आरोग्य क्षेत्रातील ‘अजय’ यात्रा

विवेक मराठी    30-Apr-2024   
Total Views |
डॉ. अजय हौदे हे सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी खेड्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील होते. अजय यांनी पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केले. काही रिसर्च प्रकाशने आणि तीन पेटंट्स मिळाल्यावर आज त्यांच्या नावे 68 पेटंट्स आहेत, ज्याचा उपयोग विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यात केला गेला. आरोग्य क्षेत्रात ही ‘अजय’ यात्रा निरंतर चालू आहे.
 
vivek
 
सत्तरच्या दशकातील एक गोष्ट. करजगी नावाच्या एका सोलापूर जिल्ह्यातील गावातील एक शाळकरी मुलगा, मित्राबरोबर गप्पा मारत जात होता. दोघेही मित्र मोठेपणी कोण होणार ह्याची स्वप्ने एकमेकांना सांगत होते. मी हायस्कूलनंतर इथेच कुठे तरी नोकरी मिळवणार आहे. जिथे मला पुरेसा पगार मिळेल आणि ज्यातून महिन्यातून एक पार्ले-जीचा बिस्किटाचा पुडा मी स्वतःसाठी घेऊन खाऊ शकेन. हे स्वप्न अर्थातच त्या मुलाच्या, अजयच्या, त्या वेळच्या वयाला अनुसरून असलेल्या इच्छा पूर्ण करण्याचे जसे होते तसेच त्या वेळेस कुठे तरी स्वतःच्या तत्कालीन परिस्थितीमुळे असलेल्या मर्यादांची जाणीव करून देणारेही होते; पण घरातून पाठिंबा, वयानुरूप वृद्धिंगत होणारी महत्त्वाकांक्षा, त्याला अनुसरून मार्गदर्शक, या सर्वांचा वापर करून प्रयत्न केले तर नशीबही साथ देऊ शकते. डॉ. अजय हौदे यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन काहीसे असेच करावे लागेल.
 
 
अजय यांचा जन्म हा सोलापूर जिल्हा, अक्कलकोट तालुक्यातील दुधनी या खेड्यात एका लहान शेती करणार्‍या परिवारात झाला. केवळ पाच महिन्यांचे असताना अजय यांना पितृशोक झाला आणि जबाबदारी आईवर पडली. आई करजगी नावाच्या खेड्यात शिक्षिकेचे काम करू लागली. अजय यांचे प्राथमिक शिक्षण हे अक्कलकोटला झाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे करजगीला झाले. तो काळ जसा ट्यूशन लावायचा नव्हता, किंबहुना तो शब्दच व्यवहारात नव्हता, शाळेतले शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये मनापासून रस घेऊन शिकवण्याचा होता. अजय यांना असेच शिक्षक मिळाले ज्यांच्याकडे शाळा सुटल्यावर जाऊन अधिक अभ्यास घेतला जायचा. केवळ परीक्षेसाठीचा नाही तर विद्यार्जनाचे संस्कार देणारा अभ्यास. रात्रभर शिक्षकांकडे राहून पहाटे चार वाजता अजय घरी जाऊन आवरत असत आणि मग शाळेत जायचे.
 
 
बघता बघता शाळा संपली. नोकरी करण्याचा विचार होता खरा; पण शिक्षक मध्ये आले. त्यांनी आईला समजावून सांगितले आणि समजूत काढली की, मुलाने महाविद्यालयीन शिक्षण घेणेही महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने पैशाच्या काळजीने हो-नाही म्हणत, अजय यांना शिकायला जायची परवानगी मिळाली. मित्राकडे राहायची सोय झाली. सोलापूरचे दयानंद कॉलेज जवळ होते. म्हणजे, आई त्यांना सकाळी गावातून निघालेल्या एसटी ड्रायव्हरबरोबर डबा पाठवू शकायची. अर्थात तिला हे कधी कळायचा प्रश्न आला नाही की, बसच्या वेळा-अवेळा आणि एकूणच सोलापूरची हवा त्यामुळे डबा बर्‍याचदा उघडेपर्यंत खराब झालेला असे; पण मित्राच्या आईने सकाळी अथवा संध्याकाळी उपाशी राहू दिले नाही. अशातच 11-12वी झाली. आई, शिक्षक इथपासून सुरू झालेला प्रवास, चांगले मित्र मिळाले म्हणून बी.एस्सी.च्या मार्गावर गेला. बी.एस्सी.नंतर आता नोकरी करायला लागणार असे वाटत असताना, एम.एस्सी.ने आकर्षित केले. आईने आधी, परत परिस्थितीमुळे कमी उत्साह दाखवला तरी नंतर मावशी आणि मावशीचे पती यांचे ऐकून आणि त्यांच्याकडून 5000 रुपये उसने घेऊन, अजय यांना सोलापूरला शिकायला पाठवले.
 

vivek 
 
अजयजी तिथे पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. झाले आणि नोकरीधंद्याचा विचार करू लागले. नोकरी मिळणे सोपे जात नव्हते आणि शोधणे थांबत नव्हते. त्या काळात इंटरनेट सोडा, साधा फोनपण नसायचा. कुठे अर्ज केला तरी पोस्टाने आणि येणारे उत्तरही पोस्टानेच. अशा वेळी दररोज पोस्टात जाऊन काही हवे तसे पत्र आले आहे का, हे अजयजी पाहायला जात होते. परत एकदा नवीन वळण लागायची वेळ आली होती. पोस्टमास्तर बघायचा, हा पोरगा दररोज येऊन कसल्या इतक्या पत्राची वाट पाहत आहे. त्याने अजयजींना विचारले, तेव्हा समजले त्यांचे शिक्षण काय आहे आणि ते कशात नोकरी शोधत आहेत. पोस्टमास्तरने सांगितले की, त्यांचा मुलगा सुभाष खट्टे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) मध्ये आहे. त्याच्याशी बोलून बघ. तेव्हा समजले, एनसीएलमध्ये ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटच्या जागेसाठी नोकरी उपलब्ध आहे. त्या जागेसाठी अर्ज केला आणि मुलाखतीला बोलावले गेले. तिथे त्या वेळेस वाटलेले एक नवीन आव्हान समोर आले. अजून एका अनिता नावाच्या मुलीने कामासाठी अर्ज केला होता. दोघांत कुणाला काम मिळेल यावरून स्पर्धा होती; पण झाले वेगळेच. एनसीएलने दोघांनाही त्याच पदासाठी घेतले. अजय आणि अनिता हे पुढे केवळ लॅबमधील सहकारी न राहतात, एकमेकांचे सहधर्मचारी झाले. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते. अनिता ह्या अजय यांचे सर्व प्रकारचे प्रयत्न, आव्हाने आणि यशाच्या मागे खंबीर उभ्या राहिल्या, ह्याची अजय यांना असलेली जाण कायम बोलण्यातून जाणवते.
 
 
एनसीएलच्या प्रयोगशाळेत त्यांना काम मिळाले ते डॉ. रघुनाथ माशेलकरांचे होते. माशेलकरांमुळे अजय यांना आयुष्यातील पुढची दिशा मिळाली. माशेलकरांनी अजय यांना एनसीएलमधून पीएच.डी. कर, असे सुचवले. महिन्याला रु. 600 चा भत्ता मिळणार होता. घरी आईबरोबर चर्चा केलीच; पण आईला अजून प्रश्न आहेत हे कळल्यावर माशेलकरांनी तिला पुण्यात बोलावून शंकानिरसन केले आणि पीएच.डी.चा मार्ग मोकळा झाला. त्यांनी डॉ. मोहन कुलकर्णी तसेच सिराक्यूज विद्यापीठ, न्यू यॉर्कमध्ये शिकलेले आणि भारतात परतलेले डॉ. सुधीर कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पीएच.डी.चे अध्ययन 1991 मध्ये पार पडले. परीक्षक म्हणून माशेलकर होते. डॉ. कुलकर्णींनी अजय यांचे काम पाहून त्यांनादेखील अमेरिकेत विद्यापीठात जाऊन संशोधनाचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला.
 
 
vivek
 
1991 साली जेव्हा अजय अमेरिकेत आले तेव्हाची अमेरिका ही आत्ताच्या अमेरिकेपेक्षा वेगळी होती. माहिती आणि तंत्रज्ञान यांच्यातील क्रांती सुरू होण्याच्या आधीचा तो काळ होता. संगणक हे अजूनही घराघरांत आले नव्हते. मोबाइल फोन प्रकार सर्वत्र नव्हता. स्मार्टफोन आणि व्हॉट्सअ‍ॅपचा काळ नक्कीच नव्हता. घरी अथवा इतर कुठे अमेरिकेतदेखील साधा फोन करायला लागणारे पैसे सुरुवातीस भारतीयांना परवडायचे असे नाही. भारतीय समुदाय आजही अमेरिकन लोकसंख्येच्या 1 टक्क्याहून कमी आहे. त्या वेळेस तर कदाचित अर्धा टक्काच असावा किंवा त्याहूनही कमी... भारतीय आणि अगदी अमेरिकन मध्यमवर्ग हा पैशाने आजच्यापेक्षा खूपच नियंत्रणात होता. मोठे उद्योग करणे हे शक्य नव्हते. जैवतंत्रज्ञान (Biotech) आणि आरोग्य या क्षेत्रांतले उद्योग सुरू करणे हे आजही सोपे नाही आहे. एखादे संशोधन करण्यामध्ये जाणारा वेळ हा काही वर्षांचा असतो. त्यानंतर त्याच्या विविध चाचण्या, त्या करत असताना पाळायची गोपनीयता, पेटंट मिळवणे आणि मग सरकारी संस्थांकडून ते जनतेत वापरण्याचा परवाना मिळवणे यात दशकाहून अधिक काळ जातो. त्यानंतर ते उत्पादन बाजारात आणून यशस्वीपणे विकणे... त्या काळात भांडवल मिळवणे आणि हे यशस्वी करणे हे मोठे आव्हान असते. अजय यांना याची कल्पना 1991 ते 1995 मध्ये सिराक्यूज विद्यापीठ, न्यू यॉर्कमध्ये पोस्ट-डॉक्टरेट करताना येत होती.
 
 
सिराक्यूज विद्यापीठमध्ये सुरुवातीच्या संशोधनाच्या अनुभवानंतर आणि ग्रीन कार्ड मिळाल्यावर ते खासगी क्षेत्रात अनुभव घेण्यासाठी गेले. कागद उत्पादनाच्या व्यवसायात काही वर्षे काम, नंतर मिलवॉकी या उत्तरेतील विस्कॉन्सिन राज्यात काही काळ काम केल्यावर ते दक्षिणेत अटलांटा जॉर्जियामध्ये स्थायिक झाले, जेथे किंबर्ली क्लार्क नावाच्या जगभर पसरलेल्या आरोग्य संदर्भातील विविध प्रॉडक्ट्स करणार्‍या कंपनीत विविध विभागांत त्यांनी संशोधन केले, ज्यातून अनेक जीव वाचवणारी उपकरणे तयार करण्यात आली. त्यांच्या ह्या शास्त्रीय संशोधनाच्या कामातूनच त्यांना पेटंटचे महत्त्व समजले. सुरुवातीस काही रिसर्च प्रकाशने आणि तीन पेटंट्स मिळाल्यावर खूश झालेल्या अजय यांना आजपर्यंत 68 पेटंट्स मिळाली आहेत ज्याचा उपयोग विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यात केला गेला. अर्थात, जरी ह्या कामातून त्यांना नाव आणि बाकीचे सर्व फायदे झाले तरी अजून पूर्णपणे स्वत:चे म्हणून काही काम करण्याचे स्वप्न त्यांनी दूर लोटले नव्हते. दोन्ही मुले, अमृता आणि अमेय यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, अजय यांनी नवीन आव्हान स्वीकारायचे ठरवले. त्यांनी स्वत:ची आरोग्य क्षेत्रातील कंपनी काढली, ज्यात स्वत:ची सगळी आर्थिक साठवण ओतली.
 
 
वर आधी म्हटल्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रातील उद्योगात भांडवल मिळणे आणि तो पूर्ण साकार होणे ह्यामध्ये वेळ द्यावा लागतो. सुरुवातीची 3-4 वर्षे स्वत:च्या साठवलेल्या वर्षानुवर्षांच्या मिळकतीवर त्यांनी आणि त्यांचे मित्र क्लेम्सन विद्यापीठातील प्रा. नरेंद्र व्यवहारे यांच्याबरोबर Annoviant (https://annoviant.com/) ही कंपनी चालू केली. या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. जगभर साधारण 13 लाख मुलांना हृदरोग होतो ज्यात करोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज होते. ह्यामध्ये आत्ताची वापरात असलेली स्टेंट रोपण करण्याची टेक्नॉलजी वापरता येत नाही. केवळ बायपास सर्जरीचा उपायच उरतो. त्याला पर्याय म्हणून ह्या कंपनीने क्लेम्सन विद्यापीठाशी सामंजस्य करार करून TxGuard tm technology नामक नवीन तंत्रज्ञान तयार केले आहे. आता ह्या कंपनीकडे असलेले हे विशेष आणि महत्त्वाचे तंत्रज्ञान पाहून अमेरिकन सरकारचे अनुदान तसेच खासगी भांडवल उपलब्ध झाले आहे. लवकरच हे तंत्रज्ञान अमेरिकेत सर्वत्र उपलब्ध होणार आहे आणि नंतर ते जगभर पसरेल. त्याव्यतिरिक्त अजय यांनी, Sawnee Healthcare ही कोव्हिडकाळात मित्र आणि उद्योजक राहुल पुराणिक यांच्याबरोबर कंपनी चालू केली. अजय यामध्ये  Global Innovation Leaderम्हणून जबाबदारी सांभाळतात. त्याव्यतिरिक्त Global Healthcare Innovations, LLC (www.ghcinnovations.com) ह्या कंपनीचे अध्यक्षपददेखील त्यांनी यशस्वीपणे सांभाळले.
 
 
अजय हे सामाजिक कार्यातही त्यांच्या व्यावसायिक कार्याइतकेच सक्रिय आहेत. बी.एस्सीला असताना त्यांचा अभाविपाशी संपर्क आला आणि ते महाविद्यालयात असताना सक्रिय कार्यकर्ता होते. अभ्यासानंतर, व्यावसायिक आव्हाने झेलत असताना अजय यांना सामाजिक कामाचे आकर्षण राहिले. परिणामी ते स्थानिक मराठी मंडळ ते संपूर्ण अमेरिकेत जाळे असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळात (BMM) ते सक्रिय राहिले. BMM² चे ते अधिवेशनाचे अध्यक्ष आणि समितीत सक्रिय होते. अटलांटाला स्थायिक झाल्यावर ते प्रथम हिंदू मंदिर तसेच अमेरिकेच्या विश्व हिंदू परिषदेत सक्रिय होते; पण साधारण 2000 पासून हिंदू स्वयंसेवक संघात (HSS) सक्रिय झाले. गेली काही वर्षे अजय हे अमेरिकेच्या HSS दक्षिणपूर्व संभागाचे माननीय सहसंघचालक आहेत. त्याव्यतिरिक्त Global Indian Scientists and Technocrats, Foundation for India and Indian Diaspora Studies (FIIDS), USA, Hindus of Georgia Political Action Committee, International Day of Yoga, Atlanta, GA, Federation of Indian-American Associations of Georgia, अशा विविध संस्थांमध्ये ते ट्रस्टी म्हणून तसेच इतर महत्त्वाची पदे भूषवत आहेत.
 
 
अजय यांचे जन्मापासूनचे अनुभव बघत असताना एक जाणवते, त्यांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले; पण त्यांच्यात कडवटपणा न ठेवता ते पुढे जात राहिले. म्हणूनच कदाचित नशीबही त्यांच्याबरोबर कधी परीक्षा बघत पण चालत राहिले. त्यातूनच समाज आरोग्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात त्यांना अनेक गोष्टी करता आल्या आणि अजूनही नित्यनवीन गोष्टी करता येत आहेत.