वारणा - सहकाराचा महामेरू

विवेक मराठी    24-Jun-2024
Total Views |
 
warna
 
@जीवनकुमार शिंदे - 9823242121
 
वारणा खोर्‍याच्या सर्वांगीण विकास-क्रांतीसाठी तात्यासाहेब कोरे यांनी हरित-धवल क्रांतीचे स्वप्न पाहिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे वारणाकाठी कृषी-उद्योगाची नगरी साकारली. वारणानगर हे कृषी-औद्योगिक क्रांतीचे यशस्वी अधिष्ठान ठरले.
1 नोव्हेंबर 1969 रोजी श्री वारणा सहकारी साखर कारखान्याची तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात झाली. पण, त्याने फक्त 20 टक्के ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे भाग्य बदलले. इतर 80 टक्के ग्रामवासीयांना भाग्याची दिशा तात्यासाहेब कोरे यांना दाखवायची होती. जिरायती जमिनीशी झुंज देणारे अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर यांना सुरक्षिततेचे उत्पन्न देणार्‍या कुक्कुटपालनाची आणि अमृत वर्षाव करणार्‍या दुग्ध प्रकल्पाची योजना त्यांनी मांडली आणि साखर नगरीबरोबरच दुग्ध प्रकल्पाची अमृतनगरी येथे उदयास आली.
 
वारणा बाजार ग्राहक सहकारी संस्था असो, की वारणा विभाग शिक्षण मंडळ यासह ’श्री वारणा सहकारी साखर कारखान्या’ची निर्मिती हे ग्रामीण विकासातील तात्यासाहेबांनी टाकलेले ठाम पाऊल महत्त्वपूर्ण आहे. तात्यासाहेबांनी वारणा नदीवर धरण बांधले आणि उपसा जलसिंचन योजना, ग्राम आणि शेतीविकास प्रतिष्ठानामुळे कृषी क्षेत्राला दिशा मिळाली. महात्मा गांधी हॉस्पिटल, सत्कार्य संवर्धक मंडळ, शारदा वाचन मंदिर, वारणा व्यायाम मंडळ याबरोबरच लहान मुलांच्या अंगी असणार्‍या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जगप्रसिद्ध वारणा बालवाद्यवृंदाला चालना देऊन तात्यासाहेबांनी सहकाराची एक जीवनपद्धती वारणानगरमध्ये निर्माण करून सर्वांगीण विकास साधला. आमदार विनय कोरे (सावकार) यांनी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार चळवळीतील मानदंड असणार्‍या वारणा समूहाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीला चालना दिली.
 
श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना (1955)
 
या कारखान्याची 1959साली प्रतिदिनी 1,000 मे.टन गाळप क्षमता होती. आज ती प्रतिदिन 12,500 मे.टन आहे. सहकारी तत्त्वावरील पहिला सर्वात मोठा 44 मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प या कारखान्याने उभारला. शिवाय अशिया खंडाताील पहिला ’वारणा वायर्ड व्हिलेज प्रकल्पा’ची निर्मिती केली. 1975साली कारखान्याच्या निधीतून वारणा नदीवर चार धरणे बांधले. यामुळे 20हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. कारखाना अंतर्गत आज माती परीक्षण प्रयोगशाळा, जिवाणू, गांडूळ खत, वारणा बायोगॅस असे विविध प्रकल्प कार्यान्वित आहेत.
 
श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ (1968)
 
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने वारणा ब्रॅण्डने वारणेची दुग्धजन्य उत्पादनाच्या विक्रीस 1981 साली प्रारंभ झाला. आज प्रतिदिनी 7 लाख लिटर्स दूध संकलन होते. वारणानगर तसेच नवी मुंबई येथे दूध, दही, ताक, तूप, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, दूधपावडर, चीज, बटर, पनीर, फ्लेवर्ड मिल्क, बोर्नव्हिटा, स्टॅमिना, बाईट्स, बिस्कीट्स, आइस्क्रीम इ. दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. नाशिक, बार्शी, मुधोळ, जत, गडहिंग्लज, करमाळा, गणेशवाडी आदी ठिकाणी वारणाचे प्रकल्प कार्यरत आहेत.
 
warna 
 
कृषी व महिलांसाठी कार्य
 
वारणा समूहांकडून कृषी क्षेत्र व महिलांसाठी विविध कार्य केले जात आहे. यामध्ये ’वारणा भगिनी मंडळ व वारणा महिला उद्योग’ (1974) संस्थेच्या माध्यमातून लिज्जत पापड उत्पादन, हॅण्डमेड पेपर, बचतगट, विविध खाद्यपदार्थांचे उत्पादन, वारणा चैतन्य मतिमंद मुलांची शाळा, वारणा गारमेंट उद्योग, दुर्गम भागातील कुटुंबासाठी अभिनव पद्धतीने शेळ्यांचे वाटप केले जाते. ’श्री तात्यासाहेब कोरे वारणा विभाग शेतीपूरक आणि शेती प्रशिक्षण संस्थे’मार्फत शेतकर्‍यांना कमी व्याजदरात अर्थसहाय्य केले जाते. शेतकरी प्रशिक्षण, ठिबक सिंचन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी संदर्भात कार्यक्रम आयोजित केले जातात. वारणा सहकारी कोंबडी संघ अंतर्गत शेतकर्‍यांना पूरक व्यवसायाची जोड मिळत आहे. महिलांसाठी सावित्री औद्योगिक सहकारी संस्था कार्यरत आहे. तर ’श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती वीज निर्माण संस्था’ (2005) अंतर्गत देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे.
 
शिक्षण व बँक क्षेत्रातील योगदान
 
वारणा समूह शिक्षण व बँकीग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. 1964साली ’श्री वारणा विभाग शिक्षण मंडळा’ची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत तात्यासाहेब कोरे आभियांत्रिकी, फार्मसी, शिक्षणशास्त्र, कला, विज्ञान, वाणिज्य, सैनिक शाळा, यासह विविध शैक्षणिक उपक्रम राबिवले जातात. ’वारणा सहकारी बँके’ची 850 कोटीहून अधिक ठेवी आहे. 585 कोटीहून अधिक कर्जपुरवठा केला जातो. ’वारणा महिला सहकारी पतसंस्थे’ची 53 कोटी खेळते भागभांडवल आहे तर 45कोटीहून अधिक ठेवी असणारी महिलांची अग्रेसर पतसंस्था आहे.
 
आरोग्य व इतर कार्य
 
आरोग्य क्षेत्रात ’महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट’ चे कार्य सुरू आहे. या अंतर्गत 300बेडचे ग्रामीण रूग्णालय, दंत व नर्सिंग महाविद्यालय, ब्लड बँक कार्यरत आहे. कुस्तीगिरांसाठी वारणा व्यायाम मंदिर प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. वारणानगर येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. युवकांसाठी ’सुराज्य फाउंडेशन’ च्या माध्यमातून भरीव असे कार्य सुरू आहे. यामध्ये ’सुराज्य स्पर्धा परीक्षा फाउंडेशन’ कोर्स, योगविज्ञान शिबीर, कोल्हापूर महोत्सव आदी उपक्रम वैशिष्टयपूर्ण आहेत. वारणा समूहाने अशा विविध कार्यातून लाखो कुटुंबाला आधार दिला आहे.
 
लेखक श्री वारणा विभाग शिक्षण मंडळातील प्रशासकीय अधिकारी आहेत.