शिवराज्याभिषेक (पूर्वमीमांसा)

25 May 2024 17:16:00
लेखांक : 16
हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याची आणि सार्वभौमत्वाची पुनर्प्रतिष्ठापना अर्थात शिवराज्याभिषेक होय. इथल्या लोकांनी आपल्या पूर्वगौरवाचा, अस्मितेचा साकार केलेला तो आविष्कार होता. आपले राज्य, आपली सेना, आपले प्रशासन, आपली प्रजा या ‘स्व’त्वाच्या भूमिकेचा तो हिंदुस्थानच्या जनमानसाने केलेला पुनरुच्चार होता. शिवराज्याभिषेकाद्वारे हिंदूंचे सिंहासन पुनश्च साकार झाले. 6 जून या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त विशेष लेख..
 
 
shivaji maharaj 
भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अर्थात ‘शिवराज्याभिषेक’ ही एक अद्भुत आणि असामान्य घटना होती. या घटनेमुळे या देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक अस्मितेचे पुनर्जागरण केले गेले. हजारो वर्षे चालत आलेली हिंदू धर्म आणि संस्कृती जयिष्णु आणि सहिष्णु होती. विविध कालखंडांत हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे होऊनही ही संस्कृती अभेद्य राहिली. अनेक आक्रमकांनी इथल्या संस्कृतीला संपवण्याऐवजी इथेच स्थिरावून, तिचा अंगीकार केला. ते या संस्कृतीचाच भाग झाले. क्षत्रप, शक, हूण असे अनेक आक्रमक या भूमीत सामावले गेले. हजारो वर्षांचा हा सर्वसमावेशक सांस्कृतिक वारसा अबाधित राहिला. इतकंच नव्हे, तर त्यातून इथले धर्म, पंथ, संप्रदाय या सगळ्यांमध्ये असलेली आध्यात्मिक आणि सामाजिक संपन्नता एकत्वाने भरून राहिली; परंतु अकराव्या शतकापासून तुर्की आक्रमकांची टोळधाड एकामागोमाग एक भारतभूमीवर येत गेली आणि क्रूर, धर्मांध अशा या धाडींमुळे हिंदुस्थानच्या सांस्कृतिक वैभवाला ग्रहण लागले. धर्म, देव, देश, कला, व्यापार, उद्योग आणि लोकजीवन उद्ध्वस्त झाले. या प्रत्येक यवनाच्या विरोधामध्ये इथल्या अनेक राजसत्ता लढल्या. वेगवेगळ्या वीरांनी आपापले बलिदान दिले; परंतु पराभवांची मालिका अखंड राहिली. हिंदुस्थानचे वैभव सरले, उरली फक्त गुलामगिरी आणि लाचारी.
 
अस्मानी-सुलतानी
 
गुलामगिरीचा हा काळ सर्वत्र भ्रमण करीत अनुभवलेल्या समर्थ रामदास स्वामींनी आपल्या ‘अस्मानी-सुलतानी’ या काव्यात तत्कालीन भीषण परिस्थितीचे विवरण केले आहे. समर्थ रामदास स्वामींच्या जाणिवा आणि त्यांचं समाजस्थितीच्या निरीक्षणाचं सामर्थ्य या काव्यात सरळ शब्दांतून स्पष्ट होतं...
 
 
जणू काही संपूर्ण जग बुडून गेलं आहे, लोकांची वसतिस्थाने उजाड झाली आहेत, ओसाड झाली आहेत...
 
बहुसाल कल्पांत लोकांसी आला।
महर्गे बहु धाडी केली जनांला।
कितीयेक मृत्युसी ते योग्य जालें।
कितीयेक ते देश त्यागुनी गेले॥
कितीयेक ग्रामे चि ते वोस जाली।
पिके सर्व धान्यें च नाना बुडाली।
कितीयेक धाडिवरी धाडी येती।
तया सैनिकाचेनी संहार होती॥
 
लोकांचे हाल संपत नव्हते. दुर्दैवाचे लोट येत होते. दुष्काळही या सर्वांवरती उताणा पडला होता.
 
कितीयेक ते मेघ ही मंद जालें।
अनावृष्टी स्थळोस्थळी लोक मेले।
कितीयेक अन्नाविसी भ्रष्ट जालें।
कितीयेक लोकीं जळीं प्राण दिल्हे॥
 
जगण्याला अर्थ राहिला नाही. गुलामीचा बाजार सुरू झाला. कधी नाइलाजाने, तर कधी जुलमाने लोक गुलाम म्हणून परदेशात विकले जाऊ लागले.
 
कितीयेक ते तांब्रबंदीच गेले।
कितीयेक मार्‍हाष्टबंदी निमाले।
कितीयेक ते छंद ना बंद नाही।
कितीयेक बेबंद ते ठाईं ठाईं॥
 
पिकवायचं; पण कोणासाठी?... आपल्यासाठी? पोटाची खळगी भरायला पिकवायचं; पण तेसुद्धा स्वतःच्या मालकीचं नाही. कधी कोण येईल, सर्व लुटून नेईल, काहीही खायला मिळणार नाही, अशी अत्यंत वाईट परिस्थिती या
कालखंडात निर्माण झाली.
 
कितीयेक ते धान्य लुटोनि नेती।
कितीयेक ते पेंव खाणोनि नेती।
कितीयेक ते पुरीले अर्थ नेती।
किती पुरीली सर्व पात्रेची नेती॥
 
इस्लामी आक्रमकांच्या, सत्ताधीशांच्या धर्मांधतेचा सामना सारेच करत होते. त्याला जोड दिली पाश्चिमात्य गोर्‍यांनी. कुठलाच पंथ, कुठलाच संप्रदाय हा या त्रासातून सुटला नाही.
 
किती पंथ देशात ते नासले हो।
कितीयेक पंथात ते मारिले हो।
कितीयेक पंथात ते लुटीले हो।
किती दांडगी ते बहु कुटीले हो॥
 
व्यापार संपला, उद्योग संपला, सौदा संपला...
 
किती पोट फाडुनी ते मारीताती।
वृथा चोर अर्थाविसी प्राण घेती।
कितीयेक सौदागरा बुडविती।
कितीयेक ते काफिले लुटिताती॥
 
गृहलक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी म्हणून भारतीय संस्कृतीने जपलेल्या स्त्रीजीवनाचे तर धिंडवडे निघाले होते. या भूमीत स्त्रियांनी जन्म घेणे हा शापच ठरला ...
 
 
किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या।
किती शांमुखी जाहाजी फाकवील्या।
कितीयेक देशांतरी त्या विकील्या।
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या॥
 
हा काळ संपेल, हे दुःख संपेल, या यातनांमधून सोडविण्यासाठी कोणी तरी जन्माला येईल, या फक्त आशेवरती लोक हा कठीण काळ नुसता क्रमत होते.
 
बरें होईल होईल लागलीसे आस।
बरें होईना होईना आसेची निरास।
काळ आला रें आला रें जाहाले उदास।
काही केल्यानें केल्यानें मिळेना पोटास॥
 
देव परीक्षा घेत होता. सणसूद साजरे होत नव्हते. संकटांची रांग लागली होती. प्रार्थना आळवूनही कुणी वाली जन्मास येत नव्हता.
 
कधी देव पावेल काही कळेना।
कदा धुंडिल्या येक दाणा मिळेना॥
असे संकटी रक्षिलें तां दिनासी।
किती आठवु प्रत्ययो तो मनासि।
धरुनि करी उतरिले अनाथा।
लिळे पार तां पावविले समर्था॥
 
रामदास स्वामींच्या या ‘अस्मानी-सुलतानी’मध्ये जी आर्तता, आक्रोश जाणवतो, तो त्या काळच्या सर्वसामान्य लोकजीवनाचा आलेख होता.
 
हिंदवी स्वराज्यनिर्मिती
 
शिवचरित्राची पृष्ठभूमी ही अशा बिकट कालखंडाची होती. या काळात उगम पावलेले शेवटचे हिंदू राज्य म्हणजे विजयनगरचे साम्राज्य; पण त्या वैभवसंपन्न राज्यालाही इस्लामी राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन गिळून टाकले.
 
 
गुलामगिरीच्या या संपूर्ण कालखंडातही हजारो वर्षांची प्राचीन हिंदू संस्कृती आणि नीतिमत्तेची पाळेमुळे टिकून राहिली ती तत्कालीन साधुसंतांनी महाराष्ट्रात केलेल्या आध्यात्मिक कार्यामुळे. वारकरी, महानुभाव, दत्त आणि नाथ पंथ अशा अनेक संतांनी केलेल्या सामाजिक कार्यांमुळे इस्लामी सत्ताधीशांच्या वरवंट्याखाली चिरडलेल्या जनमानसाचे सहनशीलतेचे बळ केवळ शिल्लक राहिले नाही, तर त्याविरोधात एकवटून लढण्याची राष्ट्रीय प्रेरणा जागृत झाली. या ग्रहणांकित हिंदवी राष्ट्रीय प्रेरणेचे उद्गाते ठरले छत्रपती शिवाजी महाराज. इस्लामी सत्ताधीशांच्या अनागोंदी कारभाराला संपविण्यासाठी, इथल्या पिडलेल्या प्रजेला, धर्माला संरक्षण आणि न्याय देण्यासाठी हिंदू धर्माचं सार्वभौम राज्य पुन्हा निर्माण करावं, या आणि या हेतूनेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्राथमिक अवस्थेमध्ये शहाजीराजांचा स्वराज्यकार्याला पाठिंबा होता, याचे अनेक पुरावे आपल्यासमोर येतात. निजामशाहीचा शेवटचा बादशहा म्हणून लहान मुर्तुजा शहजाद्याला मांडीवर घेऊन निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केला; परंतु त्यांना अपयश आलं. तरीसुद्धा स्वराज्य संस्थापन व्हावं, ही इच्छा शहाजीराजांच्या आणि जिजाऊसाहेबांच्या मनात मूळ धरून होती. शिवरायांच्या मात्यापित्यांच्या ह्या सुप्त इच्छा आणि तत्कालीन परिस्थितीची आव्हाने पाहून स्वतःचे राज्य निर्माण करावं, ही अद्भुत गोष्ट शिवाजी महाराजांच्या मनात अंकुरणं स्वाभाविक होतं. त्यांच्या ठायी असलेल्या असामान्य नेतृत्वगुणांनी मावळ मुलखातील लोकांना चेतना दिली आणि प्रतिकूल परिस्थितीतही हिंदवी स्वराज्य साकारलं गेलं.
 
 
शिवरायांचं दि. 28 जानेवारी 1646च्या पत्रावरती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते’ उमटलेली दिसते. जेमतेम सोळा वर्षांच्या वयातही भविष्यातील महाराजांची हिंदू साम्राज्याची संकल्पना या राजमुद्रेतच प्रकटलेली दिसते. लहानपणापासून आपण कोणाचे मांडलिक नाही, कुणाचे दास नाही, ही गुलामी आपल्याला मान्य नाही, आपण आपल्या प्रांतातल्या लोकांना सुख देऊ इच्छितो, आपण त्यांच्या कल्याणासाठी काही तरी केले पाहिजे, ही भावना शिवाजी महाराजांच्या मनात कायम चालत असलेली आपल्याला दिसते. हीच सार्वभौमत्वाची कल्पना शिवाजी महाराजांच्या संपूर्ण स्वराज्याच्या जडणघडणीचा प्राण होता. किंबहुना स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या प्रत्येक मावळ्याच्या मनातही ती भावना शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केली. याच लोककल्याणकारी राष्ट्रीय प्रेरणेचा परिणाम शिवराज्याभिषेक या घटनेतून प्रतिष्ठापित झाला.
 
 
विश्वेश्वर ऊर्फ गागाभट्ट
 
अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांची सत्ता संपुष्टात आणली. परिणामत: दख्खनमधील हिंदू ब्राह्मण, धर्मपंडित इतस्तत: विखुरले गेले. बहमनी कालखंडात काही ब्राह्मण पंडितांना थोडा राजाश्रय मिळाला; पण बहमनी राज्याचे पाच तुकडे झाल्यानंतर बहुतेक प्रतिष्ठित ब्राह्मणांनी महाराष्ट्रातून स्थलांतर केले. जोधपूर, जयपूर, उदयपूर इथल्या राजघराण्यांचा काहींनी आश्रय घेतला. काही काशी आणि प्रयाग अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, तर काही हिमालयात कुमाँऊ आणि गडवाल या प्रांतांत जाऊन स्थिरावले. त्यापैकीच एक पैठणचे भट्ट घराणे जे काशी क्षेत्री गेले. त्यांचे मूळ पुरुष नागपाश हे विश्वामित्रगोत्री ब्राह्मण पंडित होते. या घराण्यात गंगदेव, गोविंदभट्ट, रामकृष्णभट्ट असे प्रसिद्ध विद्वान पंडित होऊन गेले, ज्यांनी अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली. गागाभट्ट यांचे पणजोबा रामेश्वरभट्ट हे स्वतः व्याकरण, तर्कशास्त्र या विषयांत पारंगत होते. त्यांचे ‘रामकुतूहल’ नावाचे एक सुप्रसिद्ध काव्य आहे. अहमदनगर सुलतानाच्या राजपरिवारातील जाफर मलिक याच्या मुलाची व्याधी त्यांनी दूर केली, अशी एक नोंद सापडते. रामेश्वरभट्टांची विद्वत्ता त्यांच्याहून अधिक नारायणभट्ट या त्यांच्या सुपुत्राने पुढे नेली. भट्ट घराण्याचे हिंदुस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठे योगदान असेल म्हणजे या घराण्याने अकबराच्या कालखंडात भग्न अशा काशीतील विश्वेश्वर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. नारायणभट्ट यांच्या ‘दानहिरावलीप्रकाश’ या ग्रंथात या जीर्णोद्धाराचा उल्लेख येतो.
 
 
गागाभट्टांची जन्मतिथी आणि त्यांचे बालपण याविषयी विशेष माहिती जरी कागदोपत्री सापडत नसली तरी हिंदू धर्मशास्त्रावरील त्यांनी त्या काळी केलेले वैविध्यपूर्ण लिखाण हे उपलब्ध आहे. ‘मीमांसा कुसुमांजली’, ‘भट्ट चिंतामणी’, ‘सुधा’, ‘दिनकरोद्योत’, ‘निरुधपशुबंधप्रयोग’, ’पिंडपितृयज्ञप्रयोग’, ‘कायस्थधर्मप्रदीप’, ‘शेणवी जाती निर्णय सुज्ञानदुर्गोदय’, ‘अशौच दीपिका’, ‘राकागम्चंद्रलोकटिका’, ‘राज्याभिषेकप्रयोग’ अशा सुमारे 28 ग्रंथांची निर्मिती गागाभट्टांनी केली. शिवाजी महाराजांनीसुद्धा गागाभट्टांकडून ‘शिवार्कोदय श्लोकवार्तिकाटिका’ हा ग्रंथ लिहून घेतला. कुळाचार, धार्मिक कार्ये, काही ज्ञातीसंबंधित निर्णय देण्यासाठी गागाभट्ट महाराष्ट्रामध्ये बर्‍याचदा येत. त्यांच्या मूळ गावी पैठणला त्यांचे मित्र अनंतभट्ट यांच्याकडे ते अनेकदा जात. शिवाजी महाराजांचा आणि गागाभट्टांचा संबंध नक्की कधी आला याबाबत आपल्याला ठोस पुरावा मिळत नाही; परंतु या दोघांचाही परस्परांशी परिचय शिवराज्याभिषेकापूर्वी होता असं आढळून येतं.
 
 
कृष्णाजी अनंत सभासद त्याच्या बखरीमध्ये लिहितो, पुढे वेदमूर्ती राजश्री गागाभट्ट वाराणसीहून राजीयाची कीर्ती ऐकून दर्शनास आले. भट गोसावी थोर पंडित. चार वेद, सहा शास्त्रे, योगाभ्याससंपन्न, ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण, कलयुगीचा ब्रह्मदेव असे पंडित. त्यास राजे व सरकारातून सामोरे जाऊन भेट घेऊन सन्मानाने आणले. याचा अर्थ गागाभट्ट महाराजांना पूर्वी भेटले नव्हते असा नसून कदाचित त्यासमयी गागाभट्टांचे स्वागत सामोरी जाऊन महाराजांनी केले, असे त्याला म्हणायचे असेल. गागाभट्ट 1664 पूर्वी शिवाजी महाराजांना राजापूरच्या एका न्यायसभेमध्ये भेटलेले असल्याची नोंद आहे. इसवी सन 1636 पासून शहाजीराजांकडे कर्नाटकात प्रभाकरभट्ट नावाचे विद्वान पंडित भोसले कुळाचे कुलोपाध्ये म्हणून कार्यरत होते. शहाजीराजांच्या आग्रहानुसार ते शिवाजी महाराजांकडे कुलोपाध्ये म्हणून रुजू झाले. या प्रभाकरभट्टांच्या पश्चात त्यांच्या पत्नीने बाळंभट नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाला दत्तक घेतले. या दत्तक विधानांमध्ये गागाभट्टांची साक्ष सापडते आणि त्यावरून आपल्याला असं कळतं की, प्रभाकरभट्टांच्या घराशी गागाभट्ट यांचे पारंपरिक संबंध होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक विधीची संपूर्ण जबाबदारी ही गागाभट्ट यांनी कदाचित या पूर्वापार संबंधांमुळे स्वीकारली असावी.
 
 
इस्लामी बादशहांच्या विरोधात शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या लोकांनी तीन दशके सर्वस्व अर्पून जे स्वराज्य निर्माण केले ते सर्वदूर पोहोचावे, त्या राजसत्तेला लोकमान्यता मिळावी, लोकधर्माने आणि राजधर्माने त्या राज्याची सिंहासनाधिष्ठित प्रतिष्ठापना व्हावी, हाच गागाभट्टांचा, तत्कालीन विद्वानांचा, जिजाऊसाहेबांचा, महाराजांचा आणि त्यांच्या सवंगड्यांचा उद्देश होता.
 
 
शिवराज्याभिषेक हा केवळ धार्मिक विधी नव्हता, त्यामागे हजारो वर्षांच्या हिंदुस्थानच्या राजपद्धतीची अभ्यासाने आणि विविधांगी विचारांनी केलेली पुनर्मांडणी होती. इस्लामी सत्तांच्या कालखंडात हिंदू राजेच शिल्लक राहिले नाहीत, त्यामुळे हिंदू राज्याभिषेक परंपराही खंडित झाली होती. शिवराज्याभिषेकाद्वारे हिंदूंचे सिंहासन पुनश्च साकार झाले. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याची आणि सार्वभौमत्वाची ती पुनर्प्रतिष्ठापना होती. इथल्या लोकांनी आपल्या पूर्वगौरवाचा, अस्मितेचा साकार केलेला तो आविष्कार होता. आपले राज्य, आपली सेना, आपले प्रशासन, आपली प्रजा या ‘स्व’त्वाच्या भूमिकेचा तो हिंदुस्थानच्या जनमानसाने केलेला पुनरुच्चार होता.
 
(क्रमश:)
Powered By Sangraha 9.0