’अर्था’चा अनर्थ अन् अनर्थाचा अर्थ!

29 May 2024 13:28:20
 सर्व दुर्घटनांच्या निमित्ताने समाजव्यवस्थेतील स्थित्यंतरांची दखल घेतली पाहिजे. नियोजनशून्य आणि अनियंत्रित शहरीकरण हे त्याचे एक कारण. या संकटांचा सामना करायचा तर जनरेटा महत्त्वाचा. सार्वजनिक स्मृती अल्प असते. याचा लाभ गुन्हेगारी प्रवृत्ती नेहमीच उठवत असतात. तेव्हा जनरेटा कायम राखणे आणि त्यात माध्यमांनी आपली भूमिका पार पाडणे हे गरजेचे. याकडे कोणत्याही राजकीय अभिनिवेशाच्या चष्म्यातून पाहणे शहाणपणाचे नाही. निष्पाप नागरिकांचे जीव आणि सामाजिक स्वास्थ्य हे कोणत्याही ‘इझम’ किंवा ‘वादा’पेक्षा मोलाचे आहेत!
 
Fires
 
गेल्या काही आठवड्यांत महाराष्ट्रासह देशभरात घडलेल्या दुर्घटना या केवळ मन विषण्णच नव्हे, तर सुन्न करणार्‍या आहेत. त्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेले डझनावारी निरपराध नागरिक हे त्याचे एक कारण आहेच; पण त्यापलीकडे जाऊन समाज म्हणून आपली वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे याची भयप्रद चिंता उत्पन्न व्हावी हे त्याचे खरे कारण आहे. निष्पाप नागरिकांचा जीव गेला, की दुर्घटनेस कारणीभूत घटकांवर काही काळ कारवाईचा देखावा निर्माण करायचा आणि जरा वातावरण सैल झाले, की पुन्हा गलथानपणापासून हलगर्जीपणापर्यंत आणि असंवेदनशीलतेपासून निर्ढावलेपणापर्यंत सर्व अपप्रवृत्तींना मोकळे रान द्यायचे, हाच प्रघात जर मान्यता पावणार असेल, तर अशा दुर्घटनांमध्ये जखमी किंवा मरण पावलेल्यांविषयी पळभर हळहळ व्यक्त होण्यापलीकडे काहीही होणार नाही. आज जे सुपात आहेत ते कधी जात्यात सापडतील याचा नेम नाही, असा या सर्व ताज्या दुर्घटनांचा सांगावा आहे. अशी अनिश्चितता आणि अस्थिरता सामाजिक स्वास्थ्यासाठी बिलकूल पोषक नाही हे मान्यच करायला हवे. अकारण निराशेचा सूर का लावायचा, असा काही शहाजोग वृत्तींचा यावर आक्षेप असू शकतो. मात्र ज्यांच्या कुटुंबातील सदस्य काहीही चूक नसताना अशा दुर्घटनांचे शिकार होतात तेव्हा त्या कुटुंबावर केवढा मोठा कुठाराघात होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. तेव्हा अकारण सकारात्मकतेचा मुलामा देऊन ‘अगा जे घडेलच नाही’ असा अगोचर पवित्रा घेण्याचे कारण नाही. परिस्थिती चिंताजनक आहे हे मान्य केले, तर दुर्घटनांमागील आणि त्या अनुषंगाने घडलेल्या घटनांच्या कारणांची तसेच त्यावरील उपायांची चर्चा आणि त्यानंतर अंमलबजावणी होऊ शकते.
 
 
ज्या दुर्घटना अलीकडच्या काही आठवड्यांत घडल्या आहेत त्यांत घाटकोपर येथे होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचा समावेश आहे. यात सतरा जण मृत्युमुखी पडले. पुण्यातील कल्याणीनगर येथे एका मद्य प्राशन केलेल्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आलिशान कार चालवीत एक तरुण आणि एक तरुणी अशा दोघांना पहाटे अडीचच्या सुमारास चिरडले. डोंबिवलीत एका रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात आणि उसळलेल्या आगीत होरपळून अकरा जण मरण पावले. राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये आग लागून काही बालकांसह 27 जण दगावले. दिल्लीत एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत सात जणांना प्राण गमवावा लागला. याचा अर्थ या पाच दुर्घटनांमध्ये 64 नागरिकांना जिवास मुकावे लागले. या सर्वांची चूक काय होती? चूक खरे म्हणजे काही नाही. ज्या अर्थी शहरे आर्थिकदृष्ट्या संपन्न होत आहेत त्या अर्थी सर्व यंत्रणादेखील तितक्याच जबाबदार होत आहेत, असा त्यांना विश्वास असावा, हीच काय ती त्यांची चूक. मात्र ती चूक त्यांच्या जिवावर बेतली.
 
 
यापैकी कोणत्याही दुर्घटनेचे स्वरूप असे नाही, की ती पहिल्यांदाच घडली आहे, असा दावा करता यावा. गेल्या वर्षी मुंबई-पुणे मार्गावर रावेत येथे होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. गेल्याच वर्षी कोईम्बतूरमध्ये होर्डिंग कोसळून तीन जण ठार झाले होते. मद्य प्राशन करून बिनदिक्कत आलिशान कार चालवीत 1999 साली माजी नौदल प्रमुखांच्या नातवाने दिल्लीत गस्तीवरील पोलिसांनाच चिरडले होते. 2013 साली कर्नाटकमधील एका चित्रपट निर्मात्याच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत एका नागरिकाला चिरडले होते. डोंबिवलीत 2016 साली एका रासायनिक कारखान्यात बॉयलरच्या झालेल्या स्फोटात पाच जण मरण पावले होते. 2021 साली मुंबईनजीक विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत 19 करोनाग्रस्त रुग्ण होरपळून मृत्युमुखी पडले होते. या काही उदाहरणांचा उल्लेख केवळ यासाठी की, गेल्या काही आठवड्यांत घडलेल्या दुर्घटना या त्याअगोदर घडलेल्या त्याच प्रकारच्या दुर्घटनांची केवळ पुनरावृत्ती आहेत. साहजिकच त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि ते केवळ सुरक्षिततेच्या उपाययोजनांसंबंधी नाहीत. याचे कारण कोणत्या ठिकाणी कोणत्या सुरक्षा योजना असायला हव्यात, त्यांचे परीक्षण कोणत्या शासकीय यंत्रणांनी करावे, त्यात त्रुटी असतील तर कोणती दंडात्मक कारवाई करावी हे सर्व निश्चित आहे. निश्चित नाही ते इतकेच की, ही सर्व जबाबदारी कोणाची आणि ती सचोटीने पार पाडली नाही तर त्यावर कारवाई काय? हे दोन प्रश्न यापैकी कोणत्याही दुर्घटनेच्या संदर्भात विचारले, तर दुर्घटनांना कारणीभूत नेमके घटक कोणते आणि समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे याचे उत्तर मिळेल आणि ते फारसे उत्साहवर्धक नसेल.
 
घाटकोपर येथे होर्डिंग पडून झालेली  दुर्घटना 

Fires
 
 
या प्रत्येक दुर्घटनेचे मूळ हे काही तरी अनधिकृत किंवा बेकायदेशीर करून ते तसेच रेटण्यात आढळेल. अवाढव्य होर्डिंग घाटकोपर येथे लटकत होते आणि वळवाच्या पाऊस-वार्‍याचा रेटा सहन करू न शकल्याने ते कोसळले. मात्र मुळात तर होर्डिंग अनधिकृत होते आणि नियमापेक्षा फार मोठ्या आकाराचे होते. शिवाय ते लावणार्‍या संस्थेला नोटीसदेखील बजावण्यात आली होती. तरीही ते काढून न टाकण्याचा निगरगट्टपणा त्यांनी केला. हा केवळ निगरगट्टपणा नव्हे; यातून मनमानीपणाची मस्ती जास्त डोकावते; पण ही मस्ती केवळ होर्डिंग लावणार्‍याचीच असू शकत नाही. ज्या यंत्रणांनी त्याकडे कानाडोळा केला त्या यंत्रणादेखील निर्ढावलेल्या आहेत हे अमान्य करता येणार नाही. किंबहुना या दोन बेजबाबदार घटकांतील अभद्र युती हेच अशा दुर्घटना घडण्यामागील खरे कारण. यापैकी एक घटक जरी सजग असता तर ती दुर्घटना घडली नसती. कल्याणीनगर दुर्घटनेनंतर तर पोलिसांपासून ससून रुग्णालयापर्यंतच्या शासकीय यंत्रणा एका सतरा वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी कशा अहोरात्र झटत होत्या याच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या रोज बाहेर येत आहेत. समाजातील सुजाणांना या व्यवस्थेचा उबग आला नाही तरच नवल. तेथेदेखील वर उल्लेख केलेलेच कारण अधोरेखित होते. पालकांनी आपल्या मुलाचे चोचले पुरविले ते बेकायदेशीर, नंबर प्लेटशिवाय पोर्शे गाडी पुण्याच्या रस्त्यांवरून गेले अनेक आठवडे धावत होती; पण त्याकडे आरटीओच्या अधिकार्‍यांचे लक्ष गेले नाही. मुलगा अल्पवयीन असून पबमध्ये त्याला सर्रास मद्य पुरविण्यात आले, त्याने अपघात केल्यानंतर पोलिसांनी तपासात चालढकल केली आणि ससूनमधील डॉक्टरांनी त्या सगळ्यावर कडी म्हणजे आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलले. राजकोट गेम झोनला महापालिकेच्या संबंधित विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नव्हते. तेव्हा ते चालविणे बेकायदेशीर; पण ते चालू असूनही महापालिका यंत्रणांना त्यात आक्षेपार्ह काही दिसले नाही हेही बेकायदेशीरच. दिल्लीतील रुग्णालयात आग नियंत्रक यंत्रणाच नव्हती आणि आणीबाणीच्या वेळी निसटता यावे यासाठी दुसरा दरवाजाच तेथे नव्हता. या सगळ्याचा लसावि हाच की, जे घडले आहे ते कायद्याला वळसा घालून घडले आहे आणि म्हणूनच घडले आहे. याचाच अर्थ कायदा कडक आहे; पण त्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणा कमकुवत आहेत किंवा बरबटलेल्या आहेत. त्याचे विदारक दर्शन गेले काही दिवस घडत आहे. यंत्रणा दोषी आहेतच; त्यावर ज्यांचा वचक हवा अशा राजकीय व्यवस्था याही दोषी आहेतच; मात्र एकूण समाज म्हणूनदेखील आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आली आहे.
 
डोंबिवलीत एका रासायनिक कारखान्यात झालेला स्फोट
Fires 
 
मुळात समाजात वावरताना काही बंधने असायला हवीत आणि ती सर्वाना समान असायला हवीत यासाठी कायदा असतो, नियम असतात. ते नसले तर कोणीही कसाही वागायला मोकळा राहील आणि समाजात अनागोंदी पसरेल. असे होणे समाजस्वास्थ्यासाठी पोषक नाही. तेव्हा कडक कायदे ही प्राथमिक पायरी; पण त्याहून अधिक महत्त्व असते ते त्या कडक कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीला. कायदा आहे म्हणून समाज त्याचे आपसूक पालन करेल, असे मानणे भाबडेपणाचे किंवा वेडसरपणाचे. तसे ते झाले असते तर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांची आवश्यकता भासली नसती. तेव्हा कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीतील महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे तो राबवणार्‍या या यंत्रणा. मात्र त्याच यंत्रणा सोकावल्या तर समाजात कायद्याचे भय राहत नाही, कारण या यंत्रणांना कसेही वाकविता येते, हा निडरपणा उत्पन्न होतो. एकदा तो झाला, की अनेकांना त्या वाटेने जाण्याचा मोह होतो, कारण जो जितके नियम-कायदे मोडून ते वर पचवू शकतो तितका तो शक्तिशाली, असा एक भ्रम समाजात पसरतो. आपण शक्तिशाली आहोत- मग ते धनशक्तीने असू वा राजकीय शक्तीने असू किंवा गुंडशक्तीने असू- पण शक्तिशाली असण्यात आणि तसे आपण आहोत याचे प्रदर्शन घडविण्यात एक निराळी कैफ असते. मद्याचा कैफ काही तासांनी उतरतो; पण या शक्तिशालीपणाची कैफ लवकर उतरत नाही. त्यातच त्या आपल्या शक्तिशालीपणाचे प्रदर्शन मांडले, की समाजातील पापभिरू घटक आपल्याला वचकून असतात आणि यंत्रणादेखील आपल्यासमोर नमून असतात याची धुंदी चढते. शिवाय अशांसमोर वाकताना यंत्रणादेखील आपले समाजाप्रति कर्तव्य विसरून अशा शक्तिशाली व्यक्तींच्या समोर निर्लज्जपणे लीन होतात. अशा धनदांडग्यांच्या अनधिकृत आणि बेकायदेशीर कामांकडे दुर्लक्ष करण्याची किंमत वसूल करून ते आपण शक्तिशाली असल्याची स्वतःचीच समजूत करून घेतात. एकदा ‘अशा’ ठिसूळ पायावरील ‘शक्तिशालींची’ अभद्र युती झाली आणि त्यांचे फावते आहे, असा संदेश समाजात गेला, की त्याच मार्गाने जाण्यात आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे, असा अनेकांचा ग्रह होतो. साहजिकच पैशाचा मोह वाढतोच; पण त्यापेक्षा तो कोणत्याही वाममार्गाने आला तरी हरकत नाही, हा कोडगेपणा वाढतो. आता झालेल्या सर्व दुर्घटनांचे मूळ या पैशाच्या हव्यासात आणि त्याद्वारे यंत्रणांना वेठीस धरण्याच्या अनिष्ट प्रवृत्तीत आहे असे दिसेल.
 
 पुण्यातील घटना 
Fires
 
हे भारतातच होते असे मानण्याचे कारण नाही. 2013 साली टेक्सास येथे एका सोळा वर्षीय मुलाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ट्रक चालविला आणि चार जणांना चिरडले. त्या वेळी त्या धनिकपुत्राला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली नाही. मात्र त्यावरून काहूर उठले आणि धनिकांनी काहीही केले तरी ते जबर शिक्षेतून सुटू शकतात का यावर समाजात बराच खल झाला. त्या वेळीच तो मुलगा ’अफ्लुएन्झा’चा (Affluenza) शिकार असल्याचा शब्दप्रयोग करण्यात आला. इन्फ्लयुएन्झाशी साधर्म्य असणारा हा शब्द. धनदांडगे असल्याने नैतिकतेला तिलांजली देण्याचा हा आजार असा त्याचा अर्थ. आपण जी कृष्णकृत्ये करतो त्यांचे परिणाम आपल्याला भोगायला लागतीलच असे नाही किंबहुना नाहीच लागणार अशी खात्री म्हणजे ही व्याधी. याचे मूळ धनशक्तीत. अमेरिकेतदेखील असे होते, मग भारतात झाले तर आश्चर्य काय, असा शहाजोग प्रश्न विचारण्याचे कारण नाही. भारतात हे सर्रास घडते, ही चिंताजनक बाब. पैसा हा दुसर्‍याचे इमानदेखील विकत घेऊ शकतो याची खात्री पटल्यावर तो कोणत्याही मार्गाने मिळविण्यात संकोच वाटण्याचे कारण राहत नाही. मग पैसा ओरबाडायचा आणि बेभानपणे वागायचे, हा सामाजिक रोग होऊन बसतो. यंत्रणा त्यासाठीच राबत असतील तर अनधिकृतचे पेव फुटणार नाही, असे मानणे भाबडेपणाचे. पुण्यात एवढ्या संख्येने अनधिकृत पब सुरू होते हे दुर्घटना घडेपर्यंत सरकारी यंत्रणांना ठाऊक नव्हते आणि दुसर्‍या दिवसापासून मात्र अचानक सत्य सूर्यप्रकाशासारखे स्पष्टपणे दिसू लागले, या बदलाची वाखाणणी करायची की कीव करायची, एवढाच काय तो प्रश्न. गेमिंग झोन दुर्घटनेनंतर महापालिकेच्या तीन कर्मचार्‍यांचे निलंबन करायचे, ही कारवाई म्हणायची की त्यातील सूत्रधारांना वाचविण्यासाठीची रंगसफेदी? दिल्लीत आग लागलेल्या रुग्णालयाचा मालक तीन रुग्णालये परवान्याशिवाय चालवत असून यंत्रणांची नजर त्यावर नव्हती, हा केवळ हलगर्जीपणा म्हणायचा की अक्षम्य चूक?
  
राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये लागलेली आग

Fires
 
यंत्रणा धनिकांच्या पैशावर पोसल्या जाणार आणि धनिकांना त्याच यंत्रणा त्याच पैशाच्या जोरावर कायद्यापासून संरक्षण पुरविणार, असे हे दुष्टचक्र आहे. त्या दुष्टचक्राची व्याप्ती किती खोलवर पसरली आहे याचे किळसवाणे दर्शन गेल्या काही आठवड्यांत घडले. त्या घटनाक्रमाची द्विरुक्ती येथे करण्याचे कारण नाही, कारण सर्व माध्यमे ते वार्तांकन करीत आहेत. प्रश्न इतक्या सडक्या अवस्थेपर्यंत आपण कसे येऊन पोहोचलो, हा आहे. याचे थोडक्यात उत्तर द्यायचे तर, ते म्हणजे वेळीच टाका न घातल्याने असे आहे. घोडा का अडला, पान का सडले आणि भाकरी का करपली, या तिन्ही प्रश्नांचे उत्तर जसे ‘न फिरविल्याने’ हे आहे तसे आताच्या या सर्व दुर्घटनांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे वेळीच टाका न घातल्याने. कुटुंबीयांनी चोचले पुरविले नसते, तर त्या अल्पवयीन मुलाला मद्याचे एवढे आकर्षण निर्माण झाले असते का? आलिशान वाहनाची किल्ली पालकांनी आपल्या मुलाला दिली नसती, तर तो पैशाची मस्ती करू शकला असता का? एका नेत्याच्या पत्नीने या अपघातानंतर समाजमाध्यमांवर व्यक्त होताना म्हटले आहे की, आपल्या मुलाला हा अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र शाळेत शिकत असताना त्रास द्यायचे; ती तक्रार संबंधित मुलाच्या पालकांना करूनही उपयोग झाला नाही; त्यामुळे आपल्या मुलाची शाळा बदलावी लागली. त्या तक्रारींकडे पालकांनी गांभीर्याने पाहिले असते, तर आताची वेळ आली असती का? अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई यंत्रणांनी सातत्याने आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता केली असती, तर घाटकोपर येथे मुळात त्या आरोपीची अनधिकृत होर्डिंग लावण्याची हिंमत झाली असती का? सुरक्षिततेशी निगडित व्यवस्थांची तजवीज सर्व कारखाने काटेकोरपणे करीत आहेत ना, की केवळ तोंडाला पाने पुसून कामगारांचा जीव टांगणीला लावत आहेत याकडे यंत्रणांनी वेळीच लक्ष दिले असते, तर डोंबिवलीची दुर्घटना टाळता आली नसती का? एक गेमिंग झोन मोठ्या प्रमाणावर डिझेलचा साठा करीत आहे आणि मुळात परवानगी नसताना ते चालू आहे याची दखल घेत यंत्रणांनी वेळीच कारवाई केली असती, तर राजकोटमध्ये अग्निकांड टळले नसते का? रुग्णालयांची तपासणी वारंवार करून नियमबाह्य रीतीने सुरू असणारी रुग्णालये त्वरित बंद केली असती किंवा त्यांचा परवाना रद्द केला असता, तर दिल्लीत काही बालकांचा जीव वाचला नसता का? ही सर्व भ्रष्टाचाराची बटबटीत रूपे आहेत. भ्रष्टाचार आर्थिक असतो तसाच नैतिकही असतो.
 
 
 दिल्लीत एका रुग्णालयाला लागलेली आग

Fires
 
पडझड एकदम आणि अचानक होत नसते. त्याची लक्षणे घसरणीत दिसू लागतात. घसरण रोखली तर पडझड टळू शकते; पण घसरण हाच रिवाज झाला, तर पडझड हेच विधिलिखित असते. चौकात पोलीस नसेल तर सर्रास सिग्नलचा नियम मोडा, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने बिनदिक्कत वाहने चालवा, मोबाइलवर बोलत वाहन चालवा, सार्वजनिक मालमत्तेवर आपली छबी चमकविणारा बॅनर निलाजरेपणाने झळकावा, उत्सवांना विकृत स्वरूप देऊन, सर्व नियम पायदळी तुडवून डीजेचा दणदणाट करा, या आणि अशा छोट्या वाटणार्‍या कृतींतून आणि मुख्य म्हणजे त्यांस कोणी अटकाव करीत नाही, या निर्धास्तपणातून सामाजिक वीण उसवू लागते. कोणी अडवत नाही. उलट असे चारचौघात केल्याने आपला वट वाढतो, अशी भावना बळावली की मग भीड चेपते. मग पैशाच्या जोरावर अधिक स्वैराचार करून अधिक मोकाटपणे वागता येण्याचा परवाना मिळतो. यंत्रणा आपला मोबदला वसूल करून अशा प्रवृत्तींना चालना देतात; ज्याने दोन्ही बाजूंचे फावते, मात्र यात बळी जातो तो सामाजिक स्वास्थ्याचा. सामाजिक वीण उसवत चालली असताना त्याला टाका कौटुंबिक स्तरापासून राजकीय स्तरापर्यंत घातला असता, तर आता समाज इतका हतबल आणि केविलवाणा दिसला नसता. ज्या समाजात आपण राहतो त्याच समाजाशी बेइमानी करायची, हे संवेदनशीलता आणि माणूसपण गोठल्याचे लक्षण. ही अनर्थाकडे सुरू असलेली वाटचाल रोखायची तर सर्व घटकांना समाजाला सावरावे लागेल.
 
 
अर्थार्जनाला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र त्या बळावर मनमानीपणा बोकाळणे, जगण्यात बेफिकिरी, बेदरकारपणा आणि मस्तवालपणा येणे, हे मात्र अस्वीकारार्ह आहे. तरुणांच्या हाती पैसा खेळू लागला, की मोठ्या प्रमाणावर त्यांना मद्यापासून अमली पदार्थांचीच चटक का लागावी, हाही प्रश्न गंभीर आहे. की ज्या सहकार्‍यांमध्ये आपण वावरतो, तेथे आपण असे वागलो नाही, तर आपल्याला त्या वर्तुळात स्थानच राहणार नाहीस, हे ’फियर ऑफ मिसिंग आऊट’ त्यामागील कारण आहे? रुग्णालयांपासून कारखाने चालविणार्‍यांपर्यंत मालकांना कर्मचार्‍यांच्या जिवापेक्षा पैसा महत्त्वाचा का वाटावा? होर्डिंग लटकविणार्‍यांना त्यातून होणार्‍या दुर्घटना आर्थिक व्यवहारांपेक्षा दुय्यम का वाटाव्यात? यंत्रणांना आपण सरकारी वेतन घेऊन काही धनदांडग्यांची चाकरी करतो याचे काहीच वैषम्य का वाटू नये? आणि मुख्य म्हणजे शासकीय यंत्रणांवर ज्यांची मांड असायला हवी अशा राजकीय व्यवस्थेला आपले हात स्वच्छ असायला हवेत, अशी इच्छा का असू नये? हे सगळे सरसकट सर्वांना लागू होईल असे नाही. जबाबदार घटक सर्वच क्षेत्रांत असतात; मात्र बेजबाबदार घटकांना वेळीच अद्दल घडविली नाही, तर त्याच वळचणीला समाजातील मोठा वर्ग जाण्याचा संभव असतो, कारण त्यात गुन्ह्याला यंत्रणांचे कवच असते!
 
 
या सर्व दुर्घटनांच्या निमित्ताने समाजव्यवस्थेतील स्थित्यंतरांची दखल घेतली पाहिजे. नियोजनशून्य आणि अनियंत्रित शहरीकरण हे त्याचे एक कारण. या संकटांचा सामना करायचा तर जनरेटा महत्त्वाचा. सार्वजनिक स्मृती अल्प असते. याचा लाभ गुन्हेगारी प्रवृत्ती नेहमीच उठवत असतात. तेव्हा जनरेटा कायम राखणे आणि त्यात माध्यमांनी आपली भूमिका पार पाडणे हे गरजेचे. याकडे कोणत्याही राजकीय अभिनिवेशाच्या चष्म्यातून पाहणे शहाणपणाचे नाही. निष्पाप नागरिकांचे जीव आणि सामाजिक स्वास्थ्य हे कोणत्याही ‘इझम’ किंवा ‘वादा’पेक्षा मोलाचे आहेत!
 
 
9822828819
Powered By Sangraha 9.0