मनुस्मृती की राज्यघटना

30 May 2024 12:24:37
vivek
पुरोगामी महाराष्ट्रात स्वतःला पुरोगामी ठरवण्यासाठी ‘मनुस्मृती’चा वापर करण्याची पद्धत रूढ झाली आहे. याची चुणूूक शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’, ‘मनाचे श्लोक’ यांचा समावेश होणार, अशी बातमी प्रकाशित झाल्यावर दिसून आली. मूळ विषय बाजूला ठेवून स्वतःभोवती पुरोगामित्वाचे वलय निर्माण करण्याच्या नादात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आणि त्यातून सामाजिक ढोंगीपणा उघड झाला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशभर नवीन अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहेत. त्यानुसार एनसीईआरटीने राज्यासाठी आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार नवीन अभ्यासक्रमात समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’ व ‘मनुस्मृती’मधील काही श्लोक व भगवद्गीता यांचा समावेश असेल, अशी एक बातमी प्रसिद्ध झाली आणि निवडणुकीपेक्षा वेगळा विषय माध्यमांनाचर्चेसाठी समोर आला. ज्या वृत्तपत्राने ‘मनुस्मृती’ व ‘मनाचे श्लोक’ अभ्यासक्रमात समाविष्ट होणार, अशा बातम्या दिल्या, त्यासंदर्भात अभ्यास मंडळाच्या कोणत्याही अधिकृत व्यक्तीच्या वक्तव्याचा आधार दिलेला नाही, केवळ मसुद्यातील निवडक भाग अधोरेखित करत ‘मनुस्मृती’चे भूत जागे केले. ‘मनुस्मृती’ आणि ‘मनाचे श्लोक’ यांच्या उल्लेखामुळे महाराष्ट्रातील सामाजिक जीवनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही प्रसिद्धीप्रेमी मंडळी आंदोलन करू लागली आहेत, तर काहींनी आपण किती पुरोगामी आहोत, हे दाखवण्याचा खटाटोप सुरू केला आहे. खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवताना संबंधित व्यक्तींनी निश्चित भूमिका घेतल्या असतील.आपल्या देशाचा सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक वारसा तपासून काही गोष्टी निश्चित केल्या असतील. प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ‘मनुस्मृती’ कशी शिकवणार? परीक्षा कशी घेणार? इत्यादी गोष्टींचा अजिबात उल्लेख केलेला नाही. तरीही नवीन अभ्यासक्रमात काही कमतरता असेल, चुकीच्या संकल्पना असतील, तर त्या सुधारल्या पाहिजेत, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी वृत्तपत्रात आलेल्या अपूर्ण बातमीच्या आधारे आंदोलने करून समाजमन कलुषित करण्याची आवश्यकता आहे का? हा खरा प्रश्न आहे.
 
 
 
‘मनुस्मृती’ म्हटले की विरोधक आणि समर्थक असे दोन गट एकमेकांसमोर उभे राहतात आणि आपला पक्ष तावातावाने मांडताना आपली वैचारिक व बौद्धिक पातळी हरवून बसतात, हा आपला आजवरचा सामाजिक अनुभव आहे. आज ‘मनुस्मृती’चे आपल्या सामाजिक जीवनात एका पुस्तकापलीकडे कोणतेही महत्त्व नाही. कधीकाळी आपल्या समाजाचे संचालन कसे होत होते याचा ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याला त्रोटक संदर्भ पुरवण्यापलीकडे आज ‘मनुस्मृती’चे अस्तित्व शिल्लक नाही, कारण आपण आपल्या समाजाचे संचालन भारतीय राज्यघटनेनुसार करत असतो आणि आजच्या काळाशी ते सुसंगत आहे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे प्रावधान आहे. आपल्या देशात राज्यघटनेचा अंमल सुरू झाला त्या दिवसापासून आपला दिशादर्शक दस्तऐवज केवळ आणि केवळ भारतीय राज्यघटनाच आहे, हे आपण विसरता कामा नये. ‘मनुस्मृती’चे समर्थक आणि विरोधक ही गोष्ट जितक्या लवकर समजून घेतील तितक्या लवकर आपल्या समाजाचे आणि राष्ट्राचे भले होईल. समाजमाध्यमातून ‘मनुस्मृती’चे समर्थन करणारे किंवा जोरकसपणे विरोध करणार्‍यांपैकी किती जणांनी ‘मनुस्मृती’चा अभ्यास केलेला असतो? हा यानिमित्ताने उपस्थित होणारा प्रश्न आहे.
 
 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’चे दहन बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते केले. ते करताना अस्पृश्य, महिला यांच्याविषयी किती अमानुष आणि जाचक कायदे ‘मनुस्मृती’मध्ये आहेत हे स्पष्ट केले आणि पुढील काळात या जाचक व अमानुष कायद्यांना पर्याय राज्यघटनेच्या माध्यमातून दिला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’चे दहन बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते केले. ते करताना अस्पृश्य, महिला यांच्याविषयी किती अमानुष आणि जाचक कायदे ‘मनुस्मृती’मध्ये आहेत हे स्पष्ट केले आणि पुढील काळात या जाचक व अमानुष कायद्यांना पर्याय राज्यघटनेच्या माध्यमातून दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वत्रयीच्या आधारे समाजाचे संचालन व्हावे अशी व्यवस्था निर्माण केली. ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ दहन केली, त्याच दिवशी कालविसंगत समाजव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला, तर राज्यघटनेच्या अमलाने नव्या समाजव्यवस्थेला प्रारंभ झाला. या सार्‍या पार्श्वभूमीवर वारंवार ‘मनुस्मृती’वादाचा मुद्दा उपस्थित करून समाजात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी प्रयत्न का केले जातात याचा विचार केला पाहिजे. ’मनुस्मृती’चे भूत वेळोवेळी जागे करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम काही मंडळी तत्परतेने करत असतात. असे केल्याने आपण पुरोगामी ठरू; दलित, वंचित बहुजन समाजातील मतपेढी कायम आपल्यासोबत राहील, असा त्यांना विश्वास वाटत असतो.
 
नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’चा समावेश होणार असल्याने याला विरोध म्हणून महाडच्या समता भूमीवर एका राजकीय नेत्याने आंदोलन केले आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी पुन्हा एकदा ‘मनुस्मृती’ दहन करण्याचा प्रयत्न केला. कायम सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या या नेत्याने आवेशपूर्ण घोषणाबाजी करत असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली. लक्षावधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अपमान नाही का? पुरोगामित्व सिद्ध करताना आपण काय करत आहोत याचे भान बाळगायला नको काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेली ‘मनुस्मृती’ आज समाजाच्या स्मरणात आहे ती अशाच लोकांमुळे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडल्यामुळे दलित समूहातील काही मंडळींनी संताप व्यक्त केला, तर काहींनी त्या नादात नेत्याची पाठराखण केली. चूक ते चूकच म्हणण्याचे धाडस हरवून बसलेले हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असू शकतात का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान हा राजकीय संघर्ष किंवा लाभाचा विषय नाही. हा श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे या घटनेनंतर आलेल्या दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया या निषेधार्हच आहेत आणि अशा प्रतिक्रिया देताना समाजातील सर्वसाधारण घटकांना त्याची झळ पोहोचणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.
 
 एका नेत्याने अभ्यासक्रमातून ‘मनुस्मृती’ हटवली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. या नेत्याचा पूर्वइतिहास तपासला, तर असे लक्षात येते की, दलित समूहाचा मोर्चा हुतात्मा स्मारकमध्ये गेला म्हणून याच नेत्याने गोमूत्र शिंपडून हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण केले होते.
 
दुसर्‍या एका नेत्याने अभ्यासक्रमातून ‘मनुस्मृती’ हटवली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. या नेत्याचा पूर्वइतिहास तपासला, तर असे लक्षात येते की, दलित समूहाचा मोर्चा हुतात्मा स्मारकमध्ये गेला म्हणून याच नेत्याने गोमूत्र शिंपडून हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण केले होते. अगदी चाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. राज्यघटना अशा शुद्धीकरणास अनुमती देत नाही. मग ते शुद्धीकरण ‘मनुस्मृती’च्या कायद्यानुसार केले होते आणि तेव्हा ते नेते ‘मनुस्मृती’चे समर्थक होते, असे म्हणायचे का? की आज त्यांनी राजकीय सोईसाठी पुरोगामित्वाची झूल पांघरली आहे? असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने पुढे येत असून संबंधित नेत्यांना त्याचे उत्तर कधी तरी द्यावेच लागेल.
 
मुळात मुद्दा हा आहे की, अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’ नको, अशी मागणी असेल तर ती योग्य पद्धतीने, योग्य व्यासपीठावर उपस्थित केली जाते आहे का? की समाजास वेठीस धरून आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी यानिमित्ताने शोधली जाते आहे. समाजमाध्यमातून आणि रस्त्यावरची आंदोलने करून समाजात दुफळी निर्माण करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग करून घेतला जातो आहे. आपण आपल्या देशात राज्यघटनेच्या चौकटीत राहून आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, अशी माफक अपेक्षा ठेवू शकतो का? बाहुबळाच्या जोरावर संपूर्ण समाजाला वेठीस धरणार्‍या महाभागांचे अंधानुकरण करायचे, की नीरक्षीरविवेकबुद्धीने या सार्‍या घटनेकडे पाहून राष्ट्र प्रथम, एकात्म, समरस समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करायचे, हे नक्की करण्याची ही वेळ आहे. सर्वसामान्य माणसाला आज ‘मनुस्मृती’शी काहीही देणेघेणे नाही. भारतीय राज्यघटनेमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले आहेत.
 
त्यामुळे ज्यांना ‘मनुस्मृती’चे समर्थन किंवा विरोध करायचा असेल, त्यांनी ते करत राहावे. आपण राज्यघटनेचे समर्थन आणि त्यानुसार व्यवहार यावर अधिक भर दिला पाहिजे.
Powered By Sangraha 9.0