा प्रस्ताव रेड्डी यांनी बासनात बांधून ठेवला आणि तेथे हजारो एकर जमीन विकलेल्या शेतकर्‍यांच्या तोंडाचे पाणी पळाले. पाच पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचा अगोचरपणा रेड्डी यांनी केला होता; पण त्या तुलनेत कारभार प्रभावी ठरत नव्हता. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीला उद्देशून वायएसआर काँग्रेसच्या दोन आमदारांनी भर विधानसभेत अपशब्द काढले होते. नायडू यांना कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती. पण खुद्द सरकारवर भ्रष्टाचाराचे; वाळू खाणकाम ठेका ठरावीक कंपन्यांना देण्यात येत असल्याचे आरोप होत होते. आंध्र प्रदेशात मंदिरांवर सातत्याने हल्ले होत होते आणि रेड्डी सरकार कोणतेही ठोस उपाय योजत नव्हते. शासकीय कर्मचार्‍यांना मासिक वेतन मिळण्यात विलंब होत होता. सामान्यतः शासकीय कर्मचारी टपाली मतदान अधिक प्रमाणात करतात. यावेळी सुमारे पाच लाख टपाली मतदान झाले. त्यातील जवळपास 78 टक्के मतदान हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) होते हे पुरेसे बोलके. असंतोष सार्वत्रिक होता आणि तोच मतदानातून व्यक्त झाला. हे कसे झाले याचे आकलन आपल्याला होत नसल्याची भावना रेड्डी यांनी व्यक्त केली हे खरे. पण लोकशाहीत मतदानाची तीच खासियत असते. मतदार असा काही कौल देतात की भले भले त्याने घायाळ होऊन जातात.
’रालोआ’च्या यशाची भव्यता
 
सत्तारूढ पक्षाच्या विरोधात असणारा असंतोष नेमका हेरून त्यास विश्वासार्ह पर्याय देणे ही विरोधकांची कसोटी असते. आंध्र प्रदेशात भाजप-तेलुगू देशम-जनसेना पक्ष या आघाडीने घवघवीत यश मिळविले आहे. या आघाडीने 175 पैकी 164 जागा जिंकल्या; त्यात एकट्या तेलुगू देशमच्या 135 जागांचा समावेश आहे. भाजपने विधानसभेच्या 10 जागा लढवून त्यातील 8 वर विजयाचा झेंडा रोवला तर लोकसभेच्या 6 जागा लढवून 3 जागा जिंकल्या. भाजपच्या यशाचे तेवढेच वैशिष्ट्य नाही. ज्या तीन जागा भाजपने जिंकल्या त्या सर्व दोन लाखांहून जास्त मताधिक्याने जिंकल्या आहेत. या विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांचाही समावेश आहे. मात्र या आघाडीत ज्या पक्षाने शत प्रतिशत यश मिळविले तो पक्ष म्हणजे जनसेना पक्ष. पवन कल्याण यांच्या नेतृत्त्वाखाली या पक्षाने लोकसभेच्या दोन जागा लढविल्या आणि दोन्ही जिंकल्या तर विधानसभेच्या लढविलेल्या सर्व 21 जागांवर विजय नोंदविला. असा निकाल क्वचितच पाहायला मिळतो. आता चंद्राबाबू नायडू मंत्रिमंडळात पवन कल्याण उपमुख्यमंत्री झाले आहेत. तेलुगू देशमच्या तुलनेत जनसेना पक्षाच्या आमदारांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी आहेत हे उघड आहे. मात्र केवळ आकडेवारी म्हणजे मर्म नव्हे. पवन कल्याण यांनी गेली दहा वर्षे राजकारणात केलेल्या प्रयोगांची ही परिणती आहेच; पण मुख्य म्हणजे सत्तारूढ वायएसआर काँग्रेसला पराभूत करायचे तर तेलुगू देशम-भाजप-जनसेना पक्ष यांनी एकत्र येण्यावाचून गत्यंतर नाही हे आघाडीतील पक्ष नेतृत्वाच्या गळी उतरविण्यात पवन कल्याण यांचा असणारा आग्रह आणि हट्ट हे त्यांचे मुख्य योगदान. सूर्य किरणांमध्ये एरव्हीही दाहकता असते; पण बहिर्वक्र भिंगातून ते किरण एकवटतात तेव्हा एखादी वस्तू जाळून टाकण्याची क्षमता त्यांत येते. सत्तारूढ पक्षाच्या विरोधात कमालीचा असंतोष असला तरी विरोधक जर विखुरलेले असतील तर त्या असंतोषाची पुरेशी धग मतदानातून प्रकट होत नाही. आघाडीचे ते ‘बहिर्वक्र’ भिंग किती महत्वाचे आहे हे ठसविण्याचे श्रेय निखालस पवन कल्याण यांच्याकडे जाते.
जनसेना पक्षाचे चढ-उतार
पवन कल्याण हे खरे तर अभिनेता; मात्र दक्षिणेतील आघाडीचे कलाकार आणि आपले थोरले बंधू चिरंजीवी यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या माध्यमातून पवन कल्याण यांचा राजकारणाशी संबंध आला. चिरंजीवी यांनी काँग्रेसविरोधात प्रजा राज्यम पक्षाची स्थापना 2008 साली केली. आंध्र प्रदेशात 1990 च्या दशकात अभिनेता एन. टी. रामाराव यांना बिगरकाँग्रेसवादाच्या राजकारणात पदार्पणातच भव्य यश आणि सत्ता मिळाली होती. रामाराव यांच्या त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने चिरंजीवी यांनी राजकारणात उडी घेतली. त्यावेळी पक्षाच्या युवक आघाडीचे नेतृत्व पवन कल्याण करीत असत. मात्र चिरंजीवी यांचा हा राजकीय प्रयोग यशस्वी ठरला नाही. निवडणुकीत त्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाहीच; पण ज्या काँग्रेसचा विरोध करून पक्षाची स्थापना करण्यात आली होती त्याच काँग्रेस पक्षात चिरंजीवी यांनी आपला पक्ष 2011 साली विलीन करून टाकला. त्याचे बक्षीस म्हणून चिरंजीवी यांना जरी राज्यसभेची खासदारकी आणि कालांतराने केंद्रात पर्यटन मंत्रिपद मिळाले तरी पवन कल्याण यांनी मात्र आपल्या बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश करणे टाळले.
आंध्र प्रदेशचे विभाजन केंद्रातील काँग्रेस सरकारने 2013 साली केले. काँग्रेसच्या त्या निर्णयाच्या विरोधात पवन कल्याण यांनी शड्डू ठोकला. काँग्रेसचा विरोध करायचा तर प्रतिस्पर्धी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणे हाच पर्याय त्यांच्यासमोर होता. 2014 सालच्या निवडणुका पवन कल्याण यांच्या नव्या जनसेना पक्षाने लढविल्या नाहीत तरी तेलुगू देशम आणि भाजपला त्यांनी पाठिंबा अवश्य दिला. मात्र 2019 च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष, डावे पक्ष यांच्याशी आघाडी करण्याचा आश्चर्यकारक निर्णय त्यांनी घेतला. त्याचा फटका जनसेना पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसला की विधानसभेच्या लढविलेल्या 137 जागांपैकी अवघ्या एका जागेवर त्या पक्षाला विजय मिळाला. त्यातही पवन कल्याण यांना धक्का बसला तो याचा की तो एकमेव आमदार काही काळातच पक्ष सोडून वायएसआर काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाला. स्वतः पवन कल्याण यांनी दोन जागांवर निवडणूक लढविली होती; दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेलुगू देशम, भाजप आणि जनसेना हे तिन्ही पक्ष त्या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते आणि तिन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला. वायएसआर काँग्रेस दणदणीत बहुमत मिळवत सत्तेत आली. विभक्त झालेल्या तीन पक्षांनी एकत्र येण्याची निकड पवन कल्याण यांना कदाचित त्याचवेळी जाणवली असावी. 2021 साली केलेल्या एका भाषणात त्यांनी ’पराभव म्हणजे अंत नव्हे ’ असे विधान करून आपली विजिगीषा प्रकट केली होती. सत्तारूढ वायएसआर काँग्रेसच्या कारभाराने पवन कल्याण यांना राजकारणात पुन्हा आक्रमकपणे सक्रिय होण्याची संधी दिली.
पवन कल्याण यांची हिंदुत्ववादी भूमिका
जगन मोहन रेड्डी सरकारच्या कारभाराची लक्तरे पवन कल्याण यांनी सातत्याने वेशीवर टांगलीच; पण हिंदू देवतांच्या मंदिरांवर होणार्‍या हल्ल्यांच्या विरोधात पवन कल्याण यांनी जोरदार आवाज उठविला. दोनेक वर्षात आंध्र प्रदेशात जवळपास 120 मंदिरांना किंवा देवतांच्या मूर्तींना लक्ष्य करण्यात आले. यांत 2020 सालच्या डिसेंबर महिन्यात रामतीर्थ मंदिरातील चारशे वर्षे जुन्या मूर्तीच्या झालेल्या विटंबनेचा समावेश होता. अंतर्वेदी लक्ष्मीनारायण स्वामी रथाची नासधूस करण्यात आली. राजमुद्री येथील मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आली. चितूर जिल्ह्यातील एका मंदिरातील नंदीची मूर्ती अशीच 2020 साली लक्ष्य करण्यात आली.
हे सर्व हल्ले होत असताना रेड्डी सरकार कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत पवन कल्याण यांनी प्रथम निषेध नोंदविला. त्यानंतर तेलुगू देशमनेदेखील त्याचे अनुकरण केले. मात्र तेव्हापासून पवन कल्याण यांचा कल हिंदुत्ववादाकडे असल्याचे जाणवू लागले. हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पवन कल्याण यांनी 2020 साली भाजप नेत्यांसह अकरा तासांचे उपोषण केले होते. तत्पूर्वी 2019 साली त्यांनी तिरुपतीला भेट दिल्यानंतर बोलताना सक्तीच्या धर्मातरांना आपला विरोध दर्शविला होता. आपण बेगडी सेक्युलरवादी नसून हिंदू समाजावर अन्याय झाला तर आपण निश्चित आवाज उठवू असे विधान त्यांनी केले होते. 2020 साली महाराष्ट्रात पालघर येथे दोन साधूंना झुंडशाहीमुळे प्राणांना मुकावे लागले होते. त्यावेळी डॉ. डेव्हिड फ़्राउले तथा वामदेव शास्त्री यांनी केलेले ‘ट्विट’ पवन कल्याण यांनी ‘री-ट्विट’ करून आपला हिंदुत्ववादी कल स्पष्ट केला होता. अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा या वर्षीच्या 22 जानेवारी रोजी संपन्न झाला. तेव्हा पवन कल्याण अयोध्येत उपस्थित होते आणि तो सोहळा पाहताना त्यांना भरून आले.
बंधू चिरंजीवी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला असताना पवन कल्याण यांनी मात्र काँग्रेसशी सलगी केली नाहीच; पण हिंदुत्ववादापासून अंतर राखले नाही हे त्यांचे विशेष. हिंदूंबद्दल अनादर दाखवू नका असा इशारा गेल्याच वर्षी त्यांनी जगन मोहन रेड्डी यांना दिला होता. याचाच अर्थ काही काळ पवन कल्याण भाजप आणि तेलुगू देशमपासून दूर झाले असले तरी जनसेना पक्षाची वैचारिक नाळ भाजपशी जुळणारी होती. भाजप हा मुस्लिमविरोधी पक्ष नाही तो हिंदुत्ववादी पक्ष आहे असे पवन कल्याण आवर्जून सांगत. गेल्या वर्षीच्या मध्यास दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या झालेल्या बैठकीत पवन कल्याण उपस्थित होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीतून नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हादेखील पवन कल्याण यांनी हजेरी लावली होती.
राजकीय समंजसपणाचे दर्शन
गेल्या वर्षी (2023) तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगावासाची शिक्षा झाली. नायडू 52 दिवस तुरुंगात होते. नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका जामिनावर केली. मात्र त्यावेळी नायडू यांची तुरुंगात जाऊन पवन कल्याण यांनी आवर्जून भेट घेतली होती. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आगामी निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. एकीकडे भाजप आणि दुसरीकडे तेलुगू देशम अशा दोन्ही पक्षांच्या संपर्कात पवन कल्याण सतत होते; हेतू हाच की तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवाव्यात. अखेरीस पवन कल्याण यांच्या प्रयत्नांना यश आले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील तिन्ही पक्ष वायएसआर काँग्रेसला एकजुटीने सामोरे गेले. पवन कल्याण यांनी राज्यभर यात्रा केली होती आणि तीत मिळणारा प्रतिसाद आश्वासक होता. साहजिकच जागावाटपात आपल्या पक्षाला साठ जागा मिळाव्यात अशी पवन कल्याण यांची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण होताना दिसली नाही तेव्हा व्यापक हितासाठी पवन कल्याण यांनी माघार घेतली; लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या केवळ 21 जागांवर समाधान मानण्यात संकोच केला नाही. त्यामुळे पक्षात नाराजी पसरली. पण पक्षातील अन्य नेते आणि कार्यकर्त्यांची पवन कल्याण यांनी समजूत काढली. पक्षाची व्यूहरचना आपल्यावर सोपवावी आणि यावेळी एकदा आपल्यावर विश्वास दाखवावा अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. त्यावर कार्यकर्ते आणि नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याचे फळ आता मिळालेले दिसते आहे. लढविलेली प्रत्येक जागा जिंकणे हे दुर्मीळ असते. पवन कल्याण यांनी ते करून दाखविले. पिठापुरम मतदारसंघातून ते स्वतः विजयी झाले. तेलुगू देशम ते प्रजा राज्यम पक्ष ते वायएसआर काँग्रेस असा प्रवास केलेल्या पण एकही निवडणूक न हारलेल्या व्ही. गीता यांचा पवन कल्याण यांनी 70 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की जनसेना पक्षाने उमेदवारी दिलेले सर्वच उमेदवार काही मूळचे त्या पक्षाचे नव्हेत. काही उमेदवार अन्य पक्षांतून आलेले देखील होते. विधानसभा निवडणुकीत जनसेना पक्षाची उमेदवारी मिळालेले एक उमेदवार तर उमेदवारी जाहीर होण्याच्या केवळ तीन दिवस अगोदर तेलुगू देशम पक्षातून जनसेना पक्षात आले होते. काही उमेदवार वायएसआर काँग्रेसमधून आयात केलेले होते. जगन मोहन रेड्डी यांनी ऐंशीएक विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली होती. आपल्या पुनर्वसनासाठी ते अन्य पक्षांकडे जाणे अपरिहार्य होते. पवन कल्याण यांनी काहींना संधी दिली. आणि ते विजयीही झाले. मात्र याचा एक अर्थ असा की नेतृत्व म्हणून जगन मोहन रेड्डी यांच्या तुलनेत पवन कल्याण यांच्यावर मतदारांचा भरवसा अधिक होता. ‘रालोआ’चा प्रभाव एवढा होता की जातीय समीकरणानी देखील या आघाडीस साथ दिली.
पवन कल्याण यांच्या या कामगिरीचे काही बोध आहेत. 2019 च्या पराभवाने ते खचले नाहीत किंवा निष्क्रिय झाले नाहीत. उलट भाजप आणि तेलुगू देशम यांची साथ सोडणे महागात पडले हे जाणवल्यावर त्यांनी चूक दुरुस्त केली. दक्षिणेतील राज्यांत उघडपणे हिंदुत्ववादी भूमिका भाजप वगळता अन्य पक्ष क्वचितच घेतात. पण पवन कल्याण यांनी ती भूमिका निःसंकोचपणे घेतली. भाजप आणि तेलुगू देशम हे दोन्ही पक्ष जनसेना पक्षाच्या तुलनेत मोठे आणि जुने. पण म्हणून आघाडी करण्यासाठी त्या दोन्ही पक्षांच्या नेतृत्त्वाला सातत्याने आग्रह करण्यात त्यांनी संकोच मानला नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागावाटपात कमीपणा घेण्याचा राजकीय समंजसपणा आणि व्यापक उद्देशाला प्राधान्य देण्याचे व्यावहारिक शहाणपण त्यांनी दाखविले. जगन मोहन रेड्डी सरकारचा नामुष्कीजनक पराभव होण्यात ‘पवन’ नावाच्या वादळाने निर्माण केलेल्या वातावरणाचा मोठा वाटा आहे. त्यांचे राजकीय प्रस्थ हे त्यामुळेच जिंकलेल्या 21 जागांपेक्षा कितीतरी वाढले आहे!

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार