रामोजी राव काळाच्या पुढे असलेली व्यक्ती

विवेक मराठी    14-Jun-2024
Total Views |
@संजय दाबके
रामोजी राव अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. 1998 साली भारतातलं पहिलं सॅटेलाइट अपलिंकिंग स्टेशन फिल्म सिटीमध्ये उभारून टेलिकास्ट त्यांनीच सुरू केलं. त्यांना गाठायला इतरांना बरीच वर्षे लागली. त्यांचं सगळं करणं म्हणजे प्रचंड... भव्य... डझनात! नक्षली अतिरेक्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा विचार करणे हीच गोष्ट दुरापास्त अशा ठिकाणी ‘रामोजी फिल्म सिटी’ हे 2000 एकरांचं भव्य पार्क निर्माण केले. आज लाखोे पर्यटकांचे पसंतीचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जातं.

ramoji
 
’रामोजी फिल्म सिटी’ अशा दणदणीत आणि भव्य कमानीशेजारून तिथे पहिल्यांदा पोहोचलो तेव्हाच एक मोठा माणूस नशिबाने जवळून बघायला मिळणार आहे याची खात्री पटली होती. दक्षिणेत अजिबात विनय वगैरे न दाखवता स्वतःची नावे आपल्या मालकीच्या जागांना देण्यात लोकांना गैर वाटत नाही. तसंच 2000 एकरांच्या थीम पार्कला सरळ स्वतःचं नाव देणारे रामोजी राव! ईटिव्ही मराठीचा प्रमुख म्हणून मी तिथे 2004 ला जॉइन झालो. ईटिव्ही मराठी चॅनेल त्या वेळी भलतंच घसरणीला लागलं होतं. पुढच्या वर्षभरात त्याला एक नंबरचं चॅनेल बनवताना रामोजी रावांशी अनेक भेटी झाल्या. ’झी’ नेटवर्क हे मला मनापासून कधीही आवडलं नव्हतं, कारण तिथे हिंदीची कॉपी सोडून काहीही नव्हतं आणि आजही नाही. त्याच्या तुलनेत ईटिव्ही ची सगळीच चॅनेल्स आपल्या प्रादेशिक प्रतिमा घट्टपणे जपणारी होती म्हणून मला त्याविषयी तिथे जायच्या आधीही आपुलकी होती आणि अशी एक नाही, तर 12 चॅनेल्स उभारणार्‍या रामोजी रावांबद्दल भेटायच्या आधीच अतिशय आदर होता. रामोजी राव होतेच तसे. अतिशय कर्तृत्ववान... 1998 साली भारतातलं पहिलं सॅटेलाइट अपलिंकिंग स्टेशन फिल्म सिटीमध्ये उभारून टेलिकास्ट त्यांनीच सुरू केलं. त्यांना गाठायला इतरांना बरीच वर्षे लागली. त्यांचं सगळं करणं म्हणजे प्रचंड... भव्य... डझनात! टिव्ही चॅनेल्स काढली तीही बारा; भारताच्या बहुतेक सगळ्या प्रमुख प्रादेशिक भाषांमधली! देशभरातून गोळा केलेला सगळा स्टाफ काही हजारांत होता. त्यांच्यासाठी स्टुडिओही बारा! सगळी चॅनेल्स सुरू करून दीड वर्ष झालं तरी एकही जाहिरात नव्हती. तरीही कोणाचेही पैसे कधी थकलेत असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही! नंतर जाहिराती घेतल्या त्या स्वतः ठरवलेल्या भावात. एक पैसा कमी नाही! फिल्म शूटिंगसाठी प्रचंड आकाराचे एसी स्टुडिओ बांधले, तेही बारा! हैदराबाद शहराच्या बाहेर चाळीस किलोमीटर्स अंतरावर 2000 एकरांचं भव्य पार्क निर्माण करून तिथे दरवर्षी लाखो पर्यटक आणायचं स्वप्न किती जणांना पडू शकेल? खरं तर ही सगळी जागा नक्षली अतिरेक्यांनी व्यापली होती. तिथे कोणाची यायची हिंमत नव्हती. तिथे असं थीम पार्क निर्माण झालं आणि आज आजूबाजूच्या अनाजपूरसारख्या नक्षलवाद्यांचा अड्डा म्हणून गणल्या जाणार्‍या कित्येक गावांत घरटी एक तरी माणूस रामोजी
 
 
vivek
 
फिल्म सिटीमध्ये नोकरीला आहे. त्यांची दृष्टीच अतिप्रचंड होती आणि महत्त्वाकांक्षा जबरदस्त होती. 2004 पासून रामोजी फिल्म सिटीच्या थीम पार्कची अट्रॅक्शन्स मी करायला सुरुवात केली आणि रामोजी रावांच्या आणखीन प्रदीर्घ गाठी पडायला लागल्या. त्यातल्या अनेक गमतीदार, तर अनेक अविस्मरणीय होत्या. ते पक्के काँग्रेसविरोधी. वायएसआर रेड्डी आंध्रचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी रामोजी राव यांच्याशी उभा दावा मांडला. रामोजी राव यांना संपवायचा त्यांनी चंग बांधला होता. मला आठवतंय... मी तिथेच होतो आणि दुसर्‍या दिवशी त्यांचं एका शोसाठी शूटिंग करणार होतो. संध्याकाळी त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला की, ’सर बोलतायत.’ ‘संजय, उद्याचा दिवस थांबशील का? काही महत्त्वाची कामं आहेत. आपण शूटिंग परवा करूयात आणि आत्ता माझ्याकडे यायला थोडा वेळ आहे का?’ हे जरी प्रश्न असले तरी अ‍ॅज गुड अ‍ॅज ऑर्डर होते म्हणून गेलो. ते एकटेच बसले होते. त्यांच्या समोर दुसर्‍या दिवशीचा ’इनाडू’ या त्यांच्या दैनिकाचा अग्रलेख लिहिलेला होता. वायएसआर रेड्डींच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पहिला बॉम्बगोळा त्यांनी टाकला होता. त्यांनी का कुणास ठाऊक, तो अग्रलेख वाचत त्याचा मथितार्थ इंग्रजीत मला सांगितला आणि म्हणाले, ’आज जर आम्ही दोघे एकमेकांच्या समोर आलो तर कोणी तरी एक निश्चित मरेल!’ त्यानंतर रोज अशा सलग 100 अग्रलेखांची मालिका त्यांनी लिहिली होती.. त्या एपिक लढाईच्या सुरुवातीचा अगदी पहिला साक्षीदार मी होतो. नंतर ही लढाई भयंकर टोकाला गेली. त्यांची अनेक रूपे जवळून बघायला मिळाली. एखादी राइड पहिल्यांदा लहान मुलाच्या उत्सुकतेने बघायला आलेले, एका प्रेझेन्टेशनमध्ये माझी पूर्ण फजिती झालेली असताना मला सावरून धीर देणारे, मुलाच्या अकाली मृत्यूनंतर काही काळच हादरून गेलेले, प्रचंड आर्थिक संकट असताना न डगमगणारे रामोजी राव मी पाहिलेत. मोठी माणसं मोठी का होतात? हे न्याहाळायचा मला छंद आहे. 20,000 कोटींच्या व्यवसायाचा हा स्वामी, फिल्म आणि टीव्ही च्या झगमगाटी दुनियेचा हा मीडिया बॅरन, व्यक्तिगत आयुष्यात अतिशय साधा होता. चार्टर प्लेन करून जायची ऐपत असताना मी त्यांना इकॉनॉमी क्लासने प्रवास करताना बघितलंय. दुसर्‍या बाजूला हा पराकाष्ठेचा शब्द पाळणारा माणूस होता. त्यांच्या नवव्या मजल्यावरच्या भव्य ऑफिसमध्ये बसून अतिशय मोजकं, पण टोकदार बोलताना त्यांना ऐकणे ही पर्वणी असायची. अगदी आत्ता दोन वर्षांपूर्वी पार्कमध्ये रात्री काही नवीन शोज् निर्माण करून ’रामोजी बाय नाइट’ करता येईल का? याचा मास्टर प्लॅन त्यांनी माझ्याकडून तयार करून घेतला होता. आता त्या अतिशय शांत आणि हळुवार आवाजातल्या प्रचंड कल्पना पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत.. नखशिखान्त पांढर्‍या वेशातले रामोजी राव आता पुन्हा भेटणार नाहीत. एक मोठा माणूस आज आयुष्यातून गेला. यापुढेही मी रामोजी फिल्म सिटीमध्ये जाईन, तिथे कामही करेन; पण रामोजी रावांशिवाय रामोजी फिल्म सिटी... डझन्ट मेक सेन्स!!!