एकात्मिक शेतीचा यशस्वी प्रयोग

18 May 2024 15:26:40

krushivivek
कुडाळ तालुक्यातील कालेली येथील गोविंद ऊर्फ नाना राऊळ या शेतकर्‍याने एकात्मिक शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. फलोत्पादन, मसाले शेती, गो-संगोपन आणि कुक्कुटपालनाच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न ते मिळवीत आहेत. त्यांचा हा प्रयोग कुडाळ तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी आदर्शवत ठरत आहे.
डाळ शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर कालेली- बगलेवाडी हे छोटेसे गाव. या ठिकाणी गोविंद ऊर्फ नाना वसंत राऊळ यांची 40 एकर शेती (एकत्रित) आहे. दहावीपर्यंत शिकलेले गोविंद हे पूर्वी पारंपरिक पिके घ्यायचे; पण त्यातून समाधानकारक उत्पन्न काढणे व घरखर्च भागविणे कठीण जायचे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी 1997 साली एकात्मिक शेती करण्याचा विचार केला. एकात्मिक शेतीकडे कसे वळलात? याविषयी सांगताना नाना राऊळ म्हणाले, मी मूळचा तेंडोली (ता. कुडाळ) गावचा. या गावातच आमची वडिलोपार्जित शेती आहे. पूर्वी शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मला काही वर्षे मुंबईत एका कंपनीत काम करावे लागले. जमापुंजी एक करून कालेली गावात मी व माझ्या चुलतभावाने कालेली येथे डोंगरउताराची 40 एकर शेती विकत घेतली. तेव्हापासून शेती करू लागलो. पारंपरिक शेतीला छेद देत फलोत्पादन, मसाले शेती, गो-संगोपन आणि कुक्कुटपालनाच्या माध्यमातून समाधानकारक उत्पन्न मिळवत आहे. ही शेती विकसित करण्यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च आला.
 

krushivivek 
 
फलोत्पादन शेती
 
राऊळ यांनी 1997 पासून टप्प्याटप्प्याने शेती विकसित करायला सुरुवात केली. काजू, आंबा, सुपारी, फणस, चिकू, नारळ यांच्या उपयुक्त वाणांची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली. रोपांची योग्य प्रकारे जोपासना केली. आज त्यांच्याकडे आंब्याची दोनशे झाडे आहेत. यामध्ये हापूस, केशर, रत्ना नीलम आणि पायरी या आंब्यांच्या जाती आहेत. याखेरीज सुपारीच्या ’मंगला’, ’मंगल सुपर’, ’विठ्ठल’, ’श्रीवर्धन’ जातींची सुपारीची एक हजार झाडे आहेत. काजू 1500, फणस 40, तर नारळाची 500 झाडे आहेत. या सर्व फळझाडांची 20 ते 35 फूट उंच वाढ झाली आहे. त्यामुळे येथे येणार्‍या प्रत्येकाला आल्हाददायक अनुभव येतो. गर्द सावलीमुळे विविध पक्ष्यांची घरटी पाहायला मिळतात. शिवाय जैवविविधतेचे रक्षण होत आहे. बागेच्या संगोपनासाठी दोन शेततळ्यांची निर्मिती केली आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून बागेला मुबलक प्रमाणात पाण्याची सोय झाली आहे.
 

krushivivek 
मसाला पीक
 
ज्या जमिनीत नारळ व सुपारी उत्तम प्रकारे येते, अशा प्रकारच्या जमिनीत मसाला पिके उत्तम येतात. शेतकरी राऊळ यांनी आपल्या फळबागेत मसाला पिकांची मिश्र लागवड केली आहे. चार सुपारीच्या मध्यबिंदूवर जायफळ, दोन नारळाच्या मध्य अंतरावर दालचिनी, नारळ व सुपारीच्या झाडाखाली काळी मिरीची लागवड केल्याचे पाहायला मिळते. काळी मिरीची लागवड केल्यानंतर तीन वर्षांत उत्पन्न सुरू झाले. एका वेलीपासून सरासरी पाच किलो हिरव्या मिरीचे उत्पन्न मिळाले आहे.
देशी गाईचे संगोपन
 
राऊळ यांनी आपल्या शेतीला गो-आधारित शेतीची जोड दिली आहे. त्यांच्याकडे 12 देशी गाईआहेत. यामध्ये गीर, सहिवाल, खिल्लार अशा देशी गाईंचा समावेश आहे. दुधापासून तूपनिर्मिती, शेण व मूत्रापासून दशपर्णी अर्क, जीवामृत तयार करतात. देशी कुक्कुटपालनाचा त्यांचा छोटा व्यवसाय आहे. सर्व माध्यमांतून वर्षाकाठी 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत असतात. शेतीचे काम पाहण्यासाठी चार महिला व सहा पुरुषांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.
 
संपर्क : गोविंद वसंत राऊळ
8668556837
Powered By Sangraha 9.0