कमल ग्रुप्सअंतर्गत जनजागृती ‘पे बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेतून मुलींना आरोग्य आणि मासिक पाळी याविषयी शाळा-शाळांतून मार्गदर्शन करणार्या डॉ. उन्नती शिंदे हिच्या निःस्वार्थी वृत्तीचा आणि समाज निरोगी ठेवण्याच्या कार्याचा घेतलेला आढावा.
“बय, कावळा शिवला! जरा जपून- इकडं-तिकडं फिरू नगं, अशा येळला आपला कपडा बरा! नगं ती शहरी खुळं, उगा कामाची न्हायं. ती खुळं बाळगणं म्हंजे साप अन् विंचूच्या घशात आपला जीव देण्यापरीस हाय बगं!”
अनेक ग्रामीण भागांत अशी संभाषणे आजूबाजूच्या आया-बहिणींकडून लहानपणापासून ऐकायला मिळालेल्या पोरीबाळी पार गांगरून गेलेल्या असतात. त्यामुळे लहान वयापासूनच मासिक पाळीविषयी गैरसमजांबरोबर मनात भीती निर्माण होते. त्यातच शैक्षणिक औदासीन्य आणि अनेक रूढींचा आणि परंपरांचा पगडा असल्यामुळे ही भीती शतपटीने वाढलेली असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीती निर्माण होणार्या अनेक गोष्टी घरातील थोर सांगतात; पण मासिक पाळी म्हणजे नेमकं काय, याविषयी कुणीही स्पष्टपणे बोलत नाही.
या झाल्या गैरसमजुतीच्या गोष्टी. याही पुढे जाऊन पाण्याचे दुर्भिक्ष ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे स्वच्छतेचा अभाव तर आहेच आणि स्वच्छतेचे महत्त्वही माहीत नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाणही कमी होते; आल्याच तरी अनेक समस्यांनी त्या ग्रासलेल्या असतात. या समस्या प्रकर्षाने थोड्याबहुत फरकाने सर्व ग्रामीण भागांत पाहायला मिळतात.
परभणी जिल्ह्यातील एका शाळेचे मुख्याध्यापक गणेश शिंदे हे या समस्या गेली अनेक वर्षे जवळून पाहत होते. या समस्येवर तोडगा निघून या शाळकरी मुलींनी विनासायास शिक्षण घ्यावे, असे मनोमन त्यांना वाटत असे. गावाकडच्या शाळा, त्यात मासिक पाळीविषयी मुलींसोबत त्यांच्या घरच्यांचेच मौन, या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा व्हायला हवी, हा विचार सतत डोक्यात होता. घरीदेखील या विषयावर चर्चा होत असत. गणेश शिंदे यांची मुलगी नुकतीच एमबीबीएस झाली होती. लहानपणापासून शिक्षणाचे महत्त्व आणि समाजाप्रति असलेली कणव शिंदेची मुलगी उन्नती हिला स्वस्थ बसू देत नव्हती. आजीच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कमल ग्रुप्सअंतर्गत ‘पे बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेतून मुलींना आरोग्य आणि मासिक पाळी याविषयी शाळांतून मार्गदर्शन करायला उन्नती आणि तिचा भाऊ मंदार यांनी सुरुवात केली.
मुलींचे आरोग्य आणि त्यांची मासिक पाळी हा विषय निवडण्यामागचे कारण उन्नती सांगते, “माझे बाबा वीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मासिक पाळीत दैनंदिन जीवनात शाळकरी मुलींना ज्या समस्या उद्भवतात त्याविषयी जागृती व्हावी, हा हेतू होता. म्हणून हा विषय मी निवडला आहे. ग्रामीण भागात या विषयावर घरी बोललं जात नाही. अशा अतिमहत्त्वाच्या आणि आरोग्याशी संबंधित विषयांवर ‘डॉक्टर’ या नात्याने संवाद साधणे, ते शास्त्रीयदृष्ट्या त्यांना पटवून देणे, हे मी माझेे कर्तव्य समजते.
त्यातच आधुनिक जीवनशैलीचा अवलंब आणि मोबाइलचा अतिवापर या सर्वांचा परिणाम म्हणजे मासिक पाळी येण्याचं वय अलीकडे आलं आहे म्हणजे अगदी (4थी-5वीच्या) शाळकरी मुलींपर्यंत. मासिक पाळीचे शास्त्रशुद्ध पद्धतीचे चक्र काय असते, हे मार्गदर्शनातून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचे तक्ते तयार केले आहेत. मुलींच्या मार्गदर्शनावेळी मुली आणि मी असेच त्या खोलीत असतो, जेणेकरून मुली निःसंकोचपणे बोलू शकतील. काही बोलतात, तरकाही नाही. अशा वेळी मी सत्र संपल्यानंतर माझा भ्रमणध्वनी देते. त्यानंतर काही दिवस मुलींचे शंकांचे समाधान करण्यासाठी फोन येतात.
ग्रामीण भागातील जीवनशैली पूर्णपणे भिन्न आहे. जेव्हा एखाद्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते, तेव्हा तिच्या हातात कपडा देतात. याव्यतिरिक्त मासिक पाळी म्हणजे काय, त्या दरम्यान घ्यावयाची काळजी, स्वच्छता याबाबतीत कोणतीच प्राथमिक माहिती दिली जात नाही.
आम्ही करीत असलेल्या मार्गदर्शनातून मासिक पाळीचे चक्र, आहार कसा असावा, व्यायाम कोणते करावेत, तसेच या कालावधीत काही जणींना किरकोळ त्रास, पीसीओडी (आताच्या मुलींना) होतो. या त्रासाची तीव्रता कमी होण्याविषयी प्रतिबंधात्मक व त्या वेळेतील उपाय सांगतो. याचा अर्थ मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जसं आपल्या शरीरात इतर अनेक बदल घडत असतात, तशीच ही अगदी सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे याविषयी कोणतीही भीती अथवा दडपण घेण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबरीने मासिक पाळी बंद होण्याचा काळ म्हणजे रजोनिवृत्ती (मेनोपॉझ). या कालावधीत काही स्त्रियांना निष्काळजीपणामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. उदा. गर्भाशयमुखाचा कॅन्सर इ. या सर्व आजारांचे कारण असते, ते म्हणजे मासिक पाळीच्या कालावधीत न घेतली जाणारी काळजी. म्हणून प्रथम त्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगतो. या आजारांवर प्रतिबंधात्मक उपचाराविषयीचे मार्गदर्शन करतो.
मासिक पाळीदरम्यान अनेक गैरसमजुतींमुळे सॅनिटरी पॅड वापरणे टाळले जाते आणि परंपरागत वापरला जाणारा कपडा सोयीचा वाटतो. कपडा वापरणे स्वच्छतेच्या दृष्टीने कसे अपायकारक आहे आणि आरोग्याच्या समस्यांना आपण स्वतःहून कसे निमंत्रण देतो ते शास्त्रीयदृष्ट्या सोदाहरण स्पष्ट करून सांगतो. सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्याच्या दृष्टीने कसे हितकारक आहे हे पटवून तर देतोच, शिवाय या सॅनिटरी पॅडचे मोफत वाटपही स्वखर्चाने करतो. त्याचबरोबर टॅम्पन्स आणि मासिक पाळीचा कप (Menstrual Cup) याविषयी माहिती देतो.
ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे प्रमाण अधिक, त्यात मोलमजुरी करणार्यांची संख्या लक्षणीय. हलाखीत जीवन जगणार्या या वर्गाकडे अन्न मिळवणेच कष्टप्रद. त्यात हे आपल्या लेकरांना पोषक आहार कसा देणार? बर्याच मुलींच्या डब्यात पाहिलं तर शिळी भाकर-भात, नाही तर शाळेत वाटप होणारी खिचडी. यावर आम्ही सांगतो, पैसे मोजले तरच पोषक आहार मिळतो असे नाही, तर परसात लावलेल्या पालेभाज्या, दाण्याचा लाडू हेदेखील तुम्ही या दिवसांत खाऊ शकतात.
मासिक पाळीदरम्यान काही मुलींना पोटदुखी, कंबरदुखीसारखे त्रास जाणवतात. त्यावर गोळ्या खाण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. प्रथम गोळ्या घेऊ नका हे सांगते. त्यासाठी निवडक योगासने, प्राणायाम असे पर्याय सुचवते.
मुलींचे आरोग्य आणि मासिक पाळीदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी अनेक शाळांतून फिरल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे परभणीसारख्या जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. या भागात उत्पन्नाचे साधन कमी, शिक्षणाचा अभाव, अशा स्थितीत मुलीला एखादे स्थळ आल्यास लग्न लावून दिले जाते. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम म्हणून बालविवाहाची प्रथा बळावली. मार्गदर्शनादरम्यान विवाहमान्य कायदेशीर वय काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करते. लग्न होणे ही त्यांच्यासाठी सामान्य गोष्ट आहे. लग्न केल्यानंतर शारीरिक, मानसिक बदल, तसंच सामाजिक विश्व बदललं जातं याबाबत त्या अनभिज्ञ असतात.
बालविवाहामुळे आरोग्याची हानी तर होतेच, काही वेळेला मृत्यूलाही सामोरे जावे लागते. तेव्हा गर्भाशयाची माहिती देताना डायग्राममार्फत माहिती देते. गर्भाशय परिपक्व होणेे म्हणजे काय, गर्भाशयाची परिपक्वता कशी असते. त्याशिवाय त्यांना मातीच्या अपरिपक्व मडक्याचं उदाहरण देते. मातीचं मडकं अपरिपक्वतेमुळे फुटू शकतं, तेच आपल्या शरीराबाबतीतही होऊ शकते. लग्नानंतर आपण बाळाला जन्म देतो; परंतु बालविवाहात आपण (मुलगी) स्वतःच अपरिपक्व असेल तर एखादा जीव त्या शरीरात कसा काय तग धरू शकेल? आजूबाजूला घडलेली काही उदाहरणेे देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. उदा. गर्भपात, गर्भधारणा न होणे, गर्भाशयाबाबत अनेक समस्या उत्पन्न होतात. त्याचं मूळ कारण हेच की, शरीराची अपरिपक्वता. अशा पद्धतीने सांगितले की, त्यांना पटते, त्यांच्यात रुजतेे आणि त्या योग्य विचार करू लागतात. आपल्या भारतात स्त्रियांच्या मृत्यूची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे कमी वयात गर्भधारणा होणे. मृत्यूचे कारण तिच्यातील शारीरिक व मानसिक क्षमतेचा अभाव. या मुली इतक्या लहान असतात की, त्यांच्या शरीरातील बदल समजून घेण्याची त्यांची क्षमताच नसते. जेव्हा आम्ही त्यांचं समुपदेशन करतो, तेव्हा त्यांना स्वतःला कळतं की, आपलं अजून मोठं व्हायचं राहून गेलंय.
या मुलींना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पटली, की ती त्यांच्यात रुजतात आणि बालविवाह हा आपल्यासाठी धोका आहे, हे आज मार्गदर्शनानंतर मुलींना पटू लागले आहे आणि त्यांनी बालविवाह न करण्याचा निर्धार केला आहे. हे आम्ही आमच्या कामाचे यश समजतो.
आतापर्यंत केलेल्या अनेक गोष्टींच्या समस्यांचे मुख्य लक्षण हे शैक्षणिक औदासीन्य आहे. त्यामागची कारणे अनेक आहेत. म्हणून मुलींना प्रथम शिक्षणाचे महत्त्व पटवून देते, आर्थिक सक्षम होण्यास प्रोत्साहित करते, करीअरसाठी समुपदेशन करते, जेणेकरून त्या या चक्रव्यूहात अडकणार नाहीत.
आमचे काम पाहून गेल्या वर्षी शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह संदर्भात जागृतीचा कार्यक्रम परभणीत आयोजित केला होता. या कार्यक्रमास मला विशेष आमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमास 2500 ते 3000 मुली उपस्थित होत्या.“
‘कमल ग्रुप्स’अंतर्गत ‘पे बॅक टू सोसायटी’ ही संस्था नोंदणीकृत आहे का, असं विचारल्यावर उन्नती म्हणाली, “खरं तर एखादी संस्था उभी करावी, असा कोणताही हेतू ठेवून काम सुरू केलं नव्हतं. देशाचे नागरिक म्हणून आपण समाजाचं देणं लागतो, आपले ते कर्तव्य आहे, या जाणिवेने माझ्या आजीच्या प्रथम स्मृतिदिनाप्रीत्यर्थ या कामाची सुरुवात केली. आम्ही करीत असलेेले काम समाजोपयोगी असल्याने काही समाजहितचिंतकांनी या राष्ट्रीय कामासाठी संस्था सुरू करा, अशी सूचनावजा विनंती केली. संस्था नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच संस्था नोंदणीकृत होईल.
मासिक पाळी हे स्त्रीला मिळालेले निसर्गाचे वरदान आहे. त्याचा आनंदाने स्वीकार करून आयुष्याची वाटचाल यशस्वी होते. मासिक पाळी हा अडसर ठरवून, स्वतःच्या प्रगतीला बंदिस्त करू नका. आपण प्रकृतीचे रूप आहोत, देवी आदिशक्ती स्वरूप आहोत. आपली ताकद ओळखा व सर्वशक्तिनिशी कुठल्याही गोष्टीचा सामना करा. दुःख सहन करण्याची आणि ते समर्थपणे पेलण्याची शक्ती स्त्रीमध्ये आहेच. मात्र स्वतःला ओळखण्याची गरज आहे. ‘पे टू बॅक सोसायटी’ माध्यमातून या स्त्री शक्तीची ओळख या मुलींना होत असल्याचे समाधान आहे.”
उन्नतीकडून भविष्यातील योजना समजून घेताना ती म्हणाली, “आता करीत असलेले काम केवळ परभणी जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. लातूर आणि अन्य विभागांत या कामाची व्याप्ती वाढवायची आहे. एक भव्य सभागृह निर्माण करायचे आहे, जेणेकरून स्त्रियांच्या आरोग्य संदर्भातील माहितीपत्रके भित्तिचित्राप्रमाणे लावता येतील. आता ‘ए आय’चे जग आहे. या आधुनिक तंत्रशैलीचा वापर करून ही माहिती अधिक सोप्या पद्धतीने समजावण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुलीचा जन्म ते तिचा निसर्गचक्र (मासिक पाळी) समाप्तीचा काळ. दुसरं म्हणजे समुपदेशन सेंटर उभं करायचं आहे.
वैद्यकीय क्षेत्रात उन्नतीला स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून करीअर करायचे नाही, तर तिचं क्षेत्र वेगळं असणार आहे. आतापर्यंत ती ‘पे बॅक सोसायटी’च्या माध्यमातून ‘मुलींचे आरोग्य आणि मासिक पाळी’ याविषयीचे काम करीत असताना अकरा हजार मुलींपर्यंत पोहोचली आहे. या मुली भविष्यात तिच्या करीअरशी कुठल्याही प्रकारे संपर्कात येणार नाहीत. तरीदेखील ती निःस्वार्थ भावनेने हे काम समाजासाठी करीत आहे. तर मग प्रश्न पडतो, एवढा निःस्वार्थ भाव उन्नतीकडे आला कुठून?
घरातूनच तिला समाजसेवेचे बाळकडू मिळाले आहे. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षण घेताना डॉ. उन्नती, डॉ. हेडगेवार रुग्णालयाद्वारे चालणार्या ‘सेवांकुर’शी जोडली गेली. ‘वन वीक फॉर नेशन‘ या साप्ताहिक शिबिरात ती सहभागी झाली. या शिबिरात ती आरोग्यसेवा देण्यासाठी ज्या वनवासी भागात गेली, त्यांची परिस्थिती पाहून ती हबकलीच. तेथील लोक ज्या परिस्थितीत जीवन जगतात त्यांच्याहून आपण कित्येक पटीने सुस्थितीत जगतो आहोत. त्यामुळे आपण समाजासाठी आरोग्यसेवेच्या माध्यमातून सेवा चालू केली पाहिजे हे मनोमन पटले. उन्नतीच्या दृष्टीने ‘सेवांकुर’चा अर्थ मनामध्ये सेवेचे अंकुर निर्माण करणे. या शिबिरात हे सेवांकुर तिच्यात रुजले, बहरले आणि त्याचा विस्तार होत आहे. अशीच सेवेची बीजे अंकुरावी आणि उन्नतीला सेवेचा वसा पुढे चालू नेण्यास बळ मिळावे, या शुभेच्छा!