दरबार

24 Apr 2024 17:01:56
‘मम्मे.. आमी दरबार दरबार ख्येळत हुतो णा.. कशाला आलीस मदी..!? पप्पा घाबारलं.. आता तेंच्या त्वांडातून शबूद न्हाई फुटायचा.. श्शी मम्मे..!’ आद्या कारवादला.. रश्मिआक्का आद्याच्या बापाला भडकून बोल्ली, ‘पोरात ख्येळता व्हय..!? त्ये बी म्हाराज बनून..!? लाज कशी वाटंना बाई..!?’ ‘आओ त्ये जरा भाशनाची प्र्याक्टीस करून घ्यावी म्हटलं.. पोरंबी खूश झाल्ती माजी भाशनं आयकून.. लय हासत हुती.. पन तुमी आलात नी.’ आद्याचा बाप दबकत बोल्ला.. त्यावर रश्मिआक्का पुन्ना भडाकली.. 

vivek
 अर्कचित्र - अमोघ वझे
 
 दुपारचं चार घास पोटात ढकलून रश्मिआक्कानं जऽऽरा पाठ ट्येकली आसंल तंवर तिला कायतरी जळाल्याचा वास यू लागला.. भाईर कियतरी टायरी बियरी जाळल्या आसतीन म्हनून रश्मिआक्कानं कूस बदालली.. पन जरायेळानं तिच्या खुलीच्या दारातनं काळा धूर दिसला आन् तिचं धाबंच दनानलं.. ती त्ताडकनी उटली आनी धूराचा माग काडत मागल्या आंगनात यून धडाकली..! बगती तर आंगनात पोरं ‘दरबार दरबार’ खेळंत हुती.. दोन टायरी आडव्या टाकून तेच्यावं फळकूट टाकून आनी साईडला दोन आनी फाटीम्हागं येक टायर उभी करूण शिव्वासण बनवल्यालं.. तेच्या म्हागं तेज्या आनी वरन्या हातात मशाली घेऊण हुबे केल्याले.. त्या मशालीत घरातली पायपुसनी कोंबूण आग लावल्याली.. त्यामुळं त्या मशालींचा काळा धूर वार्‍याणं समद्या घरात भरल्याला.. समूर आद्या डुईवं च्या चं भांडं उपडं घालून परधानजी झाल्याला.. शिव्वासणावं कोन बसलया त्ये बगाया रश्मिआक्का डाव्या आंगानं फुडं आली आनी तिच्या मस्तकात तिडीकच ग्येली.. तारेवं वाळंत घाटल्याला फुलाफुलाचा गुडग्यापत्तूर येनारा गाऊन घालून त्येला म्हागं म्होट्टी चादर आडकवून डुईवं ल्यांपशेड आडकवून आद्याचा बाप म्हाराज म्हनून बसल्याला.. त्येचं त्ये रूपडं पाहूण रश्मिआक्का किंचाळलीच..! आद्याचा बाप दचकूण शिव्वासणावरणं उठला तशे समदे टायर जाग्यावरणं निसाटले आनी शिव्वासण मोडलं.. आचाणक रश्मिआक्का समुर आल्याणं काय करावं त्ये न सुचल्याला आद्याचा बाप गुडग्यापत्तूर आखूड फुलाफुलाच्या गाऊणला म्हागं चादर आडकवल्याली आनी डुईवर ल्यांपशेड आशा आवतारात तिच्याम्होरं खुरट्या मिसरूडाम्हागचे दोन पिवळे दात दाकवत हुबा र्‍हायला..!
 
 
‘मम्मे.. आमी दरबार दरबार ख्येळत हुतो णा.. कशाला आलीस मदी..!? पप्पा घाबारलं.. आता तेंच्या त्वांडातून शबूद न्हाई फुटायचा.. श्शी मम्मे..!’ आद्या कारवादला.. रश्मिआक्का आद्याच्या बापाला भडकून बोल्ली, ‘पोरात ख्येळता व्हय..!? त्ये बी म्हाराज बनून..!? लाज कशी वाटंना बाई..!?’ ‘आओ त्ये जरा भाशनाची प्र्याक्टीस करून घ्यावी म्हटलं.. पोरंबी खूश झाल्ती माजी भाशनं आयकून.. लय हासत हुती.. पन तुमी आलात नी.’ आद्याचा बाप दबकत बोल्ला.. त्यावर रश्मिआक्का पुन्ना भडाकली.. ‘आहो.. पोरांला खुश कराया भासनं करता म्हनूनच तुमची भासनं पोरकट हुत्यात आसं लोकं बोलायलीत भाईर..! परवा काय ती व्हागाची गोश्ट सांगिटलीत.. म्हने व्हागीन समोरूण ग्येली पन तिनं ढुंकूनबी पाह्यलं न्हाई.. का तर म्हने तिला काय म्हाईत गाडीत आद्याचा बाप उर्फ चवन्नी टायगर हुबा हाय..!? आशी सोत्ताचीच खिल्ली कोन उडवूण घेतं वो..!?’ रश्मिआक्का फस्रेट हून बोल्ली.. पन चवन्नी टायगर म्हाराज मोडमदला आद्याचा बाप काई आयकंनाच.. ‘आओ खरंच त्या व्हागीनीला म्हायती नवतं का गाडीत आम्मी हाये.. तिनं आम्माला वळखलं न्हाई म्हनून तशीच ग्येली.. न्हायतं मुजरा कराया नक्की आली आसती..!’ रश्मिआक्काला हासावं का रडावं कळंना..
 
 
यवड्यात माजघरातणं ‘वैणी.. ओ वैणी..’ आसं बोंबलंत मागल्या आंगनात आलेल्या आंधारेच्या करिश्माचा यकदम पुतळाच जाला.. ती जागच्या जागीच थिजली.. तिचं तसं का जालं त्ये फकस्त रश्मिआक्काला समाजलं.. रश्मिआक्का जरा ओशाळली आनी आद्याच्या बापाकडं रागाणं पाहात दबक्या आवाजात म्हन्ली, ‘ आद्याचे पप्पा.. त्यो गाऊण काडा आदुगर..!’ ‘पन आमचा खेळ आजून संपला न्हाये मम्मे..’ आद्या किचाटला.. ‘र्‍हाऊद्या ओ.. जरायेळ आजून पोरांला खूश करतो.. काय पोरांनो..!? आयकायच्याना धम्माल गोश्टी..!?’ आद्याच्या बापाणं पोरांला इचारल्यावं पोरांनी ‘व्हय व्हय’ चा कल्ला क्येला.. हिकडं आंधार्‍याच्या करिश्माचा पुतळा बगून रश्मिआक्काचं बीपी व्हाडाया लागल्यालं.. शेवटी पोरांचा कल्ला आनी आद्याच्या बापाचा खुळचटपना बगून रश्मिआक्का समद्यांच्या वर आवाज काडून किंचाळली ‘त्यो गाऊण काहाडा आदुगर.. काल करिश्माणं रफू कराया आनून धिल्ता त्यो पिळून तारेवं वाळत घाटल्याला तुम्ही म्हाराज बनाया घालून फिरताय.. काहाडा त्यो आदुगर..!’ रश्मिआक्काचा आवाज आयकून आता आद्याच्या बापाचा पुतळा जाला.. रश्मिआक्काचं खवळल्यालं रूप पाहूण आद्या आनी तेज्याणं आद्याच्या बापाला ढकलंत घरात न्येला.. आद्याचा बाप जरासा लाजत मुरडतच आत पळाला.. त्ये पाहूण वरन्या हसाय लागला.. आंगनात आंधारेच्या करिश्माचा पुतळा आनी तिच्याम्होरं काळा धूर काहाडनार्‍या आरधावट प्येटलेल्या मशाली बगत रश्मिआक्का मट्टकनी खालीच बसली.. डुईवरचा सूर्व्य भाजून काहाडत हुता..!
Powered By Sangraha 9.0