तारतम्याचा अभाव

20 Jun 2024 18:24:03
 
मस्कच्या विधानानंतर या बाबींवर विचार न करता वा कळूनही तिकडे सोयीस्कर कानाडोळा करत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी भारतातील मतदान यंत्रणेवर आणि त्याआडून भाजपावर टीका करायला सुरुवात केली. या आधारे देशभरात संभ्रमावस्था निर्माण करणे, रालोआत फाटाफूट करण्याचा प्रयत्न हे हेतू त्यामागे असू शकतात. मात्र असे करणे हे काही परिपक्व राजकीय नेत्याचे लक्षण नाही, तर तारतम्याच्या अभावाचे ते निदर्शक आहे. 

vivek
 
जूनला भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले. या निकालामुळे इंडी आघाडी आणि विरोधकांमध्ये एकदम आनंदाची लाट उसळली. ही लाट इतकी प्रबळ होती की, त्यात सगळ्या विरोधकांचा ईव्हीएमबद्दलचा संशय पार लयाला गेला. या मतमोजणी यंत्राबद्दलचे त्यांचे सगळे आक्षेप, तोवर केलेली बिनबुडाची टीका सगळे काही एका निकालाने निष्प्रभ केले. ही बाब कोणत्याही सर्वसामान्य, सजग मतदाराच्या लक्षात येण्याजोगी होती.
 
निकालाच्या दिवशी भाजपा मुख्यालयात झालेल्या विजयी सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना एक चिमटा काढला, ‘ईव्हीएम का क्या हुआ? वो मर गया क्या?’ सत्ता प्राप्त केली तरी भाजपाला अपेक्षेपेक्षा व आधीच्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्याच्या आसुरी आनंदात, पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याच्या आपल्या सवयीचा या राजकीय पक्षांना विसर पडला होता.
 
भाजपाप्रणीत रालोआचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तिसर्‍यांदा सत्तेवर आले. शपथविधी पार पडला. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी सरकारला दिलेल्या नि:संदिग्ध पाठिंब्यामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांना आपली मळमळ बाहेर काढण्यासाठी पुन्हा ईव्हीएमच्याच वळचणीला जावे लागले. या वेळी त्यांना निमित्त मिळाले ते जगप्रसिद्ध उद्योजक, ‘टेस्ला’चे संस्थापक आणि समाजमाध्यमातील ‘एक्स’ या प्रभावी माध्यमाचे मालक असलेल्या एलॉन मस्क यांच्या उद्गाराचे.
 
मस्क यांचे उद्गार संभ्रम निर्माण करणारे असले तरी या उद्गाराचा संदर्भ भारतीय निवडणूक नव्हता; पण वडाची साल पिंपळाला लावण्याची खोड असलेल्या भारतीय राजकारणातील भाजपा विरोधकांनी यावरून रण माजवायला सुरुवात केली. राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासारखे नेते तर ईव्हीएमच्या आडून सत्ताधार्‍यांवर टीका करण्याच्या नादात हेही विसरले की, देशभरात कमी फरकाने जिंकलेल्या खासदारांमध्ये त्यांच्या पक्षांचेही खासदार असू शकतात. ईव्हीएम यंत्रणा वापरात येण्यापूर्वी या देशात जी मतदान पद्धती होती, त्यात गुंडगिरी करत मतपत्रिका/मतपेट्या पळवण्याचे उद्योग सर्रास चालू होते आणि त्याचा निकालावर गंभीर परिणाम होत असे. त्या भूतकाळाचाही या विरोधकांंना सोयीस्कर विसर पडला. पोर्टो रिको या कॅरेबियन बेटावरील अमेरिकन नागरिकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही. तिथे गव्हर्नरपदासाठी निवडणुका होतात. त्या नोव्हेंबरमध्ये आहेत. त्याआधी उमेदवारनिश्चितीसाठी झालेल्या प्राथमिक निवडणुकीत ईव्हीएमचा वापर झाला. त्यासाठी डॉमिनियन व्होटिंग सिस्टीम्स या अमेरिकेतील कंपनीने बनविलेली उत्पादने वापरण्यात आली आणि मतदानाच्या आकडेवारीत गोंधळ झाले. प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मिळालेली मते यांचे गणित जुळले नाही. काही उमेदवारांना तर शून्य मतदान झाले. शेवटी या यंत्राबरोबर झालेल्या पेपर ट्रेलवरून मतमोजणी करून निवडणूक अधिकार्‍यांनी मार्ग काढला. तेव्हा या पार्श्वभूमीवर, ‘अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करणे बंद केले पाहिजे,’ असे विधान या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांनी केले. या घटनेचा व या उद्गाराचा संदर्भ एलॉन मस्क यांच्या वक्तव्याला आहे. त्या दोघांमध्ये ‘एक्स’ या समाजमाध्यमावर काही प्रश्नोत्तरे झाली, त्यात, ‘ईव्हीएम हॅक होऊ शकतात म्हणून त्यावर बंदी घातली पाहिजे’, असेे वक्तव्य मस्क यांनी केले.
 
अमेरिकेत वापरण्यात येणारी मतदान यंत्रे, जगभरात अन्यत्र वापरली जाणारी मतदान यंत्रे आणि भारतातील मतदान यंत्रे यात मूलभूत फरक आहे. निवडणूक आयोगाने ‘इलेक्ट्रॉनिककॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ आणि ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या दोन कंपन्यांच्या मदतीने ईव्हीएम - इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची निर्मिती केली. प्रायोगिक तत्त्वावर 1982 साली केरळच्या निवडणुकीत या यंत्राचा प्रथम वापर झाला तरी त्या वेळी या यंत्राच्या वापराबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने ती निवडणूक रद्दबातल ठरवली. पुढे सर्व अडथळे पार होऊन, 2004 च्या निवडणुकीपासून लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांसाठी ईव्हीएम देशभरात वापरले जाऊ लागले. सर्व प्रकारच्या कसोट्या यशस्वीपणे पूर्ण करणारी ही यंत्रणा तेव्हापासूनच विरोधकांच्या पचनी पडलेली नाही. वास्तविक ईव्हीएमचे प्रत्येक मशीन स्वतंत्र बनवलेले असते. ते कोणत्याही अन्य उपकरणाला जोडले जाणे शक्य नसल्याने ‘स्टँड अलोन’ अशा प्रकारात मोडते. हे मशीन तयार करताना, त्यावर मतपत्रिका बनवताना आणि मतमोजणीच्या वेळी राजकीय पक्ष, उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत, त्यांच्या स्वाक्षरीने संपूर्ण कार्यपद्धतीचे छायाचित्रण करून कार्यवाही होते. जगातल्या अन्य देशांमधील निवडणूक प्रक्रियांचा आढावा घेतल्यानंतर, प्यू या जागतिक कीर्तीच्या संशोधन संस्थेने ईव्हीएमद्वारा निवडणूक घेणे हे सर्वाधिक विश्वासार्ह असल्याचा निर्वाळा दिला आहे. वादग्रस्त आणि लहरी विधानांसाठी मस्क ओळखले जातात. समाजमाध्यमात ईव्हीएमसंदर्भात त्यांनी उपस्थित केलेल्या शंकेचे माजी मंत्री आणि या विषयातील तज्ज्ञ राजीव चंद्रशेखर यांनी सप्रमाण खंडन केल्यावरही त्यांनी आपला हेका कायम ठेवला. म्हणूनच त्यामागे काही छुपे हेतू/स्वार्थ असू शकतात, अशी शंका घ्यायला वाव आहे. निवडणुकीच्या दरम्यानच ‘टेस्ला’संदर्भात बोलणी करण्यासाठी मस्क भारतात येणार होते. मात्र त्याऐवजी तो नियोजित दौरा रद्द करत ते चीनमध्ये पोहोचले. भारताने ‘टेस्ला’ कंपनीला भारतात गाड्या विकायला मज्जाव केला नव्हता, मात्र त्यातले काही भाग भारतात बनवा आणि मग विका, अशी अट घातली होती ती ‘मेक इन इंडिया’ या धोरणाशी सुसंगत होती. ती पटली नाही. तेव्हा त्यांच्या ईव्हीएमसंदर्भातल्या विधानामागे हे निमित्त असू शकते.
मस्कच्या विधानानंतर या बाबींवर विचार न करता वा कळूनही तिकडे सोयीस्कर कानाडोळा करत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी भारतातील मतदान यंत्रणेवर आणि त्याआडून भाजपावर टीका करायला सुरुवात केली. या आधारे देशभरात संभ्रमावस्था निर्माण करणे, रालोआत फाटाफूट करण्याचा प्रयत्न हे हेतू त्यामागे असू शकतात. मात्र असे करणे हे काही परिपक्व राजकीय नेत्याचे लक्षण नाही, तर तारतम्याच्या अभावाचे ते निदर्शक आहे. त्याऐवजी विरोधी पक्ष म्हणून संसदेत जबाबदारीने काम करावे, हे उत्तम.
 
Powered By Sangraha 9.0