शिरीष एकाएकी साथ सोडून गेलेला सहकारी

विवेक मराठी    14-Jun-2024
Total Views |
@प्रा. रवींद्र भुसारी
1995 मध्ये अमरावतीला विदर्भ व नागपूर अशा दोन प्रांतांचे एकत्रित ‘कार्यकर्ता शिबीर’ झाले. याच वेळी दोन्ही प्रांतांचे एकीकरण झाले. शिरीषजी या सुमारास अमरावती जिल्हा प्रचारक म्हणून काम बघत होते. इथे त्यांचा अधिक सहवास लाभल्याने त्यांची स्वभावगुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवली. शिरीषजींनी स्वतःला कराव्या लागणार्‍या परिश्रमाची कधी पर्वा केली नाही. एकाएकी साथ सोडून गेलेल्या सहकार्‍यास भावपूर्ण श्रद्धांजली.

rss
मी नागपुरातील गांधीनगर शाखेचा स्वयंसेवक व शिरीष हनुमान नगर शाखेचा...! वयाने तीन-एक वर्षांनी शिरीष माझ्यापेक्षा लहान. शिरीषशी विशेष ओळख झाली ती आणीबाणी काळात. पुढे एकत्रीकरण, शिबीर, अभ्यासवर्ग इत्यादी निमित्ताने वारंवार भेटी होत राहिल्या.
 
1981 मध्ये मी धरमपेठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून असता, संघ शिक्षा वर्गाच्या प्रथम वर्षास गेलो. आमचा गण व्यावसायिकांचा असल्याने सर्वच स्वयंसेवक वयाने मोठे होते आणि आमचे गणशिक्षक होते शिरीषजी वटे. शिरीष तेव्हा महाविद्यालयात शिकणारा तरुण; पण आम्ही सर्व त्यांना शिरीष मास्तर म्हणत असू. संघस्थान संपल्यावर गणातील सारे शिक्षार्थी त्यांची मजा-थट्टा करत असू. शिरीष मास्तर गण कसा घेतात, याची हुबेहूब नक्कल त्यांच्यासमोर करून दाखवत असू; पण ते कधीही चिडले नाहीत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शिरीषने सर्वांशी स्नेहबंध पक्का केला.
 
1983 साली, विद्यमान सरसंघचालक मा. मोहनजी, हे त्या काळात नागपूर प्रांत प्रचारक असता, नागपुरातून एकाच वर्षी 22-23 कार्यकर्त्यांची बॅच, प्रचारक म्हणून संघकार्यार्थ बाहेर पडली. त्यात शिरीषजी होते. मी त्या काळात अकोला येथे प्रचारक होतो. शिरीषजी प्रारंभी चिखली नगर प्रचारक म्हणून रुजू झाले. अकोला विभाग प्रचारक, मा. रामभाऊ बोंडाळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही दोघेही एकाच विभागात आल्याने अनेक बैठकांच्या निमित्ताने शिरीषजींशी स्नेहभेटी वाढू लागल्या. जाने. 1995 मध्ये अमरावतीला विदर्भ व नागपूर अशा दोन प्रांतांचे एकत्रित ’कार्यकर्ता शिबीर’ झाले. याच वेळी दोन्ही प्रांतांचे एकीकरण झाले. शिरीषजी या सुमारास अमरावती जिल्हा प्रचारक म्हणून काम बघत होते. इथे त्यांचा अधिक सहवास लाभल्याने त्यांची स्वभावगुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवली. स्वच्छता, नीटनेटकेपणा हे सांगून होत नाही, तर स्वतः करून दाखवावी लागते, हा बोध मला शिरीषजींकडून मिळाला. ते रोज सकाळी लवकर उठून 5.30 च्या स्तोत्र-मंत्रापूर्वी कार्यालयाचा परिसर झाडून, झाडांना पाणी देऊन अंगणात पाणी शिंपडत.
 
 
शिरीषजींना झाडांची फार आवड. विविध झाडांची रोपे तयार करून परिसरात लावून ती जगविणे, इतरांना वाटणे, हा त्यांचा आवडता छंद. पू. गुरुजी जन्मशताब्दी वर्षात शिरीषजींनीस्वतःपुरता एक आगळावेगळा उपक्रम केला. महालातील संघ-बिल्डिंग परिसरात अगदीच प्रवेशद्वारापाशी शमीचे एक महाकाय वृक्ष होता. महाल कार्यालयाच्या देखभालीचे काम शिरीषजींकडे असताना, ते दरवर्षी शमीच्या वाळलेल्या शेंगा जमा करून त्यातील भरपूर बिया एकत्र करायचे. अनेकांना बिया पाठवायचे, तर बरेचदा शमीची रोपे स्वतःच करून जागोजागी ते वाटायचे. पू. गुरुजी जन्मशताब्दी वर्षात शिरीषजींनी 100 शमीची रोपे तयार करून नाशिकच्या मा. नानांच्या सुपूर्द केली, जी त्यांनी योग्य जागेची निवड केलेल्या परिसरात लावली. स्वतःचा छंद व कल्पकता याचे हे अजोड उदाहरण वाटते. मधल्या काही काळात शिरीषजींकडे खापरीच्या भारतीय उत्कर्ष मंडळाची (विवेकानंद हॉस्पिटल) जबाबदारी होती. तिथे लहानमोठ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये विविध रंगांची भरपूर कमळं त्यांनी फुलवली होती. कमळाचा कंद अलगद काढून कधी तरी हौशी माणसाला ते आवर्जून देत.
 
महाल कार्यालय प्रमुख म्हणून शिरीषजींकडे दायित्व असता, त्यांच्या सात्त्विक व सेवाभावी आचरणाचा प्रत्यय ज्येष्ठ कार्यालय निवासींना सातत्याने आला. महाल कार्यालयात वार्धक्यामुळे निवासाला आलेल्या ज्येष्ठांची संख्या मोठी होती. मा. केशवराव गोरे, नारायणराव तरटे, दिनकरराव बुचे, भालूजी गोखले, अण्णाजी कुळकर्णी, लमाजी देशपांडे... असे अजूनही होते. या सर्वांच्या चिकित्सेची काळजी घेणे, तज्ज्ञ डॉक्टरांशी नियमित संपर्कात राहून त्यांचा औषधोपचार अचूक ठेवणे... इत्यादी परिश्रम त्यांनी अथक केले आहेत. कधी कधी तर शिरीषजी रात्रभर जागे असल्याचे व सकाळीच पुन्हा कामाला लागल्याचे अनेकांनी पाहिले आहे. नागपूरच्या महाल भागातील संघ कार्यालय म्हणजे ’रा. स्व. संघाचे मुख्यालय’. भारतभरातून अनेकानेक मान्यवरांची ये-जा तिथे अविरत सुरू असे. नागपूरचे महाल कार्यालय हे संघाचे मुख्यालय असल्याने सुरक्षा व्यवस्था अति कडक. त्यात बड्याबड्या वा नामवंत अतिथी पू. सरसंघचालकांना भेटावयास येणार. अशा अतिथींचे सन्मानपूर्वक आतिथ्य करण्याचे काम अबाधित ठेवता, शिरीषजींना संघाच्या वडीलधार्‍या प्रचारकांकडे पुत्रासम लक्ष द्यावे लागे; पण शिरीषजींनी स्वतःला कराव्या लागणार्‍या परिश्रमाची कधी पर्वा केली नाही. या सर्व व्यापात कुठे जराही कमतरता लक्षात आली, तर शिरीषजी स्वतःस शिक्षा देत असत. ती म्हणजे.. ’त्या दिवशी न जेवणे!’ आज वाटते... ’याच अतिरिक्त परिश्रमामुळे तर त्यांची प्रकृती ढासळत गेली नसेल ना?’
 
मधल्या काळात महालाच्या संघ कार्यालयाचे विस्तारित बांधकाम व त्याकडे कटाक्षाने द्यावयाचे लक्ष, या सर्वामुळे त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. त्यांची सहनशक्ती प्रचंड होती. अशा सहनशील वृत्तीमुळे स्वतःला होणारा त्रास त्यांनी कुणालाही सांगितला नाही आणि एकाएकी ते निघून गेले.
शिरीष... या अतिप्रिय सहकार्‍यास भावपूर्ण श्रद्धांजली!