दुर्गाबाई कामत

04 May 2024 17:08:32
दुर्गाबाई कामत यांचं नाव भारतीय चित्रपटातील पहिली स्त्री कलावंत म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत नोंदलं गेलं. चित्रपटसृष्टीत स्त्रियांनी काम करणं हे त्याज्य मानणार्‍या काळात, दुर्गाबाईंनी धाडसानं पाऊल ठेवले. त्यामुळे आज शेकडो स्त्री अभिनेत्रींना अभिनयाच्या संधीची महाद्वारं खुली झाली.
 
 
सामाजिक मूल्यव्यवस्थेने आपल्याकडे जी बंदिस्त चौकट तयार करून ठेवली आहे, त्यात सर्वाधिक बंदिस्त झाल्या त्या उच्चकुलीन स्त्रिया. घराचा मुख्य उंबरठा ते मागील परसदार हेच प्रदीर्घ काळ त्यांचं कार्यक्षेत्र राहिलं. अर्थात याला काही अपवाद होते. या परिघाबाहेर जाणं म्हणजे पापाचे धनी होणं अशी काहीशी विचारसरणी असणारा तो काळ. सिनेमात काम करणार्‍या महिलेकडे हीन दृष्टिकोनातून समाज पाहत असे, अशा काळात घर-नवरा-संसार ही सारी बंधनं झुगारून जिनं चित्रपट क्षेत्र जवळ केलं आणि नुसतंच जवळ केलं असं नाही, तर कन्या, नातू आणि पणतू यांच्याही अभिनयाची वाट प्रशस्त करून दिली अशा धाडसी, बंडखोर अभिनेत्री म्हणजे दुर्गाबाई कामत.
 
 
दुर्गाबाईंचा जन्म 1899 सालचा, कामत घराण्यातला. त्यांच्या मातापित्याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही; परंतु त्या वेळची सातवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या दुर्गाचे लग्न जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या आनंद नानोस्कर यांच्याशी लावण्यात आलं. उभयतांना एक मुलगीही झाली; परंतु दुर्गाबाई आणि आनंद नानोस्कर यांचं वैवाहिक आयुष्य फार काळ टिकलं नाही, वयाच्या 24 व्या वर्षी, म्हणजे 1903 साली, मुलगी तीन वर्षे वयाची असताना दुर्गाबाईंनी घटस्फोट घेतला आणि त्या वेगळ्या राहू लागल्या.
 
 
आर्थिक ओढाताण स्वाभाविकपणे होऊ लागली. तो काळ एकल महिलेला नोकरी देण्याचा नव्हताच आणि कुटुंबवत्सल महिलेनं नोकरी करावी असाही नव्हता. चरितार्थासाठी काही वेगळा मार्ग अवलंबावा लागेल अशी शक्यता त्यांना जाणवू लागली. कुणाच्या घरी मोलकरीण म्हणून धुणीभांडी करणं स्वभावात बसणारं नव्हतं. अन्य मार्ग होते; पण ते कुलीन घराण्याला शोभणारे नव्हते. एकच पर्याय पुढे होता तो म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्याचा आणि मुलीचं भविष्य घडवण्याचा.
 
 
दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा त्यांचा पहिला चित्रपट तयार केला, तो 1913 साली. त्यात राणी तारामतीची भूमिका केली होती ती अण्णा साळुंखे यांनी. स्त्री पात्र असूनही साळुंखे यांनी मिशी काढण्यास नकार दिला होता. दादासाहेब फाळके यांना साळुंखे यांची मनधरणी करावी लागली; परंतु उपयोग झाला नाही आणि अखेरीस मिशी दिसणार नाही अशा पद्धतीनं चेहर्‍याचं चित्रीकरण करत दादासाहेबांना तो चित्रपट पुरा करावा लागला. 1913 मध्येच दादासाहेब फाळके यांनी दुसरा चित्रपट तयार केला, त्याचं नाव होतं ‘मोहिनी भस्मासुर’.
 
या चित्रपटात सर्वप्रथम स्त्री कलाकार म्हणून दुर्गाबाई कामत पडद्यावर दिसल्या. यात त्यांनी पार्वतीची भूमिका साकार केली आणि भारतीय चित्रपटातील पहिली स्त्री कलावंत म्हणून त्यांचं नाव भारतीय चित्रपटसृष्टीत नोंदलं गेलं. याच चित्रपटात त्यांच्या मुलीनं म्हणजे कमल कामतनं मोहिनीची भूमिका केली व पहिली बाल कलाकार म्हणून त्यांचीही चित्रपटसृष्टीत नोंद झाली; पण दुर्दैव असं की, ‘मोहिनी भस्मासुर’ प्रसारित होताच प्रेक्षकांनी त्यांच्यावरच नव्हे तर त्यांच्या सिनेमावरही बहिष्कार घातला. दुर्गाबाईंना काम मिळणंही मुश्कील होऊन बसलं. दुर्गाबाई कामत यांचं लग्न जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे इतिहासाचे प्राध्यापक आनंद नानोस्कर यांच्याशी झालं होतं, तर त्यांच्या मुलीचं म्हणजे कमल कामत यांचं लग्न रघुनाथराव गोखले यांच्याशी झालं.
 
 
vivek
 
कमल गोखले यांच्या तीन मुलांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध रंगभूमी व चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले, जे चित्रपट व रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे वडील होते. दुर्गाबाईंनी सुमारे 70 वर्षे चित्रपटांतून भूमिका केल्या. 1980 मधील ‘गहराई’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. हा सर्व तपशील सांगण्याचा उद्देश हा की, चित्रपटसृष्टीत स्त्रियांनी काम करणं हे त्याज्य मानलं गेलं असण्याच्या काळात, दुर्गाबाई व कमलबाई यांनी धाडसानं पाऊल ठेवून स्त्रियांना या क्षेत्रात येण्याची वाट मोकळी करून दिली.
पण जितक्या सहजपणे हे लिहिलं, तितक्या सहजपणे ते घडलं नाही. स्त्री पात्र करणार्‍या पुरुष कलाकारांना आपल्या पायावर धोंडा पडतो आहे असं वाटू लागलं आणि त्यांनी दुर्गाबाईंना कसून विरोध, त्यांची हेटाळणी, नालस्ती सुरू केली. दुर्गाबाई त्याला पुरून उरल्या. इतकंच नव्हे, तर त्यांनी आपली कन्या कमला हिलाही चित्रपटात आणलं आणि त्यांच्या रूपानं पहिली स्त्री बाल कलाकार चित्रपटसृष्टीला मिळाली. दुर्गाबाईंनी आणखी किती चित्रपट केले याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही; परंतु त्यांच्या अभिनयानं त्यांची मुलगी चित्रपटात आली आणि तिच्यापाठोपाठ तिचा मुलगा चंद्रकांत गोखले यानंही चरित्र अभिनेता म्हणून आपली उत्तम छाप निर्माण केली.
 
 
दुर्गाबाईंना जसा चंद्रकांत हा एक नातू, तसेच लालजी आणि सूर्यकांत हे आणखी दोन नातू. लालजी आणि सूर्यकांत अभिनयाकडे वळले नाहीत, ते तबलावादनात रमले; पण चंद्रकांत यांचा चिरंजीव आणि दुर्गाबाईंचा पणतू विक्रम यानं अभिनयाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. दुर्गाबाईंचं पुण्यात निधन झालं. त्या गेल्या ती तारीख 17 मे 1997. ती तारीख बरोबर असेल तर याचा अर्थ त्या तब्बल 117 वर्षे जगल्या.
 
 
आज सिनेमा खूप बदलला आहे, नवनवे जॉनर आणि नवनवी तंत्रं वापरून आजचा सिनेमा तंत्रशुद्ध केला जातो आहे. केवळ स्त्रीकेंद्रित भूमिका डोळ्यापुढे ठेवून चित्रपटांची निर्मिती केली जाते आहे. स्त्री अभिनेत्रीच नव्हे, स्त्री तंत्रज्ञ वगळून सिनेमा करायचं धाडस कुणीही करू धजेल अशी शक्यता आज दिसत नाही. अभिनयाच्या क्षेत्राकडे हीन दृष्टिकोनातून पाहिलं जात असताना धाडस करून त्यात उतरत पुढच्या चार पिढ्यांसाठी चित्रपटाची दारं खुली करून देणार्‍या, इतकंच नव्हे तर शेकडो स्त्री अभिनेत्रींना अभिनयाच्या संधींची महाद्वारं उघडून देणार्‍या आणि एक समृद्ध जीवन जगलेल्या दुर्गाबाईंना सलाम...
Powered By Sangraha 9.0