कैसी कळवळ्याची जाती, नाही लाभावीण प्रीती

30 May 2024 17:02:33
 कलावंतांना निरपराधांच्या हत्येचे दु:ख आहे, असा कयास केला तर आपली फसगत होईल, कारण ज्या वेळी ऑक्टोबर महिन्यात इस्रायलच्या हद्दीत घुसून हजारो निरपराध इस्रायली नागरिकांची हत्या करण्यात आली तेव्हा, आज 'All eyes on Rafah' असं म्हणणारी हीच मंडळी 'I stand with Gaza' चे फलक नाचवत होती. बळी गेलेल्या निरपराध इस्रायलींविषयी त्या वेळी त्यांना काही सोयरसुतक नव्हते, कारण तेव्हा त्यांना गाझाचे समर्थन करण्याचा आदेश असावा. या हल्ल्यावरून इस्रायललाटार्गेट करत जगभरातले डावे समाजमाध्यमात सक्रिय झाले आहेत. हे तेच लोक आहेत जे दिल्लीतल्या शाहीनबाग इथल्या आंदोलनात आंदोलकांच्या बाजूने उभे होते.
 
all eyes on rafah
 
गेले सात महिने इस्रायल-हमासदरम्यान युद्ध सुरू आहे. सगळ्या जगाला हे युद्ध थांबण्याची प्रतीक्षा आहे. स्वत:च्या देशाच्या रक्षणासाठी आणि हमास या दहशतवादी संघटनेचे उच्चाटन करण्याच्या इराद्याने इस्रायल संपूर्ण ताकदीनिशी लढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या फौजांनी दक्षिण गाझा येथील राफा इथे असलेल्या एका छावणीवर बाँबहल्ला केला आणि त्यात 45च्या आसपास नागरिक मारले गेले. यामध्ये बहुतांश स्त्रिया आणि मुले मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आल्यावर याविषयी नेतान्याहूंनी जाहीर दु:ख व्यक्त करत चूक झाल्याचे मान्य केले.
 
 
युद्ध हा कोणत्याच प्रश्नावरचा कायमस्वरूपी तोडगा नाही, अशी भारताची भूमिका आहे. ती या युद्धाबाबतही आहे. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, अशीच भारतासह अनेकांची इच्छा असली तरी सात महिन्यांपूर्वी ते इस्रायलवर लादण्यात आले, ही वस्तुस्थिती आहे. इस्रायलच्या हद्दीत घुसून त्यांच्या हजारो निरपराध नागरिकांची हत्या करून हमास या दहशतवादी संघटनेने युद्धाला तोंड फोडले. त्यामुळे या संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलचा लढा चालू आहे. या युद्धात सरशी होण्याइतका इस्रायल बलाढ्य असला तरी समाजमाध्यमांच्या मदतीने त्याच्याविरोधात अपप्रचार होतो आहे. युद्धाला असलेल्या धार्मिक संदर्भामुळे समाजमाध्यमांच्या दुनियेत दोन तट परस्परांशी भिडले आहेत. एक इस्रायलचा समर्थक आहे आणि दुसरा गट पॅलेस्टाईन-हमास समर्थकांचा आहे. या दुसर्‍या गटात जगभरातल्या मुस्लिमांबरोबरच स्वत:ला उदारमतवादी म्हणवणारे संधिसाधू डावेही आहेत. समाजमाध्यमातून कोणाच्याही विरोधात ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्यात आणि ते प्रस्थापित करण्यात डाव्यांची मातब्बरी आहे. त्यामुळे जमिनीवरच्या युद्धात इस्रायलचे पारडे कायम जड राहणार असले तरी समाजमाध्यमांना हाताशी धरून जगभराची सहानुभूती हमासच्या दिशेने वळविण्यात डावे यशस्वी होत आहेत.
 
 
भारतातील अनेक कलावंत, मग ते बॉलीवूडशी संबंधित असतील वा अन्य क्षेत्रांतील; त्यांची डाव्यांशी विशेष जवळीक असते. हे पूर्वापार चालत आले आहे. या कलावंतांवर प्रभाव व दबाव टाकून त्यांच्या मदतीने आपल्याला हवी तशी हवा तयार करणे, त्या अपप्रचाराला कलावंतांच्या समर्थकांकडून अधिकाधिक समर्थन मिळवणे, अशी ती व्यापक कुटिल नीती असते. वेगवेगळ्या प्रलोभनांपायी आणि कधी जिवाच्या भीतीने ही कलावंत मंडळी आपली विचारक्षमता खुंटीला टांगून डाव्यांना शरण गेलेली असतात. इस्रायल-हमासमधील ताज्या घडामोडींसंदर्भात आत्ता सुरू असलेली "All eyes on Rafah' ही trending post हे त्याचे ताजे उदाहरण. (लक्षवेधी बाब अशी की, निषेधाचे सर्वांचे वाक्य एक, फोटो एक आणि हॅशटॅगही एकच आहे. याला वैचारिक समानता म्हणावे की आणखी काही?)
 
 
यावरून या कलावंतांना निरपराधांच्या हत्येचे दु:ख आहे, असा कयास केला तर आपली फसगत होईल, कारण ज्या वेळी ऑक्टोबर महिन्यात इस्रायलच्या हद्दीत घुसून हजारो निरपराध इस्रायली नागरिकांची हत्या करण्यात आली तेव्हा, आज 'All eyes on Rafah' असं म्हणणारी हीच मंडळी  'I stand with Gaza' चे फलक नाचवत होती. बळी गेलेल्या निरपराध इस्रायलींविषयी त्या वेळी त्यांना काही सोयरसुतक नव्हते, कारण तेव्हा त्यांना गाझाचे समर्थन करण्याचा आदेश असावा. या हल्ल्यावरून इस्रायललाटार्गेट करत जगभरातले डावे समाजमाध्यमात सक्रिय झाले आहेत. हे तेच लोक आहेत जे दिल्लीतल्या शाहीनबाग इथल्या आंदोलनात आंदोलकांच्या बाजूने उभे होते. सीएए आंदोलनातही ही मंडळी सक्रिय होती. त्या टूलकिट गँगचाच हा नवा अवतार आहे. आपले हेतू साध्य करण्यासाठी प्रसिद्ध लोकांची मदत त्यांच्या पी.आर. एजन्सीजना हाताशी धरून घेणे, त्यासाठी त्यांना पैसे पुरवणे, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचा आरोप आहे.
 
 
1986 साली पॅलेस्टाइनच्या दहशतवादी गटाने केलेल्या हवाई हल्ल्यात स्वत:च्या प्राणाचे बलिदान देत अनेक प्रवाशांचा जीव वाचवणार्‍या नीरजा भानोत यांच्यावर अलीकडे चित्रपट आला. त्यात त्यांची भूमिका करणारी आणि त्यासाठी पुरस्कारप्राप्त झालेली अभिनेत्री सोनम कपूर आत्ता पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या समर्थनात "All eyes on Rafah'चा फलक समाजमाध्यमांमध्ये झळकवते आहे. तेव्हा या मंडळींना कळवळा खरा आहे का, प्रश्नाचे गांभीर्य त्यांना समजते आहे का, हा प्रश्न आहे.
 
 
मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या या लोकांना युद्धासारख्या विषयात इतके महत्त्व देण्याची खरे तर आवश्यकता नाही; पण दुर्लक्ष केले तर काळ सोकावतो म्हणून त्यांचे दु:खाचे सोंग उघडे पाडणे गरजेचे आहे.
 
 
भारतातील शेतकरी आंदोलनाच्या वेळी हॉलीवूडमधील प्रख्यात गायिका रिहाना हिने, ‘मला भारतातल्या शेतकर्‍यांची काळजी वाटते’, म्हणत समाजमाध्यमावर गळा काढला होता. तिचा या विषयाशी अर्थाअर्थी काही संबंध नसतानाही तिला आलेल्या या कळवळ्यामुळे अनेकांना तिच्याविषयी प्रेमाचे भरते आले. तीच रिहाना अलीकडे अंबानी यांच्याकडील सोहळ्यात भरपूर बिदागी घेऊन गाऊन-नाचून गेली.
 
राफा येथील ज्या छावण्यांमध्ये गाझाचे सर्वसामान्य नागरिक राहतात तिथेच हमासचे दहशतवादी त्यांच्यासारख्याच वेशात राहतात. त्यांच्या दिसण्यातही साधर्म्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कोण आणि दहशतवादी कोण यातला भेद ओळखणे अवघड असते. याच भागातून ते इस्रायलवर रॉकेटहल्ले करतात. त्यासाठीची शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांचा साठा कँपमध्येच असतो. अशाच एका तंबूत लपलेल्या हमासच्या दोन दहशतवाद्यांना संपविण्यासाठी इस्रायलने अगदी नेम धरून हल्ला केला; पण त्या हल्ल्यांनतर तिथे असलेल्या दारूगोळ्याच्या साठ्याला लागलेल्या आगीत जवळपासचे तंबू भस्मसात झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज इस्रायलकडून वर्तवण्यात येतो आहे. इस्रायल त्याची अधिक तपासणी करत असला तरी समाजमाध्यमांना हाताशी धरून राफातल्या सर्वसामान्य नागरिकांना इस्रायलने मुद्दाम मारले, असे पसरवले जात आहे.
 
 
शत्रुसैन्यावर दबाव आणण्यासाठी स्त्रियांना पुढे करण्याच्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या या आक्षेपार्ह वर्तनाबद्दल आपल्या कलावंत मंडळींनी कधी निषेधाचा एक शब्द काढल्याचे ऐकिवात नाही. पाकिस्तान-बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर अनन्वित अत्याचार होताहेत, नुकतेच संदेशखाली प्रकरण झाले; पण या विषयात बोलण्यासाठी, निषेध नोंदविण्यासाठी हे कलावंत पुढे आले नाहीत आणि हेच लोक इस्रायलशी युद्ध पुकारणार्‍या धोकेबाज हमाससाठी सहानुभूती गोळा करण्याचे उद्योग करत आहेत. त्यांचा हा कळवळा अनाकलनीय आहे. ते सोंग घेतले असण्याचीच शक्यता जास्त असल्याने या मुखवट्यांपासून दूर व सावध राहणे हेच श्रेयस्कर.
Powered By Sangraha 9.0