‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ आरोग्याची गुरुकिल्ली

विवेक मराठी    15-Jun-2024
Total Views |
vivek
‘प्राणायाम - एक अमृतानुभव’
• लेखक - योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन
• मूल्य - 250
• सवलत मूल्य - 225
• नोंदणीसाठी संपर्क - 9594961858
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
योगाचार्य मनोज पटवर्धन सरांच्या पुस्तकास प्रस्तावना लिहिणे हे खरं तर माझं धाडसच म्हणायला हवं. एका ‘सर्जन’ने ‘सर्जनशील योग्या’विषयी लिहिणं लोकांना आवडेल, अशी आशा करते.
 
 
योगाच्या प्रत्येक अंगाविषयी त्यांना सखोल जाण आहे. या विषयावर त्यांनी नुसती माहितीच नाही, तर संपूर्ण प्रभुत्व मिळवलेलं आहे. ते स्वतः अनेक वर्षं योगसाधना करत आहेत. योगाच्या प्रसाराबरोबरच प्रशिक्षणही देत आहेत.
 
 
‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक अत्यंत माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण असून त्यातील माहिती ही सर्वसामान्यांना कळेल अशीच आहे. अत्यंत गहन विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी अत्यंत महत्त्वाची व अवर्णनीय आहे. आजवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात ‘ध्यान - एक आनंदयात्रा’ या ध्यानसाधनेवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या पुस्तकाचाही समावेश आहे. ध्यानासारखा अतिशय गहन, गूढ विषय त्यांनी आपल्यासाठी अत्यंत सोपा करून ठेवला आहे. हेच प्राणायामाबद्दलही म्हणता येईल. खरं तर आरोग्याची गुरुकिल्लीच त्यांनी आपल्या हातात दिलेली आहे. आता याचा उपयोग करून आरोग्य सुधारणे हे आपल्या हातात आहे.
 
 
योगाचार्य पटवर्धन सर नुसतं लिहीत नाहीत, तर प्रत्येक विषयाचा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीनं करतात. त्याचा पूर्ण अनुभव घेऊन ते शास्त्र आत्मसात करतात. असाच अनेकविध अनुभवांनी समृद्ध असा ‘प्राणायाम’ हा अमृतकुंभ आज त्यांनी आपल्या हातात दिलेला आहे. त्यांच्या सर्व लेखनाला शास्त्रीय आधार तर आहेच; पण सर्व गोष्टी संशोधन करून, प्रयोग करून, सिद्ध करून मगच त्यांनी लिहिलेल्या आहेत. प्राणायाम ही अत्यंत प्राचीन पद्धती आहे, ज्यामुळे मनुष्याचे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक स्वास्थ्यही सुधारते.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी 
प्राणायाम एक अमृतानुभव

लेखक – योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन

सवलत मूल्य : २२५/-
 
 
 
 'Breath is not just air, but it is life' असं म्हटलं जातं. श्वास घेणं म्हणजे नुसती फुप्फुसात हवा भरणं नाही. श्वास घेण्याची ती एक पद्धत आहे. त्या प्रकाराने श्वास घेतला तर शरीराला, मनाला नक्की फायदा होतो. प्राणायाम आपल्याला हेच शिकवतो. प्राणायामाने श्वासावर नियंत्रण करून योग्य तो शारीरिक व मानसिक फायदा आपण मिळवू शकतो.
श्वासाचा मनावर कसा परिणाम होतो ते पाहा.
 
 
राग, भीती, अस्वस्थता या भावना श्वास अस्थिर करतात. याउलट मन शांत असेल तर श्वासही मंद व संथ चालतो. असंही म्हटलं जातं की, ‘मनाचं नियंत्रण करण्याचं शास्त्र म्हणजे प्राणायाम’. नियमित प्राणायामाच्या अभ्यासाने श्वासावर नियंत्रण मिळवल्यास मनुष्य निरोगी राहतो. त्याला आत्मिक, मानसिक, शारीरिक बलही लाभते व त्यामुळे दीर्घायुष्य लाभतं.
 
 
या साधनेनं श्वसनक्षमता वाढते. शरीरास भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यानं रक्ताभिसरणात सुधारणा होते. मानसिक ताणतणाव कमी होतात व प्राणिक शक्ती, ऊर्जा वाढते. तसेच यामुळे फुप्फुसांचं कार्यही सुधारतं. फुप्फुसांची हवा आत घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे रक्ताभिसरण नीट होतं. रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. नियमित प्राणायामाने रक्तकोषिकाचं, ऑक्सिजन आत घेण्याचं व कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्याचं कार्य सुधारते. त्यामुळे फुप्फुसाच्या कार्यात सुधारणा होऊन त्यांची क्षमता व ताकदही वाढते. श्वासगती नियंत्रित झाल्याने ताणतणाव कमी होतात व मनुष्य शांत होतो.
 
 
प्राणायामाने मस्तिष्काच्या क्षेत्रातही बदल होतो. मेंदूला नीट व भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे मन शांत राहतं. मेंदूवर ताण न येता त्याचं कार्य स्थिर होण्यास खूप मदत होते. प्राणायामाने ‘ऑटॉनॉमिक नर्व्हस सिस्टीम’ संतुलित होते. त्यातून ‘पॅरासिंपथेटिक अ‍ॅक्टिव्हिटी’ वाढून ‘सिंपथेटिक अ‍ॅक्टिव्हिटी’ कमी होते. हे झाल्याने अंक्झायटी, ताणतणाव व डिप्रेशनही कमी होतात व मनुष्य आनंदी राहू लागतो. तसेच नेत्रासही ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा झाल्याने नेत्राचे कार्य सुधारते. चष्म्याचा नंबरही भराभरा वाढत नाही.
 
 
वेदांतही याची महती वर्णलेली आहे. वेदांच्या उपाख्यानात एक जिज्ञासू ऋषींना विचारतो, ‘कस्मिन् नु विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति।’
 
 
तेव्हा ऋषी उत्तर देतात, ‘प्राणतत्त्व जाणल्यावर बाकी काही जाणण्याची आवश्यकताच राहात नाही.’
 
 
‘प्राणायामाच्या नियमित अभ्यासाने श्वास आणि मन यांचे काम एकात्मिकतेने सुरू होते. त्यामुळे फुप्फुसांची क्षमता, मनोबल, शारीरिक बल सुधारतं. बर्‍याच शारीरिक व मानसिक व्याधींवर विजय मिळवता येतो. हृदयबलही वाढतं, शरीराचं एकूण स्वास्थ्य सुधारतं. रक्तप्रवाह नीट सुरळीत होतो व भरपूर ऑक्सिजन मिळाल्याने हृदयाची कार्यशीलताही सुधारते.’ हे सर्व प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे.
 
 
मात्र यासाठी हा अभ्यास नियमित करावा लागतो. तसेच योगाचार्य पटवर्धन सरांसारख्या गुरूंच्या निरीक्षणाखाली पूर्ण शिकून घ्यावा लागतो. ब्लडप्रेशर व हृदयरोग असणार्‍या व्यक्तींनी मात्र हा अभ्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. तसेच गर्भवती महिलांनीही डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच सराव करावा. प्राणायाम करण्यास सुरुवात केली तरी, आजारावरचं औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज अजिबात बंद करू नये. थोडक्यात काय, तर शरीर-मन-मस्तिष्क-फुप्फुसे यांच्या कार्यात सुधारणा करून, जास्तीत जास्त चांगले परिणाम करणारं हे शास्त्र आहे.
 
 
या पुस्तकाच्या वाचनाने आपल्या सर्व शंका दूर होतील व शास्त्रशुद्ध प्राणायामाचं महत्त्व आपणास समजून येईल. ‘हे पुस्तक वाचणार्‍याला प्राणायामाविषयी मनात कोणताही संदेह राहू नये’ असं महत्त्वाचं कार्य पटवर्धन सरांनी केलं आहे. या पुस्तकाच्या रूपाने ‘त्यांचा सखोल अभ्यास, विषयाच्या मुळापर्यंत जाऊन केलेला विचार’ ही एक मोठी ठेवच आपल्या हातात त्यांनी दिलेली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आरोग्याची, मानसिक स्वास्थ्याची गुरुकिल्ली हरवून बसला आहे. त्यामुळे मी म्हणेन की, हे पुस्तक म्हणजे आजच्या जगात आपणास मिळालेला एक ठेवाच आहे. प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचावे, विचारपूर्वक अभ्यासावे व आपले आरोग्य सुधारावे, ही नम्र विनंती मी आपणास करत आहे.
 
 
- डॉ. शीलादेवी टिळक
प्रख्यात ईएनटी सर्जन