बीडीडी चाळीतला तरुण ते महायुतीचा उमेदवार

विवेक मराठी    15-Jun-2024
Total Views |
@योगिता साळवी
वरळीच्या बीडीडी चाळीतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातले, घरोघरी वृत्तपत्रे टाकून आलेल्या पैशातून उच्च शिक्षण घेणारे, स्वकर्तृत्वाने मुंबईच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटवणारे किरण रवींद्र शेलार यांना मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीची उमेदवारी मिळाली. त्यानिमित्ताने किरण सर आणि त्यांच्या संदर्भातल्या अनेक घटना आठवल्या. त्यातील काही या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Kiran Shelar
 
2018 साल होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या नाशिक आवृत्तीकरिता उपसंपादक पदासाठी जागा रिक्त होती. त्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार होतो. मात्र काही कारणास्तव मुलाखतीचा दिवस पुढे ढकलला. तसा निरोप इच्छुक उमेदवारांना दिला तरी एका उमेदवाराला संपर्क करण्याचे राहून गेले. त्यामुळे हा उमेदवार अगोदर ठरलेल्या दिवशीच हजर झाला. त्याच्याबद्दल किरण सरांना सांगितले. यावर एक क्षण थांबत किरण सर म्हणाले, “टळटळीत उन्हात तो मुलाखतीसाठी नाशिकहून आला आहे. त्यासाठी घरातून पहाटेच निघाला असेल. मिळेल त्या वाहनाने उपाशीतापाशी मुंबईपर्यंतचा प्रवास त्याने केला असेल. कदाचित त्यासाठीचा प्रवास खर्च कुठून तरी उभा केला असेल आणि आता त्याला आपण काय सांगणार आहोत, की मुलाखत पोस्टपोन झाली. त्याच्या जेवणाची व्यवस्था करा. मुलाखत घ्या.” वास्तविक त्या दिवशी त्यांना इतर कामांचा व्याप होता. मात्र नोकरीसाठी मुलाखत द्यायला आलेल्या त्या तरुणाच्या परिस्थितीबद्दल किरण सरांनी इतका आत्मीयतेने विचार केला होता! संपादकाच्या चेहर्‍यामागे खरे माणूसपण जपणारे किरण सर. तेच आज महायुतीचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. पदवीधर युवकांच्या आशाआकांक्षा, त्यांची स्वप्ने, त्यांचे वास्तव जाणून घेणारा त्या जागेसाठी खरोखर योग्य उमेदवार म्हणजे किरण शेलार सर.
 

Kiran Shelar 
चेंबूरच्या चाळसदृश वास्तूत असलेले दै. ‘मुंबई तरुण भारत’चे कार्यालय आज वडाळा येथे भव्य जागेत आहे. तसे होण्यात किरण सरांचा सिंहाचा वाटा आहे. हे यासाठी सांगायला हवे की, अत्यंत तरुण वयात संस्थात्मक कामात ‘सब को साथ लिये’ हा विचार कृतीत उतरवत यश मिळवण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा किरण सरांचा गाढा अभ्यास आहे. भारतीय संस्कृतीसोबतच जागतिक प्राचीन आणि आधुनिक घडामोडींसंदर्भातले त्यांचे चिंतनही थक्क करणारे आहे. त्यांच्या कार्यालयात अवलोकितेश्वर गौतम बुद्धांचा एक पुतळा आहे. गौतम बुद्ध, त्यांना मिळालेले निर्वाण आणि सध्याच्या जगभरातल्या आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय चळवळींबाबत अतिशय रंजक शैलीत माहिती देताना किरण सर अनेकदा रंगून जातात. पुस्तकात, साहित्यात रमणार्‍या सरांनी कार्यालयात हौसेने कुंड्यांमध्ये वेगवेगळी झाडे, वेली लावल्या आहेत. कार्यालयात शिपाई म्हणून अनेक जण असतानादेखील या झाडांची निगा किरण सर स्वत: राखतात. कितीही कामात असले तरी या रोपट्यांना पाणी घालणे, त्यांना मानवेल इतके खत घालणे तसेच फिश टँकमधील माशांना खाऊ घालणे, मन लावून फिश टँकमधले पाणी बदलणे, हे सगळे ते हौसेने करत असतात. पूर्वी मला या सगळ्याचे आश्चर्य वाटायचे; पण मग कळले की, ते पर्यावरणप्रेमी आहेत.
 
 
पर्यावरणविषयक चळवळीत काम करणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पशुपक्षी, अगदी सापालासुद्धा सोडवून त्यांचे सुरक्षित जागी स्थलांतर ते करत असतात. पशुपक्षी, वृक्षांबद्दल प्रचंड प्रेम असणारे सर माणसांच्या माणूसपणावरही तितकेच प्रेम करतात यात नवल ते काय?
 

Kiran Shelar 
जातिभेदापलीकडे जाऊन समाजाने एक राहिले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत. त्यासाठी शोषित, वंचित समाजातील अंत्यज म्हणजे शेवटच्या रांगेतील व्यक्तीपर्यंत समानतेची आणि विकासाची, प्रगतीची संधी गेलीच पाहिजे, या दृष्टीने काम केले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष.
 
समाजातील सुशिक्षित युवकांना योग्य व्यासपीठ मिळायलाच हवे यासाठीची सरांची तळमळ अनेकदा अनुभवली आहे. पदवीधर मातंग युवती परिषद याचे उत्तम उदाहरण ठरावे. वंचित समाजातील युवती प्रचंड संघर्ष करत पदवीधर होतात. त्यांचे पुढे काय होते? त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणात्मक वातावरण मिळाले, तर त्यांचे आयुष्य सकारात्मक यशाने उजळेल, या विचाराने मातंग समाजातील पदवीधर युवतींची परिषद आयोजित करावी, हा त्यांचाच निर्णय. ठरवले त्याप्रमाणे त्यांनी मातंग समाजाच्या पदवीधर युवतींच्या शिबिराचे भव्य आयोजनही केले.
 
किरण सरांचे मार्गदर्शन आणि अक्षरश: सर्वतोपरी सहकार्य होते म्हणूनच मातंग समाजातील पदवीधर मुलींच्या मेळाव्याचे यशस्वीरीत्या आयोजन आम्ही करू शकलो. पुढे किरण सरांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून बौद्ध, चर्मकार आणि रामोशी समाजातील युवक-युवतींसाठी रोजगार मार्गदर्शनसंदर्भात झालेले मेळावेही असेच मैलाचा दगड ठरले. वंचित समाजातील होतकरू आणि संधी नाकारलेल्या युवक-युवतींना शिक्षणाची, रोजगाराची संधी मिळावी म्हणून आयोजित केलेले ते मेळावे. या मेळाव्यातून अठरापगड जातींतले युवक-युवती सकारात्मकता, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन गेले. पदवीधर संघाचे आमदार नसतानाही गेले दोन दशक युवक-युवतींचा उच्च शिक्षणाचा टक्का वाढावा, त्यांना रोजगार मिळावा यासाठी प्रेरणा देणारे, सहकार्य करणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे किरण सर. त्यांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. उद्या जिंकून आले तर त्यांचे हे काम आणखीन जोमाने वाढेल यात काही शंका नाही.
 

Kiran Shelar 
असो. कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराचे कर्तृृत्व आणि कामासंदर्भातील नियोजन दृष्टी महत्त्वाची असते. या दृष्टीने किरण सरांचे पदवीधर मतदारसंघासाठीचे नियोजित लक्ष्य काय आहे? याचा मागोवा घेतला. अर्थातच वरळी बीडीडी चाळीतला मध्यमवगीर्र्य कुटुंबातला तरुण जेव्हा स्वकष्टाने प्रचंड संघर्ष करत स्वत:चे अस्तित्व निर्माण करतो तेव्हा त्याचे जे लक्ष्य असेल तेच किरण सरांचे आहे. पदवीधर तरुणासमोर उभ्या असलेल्या समस्या मार्गी लावणे हे तर आहेच; त्याशिवाय व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, रोजगार, आरोग्य, निवास, पर्यावरण आणि मुख्यत: ‘मुंबई मेरी जान’ ही भावना मनात ठेवून केलेल्या कामाच्या अनेक योजना त्यांच्या मनात आहेत. घरोघरी वर्तमानपत्र टाकून स्वत:चे शिक्षण पूर्ण केलेले किरण सर म्हणूनच आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या युवकांच्या कथा आणि व्यथा जाणतात. ते त्यांच्या समस्या समजून घेतील आणि त्यावर समाधानकारक तोडगाही सुचवतील. ज्याने संघर्ष केला आहे, ज्याने परिस्थिती भोगली आहे त्याला दुसर्‍याचे दु:ख समजते.
 
आणि आणखी एक त्यांचे वैशिष्ट्य... विनाकरण अंगावर आले, की ते शिंगावर घेण्याची धमक किरण सरांकडे आहे. अनेकदा बातम्या संकलित करताना किंवा लेख लिहिताना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वार्ताहर किंवा उपसंपादकांना धमक्या येतात. अशा वेळी जर वार्ताहर किंवा उपसंपादकाची चूक असेल, तर किरण सर त्या संदर्भात त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात. मात्र जर त्यांनी पत्रकारितेला अनुसरून योग्य बातमी केली असेल, लेख लिहिला असेल आणि तरीही कुणी जर त्या पत्रकाराला किंवा उपसंपादकाला त्रास देत असेल, तर मग किरण सर पालकाची भूमिका घेऊन त्या पत्रकाराला, उपसंपादकाला संरक्षण देतात. अगदी कार्यालयाच्या सगळ्या स्टाफची बैठक घेऊन कौतुक, अभिनंदनही करतात. दुसरीकडे त्या त्रास देणार्‍याला कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो धडाही शिकवतात. आज महाराष्ट्राच्या अनेक आघाडीच्या वर्तमानपत्रांत नावारूपाला आलेले पत्रकार, निवेदक हे किरण सरांच्या अशा तालमीत घडले आहेत. सहकार्‍यांना तसेच संपर्कातील सगळ्यांना स्वप्न देऊन ते पूर्ण करण्यासाठी बळ देणारे किरण सर पदवीधर निवडणुकीत जिंकले, तर अनेक युवक-युवतींचे भवितव्य उज्ज्वल होईल.
 
 
स्वामी विवेकानंद यांनी तरुणाई कशी हवी यासंदर्भात विचार मांडले होते... ‘मला असे युवक हवे आहेत, जे मनाने कणखर, शक्तिसंपन्न, संस्कारक्षम, राष्ट्राप्रति, समाजाप्रति नितांत प्रेम करणारे आहेत, जे माझ्या समाजाला आणि माझ्या भारतमातेला शक्तिसंपन्न, परिपूर्ण करून पुन्हा एकदा तिला विश्वाच्या उत्तुंग शिखरावर बसवतील.’
 
किरण रवींद्र शेलार हे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे पाईक आहेत. सत्य, न्याय आणि मुख्यत: संविधानावर प्रचंड श्रद्धा असलेले किरण सर मुंबईच्या पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार आहेत. ते सर्वार्थाने योग्य उमेदवार आहेत, असे त्यांच्या संपर्कातील सगळ्यांना वाटते. म्हणूनच आम्ही सगळे मनापासून शुभेच्छा देत आहोत - विजयी भव!