सोहळा शिवराज्याभिषेकाचा ( उत्तरमीमांसा )

01 Jun 2024 12:07:51
शिवराज्याभिषेक ही हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाची संजीवनी आहे. या महन्मंगल प्रेरणादायी गौरवांकित घटनेचे हे तीनशे पन्नासावे स्मृतिवर्ष. या संस्मरणानिमित्त ‘विवेक परिवारा’तर्फे ‘शिवकल्याण राजा’ या लेखमालेद्वारा सतरा लेखांत शिवचरित्रातील अनेक पत्रांचा, प्रसंगांचा, राजनीतीचा, युद्धनीतीचा विविधांगी धांडोळा आपण घेतला. या सागरातले काही कण आपण वेचले. शिवछत्रपतींनी दाखविलेल्या मार्गावरून पुढे चालत, परस्परांतील भेदाभेद टाकून, संघटित होऊन भारताचा अभ्युदय साध्य करू या.

vivek
 
छत्रपती शिवाजी महाराजयांच्या राज्याभिषेकाचे विधी हिंदू राजपद्धतीनुसार पूर्णतः वेदोक्त पद्धतीने संपन्न झाले होते. महाराजांच्या हिंदू राज्यनिर्मितीच्या संकल्पाची पूर्ती होत होती म्हणूनही प्राचीन वेदमंत्रांचे अनुसरण करणे, हाच शिवरायांच्या मनोदय यातून स्पष्ट होतो. राज्याभिषेकाच्या संपूर्ण विधीसाठी प्रचंड खर्च होणार होता. हिंदुस्थानच्या एके काळच्या संपन्न राजवैभवाची पुनर्प्रतिष्ठापना राजांना करायची होती. इथली संस्कृती अधिष्ठित व्हावी, तिला जगात सन्मानाने ओळखलं जावं, यासाठी अशा वैभवसंपन्न राज्याभिषेक विधींची शिवरायांनी पूर्तता केली. भरपूर दानधर्म केला. अनेक शास्त्रांत पारंगत असे विद्वान पंडित, ब्राह्मण, पुरोहित या सर्वांना रायगडावरती आमंत्रित केलं. राज्याभिषेकाआधी महाराजांनी प्रतापगडावर जाऊन भवानीमातेची साग्रसंगीत पूजा केली. तिला सवा मण सोन्याचं छत्र अर्पण केलं. महाराज सिसोदियावंशीय क्षत्रियकुलावतंस होते. काळाच्या ओघात क्षत्रियांचे कित्येक संस्कार लोप पावले होते. म्हणून गागाभट्टांनी उपनयन, विवाह, तुलादान, प्रायश्चित्त अशा अनेक विधींचा राज्याभिषेक प्रयोग पद्धतीमध्ये समावेश केला. अर्थात ही सगळी घाई यासाठी झाली, की महाराजांना लाभणारा मुहूर्त हा चातुर्मासाच्या पूर्वी, म्हणजे शके 1596 आनंद संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला पहाटेचा होता आणि त्यानंतर बर्‍याच काळापर्यंत दुसरा शुभ मुहूर्त नसल्यामुळे तातडीने हाच मुहूर्त ठरवण्यात आला. सामान्यतः 30 मे 1674 ते 6 जून 1674 कालावधीत महाराजांचा राज्याभिषेक विधी संपन्न झाला. यानिमित्ताने अनेक सोहळे झाले, धार्मिक विधी झाले. ह्या सर्व विधींसंदर्भात जशी गागाभट्टांच्या ‘श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः’ या ग्रंथात माहिती मिळते, तशीच गोविंद नारायण बर्वेलिखित ‘शिवराजराजाभिषेककल्पतरू’ ह्या ग्रंथातही सापडते. यातील सगळ्यात मोठा भाग आहे आहे तो गागाभट्ट यांचा ‘श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः’ हा ग्रंथ. शिवापूर शकावली, जेधे शकावली अशा शकावलींमध्येही महत्त्वाच्या तिथींची आणि विधींची माहिती मिळते. त्याखेरीज हेन्री ऑक्झिंडेनच्या डायरीमध्ये त्याने पाहिलेल्या अनेक गोष्टींची नोंद केली आहे. याखेरीज अजून एक महत्त्वाची नोंद म्हणजे, 13 ऑक्टोबर 1674ला वेंगुर्ल्याचा डच अधिकारी अब्राहम लि. फेबर याने एक पत्र लिहिले आहे, ज्यात तो राज्याभिषेक विधींच्या संदर्भात महाराजांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या यासंदर्भातली अधिक माहिती देतो. त्याच्या माहितीमध्ये काही त्रुटी आढळतात, कारण ही माहिती त्याने स्वतः पाहून लिहिली आहे की ऐकीव माहितीच्या आधारे लिहिलेली आहे हे आपल्याला समजायला निश्चित असा पुरावा मिळत नाही.
 
शिवराज्याभिषेक
 
धार्मिक विधींचा पहिला दिवस होता, 30 मे 1674. या दिवशी प्राथमिक पूजेनंतर महाराजांची मुंज झाली. महाराजांनी मौंजीबंधनानंतर आधीच्या स्त्रियांशी पुन्हा एकदा विवाह करून विधीपूर्वक त्यांचा स्वीकार केला. गणेशपूजन, कलशपूजन, पुण्याहवाचन, षोडश मातृकापूजन, नांदी श्राद्ध, रक्तसूत्रबंधन, पट्टबंधन, असे अनेक विधी संपन्न झाले. हे सगळेच विधी विनायकशांती होमाने पूर्ण झाले. त्याच दिवशी उत्तरार्धामध्ये तुलादान विधी अर्थात पुरुषतुला दान असा विधी संपन्न झाला. हा प्रायश्चित्त विधी होता. अब्राहम लि. फेबर आणि हेन्री ऑक्झिंडेन यांनी नोंदवलेल्या नोंदीनुसार महाराजांचं या तुलादान विधीमध्ये वजन साधारणपणे 16 ते 17 हजार पागोडे इतकं झालं म्हणजे 160 पौंड. साधारणपणे 70-72 किलोच्या दरम्यान महाराजांचं वजन होतं. अर्थात आपल्या वजनाइतकं सुवर्ण, रुपे, खाण्याचे जिन्नस, साखर अशा अनेक वस्तू महाराजांनी दान केल्या.
 
 
दुसर्‍या दिवशी ऐंद्रीशांती, ऐशानयाग हे दोन महत्त्वाचे विधी पार पडले. तिसर्‍या दिवशी ऐंद्रीशांती विधी, ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम असे मंगल विधी संपन्न झाले. चौथ्या दिवशी मंगळवार आणि चतुर्थी या दोन्ही निषिद्ध गोष्टी आल्यामुळे या दिवशी कोणतेही मंगल विधी संपन्न झाले नाहीत. पाचव्या दिवशी ऐंद्रीशांतीनिमित्त आचार्यपूजन झालं. सहाव्या दिवशी रात्री पर्वामध्ये निऋतियाग हा विधी झाला. सातव्या दिवशी शुक्रवारी 5 जूनला सकाळच्या प्रहरी ऐंद्रीशांतीचे उर्वरित सर्व विधी पूर्ण करण्यात आले. उत्तरपूजा झाली आणि त्यानंतर दान विजयादी कर्म झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमास म्हणजे राज्याभिषेकाच्या विविध विधींना संध्याकाळपासूनच सुरुवात झाली. उत्तररात्रीपर्यंत अनेक मंगल विधी संपन्न झाले. यानिमित्ताने रायगडाची राजसभा सजली होती. विविध प्रांतांतून नद्यांचे आणि समुद्रांचे पाणी, विविध ठिकाणांच्या मृत्तिका आणल्या होत्या. यानिमित्ताने आणलेले सगळे मंगल साहित्य वेगवेगळ्या प्रांतांतून पंडितांच्या मार्गदर्शनाखाली आणले होते. याप्रसंगी वैभवाचे लक्षण म्हणून रायगडावरती दोन हत्तीही आणले होते. सुलक्षणी अश्व होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा देदीप्यमान सोहळा हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शुक्रवार संध्याकाळपासून शनिवारी पहाटेपर्यंत चालला. शनिवारी पहाटे महाराजांना मंगलस्नानानंतर सिंहासनारूढ व्हायचे होते आणि त्यानंतर सकाळी 7-8च्या सुमारास राजदर्शन असा प्रमुख विधी यानिमित्ताने योजिला होता.
 

vivek 
आणि अखेर शिवछत्रपतींच्या सिंहासनरोहणाचा अत्यंत शुभलक्षणी असा मुहूर्त समोर उभा ठाकला. चार शतकांहून अधिक काळ भारतभूमीने हिंदू राजा पाहिला नव्हता. हिंदवी सिंहासन पाहिलं नव्हतं. विजयनगरचे साम्राज्य संपल्यानंतर एकाही हिंदूचं राज्य हिंदुस्थानात उभं नव्हतं. रायगडाच्या राजसभेमध्ये तो महन्मंगल क्षण अवतरला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पहाटे साधारणपणे 5च्या सुमारास महाराजांनी राजसभेत प्रवेश केला. महाराजांच्या सिंहासनाच्या चहूबाजूने अष्टप्रधान मंगल कलश आणि छत्रचामर घेऊन उभे होते. सिंहासनाच्या बाजूला शुभचिन्हांकित भाल्यांवरती सुवर्ण मासे, तराजू, चंद्रपान, सूर्यपान, मोर्चेल, अश्वपूच्छ अशी किती तरी राजचिन्हे घेऊन सरदार उभे होते. मंगलवाद्ये वाजत होती. ब्राह्मणांनी उच्चघोषांत वेदमंत्र उच्चारायला सुरुवात केली. महाराजांना अभिषेक झाला. धीरगंभीर मनाने सजवलेल्या सिंहासनासमोर महाराज उभे राहिले. त्या आसंदीला प्रणाम करून आणि त्याला पदस्पर्श न करू देता, एका हातात विष्णूची मूर्ती आणि दुसर्‍या हातात धनुष्य धारण करीत राजदंड घेऊन महाराज त्या मंगल आसनावरती विराजित झाले. मंगल वाद्ये वाजत होती. लोक नाचत-गात होते. हजारो कंठांमधून महाराजांचा जयजयकार राजसभेत घुमत होता. महाराजांच्या मस्तकावरती छत्र धरलं गेलं... महाराज छत्रपती झाले. मोरोपंतांनी त्यांच्या मस्तकावरून सुवर्णमुद्रा ओतल्या, लक्ष्मीस्नान झालं. सर्व प्रधानांनी, सरदारांनी, आमंत्रितांनी महाराजांना नजराणे अर्पण केले. अष्टखांबी मेघडंबरीमध्ये हिंदवी स्वराज्याचं रत्नजडित सुवर्णसिंहासन शोभत होतं आणि त्याच्यावरती हिंदुपदपादशाह शिवछत्रपती आरूढ झाले होते. युवराज शंभूराजे सिंहासनासमोर बाजूस सालंकृत बसले होते. पट्टराणी सोयराबाई राणीसाहेब आणि सर्व अष्टप्रधान, सरदार, मानकरी, लेखक, चिटणीस आपापल्या जागी उभे होते.
 
 
हेन्री ऑक्झिंडेन सकाळी 7-8च्या सुमारास राजसभेत गेला आणि त्या वेळचं वर्णन त्याने लिहून ठेवलं आहे. राजसभेच्या दरवाजाशी ज्या वेळी तो परत आला त्या वेळी त्याने सजवलेले दोन हत्ती पाहिले आणि त्याला आश्चर्य वाटलं की, रायगडासारख्या दुर्गम किल्ल्यावरती, जिथे माणसंसुद्धा चढताना थकतात, तिथे हे विशालकाय हत्ती आलेच कसे? रायगडाच्या अवतीभवती सह्याद्रीभर पसरलेल्या गडकोट किल्ल्यांवरून तोफांची सलामी महाराजांना दिली गेली. राजदर्शनानंतर शुभ्र अश्वरथावर महाराज आरूढ झाले. रथारोहणानंतर नगारखान्याबाहेर उभ्या असलेल्या हत्तीवरील अंबारीत महाराज बसले. मागे पंतप्रधान मोरोपंत मोर्चेल घेऊन बसले. सेनापती हंबीरराव माहूत झाले आणि त्यानंतर राजसभेच्या महाद्वारापासून ते जगदीश्वरापर्यंत नृत्यसंगीताच्या नादकल्लोळामध्ये, लोकांच्या हर्षोल्हासित जयघोषांत ती भव्य मिरवणूक वाजतगाजत गेली. कृष्णाजी अनंत सभासद लिहितो, येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. याआधी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा मराठा बादशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही.
 
 
राज्याभिषेकानंतर
 
सुमारे चार-पाच शतके इस्लामी राजसत्ता सर्वत्र असल्यामुळे फार्सीच राज्यव्यवहाराची, पत्रव्यवहाराची भाषा होती. हा पायंडा बदलून भाषासुद्धा सुसंस्कृत व्हावी आणि त्यासाठीच शिवाजी महाराजांनी आग्रहाने रघुनाथपंत हणमंते यांना आज्ञा केली आणि ‘राज्यव्यवहारकोश’ नावाचा फार्सीला पर्याय संस्कृतप्रचुर मराठी शब्दांचा ग्रंथ तयार झाला. बाळाजी आवजी चिटणीसांनी नूतन लेखनप्रशस्ती तयार केली. मराठीला राजभाषेचे अधिष्ठान प्राप्त झाले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून नूतन राजाभिषेक शक सुरू झाला. पत्रांची सुरुवात अजरख्तखानेऐवजी स्वस्ति श्री राजाभिषेक शके अशी होऊ लागली.
 
 
तत्कालीन विविध कागदपत्रांमध्ये शिवराज्याभिषेकाचा उल्लेख सापडत असला तरीही एकाही फारसी साधनांमध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख आढळत नाही. त्या इस्लामी सत्ताधीशांच्या मनातल्या असूयेवर सभासदाने मोलाचे भाष्य केले आहे. सभासद म्हणतो की, वर्तमाने बहादूर सिंग तूखा यांसी कळवी. त्याने पुढे पेडगाव भीमातीर येथे घेऊन छावण्या केल्या आणि दिल्ली पातशहासी वर्तमान सिंहासनाचे लिहिले. पातशहास कळून तख्तावरून उतरून अंतःपुरात गेले आणि दोन्ही हात भूमीस घासून आपले देवाचे नाव घेऊन परम खेद केला. दोन दिवस अन्न, उदक घेतले नाही आणि बोलले, खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून, तख्त बुडवून मराठ्यास तख्तियले, आता हद झाली. असो. बहुत खेद.दुःखाचे पर्वत. नाना प्रकारे समाधान करून खानाखुना घालून तख्तावर बसविले. ऐसेच विजापूरचे पातशहास व भागानगरचे पातशहास वरकड सर्वांना वर्तमान कळून खेद जाहला. रूम, श्याम, इराण व दर्‍यातील पातशहास खबर कळून मनात खेद करू लागले. खेद करून आशंका मानिली. ये जातीचे वर्तमान जाहले.
 
 
‘शिवराजराजाभिषेककल्पतरू’ या गोविंद बर्वेने लिहिलेल्या ग्रंथामध्ये निश्चयपुरी गोसावी या साधूने त्याच वर्षी आश्विन शुद्ध पंचमीला शिवछत्रपतींसाठी केलेल्या तांत्रिक विधींचीही माहिती मिळते. हा तांत्रिक विधी राज्याभिषेकाचा पूरक विधी म्हणून केला गेला. महाराजांच्या राज्याभिषेक विधींदरम्यान काही अपशकुनी गोष्टी घडल्या. बाराव्याच दिवशी जिजाऊसाहेबांचे देहावसान झाले. अधिक अघटित नको म्हणून लोकसमजुतीनुसार असे काही तंत्रविधी करण्यात आले असावेत. महाराजांनी हे विधी लोकोपवादासाठी केले होते. ते फार भव्य प्रमाणात झाले याला कोणताही आधार नाही. हे तांत्रिक विधी शक्ती उपासकांचे असल्यामुळे आश्विन नवरात्रातील ललिता पंचमीच्या दिवशी करण्यात आले.
 
 
शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व
 
हिंदुस्थानच्या मध्ययुगीन इतिहासातील शिवराज्याभिषेक ही घटना अत्युच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. सतराव्या शतकातल्या या एका घटनेने इतिहासात हिंदुस्थानची संस्कृती पुन्हा एकदा प्रतिष्ठित झाली, सुरक्षित झाली. इतकंच नाही तर राजकारण, धर्मकारण, अर्थकारण आणि समाजकारण यांच्या केंद्रीय स्थानी तळागाळातल्या माणसाच्या सुखाचाच विचार असला पाहिजे, हे मापदंड नव्याने रोवले गेले. हिंदवी स्वराज्य एकाएकी अवतरलं नव्हतं. पारतंत्र्याच्या भीषण काळात अत्याचाराविरुद्ध असंतोषाची धग जनमानसांत धगधगत होती. हजारो वर्षांची हिंदू परंपरा खंडित होत असताना एतद्देशीय समाजमन ढवळून निघाले होते. या समाजाच्या क्रांतीसाठी आतुर मनावर शिवरायांनी फुंकर घातली. ‘स्वराज्य’ ही नवसंकल्पना देऊन या क्रांतीचे नेतृत्व केले. त्यासाठी सर्व समर्पण करण्याची प्रेरणा दिली. स्वार्थी, लोभी, मगरूर वतनदारांना पायबंद घातला. त्यांना सन्मार्गावर आणून शिवरायांनी लोकरक्षणाचे, स्वातंत्र्यप्रेमाचे, राष्ट्रनिष्ठेचे बाळकडू पाजले. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, त्याच्या कुटुंबाचे, मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी आदर्श राजपद्धती घालून दिली. जाचक कर पद्धती बंद केली. शेती हा तत्कालीन समाजाचा मूळ व्यवसाय होता. देशोधडीला लागलेल्या शेतकर्‍याला महाराजांनी पुन्हा उभे केले. सरकारातून बी-बियाणे, नांगरादी हत्यारे, बैल इ. दिले. शेतकरी उमेदीने उभा राहिला पाहिजे यासाठी पहिले वार्षिक कर माफ केले. ज्यांच्याकडे जमिनी नाहीत त्यांना जमिनी दिल्या. दुर्गबांधणी, आरमारबांधणी, अशा अनेक भव्य कार्यांना आकार देत असंख्य कारागिरांना, पारंपरिक कौशल्याला वाव दिला. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज अशा पाश्चिमात्यांकडे असलेले अद्ययावत तंत्रज्ञान आपल्या लोकांनी शिकून त्याचा वापर स्वराज्य कार्यासाठी करावा अशी योजना केली. या सर्व परकीय व्यापार्‍यांना सहकार्य केले, उत्तेजन दिले; पण राजकारणात लुडबुड न करण्याची ताकीदही दिली.
 
 
शिवरायांसी आठवावे

शिवराज्याभिषेक ही हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाची संजीवनी आहे. या महन्मंगल प्रेरणादायी गौरवांकित घटनेचे हे तीनशे पन्नासावे स्मृतिवर्ष. या संस्मरणानिमित्त ‘विवेक परिवारा’तर्फे ‘शिवकल्याण राजा’ या लेखमालेद्वारा सतरा लेखांत शिवचरित्रातील अनेक पत्रांचा, प्रसंगांचा, राजनीतीचा, युद्धनीतीचा विविधांगी धांडोळा आपण घेतला. या सागरातले काही कण आपण वेचले. स्वतंत्र भारताच्या आजच्या अमृतमहोत्सवी काळात सुराज्य, सुशासन, राष्ट्रभक्ती, सीमा संरक्षण यासाठी शिवचरित्राचे पुरश्चरण अत्यावश्यक आहे, याच विचारांनी ही लेखसेवा मांडली. सर्व वाचकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला, हेच या लेखमालेचं यश. शिवछत्रपतींनी दाखविलेल्या मार्गावरून पुढे चालत, परस्परांतील भेदाभेद टाकून, संघटित होऊन भारताचा अभ्युदय साध्य करू या, अशा संकल्पाने ही लेखमाला पूर्ण करतो आहोत. शिवछत्रपतींच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन, शत शत नमन.
 
 
शेतकरी उभा राहिला. सुतार, लोहार, चांभार, कुंभार अशा गावगाड्यातील सर्व अलुतेबलुतेदारांना कामे मिळू लागली. व्यापारउदीम वाढीस लागावे यासाठी जातीने लक्ष घातले. रयतेचे शोषण करून गब्बर झालेल्या धनाढ्यांना लुटून गोरगरिबांच्या कल्याणाची कामे केली. स्वदेशीच्या लोकांचे मिठासारखे उत्पादन मोठ्या प्रमाणात नफा साधत विकले जावे म्हणून पोर्तुगीजांसारख्या व्यापार्‍यांवर जबर कर लादले. स्वराज्यातील साधनसंपत्तीचे रक्षण केले पाहिजे, असे कडक आदेश अधिकार्‍यांना दिले. स्वराज्यातील झाडे तोडू नये, परमुलखावरून लाकूड आणावे, अशा आज्ञा दिल्या. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नये, हा दंडक घालून दिला. स्त्रियांना मानाने वागवले पाहिजे, त्यांच्या शीलाचे रक्षण केले पाहिजे, अशी शिस्त लावली. भ्रष्टाचार्‍यांना, फितुरांना कडक शासन केले. कृषिक्रांती केल्यानंतर सामाजिक क्रांती साध्य केली. अठरापगड जातींना एकत्र आणून समानतेचा महामंत्र दिला. इस्लामी राज्यांमध्ये हिंदूंवर जिझिया नावाचा जाचक व अपमानास्पद कर लादला होता. त्याउलट महाराजांनी स्वराज्यात सर्वांना आपापल्या धर्माचे, पंथाचे स्वातंत्र्य दिले. इतर धर्मीयांच्या ग्रंथांना सन्मान दिला. हिंदू धर्माचे रक्षण केले. बळजबरीने होत असलेल्या धर्मांतरणाविरोधात कडक धोरण राबविले. गोवेकर पोर्तुगीज पाद्य्रांसहित सर्व धर्मांधांना अद्दल घडवली. नेताजी पालकर, बजाजी निंबाळकरांसारख्यांना पुन्हा सन्मानाने हिंदू धर्मात आणले. मंदिर-मठांमध्ये विविध उत्सव चालविले. दिवाबत्तीची, नैवेद्याची सोय केली. सप्तकोटीश्वरासारखी पाडलेली मंदिरे पुन्हा बांधली, त्यांचे जीर्णोद्धार केले. प्रतापगड भवानीसारखी नवीन मंदिरे बांधली. धर्माचरणाबाबत लोकांमध्ये सुरक्षिततेचे आणि निर्भयतेचे वातावरण निर्माण केले. अष्टप्रधान मंडळ, शिस्तयुक्त कारभार करणारे राजमंडळ, निष्ठावंत सुसज्ज सेना, नौदल असे सुराज्य साकारले. महाराजांच्या लोककल्याणकारी धोरणांमुळे स्वराज्यासाठी सारे तत्कालीन इस्लामी सत्तांविरुद्ध प्राणपणाने लढले आणि नूतन राज्यक्रांती झाली. शिवशाहीमुळे खर्‍या अर्थाने लोकराज्य अवतरले. शिवरायांनी चारित्र्यसंपन्न राज्यकर्त्याचे आदर्श प्रस्थापित केले. अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वातंत्र्यासाठी पराकाष्ठा करण्याची प्रेरणा आपल्या हयातीत सर्वांना दिलीच; पण त्या स्फूर्तीमुळे त्यांच्या पश्चात शेकडो वर्षे, किंबहुना आजतागायत भारतीय समाज स्वातंत्र्यासाठी झटत आल्याचे दिसते. बुंदेलखंडातील छत्रसाल बुंदेल्याने शिवरायांच्या प्रेरणेने बुंदेलखंड स्वतंत्र केला. आसाममध्ये आहोमचे राज्य स्वतंत्र झाले. शिवरायांमुळे दक्षिणेकडील राज्ये सुरक्षित झाली. महाराजांनंतर औरंगजेब सर्व शक्तिनिशी मराठ्यांचे राज्य संपविण्यासाठी दख्खनमध्ये उतरला; पण शंभू छत्रपतींनी धैर्याने आणि पराक्रमाने त्याचा सामना केला... देहाची आहुती दिली. त्यांच्यानंतर राजाराम-ताराराणीने स्वातंत्र्ययुद्ध जिकिरीने सुरू ठेवले. संताजी-धनाजींसारख्या वीरांनी, रामचंद्रपंत अमात्यांसारख्या बुद्धिवंतांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. औरंगजेब संपला. मुघल सत्ता नाममात्र झाली. शाहू छत्रपतींच्या कालखंडात थोरल्या बाजीराव पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रजांसारख्या समुद्रशक्तींवर आंग्रे यांच्या आरमाराने दरारा निर्माण केला. कोकण आणि घाट प्रदेशातील स्वराज्याची सीमा पेशवे कालखंडात भारतभर विस्तारली. जिथे जिथे मराठी सत्ता पसरली, तिथे तिथे स्वातंत्र्याची राष्ट्रीय प्रेरणा पेरली गेली, धर्मकार्ये वाढीस लागली. ब्रिटिश राजवटीच्या कालखंडातही शिवछत्रपतींची शिकवण स्वातंत्र्यलढ्याला उपयुक्त ठरली. रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा किती तरी महापुरुषांनी स्वातंत्र्यलढ्यात शिवचरित्राची कास धरून ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा तीव्र केला, समाजसुधारणा केल्या. भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरही या देशाच्या राजनीतीला आणि सामाजिक उत्थापनाला शिवछत्रपतींची राष्ट्रीय प्रेरणा मार्गदर्शक ठरत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0