शिवरायांचे राजकारण (उत्तरार्ध)

14 May 2024 15:34:42
vivek
शिवरायांच्या सर्व राजकारणाचा, आचरलेल्या नीतींचा एकत्रित विचार केला, तर मानवी इतिहासातील आदर्श राजकारणाचा तो एकमेव शिखरबिंदू ठरतो, किंबहुना पिढ्यान्पिढ्या लोककल्याणकारी नीतिमूल्यांचा मार्गदर्शक आणि प्रेरणादायी दीपस्तंभ बनून राहिला आहे.
शिवपूर्वकाळाचा विचार केला तर हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकते, अशी शंका त्या काळात कुणाच्याही मनांत आली नव्हती. आपल्याकडे सत्ता असावी असे काहींना वाटले असले, तरी हिंदुराज्य निर्माण करण्यासाठी आवश्यक लोकसंघटन करण्याचे प्रयत्नच त्या काळी विशेष झाले नाहीत हे दुर्दैव होते. अशा परिस्थितीत स्वराज्य स्थाaपनेचा विचार शिवरायांनी केला आणि तो तडीस नेला हेच त्यांचे लोकोत्तर कार्य होते. ते साकार करण्यासाठी कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागणार याचा सखोल अभ्यास शिवरायांनी केलेला होता. रणाशिवाय स्वातंत्र्य असंभव होते. त्यामुळे शिवरायांनासुद्धा तत्कालीन सत्तांशी लढावे लागले. त्यासाठी युद्धशास्त्रांत पारंगत अशा सुसज्ज सैन्यबळाच्या निर्मितीला शिवरायांनी प्राधान्य दिलेच; पण त्याहून अनेक मार्गांनी स्वराज्य साकारता येऊ शकते हे मर्म त्यांनी जाणले होते आणि तशी नीतीही त्यांनी अमलात आणली.
 
लोकसंघटन
 
कॅरे म्हणतो, छत्रपती शिवाजींमध्ये कुशल सेनानायकाचे गुण होतेच; पण त्याहूनही आपले लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक असे किती तरी मार्ग त्याने जाणले होते. शिवरायांनी प्राप्त केलेले यश हे अशा अनेक नीतींची एकत्र परिणती होती. प्रस्थापित इस्लामी सत्ता सर्वार्थाने प्रबळ होत्या. शिवरायांच्या स्वराज्याचे अस्तित्व त्यापुढे नगण्य होते. त्यामुळे त्या सत्ता मानणार्‍या लोकांना आपल्याकडे वळवणे हे महाकठीण कर्म होते. तुटपुंजे अर्थबळ आणि स्वराज्याचा मौलिक विचार एवढेच शिवरायांच्या हाती होते. शिवरायांनी या दोन्हींचा वापर चाणाक्ष रीतीने केला. 1672 पर्यंत म्हणजे स्वराज्य प्रबळ होईपर्यंत त्यांनी अशाच साम-दाम-दंड-भेद, चतुरंगी राजनीतीचा वापर केल्याचे अधिक दिसून येते. युद्धात जय किंवा अनेक किल्ले, भूभाग मिळवणे यामध्ये अशीच राजनीती त्यांनी वापरली. या मार्गांनी माणसे फोडली, मिळवली असली तरी त्यापुढे जाऊन त्यांच्यात अतूट स्वराज्यनिष्ठा शिवराय निर्माण करू शकले हे त्यांच्या यशाचे खरे गमक होते. राजकारणात आमिष हा तत्कालीन प्रभाव साधतो; पण विचार हा दीर्घकालीन परिणाम घडवतो हे शिवरायांनी प्रत्यक्ष साध्य करून दाखवले आणि म्हणूनच विविध मार्गांनी मिळवलेले लोक विचाराने एकत्र गुंफून ठेवण्याचे कसब जे राजांना साधले ते त्या काळी कुणालाच तितक्या प्रमाणात जमले नाही. अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर विखुरलेल्या समाजाला एका ध्येयाखाली, एका विचाराखाली आणणं हे कठीण कार्य महाराजांनी साधलं ते गुणग्राहकता, निष्पक्षपाती वर्तन आणि शुद्ध चारित्र्याच्या जोरावर. म्हणूनच ते गुण आपल्या लोकांत उतरवू शकले.
 
शिवरायांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. आपला-परका, उच्च-नीच हा भेद मानला नाही. अठरापगड जातींनी भरलेल्या समाजाला एकदिलाने कार्य करण्यास प्रवृत्त केलं. रयतेचं रक्षण आणि कल्याण सर्वतोपरी ठेवून त्यासाठी सेनेतील आणि प्रशासनातील सर्व लोकांना कडक शिस्त लावली. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणार्‍यांची मांदियाळी झाली; पण सर्वांत मुख्य म्हणजे चारित्र्यसंपन्न लोकांचा समाज पुनश्च अस्तित्वात आला. गोरगरीब, स्त्रिया, साधुसंत, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, त्यांना दुखवणेसुद्धा शिवरायांच्या नीतीत बसणारे नव्हते. स्वराज्यातील मुलखातून जाणार्‍या प्रवाशांना, यात्रेकरूंना किंचितही इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. परमुलखात लूट करतानाही तिथल्या सामान्य प्रजेला त्रास होणार नाही यासाठी सैनिकांना कडक आज्ञा दिल्या. इस्लामी सत्तांसारखे अनेक फतवे-कायदे महाराजांनी केले नाहीत; पण प्रत्येक बाबतीतील आपल्या आदेशांद्वारे, शासनांद्वारे, कृतीद्वारे जे त्यांनी दाखवून दिले, त्यामुळे प्रशासन आणि सैन्य दोघांमध्ये शिस्त आणि नीतिमत्ता दृढ झाली. जसा प्रजेवरचा अन्याय राजांना अमान्य होता, तसाच स्वराज्यासाठी खपणार्‍या माणसांबाबतीतही त्यांनी अन्याय होऊ दिला नाही. कोणत्याही गुण आणि कौशल्याची अवहेलना केली नाही आणि विजय जरी मिळाला नाही तरी पराक्रमाचा सन्मान केल्यावाचून राहिले नाहीत. जंजिर्‍यावरील मोहीम फसली तरी लायपाटलाच्या हातात सोन्याचे कडे घालून, त्याला ‘पालखी’ गलबत देऊन गौरव करणे हे राजांच्या अशाच नीतीचे उदाहरण होते.
 
संधीचे सोने
 
शत्रूच्या सैन्यात, राज्यकारभारात, मोहिमांत कुठे काय घडते आहे याची तत्काळ माहिती मिळेल असे सशक्त, दक्ष आणि तत्पर हेरखाते शिवरायांनी निर्माण केले. या हेरांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारे प्रत्येक परिस्थितीचा कसून अभ्यास केला. आपल्याकडील सामर्थ्याची आणि उणिवांची त्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणून मिळालेल्या प्रत्येक संधीचा शिवरायांनी पूर्ण फायदा करून घेतला. शत्रू दुसरीकडे गुंतला आहे अशा वेळी चढाया केल्या, तर कधी आलेल्या शत्रूचे लक्ष दुसरीकडे वळावे यासाठी योजना आखल्या. शत्रू बेसावध असेल त्या वेळी आक्रमण करण्याचा एकही क्षण राजांनी वाया दवडला नाही. जोपर्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत रणात उतरायचे नाही, उगाच सैन्यशक्ती वाया घालवायची नाही, ही रणनीती त्यांच्या विजयांचे मुख्य गमक होते. 1657 पर्यंत मोठमोठ्या लढाया करणं त्यांनी टाळलं, तर बेसावध ठाणी, किल्ले-मुलूख मिळवण्याची संधी सोडली नाही; परंतु समोर आलेल्या फत्तेखानासारख्या शत्रूला अजोड युद्धनीती वापरून परास्त करण्याचे धारिष्ट्य दाखविले. 1658 पासून आदिलशाहीतील राजकीय गोंधळाचा फायदा घेऊन कोकण ताब्यात घेतले, तर 1670 नंतर मुघलांच्या मुलखात मुसंडी मारली. मात्र 1672 नंतर परिस्थिती पूर्णत: अनुकूल झाल्यावर स्वराज्य मुलखाचा विस्तार केला.
 
1672 पर्यंत स्वराज्य प्रबळ झाले, स्वयंपूर्ण राज्य म्हणून पायाभूत झाले. नंतर मात्र शिवरायांच्या राजनीतीत अशा मार्गांऐवजी राजकीय डावपेचांचेच कौशल्य अधिक दिसून येते. आदिलशाही सत्ता आतून खिळखिळी झाली होती, दख्खनी-पठाण वाद वाढीस लागला होता. शिवरायांना मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करायचे होते आणि दक्षिणेकडे राज्य वाढवायचे होते. त्यामुळे एका बाजूस शिवरायांनी मुघलांशी तह केला, त्यांचे लक्ष आदिलशाहीकडे वळवले आणि दुसर्‍या बाजूस विजापुरातील दख्खनी लोकांना पाठिंबा देऊन अंतर्गत वादांना हवा दिली. त्यामुळे आदिलशाही शिवरायांच्या मार्गात आडवी येणार नाही अशी अनुकूल परिस्थिती झाल्यानंतरच त्यांनी दक्षिणस्वारी करून स्वराज्याची सीमा जिंजीपर्यंत वाढवली.
 
दूरदृष्टी
 
आज ना उद्या मुघल दख्खनेत उतरून स्वराज्यासह सर्वच दख्खनी शाह्या संपविण्यासाठी कंबर कसणार हे राजांनी आधीच जाणले होते. हे युद्ध किती प्रदीर्घ चालेल याचीही त्यांनी कल्पना केली होती. त्यांची दूरदृष्टी इतकी प्रगल्भ होती की, त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद त्यांनी वेगळी करून ठेवली. सर्व किल्ले मजबूत केले. शस्त्रास्त्रांचा विपुल साठा निर्माण केला आणि जर स्वराज्याचा मुलूख संकटात आलाच तर प्रसंगी दूरवर जाता येईल या योजनेने दक्षिणेकडील मोठा मुलूख ताब्यात आणला. दख्खनची एकजूट व्हावी यासाठी आदिलशाही आणि कुतुबशाहीशी आवश्यक ते तह केले. मुघलांविरुद्ध दख्खन एकवटेल याकडेही लक्ष पुरवले. महाराजांनंतर 27 वर्षे हेच नेमके इतिहासात घडले. छत्रपती संभाजी-राजाराम काळात औरंगजेबाविरुद्ध स्वराज्य लढले, टिकले आणि त्यानंतर मोठे झाले ही शिवरायांच्या दूरदृष्टीने अवलंबिलेल्या राजकारणाची परिणती होती.
 
परकीय धोरण
 
पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच अशा सर्वच पाश्चिमात्य लोकांशी महाराजांनी काहीसे संमिश्र धोरण ठेवले. मैत्रीपूर्ण धोरण असले तरी स्वराज्याच्या मुलखात त्यांचा हस्तक्षेप होणार नाही यासाठी कडक योजना राबविल्या. स्वराज्याच्या सागरी संरक्षणासाठी उत्तम आरमार आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली. पोर्तुगीजांच्या भूभागात स्वार्‍या टाळल्या; पण आपल्या मुलखात त्यांची घुसखोरी होणार नाही याकडे लक्ष पुरवले. आंतरराष्ट्रीय व्यापार स्वराज्याच्या मुलखात वाढीस लागला पाहिजे आणि पोर्तुगीजांवरही वचक हवा म्हणून मस्कतच्या राजांशी, खलिफांशी संबंध जोडले. इंग्रजांची राजापूरची वखार उद्ध्वस्त करून त्यांना स्वराज्याच्या शत्रूंशी हातमिळवणी करायची नाही, हा वचक ठेवला. त्यासाठी नुकसानभरपाई म्हणून इंग्रजांनी तगादा लावला; पण त्यासाठी उशीर करून इंग्रजांना कायमची अद्दल घडवली. जंजिर्‍याच्या सिद्दीला इंग्रज, पोर्तुगीजांकडून मदत मिळणार नाही याची दक्षता घेतली. इंग्रजांबरोबरही व्यापार-उदिमासाठी तह केले; पण खांदेरी बांधताना त्यांचा विरोध धुडकावून लावत आरमारी युद्धात मराठ्यांचा पराक्रम दाखवत इंग्रजांना जेरीस आणले. परकीयांनी व्यापार जरूर करावे; पण या भूमीत राजकारण करायचे नाही याची स्पष्ट कल्पना त्यांनी या सर्व परकीयांना दिली आणि आपल्या अधिकार्‍यांनासुद्धा जागरूक राहण्याचे आदेश दिले.
 
 
उदंड राजकारण तटले
 
 
अवघ्या पस्तीस वर्षांच्या राजकीय कार्यकाळात शिवरायांनी तीनशे वर्षांच्या अन्यायी युगाला थांबवले आणि रयतेवरील अत्याचारी अंधार दूर केला तो उदात्त राजकारणाच्या बळावर. ‘उदंड राजकारण तटले। तेणे चित्त विभागले॥’ असे म्हणत रामदासस्वामींसारखे बैरागी गोसावीही महाराजांच्या राजकारणाची थोरवी गातात. शिवरायांचे राजकारण रयतेला पोटच्या पोरासारखे सांभाळणार्‍या मायेने, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर, न्यायनिष्ठुर व्यवहाराचे, मुजोर अन्यायी लोकांना संपवणारे, फितुरांना धडा शिकवणारे, बलाढ्य शत्रूला नामोहरम करणारे, देशभक्तीने भारलेले, हिंदू धर्मसंस्कृतीचे संरक्षण आणि पुनर्प्रतिष्ठापन करण्यासाठी सरसावलेले होते. या राजकारणात लोकांचे संघटन होते आणि त्यांच्या ठायी आत्मविश्वासाने देशाचे संरक्षण करण्याची प्रेरणा होती. मराठ्यांचे ‘गोमटे’ करण्याची दुर्दम्य इच्छा आणि हिंदुस्थानाच्या भविष्यातील अभ्युदयाची संकल्पना त्यात सामावलेली होती. सर जदुनाथ सरकार महाराजांचे चरित्रकार्य समर्पक शब्दांत सांगतात,  He has proved by his example that the Hindu race can build the nation, found a state, defeat enemies; they can conduct their own defense; they can protect and promote literature and art, commerce and industries; they can maintain navies and ocean-trading fleets of their own, and conduct naval battles on equal terms with foreigners. He taught the modern Hindus to rise to the full stature of their growth. महाराजांच्या राजकारणाने हिंदुस्थानाच्या इतिहासात दाखवून दिले की, आक्रमकांनी हिंदू धर्मसंस्कृती, राज्ये संपवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी झाले नाहीत. उलट मानवतेने भरलेली ती संस्कृती उरली, पुरून राहिली आणि तितक्याच जोमाने वाढलीही. शिवरायांच्या सर्व राजकारणाचा, आचरलेल्या नीतींचा एकत्रित विचार केला तर मानवी इतिहासातील आदर्श राजकारणाचा तो एकमेव शिखरबिंदू ठरतो, किंबहुना पिढ्यान्पिढ्या लोककल्याणकारी नीतिमूल्यांचा मार्गदर्शक आणि प्रेरणादायी दीपस्तंभ बनून राहिला आहे.
Powered By Sangraha 9.0