ज्ञानं परम बलम् ।

14 May 2024 15:09:36
@अश्विनीकुमार भानुदास येवला
9421507026
1 मे 2024 रोजी 106 वर्षे पूर्ण करणार्‍या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आणि ना.शि.प्र. मंडळाचा 106 वर्षांच्या प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
vivek 
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली स्वदेशीची चळवळ लोकजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाची चळवळ होती. या चळवळीमुळे देशभर स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतुःसूत्रीचा स्वीकार करण्यात आला. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेल्या व फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेऊन आलेल्या नाशिकमधील कै. शि. रा. कळवणकर, गुरुवर्य कै. रं. कृ. यार्दी, कै. ल. पां. सोमण, कै. शि. अ. अध्यापक यांनी कै. वा. वि. पाराशरे यांच्या मदतीने 1 मे 1918 या दिवशी ’न्यू इंग्लिश स्कूल’ या नावाने शंकरराव कर्डिले यांच्या वाड्यात शाळा सुरू केली. त्याच वेळी या ध्येयवादी व शिक्षणप्रेमी संस्थापकांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवावा व ब्रिटिशांच्या विरोधात लढणारा तरुणवर्ग निर्माण व्हावा, हे उद्देश यामागे होते.
 
संस्थेचा प्रारंभकाळ
 
कर्डिले वाड्यात शाळा सुरू झाली, तेव्हा सुरुवातीला 1 ली ते 5 वीपर्यंतचे वर्ग होते. मुलांना राष्ट्रीय शाळेत प्रवेश घेण्याकडे समाजाचा कल वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे 1919 साली शिंदेकर यांच्या वाड्यात व त्यानंतर 1920 साली राजेबहाद्दूर यांच्या वाड्यात शाळा स्थलांतरित झाली. सर्व संस्थापक सदस्य संस्थेत अध्यापनाचेही कार्य करीत असत. खर्‍या अर्थाने ते लोकशिक्षक होते. 1924 मध्ये श्रीमंत माधवराव देशपांडे यांच्या उदार देणगीमुळे शाळेसाठी जागा खरेदी केली व या जागेवर 1932 रोजी चौदा खोल्यांची इमारत बांधली. यासाठी ’वाडिया ट्रस्ट’ आणि ’सुरगाणा संस्थान’ प्रमुखांनी मदत केली होती. 1938 मध्ये शाळेसाठी भव्य नवीन इमारत बांधली गेली. या नूतन इमारतीचे उद्घाटन नामदार मावळणकर जी. व्ही. यांच्या शुभहस्ते झाले होते. संस्थेने त्या काळात एक हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था केली होती. या नवीन इमारतीच्या बांधकामामुळे मंडळावर आर्थिक जबाबदारी येऊन पडली होती. त्या वेळी 1943 मध्ये मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी श्रीमान शेठ विलासरायजी रुंगटा व गोविंदरायजी रुंगटा या बंधूंनी आपल्या पूज्य पिताजींच्या नावाने भरघोस देणगी दिल्याने जुलै 1943 मध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल’चे ’जुहारमल सरुपचंद रुंगटा हायस्कूल’ असे नामकरण झाले.
 
हेच सध्याचे जु. स. रुंगटा हायस्कूल होय. संस्थेबरोबरच जु. स. रुंगटा हायस्कूल या शाळेलाही 1 मे रोजी 106 वर्षे पूर्ण झाली. आज 106 वर्षांनंतरही संस्था अभ्यासक्रमाबरोबर राष्ट्रीयत्वाचा, देशभक्तीचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी विविध उपक्रम, व्याख्याने, प्रदर्शने, स्पर्धा यांचे आयोजन केले जाते.
 

vivek 
संस्थेचा कार्यविस्तार
 
‘संहति: कार्यसाधिका’ म्हणजेच ऐक्याने कार्य साधते या संस्थेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे संस्थेच्या स्थापनेपासून आतापावेतो होऊन गेलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे सर्व घटक यांच्या अथक परिश्रमाने व समाजाच्या साहाय्याने संस्थेचा कार्यविस्तार नाशिक जिल्ह्यामध्ये शहर ते अतिग्रामीण भागापर्यंत झालेला आहे. सद्यःस्थितीत संस्था प्रामुख्याने नाशिक, नाशिक रोड, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव या संकुलांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत 51 शैक्षणिक केंद्रांमध्ये ज्ञानदानाचे कार्य अव्याहतपणे करीत आहे. नुकतेच संस्थेने नाशिक व सिन्नर येथे कला व वाणिज्य महाविद्यालये सुरू केली आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन, नाशिक व सिन्नर येथे संस्थेने औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे आयटीआय सुरू केली आहेत. ही दोन्ही केंद्रे आत्मनिर्भर करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत सिन्नर येथे विविध कोर्सेस विनामूल्य सुरू केले आहेत. नाशिक येथे युवकांसाठी स्वावलंबी भारत अभियानअंतर्गत उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. तसेच व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने नाशिक येथे बी.बी.ए., बी.सी.ए. आणि बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स हे कोर्सेस लवकरच सुरू होणार आहेत. संस्था कष्टकरी व नोकरीनिमित्ताने दिवसा शिक्षणापासून वंचित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी गेली 70 वर्षे रात्रशाळा चालवीत आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे नाशिक रोड येथे संस्थेने रात्र महाविद्यालय सुरू केले आहे. भविष्यात उच्च तंत्र शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास संस्था प्रयत्नशील राहील.
 
संस्थेचे विविध उपक्रम
 
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा व तो सुजाण नागरिक बनावा, त्यांच्यात सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचे बीजारोपण व्हावे यासाठी संस्था गेली अनेक वर्षे विविध उपक्रम अव्याहतपणे राबवीत आहे. यामध्ये प्रामुख्याने कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा, कै. खंडेराव लेले सूर्यनमस्कार स्पर्धा, विविध वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा महोत्सव, कृतज्ञता सोहळा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, संस्कृती ज्ञान परीक्षा, शिवचरित्र परीक्षा अशा विविध उपक्रमांचे संस्था सातत्याने व यशस्वीपणे आयोजन करीत आहे. तसेच सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गुरुवर्य कै. रं. कृ. यादी स्मृती व्याख्यानमाला व कै. सुमनताई बर्वे स्मृती व्याख्यान यांचे दरवर्षी आयोजन करते.
 

vivek 
 
सर सी. व्ही. रमण अकादमीच्या माध्यमातून संस्थेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केले जाते. मागील शैक्षणिक वर्षात इ. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत सात विद्यार्थ्यांना, तर 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 21 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतही दर वर्षी विद्यार्थ्यांना यश प्राप्त होत आहे. तसेच संस्थेने 2006 पासून केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असणारा ‘फंक्शनल इंग्लिश कोर्स’ संस्थेच्या विविध शाळांमध्ये सुरू केला आहे. संस्कारक्षम शिक्षणाला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. नाशिक रोड येथील शाळांमध्ये ’डिजिटल क्लासरूम’ तयार केले असून अन्य संकुलांमध्येही असे वर्ग तयार केले जाणार आहेत. संस्थेच्या सर्व शाळा मुख्यालयाशी इंटरनेटने जोडलेल्या आहेत व संस्था डिजिटल कामकाजावर भर देत आहे. यासाठी संस्थेची संगणक अकादमी कार्यरत आहे. संगणक अकादमीच्या माध्यमातून जिल्हास्तरावर 'CompuTalent'  स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यामध्ये संस्थेच्या शाळांव्यतिरिक्त अन्य संस्थेतीलही हजारो विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केंद्र शासनाच्या अनुदानातून अटल टिंकरिंग लॅब नाशिक, नाशिक रोड, इगतपुरी येथील माध्यमिक शाळांमध्ये सुरू झाल्या असून सिन्नर येथेही लवकरच सुरू होणार आहे. या अटल लॅबमधून विद्यार्थ्यांना संगणकाचे आधुनिक ज्ञान दिले जात आहे. तसेच या डिजिटल युगामध्ये संस्थेतील विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानात मागे राहू नये म्हणून IOT (Internet of Things) सारखे उपक्रम सुरू केलेले आहेत.
 
 
विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेने क्रीडा प्रबोधिनी सुरू केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून टेनिस, व्हॉलीबॉल, कॅरम, ज्युदो, कुस्ती, खोखो, कबड्डी, बुद्धिबळ, मल्लखांब इत्यादी विविध खेळांचे मार्गदर्शन केले जाते. राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या क्रीडा प्रबोधिनीचे यश म्हणजे संस्थेतील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये विजेतेपद मिळवले आहे.
 
 
संस्थेचे त्रैमासिक ’ज्ञानयात्री’
 
संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे माजी अध्यक्ष कै. द.शं. तथा काका नाईक यांच्या प्रेरणेने हे त्रैमासिक 2008 पासून सुरू आहे. संस्था व शाळा स्तरावर राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती सर्वांना व्हावी व विद्यार्थी, शिक्षक यांच्या लेखन कलेला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या विचारांना व्यासपीठ असावे यासाठी संस्थेने ’ज्ञानयात्री’ त्रैमासिक सुरू केले आहे.
 
 
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
 
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. यासाठी संस्थेने प्राथमिक तयारीही सुरू केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी बालवाडी व प्राथमिक स्तरावर सुरुवातीला होणार असल्याने, त्या दृष्टीने संस्था विद्याभारतीच्या साहाय्याने शिक्षकांच्या कार्यशाळा व कृतिसत्रांचे आयोजन करीत असते. विशेष आनंदाची बाब म्हणजे या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या विविध समित्यांमध्ये संस्थेचे सदस्य व शिक्षक कार्यरत आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती समिती व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजे ’बालभारती’ अभ्यास मंडळ सदस्य म्हणून संस्थेच्या सदस्यांची व शिक्षकांची शासनाने नियुक्ती केली आहे. संस्थेच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद आहे.
 
 
माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा
 
संस्थेला माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. या माजी विद्यार्थ्यांमध्ये कविवर्य कुसुमाग्रज, माधव मनोहर, दत्ता भट, शिवाजी तुपे, बापू नाडकर्णी, माजी खासदार कै. गो. ह. देशपांडे, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, खासदार कै. उत्तमराव ढिकले, अभिनेते गिरीश ओक, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रमेश रासकर (MIT लॅब, बोस्टन), ब्रिगेडियर योगेश कुलकर्णी यांसारखे अनेक सन्माननीय व प्रथितयश माजी विद्यार्थी आहेत. माजी विद्यार्थी हे संस्थेचे बाह्य जगात एक प्रकारे प्रतिनिधित्व करतात व समाजात संस्थेची प्रतिष्ठा वृद्धिंगत करतात. त्यांचे यश वर्तमान विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.
 
 
मान्यवरांच्या भेटी
 
संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना, उपक्रमांना मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी रेल्वेमंत्री स. का. पाटील, भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी, सेतुमाधवराव पगडी, शंकर अभ्यंकर, यु. म. पठाण, शांताबाई किर्लोस्कर, रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह मा. भय्याजी जोशी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भिकुजी तथा दादा इदाते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दवणे यांसारख्या अनेक मान्यवरांचा उल्लेख करता येईल.
 
 
‘ज्ञानं परम बलम्!’ ज्ञान हे सर्वोच्च बळ आहे. विद्यार्थ्याचे भविष्यातील जीवन समृद्ध होईल असे शिक्षण देऊन, तो देशाचा आदर्श नागरिक बनेल यासाठी संस्था कटिबद्ध आहे. संस्थेचा हा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी आहे. संस्थेची ही उज्ज्वल परंपरा कायम टिकवून, संस्था काळानुसार शिक्षणातील बदल स्वीकारून प्रगतिपथावर मार्गक्रमण करेल, असा विश्वास वाटतो.
 
लेखक या शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम पाहतात.
Powered By Sangraha 9.0