ओडिशा - राजकीय सौहार्दाचे बेट

विवेक मराठी    22-Jun-2024   
Total Views |
ओडिशामध्ये झालेलेे सत्तांतर अतिशय खिलाडूवृत्तीच्या वातावरणात झाले. शेजारच्याच आंध्र प्रदेश आणि प. बंगाल या राज्यांमधील राजकीय शत्रुत्वाचे भेसूर चित्र दिसत असताना आणि देशातील एकूणच वातावरण तसे असल्याचे दिसत असताना ओडिशा हे राजकीय सौहार्दाचे बेट असल्याचे दर्शन सर्व भारतीयांना घडले.
bjp
राजकारणातील उमदेपणा आणि नर्मविनोद हरपला आहे, याची खंत पंतप्रधान मोदी अधूनमधून बोलून दाखवत असतात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने लोकप्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालणे, हे अगदी सामान्य झालेले आहे. सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदासाठी निवड झाल्यावर जगभरातील विविध नेत्यांनी मोदींचे अभिनंदन केले. त्यास प्रमुख अपवाद होता तो चिनी अध्यक्षांचा. राहुल गांधींसह इंडी आघाडीच्या विविध नेत्यांचे देशात नेमके असेच वर्तन होते. त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन करण्याचे टाळले. पंतप्रधानांच्या शपथविधीलादेखील काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याव्यतिरिक्त कोणी उपस्थित राहिले नाही.
 
या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय कटूपणा टाळणाराच नव्हे; तर एकूणच मनाचा उमदेपणा दाखवणारा एक नेता आपल्यात असल्याचे देशाने पाहिले. दीर्घकाळ ओडिशाचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि आताच्या राज्य विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावलेले बिजू जनता दल या पक्षाचे नेते नवीन पटनायक. त्यांचे वडील व ओडिशाचे प्रभावशाली नेते असलेले बिजू पटनायक यांचे 1997 मध्ये पुरीमधील अंत्यसंस्कार झाल्यावर त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात आले होते. ते काढून टाकण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाकडून आल्यानंतर पुढे त्यास स्थगिती मिळवण्यात आली होती. मात्र या बांधकामामुळे सामान्य लोकांना खरोखरच त्रास होत असल्याचे लक्षात आल्यावर नवीन पटनायक यांच्या सरकारने स्वत:च हे स्मारक तेथून हलवले. देशात विविध मार्गांनी जमिनी बळकावण्याचे प्रकार सर्रास होत असताना नवीन यांच्या सरकारने उचललेले हे पाऊल विशेष समजले गेले.
 
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर ओडिशा राज्याच्या विधानसभेसाठीदेखील मतदान झाले. त्यापूर्वी नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि भाजप यांच्या संबंधांमध्ये बरेच चढउतार पाहायला मिळाले होते. 2008 मध्ये कंधमाल जिल्ह्यात धर्मांतरित झालेल्या आदिवासींच्या साहाय्याने माओवाद्यांनी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर तेथे मोठा हिंसाचार उसळला होता. पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवीन यांनी भाजपशी असलेली युती तोडली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस व भाजपपासून समान अंतर ठेवले असले तरी भाजपबरोबरचे संबंध संघर्षाचे नव्हते. 2019 मध्ये तर राज्यसभेच्या आपल्या कोट्यामधून त्यांनी भाजपच्या अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी देण्याचा उमदेपणा दाखवला होता.

bjp 
 
या सर्व पार्श्वभूमीवर ओडिशामधील आताची निवडणूक भाजप आणि बिजू जनता दल यांच्यातील शाब्दिक तणावपूर्व वातावरणात झाली. आजवरच्या निवडणुकांमध्ये भाजपने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना वैयक्तिक पातळीवर लक्ष्य केले नव्हते. नवीन यांची तब्येत ढासळली असल्याचे प्रदर्शन सार्वजनिकपणे होत होते. व्ही. के. पांडियन हे तमिळ मुळाचे माजी प्रशासकीय अधिकारी नवीन यांच्या वतीने कारभार एकहाती पद्धतीने चालवत आहेत हे स्पष्ट दिसू लागले होते. त्यातच नवीन यांनी आपला राजकीय वारसदार नेमलेला नसल्यामुळे आगामी काळात ओडिशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल याबाबतची संदिग्धता वाढत चालली होती. नवीन यांची लोकप्रियता अबाधित असली तरी 2021च्या निती आयोगाच्या अहवालामध्ये ओडिशा शाश्वत विकास ध्येयांच्या अनेक निकषांवर देशातील सर्वात मागास राज्यांमध्ये असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. या सर्व परिस्थितीत भाजपला निवडणुकीमध्ये पूर्ण जोर लावणे भाग होते. नवीन यांचे एके काळचे सहकारी असलेले भाजप नेते वैजयंत पांडा मवाळ समजले जातात. त्यांनीही या वेळी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले.
 
लोकसभा निवडणुकीत भाजपने 21 पैकी 20 ठिकाणी विजय मिळवत एकतर्फी यश प्राप्त केले असले तरी विधानसभेमध्ये 147 पैकी 78 जागा जिंकणार्‍या भाजपकडे निसटते बहुमत आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी विधानसभेत शपथ घेण्याच्या कार्यक्रमात एकूणच खेळीमेळीच्या वातावरणाचे दर्शन सर्वांना घडले. नवीन पटनायक यांनी सभागृहात प्रवेश केल्यावर सत्ताधारी भाजप आमदारांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना भाजपच्या एका आमदाराने दोन्ही हात जोडून त्यांना आपला परिचय करून दिला. ‘ओहो, तुम्हीच माझा पराभव केला ना! अभिनंदन,’ असे सहजोद्गार नवीन यांनी काढले. नवीन यांना त्यांच्या नेहमीच्या मतदारसंघातही निसटता विजय मिळाला आहे. तत्पूर्वी ओडिशाच्या नव्या सरकारच्या शपथविधी समारंभामध्येही अशाच सौहार्दाचे दर्शन घडले. नवीन पटनायक यांना या समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी ओडिशा भाजपचे अध्यक्ष मनमोहन सामल त्यांच्या निवासस्थानी गेले. मुख्यमंत्रीपदी निवड झालेले स्वत: मोहन चरण मांझी यांनीदेखील शपथविधीच्या दिवशी नवीन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुन्हा निमंत्रण दिले. नवीन या समारंभास उपस्थित राहिले. एवढेच नव्हे; तर शपथविधी समारंभादरम्यान त्यांना अन्य भाजप नेत्यांसमवेत व्यासपीठावर सन्मानाने स्थानापन्न केले गेले. त्या वेळी ते तेथे उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांना अतिशय आपुलकीने भेटले. नवनिर्वाचित मुख्यमंत्री मांझी नवीन यांना अतिशय नम्रपणे भेटले. नवीन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोड्या वेळाने व्यासपीठावर आलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना नवीन यांच्या उपस्थितीबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितल्यावर राजनाथ ज्या लगबगीने नवीन यांना भेटायला गेले ते दृश्य अतिशय सुंदर असे होते. शपथविधी पार पडल्यावर स्वत: पंतप्रधान मोदी नवीन यांना भेटले आणि थोडा वेळ त्यांच्याशी बोलले. तब्बल 24 वर्षांनंतर ओडिशामध्ये झालेले हे सत्तांतर असे अतिशय खिलाडूवृत्तीच्या वातावरणात झाले. शेजारच्याच आंध्र प्रदेश आणि प. बंगाल या राज्यांमधील राजकीय शत्रुत्वाचे भेसूर चित्र दिसत असताना आणि देशातील एकूणच वातावरण तसे असल्याचे दिसत असताना ओडिशा हे राजकीय सौहार्दाचे बेट असल्याचे दर्शन सर्व भारतीयांना घडले. अशीच सौहार्दवृद्धी देशभरात होवो, अशी भावना देशवासीयांमध्ये निर्माण झाल्यास नवल वाटू नये.