‘ज्या क्षेत्राविषयी कोणतेही अचूक विधान करता येणे शक्य नाही त्या क्षेत्राला राजकारण असे म्हणतात.’ आज असे आहे, तर उद्या काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही. अशी राजकारणाची व्याख्या असेल तर शरद पवारांच्या म्हणण्याचे काहीही अर्थ होऊ शकतात. मात्र एक निश्चित की, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यातून भविष्यकालीन राजकीय चित्र कसे राहू शकते याचा अंदाज येऊ शकतो.
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाचे राजनेते आहेत. अजितदादा पवार त्यांना सोडून गेले. जवळचे सहकारीही त्यांना सोडून गेले. अजित पवारांबरोबर 40 आमदारही गेले. काही जणांना असे वाटले की, आता शरद पवार संपले. त्यांचे वयसुद्धा झालेले आहे; पण तसे झालेले नाही आणि तसे होणारदेखील नाही. खरा राजकारणी तोच, जो राजकारणातील चढउताराने कधी संपत नाही किंवा अस्तित्वहीन होत नाही.
शरदराव पवार यांच्याकडे राजकीय वक्तव्य करण्याचे विलक्षण कौशल्य आहे. याबाबतीत त्यांची बरोबरी करील, असा एकही नेता महाराष्ट्रात नाही. (अन्य नेत्यांनी क्षमा करावी.) कोणत्या वेळी काय बोलले पाहिजे आणि कोणता विषय चर्चेसाठी ठेवला पाहिजे याचे त्यांना उपजत राजकीय ज्ञान आहे. त्यांची म्हणून एक राजकीय विचारधारा आहे. या विचारधारेला ते गांधी-नेहरू विचारधारा म्हणतात. त्यांची राजकीय वाढ काँग्रेस पक्षात झाली. दोन वेळा ते काँग्रेस पक्षातून बाहेर पडले; परंतु गांधी-नेहरू विचारधारेशी त्यांनी घटस्फोट घेतला नाही हेदेखील खरे. एका मोठ्या वर्गाला गांधी-नेहरू विचारधारा आवडत नाही. हा ज्याच्या-त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे; परंतु शरद पवार आपल्या विचारधारेवर ठाम आहेत. सत्तेच्या पदासाठी त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलल्या हे खरे आहे.
आपण काँग्रेसमध्ये जाणार हे शरद पवार यांनी सूचित केले, तर मी एकटा जाणार नाही, तर काही प्रादेशिक पक्षांना घेऊन जाईन, असे न बोलता ते म्हणाले. याचा अर्थ असा करायचा का, की उबाठादेखील काँग्रेसमध्ये जाणार?
अशा शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं, “लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील. त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.” या विधानामुळे अपेक्षेप्रमाणे राजकारणात खळबळ माजली. या क्षणी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राजकीय मैत्री आहे. आपण काँग्रेसमध्ये जाणार हे शरद पवार यांनी सूचित केले, तर मी एकटा जाणार नाही, तर काही प्रादेशिक पक्षांना घेऊन जाईन, असे न बोलता ते म्हणाले. याचा अर्थ असा करायचा का, की उबाठादेखील काँग्रेसमध्ये जाणार? उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतीत कोणतेही भाष्य केलेले नाही. राजकारणाच्या अनेक व्याख्या केल्या जातात. एक व्याख्या अशी करायला हरकत नाही की, ‘ज्या क्षेत्राविषयी कोणतेही अचूक विधान करता येणे शक्य नाही त्या क्षेत्राला राजकारण असे म्हणतात.’ आज असे आहे, उद्या काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही.
यावर नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली, ती त्यांच्या शब्दांत अशी आहे, “40 ते 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे एक मोठे नेते राजकारणात आहेत. सध्या ते काहीही भाष्य करत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असावेत. त्यांनी अनेक चांगल्या लोकांबरोबर काही विचारविनिमय करून ते विधान केले असावे. 4 जूननंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागू शकतं, असं त्यांना वाटलं असेल.
छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असं शरद पवार यांनी विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी मन तयार केलं आहे. मात्र, मी त्यांना सांगतो, 4 जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्वप्ने पूर्ण होतील.”
शरदराव पवार 40-50 वर्षे राजकारणात आहेत; परंतु कोणताही मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ त्यांना पूर्ण करता आला नाही किंवा देशाचे पंतप्रधान त्यांना होता आले नाही.
ज्याप्रमाणे शरद पवार हे राजकारणातील एक कसलेले मल्ल आहेत, त्याप्रमाणे नरेंद्र मोदीदेखील राजकारणातील नुसतेच कसलेले मल्ल नसून अतिशय चतुर मल्ल आहेत. शरदराव पवार 40-50 वर्षे राजकारणात आहेत; परंतु कोणताही मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ त्यांना पूर्ण करता आला नाही किंवा देशाचे पंतप्रधान त्यांना होता आले नाही. नरेंद्र मोदी सतत बारा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आणि गेली दहा वर्षे देशाचे पंतप्रधान आहेत. ते जेव्हा म्हणतात की, काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी एनडीएमध्ये विलीन व्हा, सर्व स्वप्ने पूर्ण होतील, या म्हणण्याला विशेष अर्थ प्राप्त होतो.
शरद पवार यांचे भाजपाच्या बाबतीत तळ्यात-मळ्यात चालू असते. अजितदादा पवार यांच्या सकाळच्या शपथविधीला त्यांचा पाठिंबा होता. नंतर त्यांनी भूमिका बदलली. अजितदादा पवार यांची गेल्या वर्षभरातील वक्तव्ये फार बोलकी आहेत. भाजपाकडून शरद पवार यांच्या काही विशेष अपेक्षा असतील का? आणि त्याची पूर्तता होत नसल्यामुळे 4 जूननंतर मी काँग्रेसमध्ये जाईन, असे वक्तव्य त्यांनी केले असावे का? आपल्याला यातील काही माहीत नाही. ज्या क्षेत्राविषयी काही निश्चित माहीत नाही त्याला राजकीय क्षेत्र म्हणायचे, अशी राजकारणाची व्याख्या असेल तर शरद पवारांच्या म्हणण्याचे काहीही अथर्र् होऊ शकतात.
नरेंद्र मोदी यांनीदेखील सूचकपणे म्हटले की, तुम्ही एनडीएत या, सर्व स्वप्ने पूर्ण होतील. हे त्यांनी जाहीर आश्वासन दिले. नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाचेदेखील वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जातात. काही जणांना असे वाटते की, स्वबळावर सत्ता स्थापन करू असे मोदींना वाटत नसावे, म्हणून त्यांनी शरदराव पवार यांना हा देकार (ऑफर) दिला असावा का? मोदीविरोधकांनी मोदी सरकार येत नाही, इंडिया गठबंधनाचेच सरकार येईल, अशी अनेक कथानके चालवली आहेत. म्हणून त्यांना असे अर्थ काढणे सोयीचे आहे.
“ऐन निवडणुकीच्या काळात पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षाशी जवळीक साधतील किंवा काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा पर्याय त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे, असे त्यांना वाटेल. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही.” असे शरद पवारांचे विधान करणे म्हटलं तर फार धोकादायक आहे. मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणारे आहे. प्रादेशिक पक्ष म्हणजे उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे जर उद्या काँग्रेसमध्ये जाणार असतील, तर त्यांना मतदान कशाला करायचे, असा मतदार विचार करू शकतो. तसा त्यांनी विचार करावा म्हणून शरद पवार असे बोलले असावेत का? ज्याच्याविषयी काही निश्चित सांगता येत नाही, त्याला राजकारण म्हणावे.
निवडणूक प्रचारातील सगळीच भाषणे फार गंभीरपणे घ्यायची नसतात. त्यांना अपवाद नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना करावं लागतं. यांच्या भाषणात शिवराळपणा नसतो, टोमणेबाजी नसते. औरंगजेब वगैरे त्यांच्या भाषणात येत नाही. ते आपल्या भाषणाची मांडणी मोजक्या आणि परिणामकारक शब्दांत करतात. निवडणूक काळातील राजकीय प्रचारकांची भाषणे मतदार गंभीरपणे घेत नाहीत आणि वृत्तपत्रेही त्यावर गंभीर चर्चा करीत नाहीत. फक्त 24 तास बातम्या चालविणारे चॅनेल्स त्यांचे रवंथ करीत बसतात. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यातून भविष्यकालीन राजकीय चित्र कसे राहू शकते याचा अंदाज येऊ शकतो. एके काळी काँग्रेस पक्ष हा प्रादेशिक आकांक्षा असणार्या राजकीय लोकसमूहांचा पक्ष होता. भाजपादेखील त्या दिशेने वाटचाल करीत आहे. वेगवेगळ्या प्रदेशांतील प्रादेशिक आकांक्षांना भाजपात समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. नितीश कुमार घटनेचा या दृष्टीने विचार केला पाहिजे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही त्या दृष्टीने विचार करता येऊ शकतो. पवार ही प्रादेशिक शक्ती आहे. या शक्तीला आपल्याकडे वळविण्यात मोदी यशस्वी होतील का, याचे उत्तर जून-जुलैनंतर आपल्याला सापडू शकते.