कुडाळ तालुक्यातील बांबुळी येथील नारायण चेंदवणकर हे स्वतः मधमाशीपालन करतात. याखेरीज कृषी विद्यार्थी व शेतकर्यांना मधमाशीपालन संदर्भात प्रशिक्षण देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 50 हून अधिक लोकांनी मधमाशापालन व्यवसाय सुरू केला आहे. कुडाळ तालुक्यात मधमाशी जतन व संवर्धनकार्यात ते मोलाचे योगदान देत आहेत.
दहावी नापास, कसायला स्वतःची शेती नाही, ना कुठला व्यवसाय, यामुळे न डगमगता गावातच खंडाने शेती घेऊन यशस्वीरीत्या मधमाशीपालन व्यवसाय करणार्या नारायण तुकाराम चेंदवणकर यांची कहाणी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कुडाळ तालुक्यातील बांबुळी हे त्यांचे गाव. गेल्या नऊ वर्षांपासून भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत आहेत. नारायण यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथील राष्ट्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत चार दिवसांचे मधमाशीपालन व्यवसाय प्रशिक्षण घेतले. यानंतर तीन गुंठे जमीन खंडाने (करार पद्धतीने शेती कसणे) घेतली. तीस हजार रुपयांची गुंतवणूक करून 18 मधपेट्यांपासून शेतात मधमाशीपालनाचा व्यवसाय सुरू केला. प्रारंभीच्या काळात त्यांच्या हाती फारसे उत्पन्न लागले नाही. मधमाशांमुळे होणार्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात वाढ होत असते. ही गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन कोकणातील आंबा, कलिंगड व बागायतदारांना ते मधपेट्या भाड्याने देतात व त्यातून उत्तम नफा मिळवतात. मधमाशीपालन व्यवसाय प्रशिक्षण हा त्यांच्या कामाचा आज मुख्य भाग बनला आहे. मधमाशी जतन व संवर्धनात ते मोलाचे योगदान देत आहेत. मधमाशीच्या विविध प्रजातींवर त्यांचा अभ्यास आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत त्यांना मधमाशीपालन व्यवसाय प्रशिक्षक म्हणून आमंत्रित करण्यात येत असते. या माध्यमातून ते शेतकरी, महिला तसेच सेवासंस्थांना मार्गदर्शन करतात. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत येणार्या मुळदे (ता. कुडाळ) येथील उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दोन वर्षे विनामूल्य प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय कुडाळ तालुक्यातील कृषी विद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांना मधमाशीपालन व्यवसायाचे धडे दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 50 हून अधिक लोकांनी मधमाशी व्यवसाय सुरू केला आहे. शहरी भागातील शंभरहून अधिक इमारतींवर आग्या (मधमाशी) मोहोळ पोळ्याचे जाळण्यापासून रक्षण केले आहे. मधमाशीपालन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्या अवलियांची कहाणी कुडाळवासीयांना निश्चितच प्रेरणा देणारी आहे.