समस्येच्या मुळाशी जायला हवे

23 May 2024 18:09:12
 
पुण्यातील कल्याणीनगर या दुर्घटनेनंतर काही महत्त्वाचे मुद्दे आणि वर्तमानात अशा प्रकारच्या घडत असलेल्या अन्य घटनांचा विचार केला, तर यामागे अनेक गोष्टींची गुंतागुंत आहे हे लक्षात येते. मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या हातातला मुबलक पैसा, त्यामुळे वाढलेला मौजमजेचा हव्यास आणि व्यसनांची लागलेली चटक, त्यासाठी उपलब्ध असलेले शेकडो पर्याय, अशा अनिर्बंध जगण्यावर बंधने घालणे तर दूरच, उलट अनेक घरांमधून यासाठी उत्तेजन देणारे वा पूर्णपणे दुर्लक्ष करत स्वत:च्या जगात मग्न असलेले आईवडील, कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक आहे याची उभयपक्षी- समाज व कुटुंबांमध्ये विरत चाललेली जाणीव, कायद्याच्या धाकापेक्षा तो हवा तसा वाकवण्यात सराईत असलेले संबंधित घटक आणि पोलिसांच्या विश्वासार्हतेवर उभे राहिलेले प्रश्नचिन्ह... या आणि अशा अनेक बाबी एका दुर्घटनेला कारणीभूत ठरतात.  
 
pune hit
 
पुण्यातील कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवल्याने दोन निरपराधांचे जीव गेल्याच्या घटनेमुळे आणि त्यानंतर पोलिसांनी, बालहक्क न्यायालयाने घेतलेल्या आश्चर्यकारक भूमिकेमुळे समाजात संताप, अस्वस्थता आहे. गृहमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करून आरोपीला कठोरात कठोर शासन होईल, असे आश्वासन दिल्यानंतर तसेच या प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचे आढळल्यास अशा पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही दिल्यावरही सर्वसामान्यांच्या मनातील भीती, अस्वस्थता अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही.
 
 
बारावीचा निकाल लागल्याची पार्टी म्हणून वयाची 18 वर्षे पूर्ण न झालेला वेदांत अग्रवाल वडिलांची अडीच कोटी किमतीची पोर्शे कार घेऊन मित्रमंडळींसह पबमध्ये गेला. ज्या दोन पबमध्ये त्याने प्रमाणाबाहेर दारू घेतली तिथल्या संबंधित व्यक्तींनी त्याच्या वयाची खातरजमा करण्याची तसदी घेतली नाही. त्या मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांनी, ‘मुलाने मोटार चालवायला मागितली तर दे. तू बाजूला बस’ अशी सूचना आपल्या मोटारचालकाला दिली होती. एवढेच नव्हे तर मुळात गाडीत तांत्रिक बिघाड असताना आणि कायमस्वरूपी नोंदणी क्रमांकही मिळालेला नसताना ही महागडी गाडी मुलाला चालवायला दिल्याचे उघडकीस आले. रविवारी न्यायालयाच्या सुट्टीच्या दिवशी अल्पवयीन आरोपीला न्यायालयात हजर करण्याची कार्यतत्परता दाखवत पोलिसांनी त्याची जामिनावर सुटका केली, तर बाल हक्क न्यायालयाने त्याचे अल्पवयीन असणे लक्षात घेऊन त्याला निबंधलेखनाची हास्यास्पद आणि जीव गमावणार्‍या व्यक्तींची क्रूर चेष्टा करणारी शिक्षा फर्मावली. प्रसारमाध्यमांमधून त्याविषयी बराच आरडाओरडा झाल्यावर त्याचा जामीन रद्द होऊन रवानगी बाल सुधारगृहात झाली आणि या घटनेनंतर फरार झालेल्या त्याच्या वडिलांना तसेच पब मालकांना पोलिसांनी अटक केली.
 
 
व्यसनांचे उपलब्ध असणारे शेकडो पर्याय आणि अनिर्बंध व अष्टौप्रहर मौजमजेसाठी उपलब्ध असलेली शेकडो ठिकाणे, खिशात सहजी खुळखुळणारा पैसा या मुद्द्यांवर आत्ता माध्यमांमधून चर्चा चालू आहे. त्याचबरोबर, ‘कुटुंब’ या भारतीय समाजाच्या आधारभूत असलेल्या संस्थेची उसवत चाललेली वीण यावरही विचारमंथन होणे गरजेचे आहे, याकडेही अनेक विचारवंत, अभ्यासक लक्ष वेधत आहेत.
 
 
या घटनेतील काही महत्त्वाचे मुद्दे आणि वर्तमानात अशा प्रकारच्या घडत असलेल्या अन्य घटनांचा विचार केला, तर यामागे अनेक गोष्टींची गुंतागुंत आहे हे लक्षात येते. मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या हातातला मुबलक पैसा, त्यामुळे वाढलेला मौजमजेचा हव्यास आणि व्यसनांची लागलेली चटक, त्यासाठी उपलब्ध असलेले शेकडो पर्याय, अशा अनिर्बंध जगण्यावर बंधने घालणे तर दूरच, उलट अनेक घरांमधून यासाठी उत्तेजन देणारे वा पूर्णपणे दुर्लक्ष करत स्वत:च्या जगात मग्न असलेले आईवडील, कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक आहे याची उभयपक्षी- समाज व कुटुंबांमध्ये विरत चाललेली जाणीव, कायद्याच्या धाकापेक्षा तो हवा तसा वाकवण्यात सराईत असलेले संबंधित घटक आणि पोलिसांच्या विश्वासार्हतेवर उभे राहिलेले प्रश्नचिन्ह... या आणि अशा अनेक बाबी एका दुर्घटनेला कारणीभूत ठरतात. त्यात निष्पापांचे बळी गेले, की काही काळासाठी समाज खडबडून जागा होतो. त्यावर समाजमाध्यमांमधून, प्रसारमाध्यमांमधून तावातावाने चर्चा चालू होते. मात्र, लक्ष वेधणारा अन्य एखादा विषय समोर येईपर्यंतच त्याबाबतचे (उसने) गांभीर्य टिकते. हे कटू असले तरी दुर्दैवाने सध्याचे हेच वास्तव आहे.
 
  मुळातच ही समस्या इतकी गंभीर आहे आणि दिवसेंदिवस वाढत चालली आहे, की त्यावरच्या खबरदारीच्या उपायांचे, या मंडळींचे बळ कमी पडते आहे.
 
या दुर्घटनेनंतर अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी यामागच्या कारणांचे विश्लेषण केले आहे. आईवडिलांचे मुलांवर नसलेले नियंत्रण आणि देण्यात येणारे अनिर्बंध स्वातंत्र्य (या प्रकरणात सज्ञान नसलेल्या मुलाला महागडी गाडी चालवू देण्यासाठी वडिलांनी दिलेली परवानगी हे त्याचेच उदाहरण), मुलांचे स्वत:च्या मनावरील कमी झालेले नियंत्रण, त्यातून व्यसनाधीनतेला मिळत असलेले बळ, कोणताही नकार पचवायची न रुजलेली सवय... नकार मिळालाच तर त्यावर ताबडतोबीने दिली जाणारी स्फोटक प्रतिक्रिया, न्यूक्लिअर फॅमिलीमुळे वाढलेली व्यक्तिकेंद्रितता आणि समाजाविषयी वाढत चाललेली संवेदनशून्यता अशी अनेक कारणे वेगवेगळ्या मानसोपचारतज्ज्ञांनी, समाजचिंतकांनी, समुपदेशकांनी सांगितली. या संदर्भातले जागरण समाजातल्या या मंडळींकडून गेली काही वर्षे सातत्याने चालू आहे. मुलांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांनीही हा विषय फार गांभीर्याने घेतला आहे; पण मुळातच ही समस्या इतकी गंभीर आहे आणि दिवसेंदिवस वाढत चालली आहे, की त्यावरच्या खबरदारीच्या उपायांचे, या मंडळींचे बळ कमी पडते आहे.
 
 
मुळात हे केवळ मूठभर संस्थांचे वा विचारवंतांचे वा मानसतज्ज्ञांचे काम नाही. समाज म्हणून सगळ्यांनीच ही झालेली... होत असलेली पडझड गांभीर्याने घेऊन आपल्या घरापासूनच बदलांची, डागडुजीची सुरुवात करायला हवी.
 
कुटुंब सदस्यांमधला मनमोकळा संवाद हा कुटुंबाचा आत्मा असतो. हा आत्मा क्षीण होत चालला आहे.
 
‘कुटुंबकेंद्री बांधणी’ ही भारतीय समाजाची विशेष ओळख आहे. अतिशय डोळसपणे स्वीकारलेली- जपलेली- जोपासलेली अशी ही व्यवस्था आहे. म्हणूनच आधुनिकतेचा, पाश्चात्त्य संकल्पनांचा स्वीकार करताना, नव्या जगाशी मेळ खाणारे कालसुसंगत बदल या व्यवस्थेत करताना तिचे मूळ उद्दिष्ट समाज बांधून ठेवणे हे आहे, याचे भान सदैव जागृत हवे. तेच भान गेल्या काही वर्षांत सुटत चालले आहे. कुटुंब केवळ त्रिकोणी झाले नाही, तर घरातल्या प्रत्येकात वाढत चाललेली आत्मकेंद्रितता माणसांची एकाकी बेटे तयार करते आहे. कुटुंब सदस्यांमधला मनमोकळा संवाद हा कुटुंबाचा आत्मा असतो. हा आत्मा क्षीण होत चालला आहे. कुटुंबातला जिव्हाळा लोपत चालल्याने समाजाबद्दलची संवेदनशीलताही कमी झाली आहे.
 
 
हे गडद रंगात रंगवलेले काल्पनिक चित्र नाही, तर वास्तव आहे. यातच अनेक समस्यांची बीजे आहेत. कल्याणीनगरच्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोरातले कठोर शासन होईलही. मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईही मिळेल; पण प्रश्न असा आहे की, समाज म्हणून आपण यातून काही धडा घेणार आहोत का? समाजबांधणीसाठी सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर जाणीवपूर्वक काही प्रयत्न करणार आहोत का?
 
त्यासाठी सामाजिक जीवनासाठी सकारात्मक सेन्सॉरशिप असणे, आजच्या पालकांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. तसे करणे ही खरी गरज आहे. तेव्हा दुर्घटनेविषयी संताप, चीड, काळजी व्यक्त करतानाच याचाही विचार व्हायला हवा. तशी कृती व्हायला हवी.
Powered By Sangraha 9.0