विश्वभरारी घेणारे महाराष्ट्रातील उद्योजक

30 Apr 2024 17:09:50
@अनंत तायडे
 
मलकापूरसारख्या एका सामान्य शहरातील नावलौकिक पावलेले उद्योजक म्हणजे डॉ. अशोक देशपांडे आणि संतोष बोरगांवकर होय. उद्योगाची पारंपरिक मळलेली पायवाट सोडून स्वतंत्र उद्योजक- यशस्वी उद्योजक होऊ शकतो आणि महाराष्ट्रातील उद्योजकही विश्वभरारी घेऊ शकतो, हे त्यांनी नवीन पिढीसमोर उदाहरण प्रस्थापित केले. चैतन्य केमिकल्स ते चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे छोट्या रोपट्याचे वटवृक्षातील रूपांतर होय. त्यांच्या उद्योगविश्वाचा आढावा या मुलाखतीतून संवाद साधत घेतला आहे.
 
chaitanya group of industries 
 
भारतीय जीवनपद्धतीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ यशस्वी जीवनाचे आणि आंतरिक मानसिक विकासाचे चार आधारस्तंभ समजले गेले आहेत. हिंदू संस्कृतीचा विकास म्हणजे अप्रत्यक्षरीत्या या चार पुरुषार्थांच्या ऐतिहासिक वाटचालीचाच इतिहास आहे. आजही आधुनिक काळाच्या संदर्भात याच चारी पुरुषार्थांच्या रूपाने भारत ‘समर्थ भारत’ आणि विविध रूपांनी ‘विकसित भारत ’होण्याच्या मार्गावर वाटचाल करताना आपण अनुभवतो आहे. या सर्व प्रगतीमध्ये भारतातील प्रत्येक ठिकाणी कार्यरत असलेल्या उद्योजकांचा सिंहाचा वाटा आहे. मलकापूरसारख्या एका सामान्य शहरात हा वाटा उचलणारे उद्योजक म्हणून येथील परंपरेने रहिवासी असलेले अशोक गोविंदराव देशपांडे आणि त्यांच्यासमवेत कार्य करणारे संतोष प्रभाकरराव बोरगांवकर हे दोन्ही मलकापूरच्याच नव्हे, तर आता संपूर्ण महाराष्ट्रात ख्यातनाम उद्योजक म्हणून प्रसिद्धीला आले आहेत. सर्वसामान्यपणे घराण्याची व्यवसायाची जी परंपरा असते त्याच परंपरेमध्ये त्या कुटुंबातील नवीन पिढी प्रस्थापित होते अशी जगरहाटी आहे. म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील, शिक्षकाचा मुलगा शिक्षक, उद्योजकाचा मुलगा उद्योजक इत्यादी; पण या दोघांनी त्या परंपरेला छेद दिला, कारण डॉ. अशोकराव देशपांडे यांचे पिता गोविंदराव देशपांडे हे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय शिक्षणाचा वसा घेऊन प्रारंभ झालेल्या मलकापुरातील मलकापूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल (स्थापना 1933) या विद्यालयात शिक्षक होते. त्यांना एकूण चार मुले. उच्च विद्यापीठात तिघांनी सरळ सोपा स्थैर्य देणारा नोकरीचा मार्ग स्वीकारला, तर सर्वात धाकटे डॉ. अशोकरावांनी स्वतःच्या मलकापूरमधील स्थावर शेतजमिनीचा नीटपणे उपयोग करून तेथे सन 1987 मध्ये चैतन्य केमिकल्सची स्थापना केली. पूर्वायुष्यात नोकरीच्या निमित्ताने त्यांचा बोरगांवकरांशी मित्रत्वाचा संबंध आलाच होता. याही व्यवसायात सहकारी म्हणून राहण्याची इच्छा डॉ. अशोकराव देशपांडे यांनी व्यक्त केल्याबरोबर काही तरी वेगळेच करावे आणि आपला पुरुषार्थ संपन्न करावा, अशा धारणेतून दोघांनीही मळलेली पायवाट सोडली आणि उद्योजक म्हणून आपली उज्ज्वल प्रतिमा स्थापित केली. त्यांच्या चैतन्य केमिकल्स या प्रोजेक्टची वाटचाल कशी झाली, हे सांगणारी ही मुलाखत.
 
आपल्या व्यवसायाची वाटचाल कशी झाली?
 
चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची सुरुवात 1987 साली झाली. चैतन्य केमिकल्स या नावाने ‘इवलेसे रोप लावले दारी त्याचा वेलू गेला गगनावेरी’ या उक्तीप्रमाणे आज चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या तीन उपकंपन्या आहेत.
 
 
1. चैतन्य केमिकल्स
 
2. चैतन्य बायोलॉजिकल्स प्रा. लि.
 
3. चैतन्य ग्रो बायोटेक प्रा. लि.
 
 
तिन्ही कंपन्यांमध्ये संतोष प्रभाकर बोरगांवकर व डॉ. अशोक गोविंद देशपांडे हे संस्थापक सदस्य आणि संचालक आहेत व तसेच आता नवीन पिढीतील प्रसन्ना अशोक देशपांडे हेसुद्धा संचालक म्हणून त्यांचा कारभार पुढे नेत आहेत.
 
 
vivek
 
जसजसा ग्रुप मोठा होत गेला, तसे कामाचे वर्गीकरण करण्यात आले व चैतन्य बायोलॉजिकल्स प्रा. लि.चा संपूर्ण कारभार संतोष प्रभाकर बोरगांवकर व इतर कंपन्यांचा कारभार डॉ. अशोक गोविंद देशपांडे व प्रसन्ना अशोक देशपांडे हे पाहत आहेत. हे काम सुलभ रीतीने व्हावे व ग्राहकाला वेळेवर सेवा मिळावी यासाठी केलेले हे विभाजन आहे. यात फक्त कामाचे वर्गीकरण झाले; पण संचालक मंडळामध्ये तिन्ही कंपन्यांमध्ये दोघे संस्थापक सदस्य व प्रसन्ना अशोक देशपांडे यांचा सहभाग आहे.
 
 
जसजसा व्यवसाय वाढत गेला व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला तसतसा आमचा ग्रुप वाढत गेला. आज रोजी चैतन्य बायोलॉजिकल्स प्रा. लि.चे उत्पादन 80 टक्के निर्यात होते व 20 टक्के देशांतर्गत विक्री होते.
 
 
निर्यातीच्या क्षेत्रात कधीपासून आहात व कोणकोणत्या देशात कोणकोणत्या उत्पादनांची निर्यात होते? मुख्य ग्राहक कोण? महाराष्ट्रातील उद्योजकांचे निर्यात क्षेत्र, त्यातही तुमच्या क्षेत्रात प्रमाण किती?
 
साधारणतः 2005 पासून आम्ही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये निर्यात करण्याचे लक्ष्य ठरविले. त्यानुसार काटेकोर नियोजन केले व सर्वात प्रथम आम्ही जर्मन ग्राहकाला निर्यात केली, त्याला मान्यता मिळाली आणि आमचा विश्वास द्विगुणित झाला. त्यापुढे निर्यातीचा ओघ निरंतर वाढतच गेला. आजपावेतो आमची उत्पादने आम्ही 56 देशांत निर्यात करतो. त्यात खालील देशांचा व खंडाचा समावेश होतो.
 

chaitanya group of industries 
 
1.USA 
2. Latin USA
3. South USA 
4. Canada 
5. Brazil
6. Turkey
7. Middle East Countries
8. Asia Pacific Countries
9. Row Crest of World
10. Mana Countries.
  
आज रोजी चैतन्य बायोलॉजिकल्स प्रा. लि.ची 80 टक्के विक्री फक्त निर्यातीमधून होते व काही देशांमध्ये उदा. USA, Brazil, Argentina, Turkey, Bangladesh मध्ये आमचा 100 टक्के वाटा आहे.
 
निर्यात क्षेत्रात काम करण्याची संधी कशी मिळाली? या क्षेत्रातला पहिला अनुभव कसा?
 
 
आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत व जी उत्पादने आम्ही बनवतो त्याला (API) Active Pharmaceuticals Ingrediants असे म्हटले जाते. या उत्पादनाच्या फार्म्युलेशन्स भारताबाहेर बनतात व त्याची खूप गरज आहे. म्हणतात ना- ‘गरज ही शोधाची जननी आहे’. तसे आम्ही आमची मार्केटिंग पद्धत व प्रत्येक देशातील ग्राहकांपर्यंत कौशल्याने पोहोचलो, त्यांच्या गरजा समजून घेतल्या व त्यानुसार आम्ही आमचा उद्योग जागतिक दर्जानुसार तयार केला. आज आमच्याकडे WHO - GMP, WC, Kosher, ISO अशी जागतिक दर्जाची प्रमाणपत्रे आहेत. आमच्या उद्योगात आमच्या सर्व जागतिक खरेदीदारांनी ऑडिट मंजूर केला आहे.
 

chaitanya group of industries
 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादनाच्या दर्जाच्या कोणत्या कसोट्या पार कराव्या लागतात? त्याचा अनुभव कसा? तुमचा काय अनुभव?
 
 
आमची उत्पादने निर्यात करणे इतके सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचा उद्योग USFDA Standard ला Upgrade करावा लागतो. प्रत्येक देशात DMFC (Drug Master Files) त्यांच्या आरोग्य खात्यांकडे नोंदणी करावी लागते व नंतर ऑडिट होते आणि नंतर तुमचा उद्योग मंजूर होतो. या सगळ्या कसोट्या आम्ही दिवसरात्र मेहनत घेऊन पार पाडल्या व त्यामुळेच आज आम्ही जवळपास 56 देशांत निर्यात करू शकलो. सांगण्यास आनंद होतो की, आजपर्यंत आमचे एकही उत्पादन त्याच्या दर्जामुळे नामंजूर झाले नाही.
 
 
निर्यात क्षेत्रात भारताचा प्रभाव व प्रतिष्ठा वाढते आहे का? तुमचा काय अनुभव?
 
 
भारताचा निर्यात क्षेत्रातील प्रभाव लक्षणीय आहे. कोविडच्या काळात तर भारताने आपला ठसा उमटवला, त्या चैतन्य बायोलॉजिकल्स प्रा. लि.ने आपली व्हिटामिनयुक्त उत्पादने जगातील सर्व देशांना निर्यात करून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. आजही जेव्हा आम्ही भारताबाहेर प्रदर्शन करतो- CPHI World Wide जे जर्मनी, इटली येथे होते, त्या कार्यक्रमांमध्ये भारतातील कंपन्यांचा बोलबाला असतो. भारतीय कंपन्यांना एक आगळीवेगळी प्रतिष्ठा मिळाली आहे.
 


chaitanya group of industries 
 
घरातील पुढची पिढीही तुमच्याबरोबर काम करते आहे, जबाबदारी सांभाळते आहे. त्यांचे निर्यात उद्योगाविषयी काय मत?
 
आम्ही दोघांनी (संतोष बोरगांवकर व डॉ. अशोक देशपांडे) आमचे आयुष्य ग्रुपसाठी वाहिले आहे. ‘जगासाठी भारतात बनविलेले दर्जेदार उत्पादन’(Quality Product Made in India for the World) हे आमच्या उद्योगाचे सूत्र आहे. आतापर्यंत त्यामध्ये कोणतीही तडजोड आम्ही केली नाही. आता प्रसन्ना अशोक देशपांडे हा आमच्या पुढील पिढीतील तरुण उद्योजक म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहे. प्रसन्नादेखील आम्ही उद्योगात प्रस्थापित केलेली सूत्रे वृद्घिंगत करण्यासाठी मेहनत घेत आहे, ही आम्हासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0